विकेंडला हेअरकट केला. कापले म्हणजे अगदी संदीपचे चार महिने कापले नाहीत तर किती वाढतील इतके बारीक केले. माझ्या एक लक्षात आलं की गेल्या काही वर्षात दर थोड्या दिवसांनी आपले वय अजून जास्त वाटत आहे असे वाटायला लागते. केस वाढले की नेहमीप्रमाणे मागे बांधून टाकले जातात त्यामुळे अजूनच चेहरा कंटाळवाणा वाटायला लागतो आणि केस कापायची खुमखुमी येऊ लागते. मुलीचा वाढदिवस आणि माझा यात चार महिने असतात मध्ये आणि तिच्या वाढदिवसापासून माझा येईपर्यंत मधेच कधीतरी मी केस कापून येते. मला वाटतं की हा तिशीतला आजार असावा एखादा. त्यात जसेजसे वय वाढेल तशी केसांची लांबी कमी होत जाते. एकदा कापले की पश्चाताप होतो आणि मग पुढे वर्षभर पुन्हा त्यांना हात लावायची हिम्मत होत नाही. तर हा असा आजार नक्कीच मला झालेला असणार. त्यानुसार मी केस लहान करून आले.
आता यात लिहिण्यासारखं काय आहे? तर माझे केस तीस वर्षात तीन फुटांपासून तीन इंचावर आले आणि त्या प्रोसेस मध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट मी ऐकल्या आहेत. अर्थात हे सर्व माझ्या जवळचेच लोक आहेत ज्यांना माझे लांब केस असलेले पाहायला आवडते. त्यामुळे त्यांना बोलणे हा मुद्दा इथे नाहीये. तर यावेळीही केस कापल्यानंतर 'अरे कशाला कापले?' असा प्रश्न आलाच. पण आता मी नवऱ्याकडे आहे आणि 'त्याला चालतं ना मग काय?' अशा कमेंटमुळे बरेच वाद टळतात. आणि हाच माझा मुद्दा आहे आजचा. कित्येकवेळा कितीतरी मुलींना आजही,'नवऱ्याकडे जा आणि मग काय करायचे ते कर ' हे ऐकायला मिळते.
यावरून मी विचार करत होते की केस जे कापले तर दोन तीन वर्षात वाढतीलही पुन्हा पण त्यासाठी किती बाऊ होतो आणि तोही लग्नासारख्या विषयातच डायरेक्ट. मुलीने केस कापले तर काही आकाश कोसळणार आहे का? तिला ठरवू द्यावे ना? आणि मुलीच्या आई वडिलांना तरी काय बोलणार? कितीतरी मुलांच्या किंवा त्यांच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा असतील मुलींचे केस लांबच असण्याच्या? केस लहान असतील, अगदी बॉयकटच असेल तरी त्याने ती व्यक्ती कशी आहे यात काही फरक पडतो का? का कित्येक हिंदी, मराठी चित्रपटात, सिरियल मध्ये अजूनही मुलींचे, सुनेचे केस लांबच असतात? सून छोट्या केसांची असल्याने काय फरक पडणार आहे? अगदी मुलीही लग्न ठरले की केस वाढवणाऱ्या पहिल्यात मी. माझे स्वत:चे केस अनेक वर्ष लांब होते पण ते केवळ वाढत आहेत म्हणून किंवा चांगले दिसत आहेत असे वाटत होते म्हणून. पण ते कापल्याने मी काही बदलले का?
बरं मुलींचे जाऊ दे, मुलांच्या बाबतीत तरी हे नाटक कमी आहे का? एखादया केस कापलेल्या वाढवलेल्या मुलाबद्दल कितीतरी गैरसमज असतात. अगदी त्यावरून चेष्टाही होतेच. किंवा एखादा विचित्र केस कापलेला मुलगा असेल तर त्याच्याकडेही वळून पाहिले जाते. असाच एखादा मुलगा लांब केस वाढवलेला किंवा रंगीत केस असलेला, मुलगी बघायला गेला तर त्याच्या केसांवरून त्याच्या स्वभावाचे कितीतरी अनुमान काढले जातील यात वाद नाही. बाकी मुली बघायचे राहू दे, तसाच जर तो नोकरीच्या इंटरव्ह्यू ला गेला तर? त्याच्या केसांपलीकडे जाऊन त्याचे स्किल पाहिले जाईल का? शिवाय केस वयाच्या आधी पिकलेल्या किंवा टक्कल पडलेल्या मुलांचे तर बोलायलाच नको.
आता हे सर्व बोलायच्या आधी मला एक मान्य केले पाहिजे की मलाही हे सर्व पटवून घ्यायला वेळ लागलाच. गेले काही महिने इथे नवीन ऑफिसमध्ये एक मुलगी बघते, तिचे केस कधी गुलाबी असतात किंवा कधी एखादीच पट्टी मध्ये जांभळी असते किंवा कधी चंदेरी असते. आधी वेगळे वाटायचे पण आता काही वाटत नाही. असाच एकजन आहे ऑफिसमध्ये त्याचे केस लांब आहेत निदान ६ इंच शेंडी येईल इतके तरी. बर ते नुसते लांब नाहीत तर ते हळदीच्या रंगाचे पिवळे आहेत. कितीतरी वेळा मला वाटत राहायचे की त्याला हात लावला तर माझ्या हाताला तो पिवळा रंग लागेल, इतके पिवळे. एकदा एका मिटिंगमध्ये अजून एक जण असाच दोन फुटाचे लांब केस मोकळे सोडून बसला होता. तो काय बोलतो यापेक्षा त्याला त्याचे केस होते आणि ते कापले तर तो कसा दिसेल यावरच माझं लक्ष होतं. अनेकदा इथे आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या वेगवेगळया स्टाईल पाहील्या. ते सर्व पटवून घ्यायला वेळ लागलाच. असे अनेक लोक पाहिल्यानंतर मला लक्षात येऊ लागले की माझे विचार किती संकुचित आहेत.
केस छोटे किंवा मोठे ठेवणे किंवा रंगवायचे हे सर्व व्यक्तिगत निर्णय असावे अस मला वाटते. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधेही आपल्याला स्वातंत्र्य का नसते किंवा त्यापेक्षा लोक काय म्हणतील याचा विचार का करावा लागतो? हे कधीपर्यंत चालेल? आणि आपण म्हणजे केवळ मुली नाहीत तर मुलेही. किंवा केस कसे आहेत यावरून ती व्यक्ती कशी असेल हे मत कधीपर्यंत ठरवले जाणार?
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment