Sunday, June 18, 2017

ऑप्शन्स

मध्ये मी एक लेख वाचला होता 'ऑप्शन्स' असण्याच्या परिणामांवर. त्यात असा एक प्रयोग केला होता की एका दुकानात ३ च प्रकारची आईस्क्रीम मिळतात आणि दुसऱ्या दुकानात खूप, समजा २० वगैरे. तर ३ प्रकार असणाऱ्या दुकानातून बाहेर आलेल्या लोकांना त्यांनी जे काही निवडलं होतं ते ते आईस्क्रीम त्यांना आवडलं होतं. मात्र जिथे जास्त प्रकार होते तिथल्या दुकानातून बाहेर आलेल्या लोकांपैकी अनेक जणांना आपण निवडलेलं आईस्क्रीम तितकं आवडलं नाही किंवा आपण दुसरा कुठला तरी प्रकार घ्यायला हवा होता असं त्यांना वाटलं. एकूण निष्कर्ष काय तर जितके ऑप्शन्स जास्त तितकं समाधान कमी. 
       इथे मुलांच्या शाळेत युनिफॉर्म नसतो. त्यामुळे रोज सकाळी उठून 'काय कपडे घालायचे हा प्रश्न असतो. लहानपणी कसं चारच कपड्यातला त्यातल्या त्यात चांगला ड्रेस घातला की झालं. आता मात्र मुलांना इतके पर्याय असतात आणि त्यातून होणारे वादही जास्त. त्यासाठी भारतात सर्व शाळांना असणाऱ्या युनिफॉर्मचा मला खूप आदर वाटतो. इथल्या भरमसाठ कपडे असणाऱ्या मुलांपेक्षा ती मुलं आणि त्यांचे आई-वडील बरेच आनंदात असतील. आम्ही तरी होतो. 
    तीच गोष्ट घरातल्या वस्तूंचीही. आजकाल जितक्या बेडरूम्स, रूम्स असतील तितक्या कमीच पडतात. प्रत्येकाला ज्याची त्याची प्रायव्हसी आणि शांतता हवी असते. अगदी आईवडिलांनाही. मग मुलांना त्यांचे आयपॅड आणि आपले लॅपटॉप किंवा फोन्स असं वाटून घेतलं जातं. पुढे जाऊन मुलांना प्रत्येकाला एकेक आयपॅड किंवा एकाला ते तर दुसऱ्याला टीव्ही असेही वाटून घेतलं जातं. का? तर प्रत्येकाला आपल्या आवडीचं बघायचं असतं किंवा गेम्स हवे असतात. आता हे सगळं होतं कारण 'पर्याय' किंवा 'ऑप्शन्स' असतात म्हणून. आणि वादही होतात कारण प्रत्येकाला निवडण्यासाठी पर्याय असतात म्हणून. नाहीतर घरातल्या एकाच टीव्ही वर एकाच चॅनेल वर येणारा एकच कार्यक्रम बघूनही आख्ख घर खुश होतंच की? 
       तर सध्या आमच्याकडे असाच एक गहन प्रश्न पडलेला आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे आणि त्याचसोबत आईस्क्रीम खाणंही वाढलं आहे. पूर्वी दोन्ही मुलं एकच आईस्क्रीम घेतलं की अर्धं अर्धं खात. आणि आम्हा दोघांचं एक. पण आजकाल दोघेही आपल्या आवडीनुसारच आईस्क्रीम घ्यायचा हट्ट करतात. एकतर प्रत्येक मुलाचं वेगळं घेतलं की हे भरमसाठ येतं कितीही लहान कप घेतला तरी. शिवाय त्यातून इतकी साखर पोटात जाते ते वेगळेच. शिवाय नुसत्या आईस्क्रीमसाठी इतके पैसे घालवायचे नको वाटते. यासर्वांवर काय उपाय करायचा हा प्रश्न मला पडलेला. 
      शनिवारी रात्री मुलांनी हट्ट केला तेंव्हा माझी तरी इच्छा नव्हतीच इतक्या उशिरा त्यांनी गॉड खावं अशी. शेवटी एका अटीवर मी हो म्हणाले. म्हटलं, तुम्ही दोघांनी मिळून एक फ्लेवर घ्यायचा आणि शेअर करायचा तरच मी नेईन. सुरुवातीला आरडाओरडा झालाच. मीही ऐकत नव्हते. शेवटी गाडीतच चर्चा सुरु झाली. कुठला फ्लेव्हर घेतला पाहिजे. दोघेही आपल्याच आवडत्या आईस्क्रीमचा हट्ट करत होते. मधेच त्यांनी गॉड बोलून एकमेकांना दुसरा फ्लेव्हर कसा चांगला आहे हे समजावलं. पण मार्ग काही निघत नव्हता. शेवटी सान्वीने सांगितलं तिथे जाऊन आपण बघू आणि ठरवू. 
       दुकानात जाऊन बरीच चर्चा करून मुलाच्या आवडीचं आईस्क्रीम आणि मुलीच्या आवडीचे टॉपिंग त्यावर घेतले. हे तिला आवडलं नाहीच. आम्हा दोघांसाठी मी एक निवडलं होतं. ती नाराज होऊन बसली होती. पण एकदा विकत घेतल्यावर तिच्यासमोर दोनच पर्याय होते. एकतर आमचं किंवा स्वनिकचं. तिने दोनीही चव घेऊन पाहिले आणि शेवटी माझ्यातलं अर्ध घेण्याचं ठरवलं. अर्थात तिला ते आवडलंच. पुढच्या वेळी तिच्या आवडीचं आईस्क्रीम घ्यायचं हेही आमचं ठरलं. एकूण काय शेवट गोड झाला. पण त्या इतक्याशा आईस्क्रीम साठी इतकं मोठं नाटक. संदीप म्हणालाही,"किती जीव घेतेस पोरांचा.". पण त्यालाही दिसत होतं दोघे कशी चर्चा करत आहेत आणि अर्थात बिल कमी आलं हेही. :) 
        कधी वाटतं करू द्यावं त्यांना मनासारखं. अगदी माझाही त्रास कमीच होईल. पण या अशा छोट्या गोष्टीतूनही ते शिकत असतातच. आणि त्या केल्याचं पाहिजेत असं मला वाटतं. अनेकदा टीव्ही पाहतानाही दोघांना न भांडता एकच गोष्ट बघायला लावतो, अगदी बाकी पर्याय असतानाही. कारण समोर पर्याय असले तरी थोडं समजून घेऊन, वाटून घ्यायला शिकण जास्त महत्वाचं आहे. नाही का? नाहीतर उद्या त्यांना एकमेकांसाठीही पर्याय मिळून जातील. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: