आज एकदम डोकं रिकामं होतं, ब्लॅंक म्हणतात ना तसं. फार कमी वेळा होतं असं माझ्यासोबत. कारण दिवसभरात आणि अगदी झोपेतही काही ना काही डोक्यात चालूच असते. तर आज काहीच संवेदना नाहीयेत असं वाटत होतं किंवा वाटून घेत होते. आनंद, दु:खं, कंटाळा, किंवा काहीच नाही त्यामुळे लिहिणे हा ही विषय नव्हताच डोक्यात. मग घरी आल्यावर चहा घेऊन एक झोप काढली आणि अजूनच ब्लँक झाले. मुलांचं काय चाललंय, जेवण बनवायला किती वेळ लागेल, उशीर झाला तर झोपायला वेळ होईल वगैरे असले कसलेच विचार नव्हते. जेवायला काय बनवायचं बोलणं झाल्यामुळे तेच करायला यांत्रिकपणे सुरुवात केली. मग पोळ्या संपेपर्यंत निदान वैताग नावाची फीलिंग तरी जागृत झाली होती. मग पोरांच्या आंघोळी होईपर्यंत चिडचिड जागी झाली आणि सर्व उरकेपर्यंत कंटाळा. बाहेर थोडं चालून आल्यावर जरा आळसही कमी होतोय असं वाटायला लागलं. म्हणून म्हणलं मग लिहूनही घ्यावं म्हणजे अजून थोडी नॉर्मल होईन.
तर आज म्हणलं त्याच विषयावर लिहावं. असं कितीदा होतं आपल्याला की डोक्यात काहीच विचार नाहीयेत. फार कमी वेळा. निदान मला तरी. सकाळी उठले की आज किती वाजता ऑफिसला पोचणार, कुठले कपडे घालावेत पासून रात्री झोपताना 'मुलांना डब्याला काय द्यायचं' पर्यंत अनेक विचार चालू असतात. कधी कधी मला वाटतं की असं सारखं डोकं वापरूनच माझे केस पिकात असतील. मग विचार केसांकडे वळतात पण बंद होत नाहीत. उलट असे सारखे ब्लँक असणारे लोक मला वेंधळे वाटतात मग. "जरा लक्ष दे की मी काय म्हणतेय त्याच्याकडे." किंवा "काय कुठे हरवलास" अशी अनेक वाक्य त्यांना ऐकायला मिळतात.
कित्येक वेळा मला असे ब्लँक राहण्याची गरज असते पण जमत नाही. योग क्लासच्या शेवटी शवासन आले की आमची ट्रेनर म्हणायची,'रिलैक्स व्हा. कसलेही विचार मनात आणू नका. मनाला शांतता असली पाहिजे."
डोंबल शांत. माझा हा क्लास शिकागोच्या असायचा. त्यामुळे डोक्यात काही ना काही कामे असायचीच. नंतर सकाळी होता तरी दिवसभर काय करायचेय. कधी सारखं आपलं घड्याळाकडे लक्ष, कधी भूक लागलीय, कधी चुकून झोप लागेल कीकाय ही भीती आणि मग त्या भीतीमध्ये खरंच एकदा झोप लागली होती त्याची आठवण. आणि मग त्या आठवणींसोबत बाकी लोकांच्या आठवणी. असं मन भरकटत कुठं जाईल याचा नेम नाही अजिबात.
बरं आपले हे विचार बरेच वेळा सुसंगत असतात. कशामुळे? तर आमच्या शाळेत मराठीच्या बाई एक खेळ घ्यायच्या. उभे राहिले की ओळीने १० वाक्य बोलायची, त्यांचा एकमेकांशी संबंध असला नाही पाहिजे अजिबात. मग मी प्रयत्न करायचे.
१. मला आंबा आवडतो.
२. मी दुपारी खो खो खेळले.
३. मला भाषण देता येत नाही.
मोठ्या मुश्किलीने पोचलेली गाडी भाषण म्हणाले की लोकमान्य टिळकांपर्यंत अडकणार. मग मी त्यांच्यावर काही बोलले की संपले, बस खाली. कधीही माझे ४ च्या पुढे एक वाक्य झाले नाही. विसंगत विचार करायलाही काहीतरी वेगळे असावे लागते हे आता लक्षात येते. अजूनही कधी मनातल्या मनात मी तो गेम आठवून प्रयत्न करते तसे विसंगत विचार ओळीने मनात आणायचा. पण जमत नाही आणि मग गाडी पुन्हा शाळेतल्या बाई, आठवीतला तो वर्ग आणि त्याच्या सोबत बाकीच्या आठवणी असे फिरत जाते.
कधी कधी मला खरंच खूप वैतागही येतो डोक्यात येणाऱ्या विचारांचा. कितीही थांबवावे म्हणले तरी ना थांबणाऱ्या चक्राने मग डोकं दुखायला लागतं. म्हणजे साध्या साध्या गोष्टीत चालूच राहतं. म्हणजे उदा. सकाळी, गाडी चालवताना, ८. १७ निघालय, मग किती ट्राफिक असेल, मुलांना सोडून स्टेशनला किती वेळात पोचता येईल, कुठली ट्रेन मिळेल, मग जागेवर पोचून लगेच काय करता येईल.... असं चक्रच ते. पण का चालू राहतं? मरू दे ना, आता गाडीत बसलोय तर ज्या वेळेत जे व्हायचं ते होईलच ना? असं कसं? विचारच तेमी, चालूच राहिले पाहिजेत.
कधी रात्री आले डोक्यात तर अगदी तोंड उशीत खुपसून पडून राहिलं तरी जात नाहीत.(अर्थात पाठ टेकली कि दोन मिनिटांत झोपलेली असतेस असं म्हणणाऱ्या नवऱ्याला हे पटणार नाही. पण होतं असं कधी कधी. ) तर कधी एखाद्या माणसाशी बोलताना मधेच काही विचार येऊनही जातात आणि समोरचा काय बोलला हे कणभरही लक्षात रहात नाही. मी विचार करतेय (हो अजून विचार :) ) की महिन्यातून असा एखादा खास दिवस काढायला हवा ब्लँक राहण्यासाठी. एकदम 'निवांत' दिवस गेला म्हणतात ते यालाच म्हणत असावेत. त्यात कधी उठायचं, कधी झोपायचं, काय जेवायचं, भांडी घासायचीत, घरात पसारा पडलाय, मुलांना काय अभ्यास करायला सांगायचा किंवा किती वेळ टीव्ही किंवा उद्या उठून काय करायचं आहे असे कुठलेच प्रश्न पडायला नकोत. किंवा काही केलंच पाहिजे असा अट्टाहासही त्या दिवशी नको. आणि असा दिवस घालवल्यावर दुसऱ्या दिवशी काय होईल याचा विचारही नको. असा एखादा दिवस काढून बघते जमतं का आणि कसं वाटतं ते. :)
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment