आदल्या रात्री गप्पा मारण्यात बराच उशीर झाला त्यामुळे मुक्ताला उठायलाही उशीर झालाच होता. तिने पटापट आवरायला सुरुवात केली. डोक्यात केदारचे, लग्नाचे विचार होतेच. पण शाळेच्या पहिल्या दिवशी असावी तशी उत्सुकता तिला आपल्या हॉटेलबद्दल वाटत होती. उशीर झाल्यावर 'फोडणीची खिचडी' हे तिचं नेहमीच ठरलेलं. तिने सगळ्या डाळी, खास खिचडीसाठी ठेवलेला तुकडा तांदूळ भिजवले. लाल सुक्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे सर्व काढून ठेवले. मधेच तिला वाटलं,'ही खिचडी तर आपल्या मेनूवर पहिल्या नंबरवर असली पाहिजे'. फोडणीत खरपूस लसणाचा वास आला आणि ती खूष झाली. तिने डब्यात खिचडी नेली की बाकी मित्र मैत्रिणीही मागून घेत त्यामुळे जरा जास्तच बनवली होती. घरातून निघताना लिंबाचं गोड लोणचं, भाजलेले पापड आणि शेंगदाण्याची चटणी आठवणीने डब्यात घेतली. आजचा दिवस एकदम मस्त सुरु झाला होता.
ऑफिसमध्ये जाताना केदारला कॉल करायला ती विसरली नव्हती. पोचल्यावर तिने लगेचच मॅनेजरसोबत मिटिंग ठरवून टाकली होती. उगाच परत उशीर नको म्हणून. जरा मेल चेक करून झाल्यावर तिने मैत्रिणीला,पूनमला, 'चल कॉफी घेऊ' म्हणून हलवलं. तिलाही काहीतरी स्पेशल दिसत होतं. दोघी कॉफी घेऊन शेजारच्याच टेबलजवळ बसल्या. पूनमने भुवया उंचावल्या तशी ती बोलू लागली.
"काय केदारने प्रपोज केलं."
"काSSSSSSS य?", पूनम ओरडली तशी तिने तिला हात दाखवून शांत बसवलं. आणि अचानक आपण लाजतोय याची तिला जाणीव झाली. तिचा तो लाजरा हसणारा चेहरा पाहून पूनमने तिला मिठी मारली आणि पार्टीही मागितली.
"तुला ना? नुसत्या पार्ट्या पाहिजेत" मुक्ता बोलली.
"पार्टी तो बनती है यार. इतकी मोठी न्यूज अशीच सांगतेस?",पूनम एकदम हायपर झालेली.
"त्याने अजून एक गोष्ट सांगितली आहे" मुक्त पुढे बोलली.
"काय अजून गुड न्यूज?", पूनमला एकेक धक्के बसत होते. मुक्ताने तिला मग हॉटेलबद्दलही सांगितले.
"बस यार पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजेच", पूनम म्हणाली.
"ओके जाऊ विकेंडला नक्की.आज आधी काम तरी करू.आणि हो तुझी आवडती खिचडी आणली आहे. " म्हणून मुक्ताने तिला उठवले.
"हां आता नुसत्या खिचडीवर भागणार नाहीये हा." पूनम बोलतच होती.
दोघी जागेवर आल्या तर मिटिंग होती एक. तिथे गेल्यावर त्या महिन्यात वाढदिवस असलेल्या लोकांसाठी केक आणला होता. एकूण काय आनंदच आनंद. असेही काम करायची इच्छा कुणाला होती म्हणा. पण या असल्या मीटिंगमध्ये उगाच पुढे होऊन काम करायला नको वाटायचं तिला. दरवेळी आपणच पुढे होऊन का केक वाढायचा सर्वाना? "मुलगी म्हणून मी इथेही हे वाढण्याचे काम का करावे?" असं ती नेहमी पूनमला म्हणत असे. पण आज तो विचार सोडून ती केक घेऊन जागेवर गेली आणि पुन्हा एकदा आपल्या विचारांच्या कोशात निघून गेली. काल जितके आपण प्रॅक्टिकल बोलत होतो त्यापेक्षाही जास्त जवळीक केदारबद्दल जाणवत आहे हे पाहून तिला कसलं तरी समाधान वाटलं होतं.
दुपारच्या मस्त जेवणानंतर ती मॅनेजरकडे गेली. तिला स्वतःला तर बिझनेसची माहिती होतीच पण त्याच्याकडूनही कर्जाबाबत लागेल ते तिने विचारून घेतले. पुढच्या सहा महिन्यांत हॉटेलचं सर्व काही पक्कं करायचं तिने ठरवलंच होतं. मॅनेजरशी बोलल्यावर पुन्हा एकदा तिने केदारला फोन केला. तिच्या बोलण्यात थोडा फरक तिला जाणवत होताच. 'केदारचा विचार करून आपण लाजतोय का उगाचच?' म्हणून ती स्वतःवरच रुसलीही. हळूहळू तिला आता केदार 'आपला' असण्याचीही सवय झाली होती.
एकदा सुरुवात झालीये म्हटल्यावर दोघेही कामाला लागले होते. पुढचे काही दिवस मग हॉटेलसाठी जागा शोधण्यात, इंटेरियर डिझाईनरशी बोलण्यात आणि मेनू ठरवण्यात गेले. दोघे बसून सविस्तर चर्चा करत, जाहिरातींसाठी वेगवेगळ्या कल्पना मांडत. तर कधी कॉलेजमध्ये शिकलेल्या एखाद्या विषयावरून वाद घालत. हॉटेल हे आता केवळ एक स्वप्न न राहता ध्येय बनलं होतं.
असेच एक दिवस संध्याकाळी तिला केदारचा फोन आला,"घरी आहेस ना? मी एका मित्राला घेऊन येतोय. जेवायलाच असेल तो."
तिने काही विचारण्याआधी त्याने फोन ठेवला होता. आता नेहमीप्रमाणेच काहीतरी खास 'साधी' डिश करावी असं तिच्या मनात आलं होतं पण, 'मित्रासाठी हे असं रोजचं जेवण बनवतेस का?' म्हणून केदार चिडेल की काय असा विचार केला आणि तिने, पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि वरण भात असा बेत आखला. इतक्यात पुन्हा त्याचा मेसेज आला,"पिठलं भाकरी करशील का?"
ती जरा दचकली. आजपर्यंत कधीही केदारने तिच्याकडे स्वतःहून पिठल्याची मागणी केली नव्हती. पण आता विचारलंच आहे तर मग काय? तिने हिरव्या मिरच्या, लसूण ठेचले, तेलात जिरे, मिरच्या लसूण परतला. कांदा हलकासा भाजला. भरडलेले दाणे त्यात घातले. जोरजोरात ते पिठलं तिने घोटलं. बाजूला भाकरी थापल्या. मऊ भात केला. भरलेल्या मिरच्या तळल्या. स्वयंपाक करणे हे जणू तिच्यासाठी ध्यानधारणाच होती एक प्रकारची. 'असा कोण मित्र आहे ज्यासाठी त्याने पिठलं मागितलं असावं' हा विचार मात्र तिच्या डोक्यात राहून राहून येत होता.
केदार आणि त्याचा मित्र लवकरच घरी पोचले. तिने पाहिलं तर समोर एक माध्यम बांध्याचा, मळकट टी-शर्ट- जीन्स घातलेला आणि अगदी 'उन्हाने रापलेला' म्हणावा तसा रंग असलेला तरुण उभा होता. आत आल्यावर त्याने ओळख करून दिली,"हा नितीन, माझा शाळेतला मित्र. आणि ही मुक्ता."
'हाय' म्हणून दोघेही सोफयावर बसले. तिने आल्याचा चहा ठेवला. केदार तिला सांगत होता,"नितीन आणि मी दहावी पर्यंत सोबत होतो. शाळेनंतर याने कृषी कॉलेजमधून पदवी घेतली आणि जवळच्याच एका गावाकडे जमीन विकत घेतली. पहिले काही वर्ष नुकसान झालं त्याचं बरंच कर्जही होतं पण पठ्ठ्या काम करत राहिला आणि आता हळूहळू ऑरगॅनिक भाज्याचे पीक घेत आहे. हुशार आहे हा आपला मित्र. त्याच्या शेतांवर घेऊन जाईन तुला एकदा. "
तो कौतुक करताना नितीन मात्र शांत बसून होता. त्याच्या वागण्यातून त्याचं शांत व्यक्तिमत्व दिसत होतं.
पुढे केदारच बोलला, "आपल्याला हॉटेलसाठी असाच माणूस पाहिजे. खात्रीशीर, माहितीतला आणि जवळचा. देणार ना रे आम्हाला भाज्या?"
तो पुन्हा हसला आणि मान होकारार्थी हलवली.
पुढे मग मुक्ता बोलली,"मला वर्षभरात येणाऱ्या सर्व भाज्यांचे वेळापत्रक हवंय. म्हणजे कुठल्या महिन्यात काय पीक येतं आणि त्यानुसार मेनू बनवायचा आहे. बाकी वर्षभर ठेवायचे पदार्थ असतीलच. पण मला शेंगसोला, हुरडा, वालाची,पातीची भाजी, भरीत, पिठलं, नाचणीची भाकरी, ओल्या हरभऱ्याची भाजी, अंबाड्याची भाजी असे अनेक पदार्थ हवे आहेत. सोबत उसाचा रस, कैरीचं पन्हं हे सर्वही हवं आहे. " त्याने पुन्हा मान हलवली.
तिच्याकडून त्याने मग एक पेन आणि पेपर मागितला. दर महिन्याचा रकाना बनवून एकेक पिकाची यादी तो करू लागला. बाकी नेहमी येणाऱ्या भाज्या, फळे यांची वेगळी यादी केली आणि तिच्या हातात दिली. त्याच्या यादीतल्या गोष्टी पाहून ती खुश झाली.
"आम्ही भाज्या रोज पहाटे आणून देऊ. त्याज्या. या यादीनुसार तुम्ही मेनू बनवा. आणि काय पायजे तसं फोनवर कळवत जा म्हणजे तयारी ठेवता येईल." तो एकदम हळू स्थिर आवाजात बोलला.
त्याने पिकांसाठी करत असलेल्या प्लॅनिंग त्यांना समजावलं. कीटकांचा बंदोबस्त, खतपाणी कसं लागतं सर्व सांगितलं. बराच वेळ गप्पा मारण्यात गेला. तिने ताटं घेतली.
तिने बनवलेलं गरम गरम पिठलं, भाकरी, नाचणीचा पापड, कैरीचं लोणचं, गरम भात सर्व अगदी मन लावून तो खात होता. मधेच तिने त्याला विचारलंच,"कसं झालंय?" तो 'चांगलं आहे' म्हणून पुन्हा खाण्यात गुंगला. त्याने अजून भाकरी मागून घेतली. ती देताना तिला त्याचे चिरा गेलेले हातही दिसले. मग हळूहळू कष्टाच्या खुणा ती त्याच्या शरीरावर पाहून लागली. पायाला पडलेल्या भेगा, बाह्यांच्या बाजूला काळ्या पडलेल्या रंगाची रेष, मातकटलेले केस, आत गेलेत म्हणावं इतके सुकलेले गाल आणि त्यात त्याचं ते मन लावून जेवणं. तिच्या मनात ते चित्र पक्कं बसलं. जेवण झाल्यावर तो निघाला. दोघांचे नंबर त्याने घेतले. त्यांना व्हाट्स अँप वर ऍड केलं.
निघताना तो एकदम तिच्याकडे बघून बोलला,"जेवण छान झालं. अगदी आईची आठवण झाली. आमची आई गावाकडची. ती गेली ७ वर्षं झाली. आज तिच्या हातचं जेवण आठवलं. धन्यवाद. " त्याचे पाणावलेले डोळे तिला दिसले आणि कसंतरी झालं. केदार त्याला सोडायला खाली गेला आणि ती बराच वेळ नितीनचा विचार करत बसली. कुणाला तरी आपल्या हातचं जेवण इतकं सुख देऊ शकतं या विचाराने तिला समाधान वाटलं.
क्रमश:
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment