Sunday, June 04, 2017

कळलेच नाही.... तुझ्या प्रेमात.... -भाग १

दीपूच्या घरी सकाळपासून धावपळ चालली होती. तिची आई मावशींना मागे लागून दमली.

"अहो जरा त्या कोपऱ्यातून घ्या की ! सोफ्याच्या मागे सगळी धूळ जमली आहे. किती वेळा सांगायचं."

मावशींनीही उगाच थोडं हात ताणल्यासारखं कोपऱ्यात हात फिरवला. त्या कोपऱ्यातली जराशी धूळ फडक्याला चिकटून बाहेर आली आणि आधी पुसलेल्या फरशीलाही लागली. आईनी आता डोक्यावर हातच मारला.

"अगं काय जरा बघ की फरशीवरची घाण. किती वेळा सांगू आता?". आई 'अहो' वरून  'अगं' वर आली होती. 
मावशींनी पुन्हा हात फिरवल्यासारखं केलं. आता आई दमलीय हे दीपूला कळलं होतं. पण त्या दोघीना पाहण्यात तिला आज जरा जास्तच आनंद मिळत होता. डायनींग टेबलच्या एका खुर्चीवर बसून हातातलं फळ दाताने तुकडा तोडत ती गालातल्या गालात हसत होती.

आईकडे बघून ती बोलली,"अगं आई, पण तुला काय इतकं हवंय? जरा धूळ असली तर काय पाहुणे पळून जाणार आहेत?"

आई वैतागून म्हणाली,"हो तू बस निवांत. काम करून पाठ मोडली तरी चालेल. तुझं लग्न थोडीच आहे? बरोबर ना?"

"असं नाही, पण तुम्ही दोघं उगाच सगळं 'पर्फेक्ट' दाखवण्याचा हट्ट करताय? राहू दे ना आहे तसं." दीपू.

"हम्म पण आता इतके बायोडेटा पाहून, कितींना नकार दिलास तू. आता एक येतंय तर सगळं नीट पाहिजे ना?"

"बरं तू म्हणशील तसं.",दीपू.

"चांगलं आहे ना त्याच्या घरचं सगळं. मुलगाही बरा दिसत होता. आता आपल्याच गावात, पाहिजे तसं असलेला मुलगा येतोय तर आपणही थोडे प्रयत्न नको करायला?" आईने विचारलं.

"हम्म म्हणून तर पार्लरला जाऊन आले ना. नाहीतर असं ऐकलं असतं का मी?" दीपू आईच्या गळ्यात पडत बोलली.

"ठीक आहे कळलं. चल जरा कांदा चिरून दे आणि खोबरं खवून ठेव. मी अंघोळ करून येते." आई म्हणाली. 

"शी काय ते पोहे ! मी काय म्हणते आपण एक काम करू ना बाहेरून ढोकळा आणि सामोसे आणू बेकरीतून. मग सोबत चहा, सरबत म्हणशील ते ठेवू. जरा चेंज सर्वांनाच, येणारे पाहुणे पण पोहे खाऊन कंटाळले असतील." दीपूने आयडीया दिली. 

तसा आईनेही थोडा विचार केला. हरकत नव्हती खरंतर. तिने बाबांकडे पाहिलं. इतका वेळ पेप्रात घुसवून ठेवलेलं डोकं त्यांनी जरा वर काढलं आणि मान हलवली. तशी आई चिडलीच. 

"हां डोलवा नुसत्या माना. तुम्ही आणि तुमची लेक काहीही करू नका मीच मरते सगळीकडे. उठा घेऊन या ढोकळा आणि सामोसे. आणि तिखट-गोड चटणी जरा जास्त घेऊन या. चला उठा उठाच आता" म्हणत आईने त्यांचा पेपर काढून घेऊन त्यांना उठवलंच. "

 बाबा पिशवी घेऊन बाहेर पडले. आई अंघोळीला आणि दीपूचं काम आता त्यांच्यावर गेल्याने ती पुन्हा आरामात बसून राहिली, कुठेतरी बघत,विचार करत. यावेळी आलेल्या मुलाला तिने भेटायला तरी होकार दिला याच आनंदात आई-बाबा होते. तिने पुन्हा एकदा त्याचा बायोडेटा पाहिला. शिक्षण, वर्ण, वय, नोकरी, पगार, उंची आणि त्याचा फोटो. सर्व पाहून ती थोडी हसली आणि तयार होण्यासाठी एकदाची उठली. 
      
           दीपूला साडी नेस म्हणून केलेल्या सूचनेला तिने काही भीक घातली नव्हती. मागच्या दिवाळीतला चुडीदार घातला तिने. केस धुवून, सुकवून, सेट केले तिने, थोडासा मेक-अप ही केला. सगळे खायचे पदार्थ नीट सुंदर काचेच्या भांड्यांमध्ये काढून, सजवून झाले, घरातलं एकेक कस्पट उचलून झालं, सोफयावर बसून राहायची प्रॅक्टिसही झाली सर्वांची. इकडे आईचा जीव खालीवर, कधी येणार काही येणार.  दीपू तर जाम वैतागली होती. 'लोकांच्या वेळेला काही महत्व असतं की नाही' वगैरे वाक्यही बोलून झाली. आईने त्यावर,"तू शांत राहा आणि उगाच ते आल्यावर चिडचिड करू नकोस" असं चार वेळा समजावलं. फोन करायचा की नाही या विचारात असतानाच बेल वाजली. सांगितलं होतं त्या वेळेपेक्षा तासभर उशिराच आली सर्व मंडळी. 

         बेल वाजली तशी दीपू आत गेली. दीपूने रागानेआईकडे बघून घेतलं. आईने तिला दटावलं. मुलगा आणि त्याचे आई-वडील इतकेच लोक आले होते. 

"या या बसा ना" म्हणत बाबांनी सर्वांना बसवून घेतलं. आई सर्वांना 'नमस्कार, पाणी आणते हं' म्हणत आत गेली. 
दीपूकडे बघून थोडं हसली. तिने डोळ्यांनीच 'काय?' म्हणून विचारलं. आईनेही डोळे उघड-बंद करून 'शांत राहा' अशी खूण केली. पाण्याचा ट्रे घेऊन ती बाहेर आली आणि परत आत जाऊन दीपूच्या हातात खाऊच्या पदार्थांचा ट्रे दिला. तिची चिडचिड झाली 'हे असं' जायला लागतंय म्हणून. 

        तिकडे बाबांनी बेसिक प्रश्न विचारून झाले होते, उशीर झाला, ट्रॅफिक होतं का, किती गरम होतंय ना आजकाल वगैरे. मुलाच्या वडिलांनीही त्याची व्यवस्थित उत्तरं देऊन झाली होती. मुलाच्या आईने घर, घरातल्या वस्तू, फर्निचर, इ वर एक नजर फिरवून झाली होती. मुलगा एकदा पाण्याचा ग्लास, एकदा स्वतःचे पाय, एकदा तिचे बाबा तर एकदा आपले बाबा यात तर टी-टी च्या मॅचसारखी मान हलवत होता. ती आली तशी सर्व एकदम शांत झाले. तिने अलगद ट्रे टेबलवर ठेवला आणि एका सिंगल खुर्चीवर बसली. 

'ही दीपा', बाबांनी माहित असलेली माहिती पुन्हा दिली. 

मुलाच्या बाबांनी 'मी मनोहर, आमची बायको आणि हा चिराग' अशी ओळख करून दिली. 

दीपूने सर्वांकडे पाहून एक कॉमन नमस्कारासाठी हात जोडले.  बाबांनीच तिची माहिती सांगितली, तिचं शिक्षण, नोकरी, इ बद्दल. मधेच आईने 'घ्या ना ढोकळा, सामोसा' असं म्हणून प्लेट हातात द्यायला सुरुवात केली. मुलाच्या आईनी प्लेट घेता घेताच सांगितलं, "अरे सामोसा खूप आवडतो चिरागला" . 

त्यावर आईने कौतुकाने सांगितलं,"हो ना, दीपूच म्हणाली, पोहे वगैरे नको करू, बदल म्हणून हा पर्याय चांगला आहे म्हणून. तसा स्वयंपाक चांगला करते ती. घरातल्या सर्व स्पेशल डिश तिच्याच असतात. मला काय ते येत नाही काही." 'हो उगाच मुलीला बाहेरचं खायला आवडतं' असं वाटायला नको ना. 

तिकडे बाबांची चिरागच्या बाबांच्या मित्राची जुनी ओळख निघाली. त्यामुळे ते दोघे बोलण्यांत व्यस्त होते. चिरागने प्लेटमधला सामोसा संपवून टाकला होता. दीपू 'पुढे काय?' या विचारात होती. ती त्याच्या हालचालींकडे बघत होती आणि तो आपला खालीच. 

त्याच्या आईने सांगितलं,"तसा शांत स्वभावाचा आहे चिराग. एकदम घरच्या कामात वगैरेही मदत करतो. उगाच बाकी पोरांसारखे दिवसभर गावभर फिरायचे अजिबात आवडत नाही त्याला. शनिवारी भाजीही तोच आणून देतो. 
" आईच्या डोळ्यांत पोराचा अभिमान उतरला होता. 
घरात कोण कोण असतं यावर, नातेवाईक यावर चर्चा सुरु झाली. 

"आमचा छोटा मुलगा आहे, तो अमेरिकेत असतो. आय-टी मध्ये आहे." त्याच्या बाबांनी सांगितलं. 

"मग तुम्ही जाऊन आला की नाही?" दीपूचे बाबा. 

"हां आता एकदा याचं जुळलं की मग जाऊन येऊ. " चिरागच्या आईनी सांगितलं. 

"हो बरोबर आहे, काळजी असतेच पोरांची. कामं सोडून असं जायला नाही जमत", दीपू ची आई बोलली. 
त्या सर्वांची बोलणी चालू असताना हे दोघे मात्र गप्पच. शेवटी त्याचे वडील म्हणाले,"तुम्हाला चालणार असेल तर, मुलांना बोलू दे एकटं पाहिजे तर. आमची काही हरकत नाही. " 

तिचेही बाबा म्हणाले, "हो हो, बरोबर त्यांना हे असं बोलता येणार नाही निवांत. आपण ताव मारू तोवर बोलतील ते आतल्या खोलीत." 

हे असं बोलणं झालं की तिची आई लगेच उठली आणि त्या दोघांना आतल्या खोलीत घेऊन गेली. 'पलंगावरचं थोडंफार आधीच आवरून ठेवलं ते बरं झालं' असं तिने मनात बोलूनही घेतलं. 
त्यांना बसवून हलकंसं दार ओढून ती बाहेर गेली. बाहेर त्यांच्या गप्पा पुन्हा सुरु झाल्या. 
इकडे दार बंद झाल्यावर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि........ 


क्रमश: 

विद्या भुतकर. 

No comments: