Friday, February 24, 2017

स्वप्नाळू : भाग ४ (अंतिम )

        पुढचे अनेक दिवस असेच सरले. कुणीच कुणाचा रुसवा काढायला आलं नाही की गेलं नाही. मुक्ताने एक दोनदा मेसेज केले होते केदार आणि नितिनलाही पण त्याच्यावर कुणाचंच उत्तर आलं नव्हतं. ज्याला त्याला विचार करायला वेळ दिला पाहिजे आणि आपणही घेतला पाहिजे हे मुक्ताला कळत होतंच. ऑफिस तर चालूच होतं. 
असेच एक दिवस जेवताना पूनमने तिला विचारलं,"काय गं किती दिवस अशी गप्प राहणार आहेस? काही सांगत पण नाहीस. "
ती बोलत असतानाच मुक्ताने आपल्या डब्यातली भाजी पूनमला वाढली. ते पाहून पूनम पुढे म्हणाली,"हे बघ मला नुसतं असं खायला घालून मी शांत होणार नाहीये. तुझं काय चाललंय ते सांगशील का?" 
शेवटी मुक्ता बोलायला लागली,"अगं खरं सांगायचं तर भांडण असं कुणाचंच कुणाशीच झालं नाहीये पण प्रत्येकाला माहितेय काय घडलं आहे ते. मला कळलंच नाही कधी त्याच्यात जीव अडकला. नसते उद्योग. कुठे एकदाचं माझं काम मार्गी लागत होतं तर मधेच दुसरंच काहीतरी उद्भवलं. "
पूनम,"मग तुला केदारशी लग्न करायचं नाहीये का? तसं त्याला क्लिअर सांगून टाक ना? आता त्याच्याशी संबंध ठेवायचेच नाहीत तर मग हॉटेलच्या कर्जाचंही बघ बाई. आणि असंही तुम्ही एकत्र काम कसं करू शकणार आहे हे सर्व झाल्यावर?"
मुक्ता वैतागली,"पूनम अगं केवळ, लग्न आणि हॉटेल हाच मुद्दा नाहीये. आमची इतक्या वर्षाची मैत्री आहे ती अशीच तोडायची का? सगळा गोंधळ आहे नुसता. " तिने डबा बंद केला आणि पूनमच्या जेवणाची वाट बघत बसली. 
"नितीनशी तरी बोललीस का? तो काय म्हणतोय?"पूनमने विचारलं. 
"तो काय बोलणार? आमचं त्या दिवसानंतर काहीच बोलणं नाहीये. मुळात असेही आम्ही बोलत कुठे होतो जास्त?" तिने उपहासाने वाक्य टाकलं.
"जाऊ दे उगाच त्रास करून घेऊ नकोस, मी आहे ठीक आता." म्हणत मुक्ता उठलीच. पूणमलाही मग तिच्या सोबत निघावं लागलं. 
        मुक्ताचं मन आजकाल स्वयंपाकात रमत नव्हतं. त्यामुळे काहीतरी बनवून टाकायची ती आणि बाकी बराचसा वेळ विचार करण्यात. पण जित्याची खोड कशी जाणार? मन रमवण्यासाठी तिने मसाले बनवायला सुरुवात केली. धणे-जिऱ्याची पूड, गोडा मसाला, भरल्या वांग्यासाठी मिक्स ओला मसाला हे तिचं चालू झालं. मधेच तिने भाजणीसाठी डाळी, तांदूळ, ज्वारी सगळं धुवून भाजून घेतलं. धान्य भाजता भाजता ती केदारच्या प्रपोजलचा विचार करत होती आणि तिला एकदम काही आठवलं.
तिने केदारला फोन केला त्याने उचलला नाहीच.
मग मेसेज केला,"एकदा तरी बोलायला संधी देणार आहेस की नाही?"
यावर मात्र उत्तर आलं होतं,"बोल". 
तिने मग त्याला परत कॉल लावला. यावेळी त्याने उचलला.
"मला तुला भेटायचं आहे. " तिने अधिकाराने सांगितलं. 
"पण..." तो. 
"पण-बीण काही नको. आपण काही लहान मुलं नाहीयेत हे असं कट्टी करून बसायला. तू येणार आहेस की नाही सांग? तुझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवते." 
त्याने नाराजीनेच 'हो' म्हणून सांगितलं. 
तिने अधीरतेने त्याच्यासाठी पनीर मसाला आणि पुलाव बनवायला घेतला. तिच्या वागण्यात जरा चंचलता आली होती. तो आल्या आल्या तिने हसून दार उघडलं. त्याचा चेहरा अजून रुसलेलाच. 
ती," काय रे काही लागलंय का?" त्याने नकाराने मान हलवली. 
"मग इतका चेहरा पाडून का बसला आहेस? हास की?" तिने त्याला चिअर अप केलं. 
"हे बघ केदार, तू ना मला कन्फ्युज केलंस. आणि हो, एक चूकही केली आहेस त्या दिवशी प्रपोज करताना.", ती बोलली.
त्याने वर पाहिलं. 
"हे बघ तू मला आधी लग्नाचं विचारलंस आणि मग बिझनेस बद्दल. बरं, हे दोन्ही एकत्र तर केलंच शिवाय हेही म्हणालास की तुम्ही मुली फार सेंटी असता, उगाच इमोशनल होऊन बिझनेस करता. आणि आता तू काय करत आहेस? तुला सांगते, आपण हे बिझनेस आणि लग्नाचं एकत्र काढायलाच नको होतं."
"आणि नितीनसोबत चालेल?" त्याने कुत्सितपणे विचारलं. 
"अरे थांब ना! मला बोलू दे. हे हॉटेल माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही तितकंच महत्वाचं आहे, होय ना?" तिने विचारलं.
"हम्म..", तो.
 "आणि माझ्या लक्षात आलं की आपण ते 'झालं तर दोन्ही नाहीतर काहीच नाही' असा विचार करून काहीच बोलत नाहीये. बरोबर ना?"
"ह्म्म्म" तो हुंकारला. 
"म्हणजे बघ, जर फक्त लग्नाचा विषय असता तर आपण तेव्हाच बोलून मोकळे झालो असतो ना? पण तू तरी माझ्याशी भांडून, संबंध तोडलेस का? नाही ना? आणि बिझनेस असता केवळ तर जरा समजून-समजावून पुन्हा बोलून आपलं स्वप्नं पूर्ण केलं असतं. बरोबर की नाही? मला वाटतं, आपण सध्या लग्न हा विषय थोडा बाजूला ठेऊ, तुला काय वाटतं?"
"असा कसा बाजूला ठेवू मुक्ता?" त्याने चिडून विचारले. 
"कसा म्हणजे? लग्न झालंय का आपलं? बोलू ना त्या विषयावर परत. पण आता ही भेळमिसळ नको असं मला वाटतं. मी जर अशी इमोशनल झाले असते तर तू म्हणाला असतंस की नाही मला? उगाच इमोशनल होऊ नको म्हणून? हे बघ थोडा विचार कर. माझ्याइतकंच तुझंही ते स्वप्न आहे. आपण आपली स्वप्नं अशी पूर्ण करायच्या वयात हे काय भांडण घेऊन बसलोय? दोन मुलं बिझनेस करतात तेंव्हा काही वाद झाले तर ते सोडवून पुन्हा एकत्र येतातच ना? आपणही असेच मित्र आहोत आधी आणि मग बाकी सर्व. हे बघ मी तुला उगाच काहीतरी सांगत नाहीये. लग्नाचा विषय नसता तर आपण बाकी कुठलंही भांडण सोडवलंच असतं ना? मग हेही तसंच समज. तू विचार कर, हवा तेव्हढा वेळ घे. आपण पुन्हा बोलू, पण हे असं उगाच न बोलता सोडून देणं मला काही पटत नाही. "
ती ताटं घेत असताना त्याने तिला थांबवलं, म्हणाला,"मी निघतो. नंतर जेऊ कधी एकत्र." 
तिने 'बरं' म्हणून पटापट डबे काढले आणि त्याला सर्व नीट पॅक करून दिलं. तो तिचं इतकं नीटनेटकं पॅकिंग बघून हसला. तीही त्याला उमजून हसली आणि 'बाय' म्हणाली. 

          तो गेल्यावर तिच्यावर मोठ्ठ काम होतं. तिने गाडी बुक केली आणि नितीनच्या शेतावर जायला निघाली. दोन तासाचा प्रवास होता, कधी एकदा तिथे पोचतो असं तिला झालं होतं. तो तिथे असेल-नसेल माहित नाही, पण त्याला भेटणं गरजेचं होतं. शेतावर पोचल्यावर तिने तो कुठे आहे म्हणून एका पोराला विचारलं, त्याने सांगितलं तशी ती चालत राहिली. त्याने बोलवूनही आपण कधीच इथे आलो नव्हतो यावर तिला स्वतःचाच राग येत होता. कुठेतरी दूर तिला त्याची आकृती दिसली. इतक्या दिवसांनी त्याला पाहून उगाच भरून येईल म्हणून तिने दोन क्षण दूरच थांबून घेतलं. 
         त्याच्याजवळ आल्यावर तिने त्याला मोठ्ठ स्माईल दिलं, त्यानेही नाईलाजाने. आपले विचार, भावना आतमध्ये दाबून कशा ठेवायच्या हे त्याला चांगलंच माहित होतं. तिने त्याला 'कुठेतरी बसूया का?' विचारलं. तो तिला घेऊन बांधावरच्या उंबराच्या झाडाखाली आला. दोघेही थोडी मोकळी जागा पाहून बसले.
तिने त्याच्याकडे डोळेभरून पाहिलं आणि म्हणाली,"अख्खं आयुष्य संपलं ना तरी एक शब्द बोलला नसतास तू, ना माझ्याशी ना माझ्याबद्दल. बरोबर ना?"
तो मान खाली घालूनच बसलेला. 
"त्यादिवशी तू पहिल्यांदा माझ्या हातचं जेवलास आणि मन तृप्त झालं. कुणीतरी असं माणूस आपलं असावं असं वाटलं. पुढे तुझं तुझ्या शेतांवरलं प्रेम, त्यासाठी घेतलेले कष्ट हे सर्व आवडत होतंच. त्यादिवशी तू भाज्या घेऊन आलास आणि जणू तुझ्यासोबतचं आख्खं आयुष्य डोळ्यासमोरून गेलं. पण तू निघून गेलास, केदारही चिडून गेला आणि वाटलं, किती ते नुकसान?" 
"एक स्त्री म्हणून आपल्या माणसानं आपल्या हातचं जेवण पोटभरून खावं यासारखं सुख नाही. ते मला तुझ्यात दिसलं. पण मग केदारही माझा मित्र आहेच. त्यानेही मला खूप काही दिलंय, शिकवलंय. या एका सुखासाठी ते सर्व तोडायचं नव्हतं मला. आणि सर्वात महत्वाचं सांगू का? तू, मी, केदार आपण सगळे स्वप्नाळू लोक आहोत. तू तुझ्या शेतावर जितकं प्रेम करतोस तितकंच माझं माझ्या प्रत्येक पदार्थावर आहे आणि तितकंच केदारचं त्याच्या बिझनेसवर. मी विचार केला, आपल्या भावनांमध्ये आपल्या स्वप्नांना का आपण चिरडायचं? इतकी लहान थोडीच आहेत ती? वर्षानुवर्षे मनात जपलीत, त्याच्यासाठी इतके कष्ट घेतलेत. मग ते इतक्या सहज का सोडून द्यायचं? तुला तुझा हा शेतीचा व्यवसाय वाढवायचा आहे तसेच आम्हालाही हॉटेलचा. उगाच तीन पार्टनरमध्ये एक मुलगी आहे म्हणून सगळे घोळ का? आपल्याला इतके परफेक्ट पार्टनर कुठेच मिळणार नाहीत. मग ते सोडून, आपलं इतकं मोठं नुकसान का करून घ्यायचं? आणि जेवायचंच म्हणशील तर एकदा हॉटेल सुरु झाले की तू एकदा काय रोज येऊन जेवलास तरी चालेल. होय ना?"
त्याने वर पाहिलं, तिच्या डोळ्यातलं पाणी आणि ओठांवरच हसू दोन वेगळ्या गोष्टी करत होतं. ती बोलतच राहिली,"नितीन, मला सध्या या कुठल्याच भावनांमध्ये अडकायचं नाहीये. मी माझं स्वप्न इतक्या सहज हातचं नाही जाऊ देणार. तुला खरंच योग्य वाटलं तर अजूनही आपण तसेच पार्टनर राहू जसं आधी ठरलं होतं. पुढच्या आठवड्यात हॉटेलच्या राहिलेल्या कामांसाठी वेगाने सुरुवात करणार आहे मी. तू आलास तर खूप आनंद वाटेल मला. तुझ्या या शेताने, मैत्रीने खूप आनंद दिलाय मला, तो असाच मिळू दे... येते मी. " 

ती उठली आणि पुन्हा म्हणाली,"येऊ मी?". तसा नितीनही उठला. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि 'हो' म्हणाला. बांधावरून काठाला येईपर्यंत दोघेही न बोलता चालत राहिले. तिची कॅब तिथेच होती अजून. ती निघाली आणि तोही वळला. दूरवर पसरलेल्या आपल्या हिरव्यागार शेताकडे पाहात राहिला आणि ती वळून त्याच्याकडे.... पण तिच्या लक्षात आलं होतं तिच्यासाठी तिचं स्वप्न बाकी सर्वांपेक्षा मोठं होतं. ती केवळ एक वेळ होती, स्वप्नांपासून भरकटल्याची. आयुष्य अजून खूप मोठं आहे, आपली स्वप्नं अशीच सोडून देण्यासाठी.

ती डोळे पुसून पुन्हा स्थित झाली. तिला आता घाई झाली होती आपलं स्वप्न पूर्ण करण्याची. 

समाप्त.

विद्या भुतकर. 


No comments: