Tuesday, June 14, 2016

मी मराठी आहे, म्हणजे काय?

         मी मराठी आहे, म्हणजे काय? तर महाराष्ट्रात जन्मले, वाढले, शिकले आणि मराठी बोलते, लिहिते आणि वाचतेही. महाराष्ट्रात होते तोवर माझ्यासाठी केवळ दोनच भाग होते देशाचे, एक नॉर्थ इंडिया आणि एक साऊथ. पण राज्याबाहेर पडले आणि मला खूप मित्र मैत्रिणी मिळाल्या. गुजरात, युपी, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, हरियाणा, आसाम सर्व राज्यातले. आणि मला आपल्या देशाचे खरेच विविधतेने नटलेल्या या सर्व राज्यांची ओळख होऊ लागली. त्यांचे खाणे, सण, लग्नं, नातेवाईक यांच्या बद्दल समजू लागले. भारताबाहेर पडल्यावर तर या गोष्टींची अजून अजून ओळख होऊ लागली. आणि ते मला सर्व आवडलेही. शिवाय भारताबाहेर राहिल्याने भारतीय म्हणून वागायची सवय झाली आहे, फक्त मराठी म्हणून नाही. त्यामुळे मला मी मराठी असल्याचा खूप ग्रेट अभिमान बाळगता येत नाही. पण कुणी वादच घालायला लागला तर नक्की भांडू शकते. एकूण काय तर भारताचा आपला देश म्हणून मला जितका अभिमान वाटतो तो माझ्या मराठी असण्यापेक्षा जास्त आहे. 
             हे सर्व खरे असले तरी माझ्या 'मी' एक व्यक्ती असण्यामध्ये माझ्या मराठीपणाचा मोठा वाटा आहे किंवा कितीही वर्षे कुठेही राहिले तरी मी 'घाटी' च राहीन यात शंका नाही. हे सर्व पल्ह्याळ लावायचं कारण की माझ्या केवळ मराठी बोलता, लिहिता वाचता आल्याने किंवा महाराष्ट्रात राहिल्याने ज्या गोष्टी मला करायला, अनुभवायला मिळाल्यात त्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे. त्यावर लिहायचं आहे. उदा. छोट्या गावात असूनही मला शिक्षणाची पूर्ण संधी मिळाली. शिवाय माझ्या व्यक्तिगत कला आणि बाकी गुणांना वाव मिळाला. मला अनेक पुस्तके, मासिके उपलब्ध झाली. ज्यांच्या वाचनाने माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. आज जे काही थोडे फार मी लिहू शकत आहे तेही मला हे सर्व साहित्य अनुभवायला मिळाले त्यामुळेच आहे. रणजीत देसाई, पु ल. , द . मा. , अरुणा ढेरे, शांत शेळके, गुरुनाथ नाईक आणि अनेक व्यक्तींची पुस्तके मला वाचायला मिळाली. खूप हसायला, रडायला, उदास व्हायला, प्रेमात पडायला मिळालं. मला माहित नाही की बाकी कुठल्या भाषेत हे सर्व मला त्याच उत्कटतेने मिळाले असते. आणि असेल तरी जे मला मिळाले त्याचा आनंद गमावण्यापेक्षा जास्त आहे. 
       आजही मी अनेक कविता, लेख, कथा हे सर्व मी केवळ मराठी मध्ये वाचू शकते, त्यांचे अर्थ लावू शकते, समजू शकते. हा सर्व अनुभव मातृभाषेमध्ये सर्वांनाच मिळतो असे नाही. माझ्या कित्येक मित्र मैत्रीणीना त्यांची मातृभाषा जास्त वाचता येत नाही किंवा लिहिताही येत नाही. त्यामुळे केवळ त्या भाषेमध्ये बोलणे आणि बाकी सर्व इंग्रजी मध्येच. यात आपण किती गोष्टींना मुकतोय याची त्यांना कल्पना असेल का? नुसते साहित्यच नाही. मराठी पदार्थ, ठेचा, पिठलं-भाकरी, मिसळ, बटाट्याची भाजी (वडा ही आहेच), भरले वांगे, चिकन रस्सा, साधा वरण भात आणि पुरणपोळी या सर्व पदार्थांची चव मला घरी घेता आली याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आणि खूप काही ग्रेट नसले तरी साधी भाजी भाकरी, वरण भात याच्यापुढे मला डोसा इडली आणि मसालेदार पंजाबी भाज्या सर्व फिके वाटते. मला आंध्रच्या लोकांचे जेवण आवडते तरीही मी एक मराठी मुलगी म्हणून मला आपल्या घरांमध्ये बनणाऱ्या जेवणाचा खूप अभिमान वाटतो. अगदी साधे, चविष्ट आणि सकस वाटते. 
          बर या साधेपणाच्या आवडी खाण्यापर्यंत मर्यादीत राहत नाही. कित्येक वेळा माझ्या लक्षात आलंय की माझ्या हातात कितीही पैसे दिले तरी मी एखादा फिकट रंगाचा किंवा कमीत कमी डिझाईन असलेला ड्रेस किंवा साडी घेऊन येते. माझ्या अनेक मारवाडी किंवा पंजाबी मैत्रिणींच्या तुलनेत माझे ड्रेस मला बरेच साधे वाटतात. पण तरीही मला ते तसेच आवडतात. तीच गोष्ट मी मेक-अप करण्यातही पाहिली आहे. म्हणजे हा व्यक्तिगत प्रश्न असतो पण तरीही माझ्या खूप कमी मैत्रीणीना मी केवळ स्वत:चे आवरण्यात तासान तास घालवलेला पाहिलंय. आणि त्यामुळे कदाचित त्या आणि मी, बाकींच्या तुलनेत जास्त साध्या वाटत असू पण तरीही त्यात वाईट काहीच नाही असे वाटते. आयुष्यात भरपूर बाकीची कामे आहेत करायला. मुलांच्या बाबतीतही मी सरसकट सर्वाना हा नियम लावू शकत नाही पण बऱ्याच माझ्या मराठी मित्रांमध्ये दारू आणि सिगारेट याचे प्रमाण बाकींच्या मानाने कमी पाहिले आहे. अर्थात व्यसन काय कसले न कसले असतेच आणि ते बदलतही राहते. पण एकूणच माझा अनुभव तरी असा  होता. 
         हा साधेपणा मला लग्नात आणि अगदी बऱ्याच कार्यक्रमातही दिसला आहे. आज काल पंजाबी स्टाईल मध्ये संगीत, मेहेंदी वगैरे सर्व करण्याचा लोक प्रयत्न करतात. पण माझं प्रामाणिक मत असं आहे की यासर्व गोष्टी जितक्या साध्या असतील तितके उत्तम. दिखाव्यासाठी कर्ज काढून लोकांना खायला प्यायला घालण्यापेक्षा योग्य ठिकाणी पैसा खर्ची करावा किंवा निदान त्यासाठी कर्ज तरी कुणाला घ्यायला लागू नये. याचा अर्थ असा नाही की मराठी लग्नात हुंडा वगैरे नसतो. हे सर्व प्रकार मी पाहिलेत आणि ज्याचा मला प्रचंड राग आहे. पण मी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या लग्नांमध्ये तुलना केली तर मराठी लग्न जास्त साधी होती. अगदी आपली पैठणी आणि मोत्यांचे दागिनेही मला सुंदर आणि साधे वाटतात. त्यामुळे होतं काय की आपली वागणीही बरेचदा कितीही पुढे गेले तरी साधेच राहते असे मला वाटते.
        अजून एक गोष्ट जी मला खूप आवडते महाराष्ट्राची ती म्हणजे सह्याद्री. लोकांनी कितीही घाटी म्हणले ना तरी मला त्याचे काही वाटत नाही कारण खरंच आमच्याकडे इतके घाट आहेत. :) आणि त्यांचं सौंदर्य अनुभवल्याशिवाय कळणार नाही. पावसांत केलेल्या अनेक ट्रेक मध्ये मला जो सह्याद्री पाहिल्याचा आनंद मिळालाय ना तो अगदी अमेरिकेत सुद्धा नाही मिळाला. बरं झालं आज हेही बोलून घेतलं. खूप वर्षं मनात होतं आणि प्रत्येक घाटी म्हणणाऱ्या माणसाला ते सांगायचं होतं. तर या अशा अनेक गोष्टी ज्यांनी मी 'मी' बनले आहे. माझे विचार, आचार, सर्व घडले आहे. असो.
         खरं सांगू का मी लिहायला सुरुवात केली तेंव्हा काही वेगळेच कारण होते सुरु करायचे. सध्या घरी आई असल्याने संध्याकाळी मराठी गाणी लावली होती. त्यात 'सांज ये गोकुळी' हे माझं एकेकाळी आवडतं असलेलं गाणं लागलं होतं. आशा भोसलेंनी गायलेलं हे गाणं ऐकलं आणि खरंच संध्याकाळी गोकुळात गेल्यासारखं वाटलं. मग मी त्याचे कवी, संगीतकार, गायक याची माहिती वाचली. तो अनुभव, ते गाणं मला केवळ मराठी समजत असल्याने घेता आला. आणि तेच काय मंगेशकरांनी गायलेली, संगीतबद्ध केलेली सर्व मराठी गीते, भावगीते, आरत्या यांचा जो आजपर्यंत घेतलेला आनंद आहे तो मला मराठी कळत नसतं तर कधीच मिळाला नसता. मराठी नाटकं, मराठी सिनेमा यांचे मिळालेलं जे धन आहे ते मला परक्या देशात किंवा परक्या राज्यातली मी असते तर मला मिळाले असते का? कदाचित हो कदाचित नाहीही. पण त्यादिवशी संध्याकाळी त्या गाण्यावरून हे सर्व डोक्यात आलं आणि लिहिल्याशिवाय राहवलं नाही. त्यामुळे मराठी असल्याचा खोटा अभिमान मी बाळगत नाही पण मी एक व्यक्ती म्हणून जी या राज्यात बनलेय ना त्याचा नक्कीच वाटतो. :) तुम्हांला काय वाटतं? 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: