Wednesday, December 05, 2012

कस्टम-मेड

       परवा थॅंक्स गिविंग वीकेंडला शॉपिंग केली, खूप ! म्हणजे मागच्या वर्षीसारखी रात्री बारा वाजता नाही गेले दुकानात. पण दुसऱ्या दिवशी दिवसभर फिरत राहिलो. कपडे, शूज, घड्याळे, पर्स, स्वेटर, सगळं घेतलं. अगदी गिल्टी वाटेपर्यंत! मग दुसऱ्या दिवशी जाऊन जे नको होतं ते परत करूनही आले, तेव्हा जरा बरं वाटलं. आता जे हवंय ते सर्व घरात आल्यावर, माझी ट्रायल सुरु झाली, हा शर्ट, हा टॉप, ही जीन्स, कशी बसते, कसे दिसतेय. त्यात सानुचे ही ट्राय करून झाले. तिचा उत्साह बघून हसू येतं. म्हणजे 'शेवटी मुलगी कुणाची आहे?' असं  वाटून. एखादा कपडा किती चांगला बसला, कसा दिसला याने माणसाला किती फरक पडावा? :) मला तर खूपच. असो तर ट्रायल झाल्यावर सगळे कपडे, वस्तू घड्या करून ठेवून टाकल्या.
        आधी जो नवीन वस्तू आणल्यावर ती लगेच दुसऱ्या दिवशी जगाला दाखवलीच पाहिजे हा नियम जरा कमी केलाय. ( वय झालं बहुतेक, किंवा पोरांनी पेशन्स वाढवला आहे). आणि घातला तो ड्रेस तरी पहिल्यासारखी मजा नाही येत. (लग्न झाल्यावर कोण विचारतय म्हणूनही असेल म्हणा. :) ) पण  शर्ट, टॉप, जीन्स, पर्स, या सगळ्या गोष्टीना भारतात असताना घेतलेल्या ड्रेस ची सर नाहीच ना. म्हणजे उत्साह निम्मा होऊन इतकी खरेदी करतेय तर निम्माच राहिलेला बरा. तरीही तेव्हा जी मजा यायची ती येताच नाही इथे. मध्ये मैत्रिणीने मेल केली होती, आईकडे गेले होते, तिच्या दोन साड्यांचे ड्रेस शिवायला टाकले. त्यात मुलीचाही ड्रेस कसा बसला तेही. मला तिचा खूप हेवा वाटला. हजार दोन हजार डॉलर खर्च करूनही मला तिच्या त्या ड्रेसचा हेवा वाटत होता.
        तर हे ड्रेस शिवायला टाकणे हे प्रकरणच एकूण मजेशीर. एक सोहळाच तो. दिवाळी, लग्न, नवीन  नोकरी, वाढदिवस असा खास दिवसांसाठीची ही खरेदी. एकतर मित्र-मैत्रिणी सोबत केलेली किंवा घरच्यांसोबत. त्यामुळे कंपनीचा आनंद वेगळाच. तर एक हेतू मनात ठेवून असं नेहमीच्या ठरलेल्या 'रोडवर' जायचे. तिथे पहिली दोन-चार दुकाने नुसती बाहेरूनच बघायची. बरेच वेळा  दुकानात सारख्याच स्टाईलचे कपडे असतात. आपल्याला त्यातला नवीन स्टाईलचा तर हवा असतो पण तरीही वेगळा. थोड्या वेळाने एखाद्या दुकानाच्या बाहेर लावलेला ड्रेस आवडतो. हा ड्रेस म्हणजे पुतळ्याला गुंडाळलेले कापडच. तर ते आवडते म्हणून आत जाऊन विचारायचे, 'कितीला हो?' त्याची किंमत जर बजेटच्या बाहेर असेल तर मग प्रश्नच मिटला. लगेच पुढे जायची तयारी दाखवायची. आणि समजा तो असला आपल्याला हवा त्या रेंज मधला तरीही तो खाली घेतला आहे आणि लगेच पसंत करून पैसे देऊन घरी घेऊन आलोय असे कधी तरी झालेय का? ते ड्रेस मटेरियल आवडले तरी ते बाजूला ठेवून आणखी काही आहे का हे विचारणे आलेच. अजून थोडे पॅटर्न पाहिल्यावर मगआधीचाही चांगला वाटत नाही. आणि काहीच न घेता दुसऱ्या दुकानाकडे रवाना व्हायःचे.
          खरेतर मनात अजूनही तो पहिलाच ड्रेस असतो. बाकीचे कपडे पाहणे हे फक्त त्या आधीच्या ड्रेसला नक्की करण्यासाठी केलेले नाटकच. खूप कमी वेळा असे झाले असेल की मी पुढच्या दुकानात जाऊन ते इतके आवडले की मी परत मागे गेलेच नाही कधी. कधीतरी अगदीच नाही काही आवडले तर एखादा कपड्याचा तागाही पहिला आहे मी. मग त्यात कुर्त्यासाठी किती कापड लागेल तो हिशोब आलाच. त्याला मॅचिंग सलवार चे कापडही शोधायचे. त्यात पिवळा जास्त चांगला की नारंगी हा वाद. कधी दुकानाच्या बाहेर जाऊन उजेडात कापड बघावे म्हणून बाहेर घेऊनही गेले आहे मी. तर कधी एखादा ड्रेस आवडला पण त्याची ओढणी अगदीच काहीतरी होती म्हणून तो नाकारला असंही झालं आहे. अनेक चर्चा, विवाद, बजेट, रंग, दुकानदाराचा एटीट्यूड हे सगळे बरोबर जमले तर मग एक ड्रेस मटेरियल घेऊन त्या दुकानातून बाहेर पडायचे. तोवर जोरदार भूक लागलेली असते. मग रस्त्यात भेल, दाबेली सारखे भयंकर आवडणारे पदार्थ खायचे आणि पुढच्या लढाईला सज्ज व्हायचे.
           हो लढाईच ती, शिंप्याकडे जाण्याची. कुठल्यातरी कोपऱ्यातल्या दुकानात किंवा छोट्याशा घरात जायचे आपला हा 'भारी'चा ड्रेस घेऊन. मी तरी आजतागायत असं खूप मोठ्ठं दुकान आहे शिंप्याच किंवा मोठ्ठा बंगला आहे असं कधी पाहिलं नाहीये. तर त्या टेलर कडे आपले ड्रेस मटेरियल घेऊन जायचे. तिथे रांगेत असलेली बाई/मुलगी आपले मटेरियल कसे शिवायचे ते सांगत असते. तिने आणलेले मटेरियल दुकानात पाहिले होते आणि आपण नाही म्हटले होते यावरून मग खाणाखुणा. टेलर कडे एक बारका पोरगा असतोच नेहमी. तो कुठल्यातरी अजून एखाद्या मुलीचा ड्रेस घेऊन आणून देत असतो. तिचा तयार झालेला ड्रेस, त्याचा पॅटर्न हे चोरून बघून घ्यायचे. मग अगदीच कंटाळा आला तर समोर टांगलेले ड्रेस बघत राहायचे. तेव्हढ्यात मग टेलर दोन-चार पुस्तके आणून देतो. त्यात एक सर्व गळ्यांचे डिझाईन असलेले, एक अख्खा ड्रेस दाखवणारे, एक बाह्यांचे डिझाईन असलेले अशी सगळी पुस्तके चाळत बसायचे.
        शेवटी आपला नंबर येतो. मग त्याच्या समोर अभे राहायचे हात आडवे बाहेर काढून. तो मापे घेणार, मान, गळा (मागचा, पुढचा), दंड, हाताची लांबी, छाती, कंबर, हिप्स (मराठीत काय म्हणतात आठवत नाही), पोटऱ्या, पायाचा घेर, कमरेपासून पायापर्यंतची उंची, खांदा, अशी सगळी मापे घेतो तेही तुम्हाला अजिबात विचित्र न वाटू देता. त्यात मग त्याला सांगायचे, मागच्या वेळी हाताची उंची ६ घेतली होती खूप लांब झाले होते, यावेळी साडेपाच घ्या. मग ड्रेस चा कट कसा चुकीचा होता ते बोलायचे. सगळी मापे घेऊन आणि काढून झाल्यावर कुठल्या टाईप चा गळा (पंचकोनी, गोल, बोट, चौकोनी, की अजून काही), मग बाहीला घुंगरू की नुसती गाठ की गोट लावायचा, कट किती वरपर्यंत घ्यायचा, मागचा गळा किती आणि पुढचा किती ठेवायचा, सलवार कसली शिवायची, सर्वकाही ठरवायचं. शिंपीदादा त्याच्या कोड लिपीत हे सर्व टिपून घेतो. आणि अगदी आपल्याला हवी त्यानंतर १५-२० दिवस उशिराची तारीख सांगतो. मग सर्वांनी,'काय हे, दिवाळी झाल्यावर ड्रेस देणार का? वगैरे टोमणे मारायचे.मग तो आपल्याला हवा त्याच्या दोन दिवस आधीची तारीख देतो. ती ठरली की मग शिलाई किती जास्त म्हणून बोलायचे. तर एकूण सर्व काम होईपर्यंत थकून जायला होतं. आता तिथून बाहेर पडून फक्त एकच काम असतं. आपला ड्रेस कधी मिळणार याची वाट बघायचं.
        हे शिंपी लोक पण ना, चांगले मिळाले तर आपलं नशीब उजळलं म्हणायचं. घरी होते तोवर आईच कपडे शिवायची. तेंव्हा या बाहेर शिवलेल्या, तयार मिळणाऱ्या ड्रेसचं खूप आकर्षण वाटायचं. बारावी नंतर सांगलीला माझ्या मावस बहिणीचा एक टेलर होता. विश्रामबाग वरून सांगलीत येऊन त्याच्याकडे ड्रेस शिवायला टाकायचे. अर्थात तेव्हा फक्त वर्षातून एक दोनच ड्रेस मिळायचे. त्यामुळे ते म्हणजे मोठं काम असायचं. नंतर पुण्यात हाय फैशन च्या समोरच्या बिल्डींगमध्ये एकाकडे जायचे. आतेबहीणीने सांगितलेला. नंतर शर्मिलीच्या समोरच्या बिल्डींगमध्ये द्यायचे, बहिणींनी सांगितले म्हणून. पण माझा मी शोधलेला टेलर म्हणजे मुंबईचा. तो नुसता शिवायचा नाही तर त्यावर इम्ब्रोयडरी पण करून द्यायचा. आणि माझे त्याने शिवलेले जे ड्रेस होते तसे परत कुणाकडेच मिळाले नाहीत. बोरीवलीमध्ये छोट्याशा खोलीत घर आणि मशीन होतं त्याचं. माझं माप लिहूनच ठेवलेलं. एकदा तर मी अमेरिकेत असताना संदीपने ड्रेस मटेरियल आणून त्याच्याकडे शिवायला दिले होते. आणि त्याने तो इकडे आणल्यावर एकदम मस्त बसला होता ड्रेस तो. खूप आनंद झाला होता मला. तर असे हे टेलर-शिंपी जे म्हणाल ते.
        शेवटी ड्रेस घेऊन यायचा दिवस उजाडतो. तिथे जाऊन तर ट्राय करता येत नाही, रिमेम्बर छोटी खोली?  त्यामुळे जे जमेल ते तिथे चेक करायचे. पण हे सर्व तुमचे नशीब चांगले असेल तर. कधी कधी ड्रेस शिवून झालेलाच नसतो. किंवा झालाय पण हातशिलाई  राहिली आहे, बटन लावायचे राहिले आहे, इस्त्री राहिली आहे, थोड्या वेळात परत या देतो करून अशी सर्व नाटकं करून तो ड्रेस मिळतो एकदाचा. केंव्हा एकदा घरी येऊन घालून बघेन असं होतं मग. कधी तरी मी एव्हढं सांगूनही त्याने ऐकले नाही म्हणून चिडचिड होते. पण जेव्हा सर्व बरोबर असतं आणि तो ड्रेस मस्त बसतो तेंव्हाचा आनंद वेगळाच. मग तो ड्रेस कॉलेज, ऑफिसला, पार्टीला घालून मिरवणे याचा अजून वेगळा.
       आता या सर्व प्रकरणात माझे हे असे मॉल मध्ये स्वत:च जाऊन आणलेले जीन्स, टॉप कुठेतरी तुलना करू शकतील का? यावेळी गेले तेंव्हा शिवायला वेळ नाही म्हणून मी ही तयारच ड्रेस घेऊन आले. पण मॉल मध्ये मिळणारे ते 'मिक्स आणि मॅच' मला परकेच वाटले. परवा दिवाळी म्हणून ऑफिसमध्ये तो रेडीमेड ड्रेस घालून गेले. ज्युडी वेडीच झाली बघून.'म्हणे मला असे वर्क करून पाहिजे ड्रेस वर'. म्हटले अगं वेडे, हे तर काहीच नाही. इथे अख्खा ड्रेस डिझाईन करून घेतो आम्ही, पाहिजे तसा, एकदम कस्टम. त्याची या ड्रेसशी काय तुलना?' तर ती म्हणे,'मला का नाही मिळणार असे सर्व कस्टम. इथे आपले साच्यातलेच कपडे घ्यायचे'. म्हटले, 'बरोबर आहे गं, मलाही आता हे साच्यातलं आयुष्य कंटाळवाणं झालं आहे. काहीतरी कस्टम केलंच पाहिजे'.

-विद्या.   

7 comments:

Meghana Bhuskute said...

अगदी अगदी!

मी आमच्या शिंप्याकडे जाऊन त्याला सांगते: जाळ्या, घुंगरू, नाड्या, झालरी यांतलं काहीही न लावता गळा नि बाह्या शिवा. पायजम्याला मियामी लावा.

की पुढे तो हसत म्हणतोच: हो ताई. ओव्हरलॉकपण करून ठेवतो आणि गळा फार खोल नको. आणि अंगावर शिवल्यासारखा घट्टपण नको.
आपण तारीख घेऊन, माप देऊन बाहेर पडायचं फक्त! नि उगाच बजावायचं - लवकर द्या हं पण!

नि खर्रच मापं घेताना किती ऑकवर्ड होऊ शकेल खरं तर. पण ते इतक्या सराईतपणे घेतात मापं, की बस, आहे काय त्यात, असं होतं अगदी!

नि कलमकारी-पटोला प्रिंट-बांधणी-बाटिक-मंगलगिरी-ओरिसा प्रिंट असल्या माझ्या लाडक्या सुती कपड्यांच्या दुकांनात हिंडून मनाजोगते कपडे जमवायची मजाही वेगळीच. मग त्यावर शोभतीलसे कानातले एकीकडे मनोमन हुडकत राहायचं. कधीकधी ते इतके साजेसे मिळून जातात, की याच कुर्त्याची वाट पाहत असावेत. मग तो कपडा किती विटका दिसायला लागला तरी टाकता टाकवत नाही. नि अगदी टाकायची वेळ आली, तरी ओढणी किती मऊ आहे, नको टाकायला. भावी भाच्याच्या दुपट्याला होईल नाहीतर निदान न्हायलेले केस गुंडाळायला तरी... असला कंजूषपणा करून जीव त्यात गुंतलेला!

ए कसलं भारी पोस्ट. लाज वाटावी इतक्या लांबीची कमेण्ट लिहिली की मी!

Vidya Bhutkar said...

अगं लाज कसली? मला तर काय लिहू आणि काय नको असं झालं होतं. त्यात माझं लखनवी वरचं प्रेम, तो फिकट रंगाचा ड्रेस, त्यावर सफेद कलाकुसर. माझं कश्मीरीवर्कबद्दलचं आकर्षण, यावर लिहायचं राहीलच. तू म्हणतेस तसा एखादा ड्रेस काहीच पुस्ती न जोडता, साधा गोल गळा शिवून घ्यायची इच्छा होतेच. त्या ड्रेसचं साधेपण हेच त्याचं सौदर्य. आणि हो, माझ्या दोन्ही मुलांना माझ्या, माझ्या बहिणीच्या कित्येक वर्षे जुन्या ओढण्याची दुपटीच वापरली. :) त्यामुळे तुझी ती कमेंट वाचून आनंदच झाला. :) एकूणच सर्व जिव्हाळ्याचा विषय आहे तो.

थॅंक्स. :)

विद्या.

भानस said...

किती जिव्हाळ्याचा विषय गं! :) एकदम पटेश! इथे कितीही काहीही खरेदी केली तरी आपल्याकडल्यासारखी मज्जाच येत नाही. सगळं कसं तेचतेच वाटत राहतं.

मस्त वाटले वाचताना. बाकी शिंपी हा प्राणी किती संतपदाला ( किमान वरवर तरी चिकाटीने त्याचे संतपद तो धारण करतोच ) पोचलाय हे पाहिले की मला थक्क व्हायला होते. इतक्या वेड्यावेड्या मागण्या आणि अखंड चिवचिवाट ऐकायचे म्हणजे काही खायचे काम नोहे महाराजा.... त्याला पाहिजे शिंपीच.. :D :D

हेरंब said...

भन्नाटच लिहिलंय एकदम !!

Maithili said...

मस्तच लिहिलेय... :-)

अपर्णा said...

आईशपथ यंदा thanksgiving ला स्वतःसाठी मोजकीच खरेदी करताना हे अगदी डोक्यात आलं होतं.

Vidya Bhutkar said...

I believe you Aparna. :)
THank you for your comments Bhanas, Heramb and Maithili. :)

-Vidya.