गेल्या काही दिवसांपासून पाहतेय, माझ्यासारखेच अनेक लोक 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे प्रत्येक विषयावर आपले मत देत आहेत. त्यामध्ये, स.ली. भ. ने बाजीराव मस्तानी मध्ये जे काही दाखवलं ते चूक हे आधीच ठरवून, नंतर त्याचंच कौतुक करणारे लोक पाहिले. दुसऱ्याने आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं, बायकोचे कुठले फोटो पोस्ट करायचे, कुठल्या देशातील लोकांना मुव्ही मध्ये घ्यायचे किंवा नाही, आणि आता त्या नवीन मुव्ही मध्ये जे काही 'सो कॉल्ड' शूटिंग होत आहे त्यावरही मत आहेच. बर नुसते मत नाही, आता तर मारहाणही होत आहे. म्हणजे साध्या माणसाच्या आयुष्यात रोजच्या जीवनात इतके काही घडत असताना या सर्व गोष्टींचा विचार करण्याचा त्रास का?
आपल्या शेजारच्यांनी जाऊ दे मुलांनीही त्यांच्या मुलाचे नाव काय ठेवायचे हे ठरवले तर त्यात आपण काही बोलू शकत नाही. का? तर तो त्यांचा प्रश्न आहे. मग कुणी आपल्या मुलाचे नाव अमुकतमुक ठेवले तर आपला काय संबंध? खरं सांगायचं तर आपल्याकडे मुलीला 'लग्न झाल्यावर नवऱ्याकडे जाऊन काय हवं ते कर' असं म्हणणारे अनेक आईवडील असतात. आणि खरंच नवऱ्याला चालतंय ना? मग आम्ही कोण बोलणारे असे म्हणून नंतर गप्पही बसतात. पण तेच एखाद्याने आपल्या बायकोसोबतचा फोटो टाकल्यावर त्याला वाटेल ते कमेंट लिहिणे याला काय अर्थ आहे?
परवा पासून जी पद्मावतीच्या सेटवरचा प्रसंग आणि त्यांवर नंतर लोकांचे आलेले कमेंट पाहून खरंच कळत नाही की लोक कुठे चालले आहेत? एखाद्या चित्रपटात काय दाखवले आहे हे पाहिल्याशिवाय कसे कळणार आहे? आणि त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे अजून. आणि आपल्याकडे मस्ती च्या सिरीजसारखे असणारे गलिच्छ चित्रपट चालतात, मग अजून प्रदर्शितही न झालेल्या चित्रपटासाठी एकदम मारहाण? कधी कधी प्रश्न पडतो हे असे कोण लोक असतात ज्यांना आपल्या पोटापाण्याचे सोडून बाकी प्रश्न महत्वाचे आहेत? आणि समजा असतील तर मग तक्रार करा पोलिसात, शूटिंग वर बंदी आणा, असे अनेक पर्याय आहेत त्यासाठी. कुठला तरी हेतू या लोकांच्या मनात नक्कीच असणार असं मला तरी वाटतं आणि त्यांना प्रसिद्धी देऊन, त्यावर चर्चा करून आपण त्यांना अजून खतपाणी घालतो.
मध्ये पाकिस्तानवरच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर, एका चित्रपटावर अनेक विरोध
झाले, वाद झाले. त्यानंतर अजून दोन पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट
प्रदर्शित झाले. त्यावेळी हा असाच गोंधळ का नाही केला गेला? म्हणजे
देशभक्ती फक्त १५-२० दिवसच टिकते का? आणि दोन महिन्यात, दुसरे चित्रपट कसे १०० कोटीच्या घरात जातात यावर चर्चा करतात. का? विरोध करायचाच तर सर्वांनाच करायचा, सरसकट. उगाच नुसते मीडियामध्ये नकारात्मक कमेंट टाकून नंतर पिक्चर बघायला जायचे नाही. आपल्या नकारात्मक वागण्याचा लोकांवरही सामुदायिक परिणाम होत असतो याचा विचार कुणी करतं का?
तामिळनाडू मध्ये जल्लीकटूच्या समर्थनासाठी इतके मोर्चे निघाले. मग त्यांनी काढले म्हणून केरळमध्ये अजून एका खेळासाठी निघाले. उद्या पुन्हा दहीहंडी किती थरांची करायची यासाठी निघतील. अजून मराठा मोर्चा वगैरे आहेच. मला असं वाटतंय की एखाद्या देशात इतकी अराजकता का? कोणी मुद्दाम हे सर्व तर करत नाहीये ना? आपण या अशा अनेक आवाहनांच्या आहारी जाऊन आपणच कुठल्या मोठ्या कारस्थानाला बळी पडत नाहीये ना हा विचार जरूर करायला हवा.
दोन तीन दिवसांपूर्वी एका मुलीची इन्फोसिस ऑफिस मध्ये हत्या झाली. त्यावरून आम्ही बोलत होतो की मुलींना अशा शिफ्ट मध्ये येऊ द्यायचं की नाही? मी म्हणले का नाही यायचं त्यांनी? जर एखादा मुलगा शिफ्ट मध्ये काम करू शकतो तर मुलीलाही करता आले पाहिजे. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, तिचे काम नाही? हा, त्या सुरक्षिततेसाठी उपाय जरूर करू शकतो, पण एखादा वाटेल त्या नजरेने मुलीकडे बघतो म्हणून त्याला शिक्षा न देता मुलींचे काम बंद करणे हा उपाय नक्कीच नाही. आता वरच्या आणि या हत्येचा संबंध तसा पाहिला तर काहीच नाही. पण मला प्रश्न पडलाय, लोकांना एखाद्याच्या बायकोचे फोटो कसे किंवा एका राणी पद्मावती बद्दल सिनेमात काय दाखवलं जावं किंवा नाही याची इतकी काळजी असते, तेच लोक स्त्री सुरक्षा आणि त्यांचा सन्मान अशा महत्वाच्या विषयांवर प्रत्यक्षात का काम करत नाहीत?
खरं सांगते आजकाल अजिबात बातम्या वाचायची इच्छा होत नाही. कुठलीही बातमी काही ना काही कारण असल्याशिवाय समोर येत नाही. मीडियावरचा तर विश्वास उडतच आहे, पण लोकांच्या चांगुलपणावरचाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला अतिशय असुरक्षित वाटते आजकाल, सगळीकडेच. फक्त ते तसं वाटू देण्याचा प्रयत्न कोणी मुद्दाम करत आहे का हे मात्र जरूर वाटत राहतं. तुम्हाला काय वाटतं?
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment