गाडीत कुणीच कोणाशी बोललं नाही. चिरागही कसलातरी विचार करतोय असं त्याच्या आई-वडिलांना वाटत होतं. घरात गेल्यावर मात्र बाबांनी विषय काढला.
"चांगलं वाटलं स्थळ मला तरी. तुम्हाला काय वाटतं?" त्यांनी दोघांकडे पाहून प्रश्न विचारला.
"तसं ठीक होतं. मुलगी सावळी वाटत होती नाही आपल्या चिरागपेक्षा?" आईने विचारलं आणि चिराग एकदम दचकला. आपले आई-वडील असाही विचार करू शकतात हे तत्याच्या डोक्यातच आलं नव्हतं.
"त्याचं एव्हढं काही नाही, बाकी घरदार, शिक्षण चांगलं आहे. बोलायलाही चांगली वाटली मला. तुला काय वाटतं चिराग? तूच तिच्याशी बोललास.",बाबांनी विचारलं.
चिरागने विचार केल्यासारखं करून उत्तर दिलं,"असं एका भेटीत सांगता येत का? ते पण लग्नाचा विषय. अजून एक-दोनदा तरी भेटायला हवं ना?".
"ह्म्म्म तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण त्यांची परवानगी पाहिजे ना? त्याशिवाय कसं करणार?", बाबा म्हणाले.
"देतील की का नाही देणार? एव्हढा चांगला मुलगा आहे तर...",आईने एकदम ठसक्यात विचारले.
"तसं नाही, पण काही मत असतात लोकांची.",बाबा.
"मला तरी ते तसे मॉडर्न वाटले, विचारा तुम्ही. मग बघू..", चिरागने शेवटचं वाक्य टाकलं.
-------------------------
दोन दिवसांनी संध्याकाळी त्यांच्या नेहमीच्या कॅफेमध्ये ते भेटले.
दीपूने विचारलं,"काय रे? इतका भाव खातोयस? म्हणे मुलीशी अजून बोलायचं आहे. बाबा नाही म्हणाले असते तर?".
"तर काय तू पटवलं असतंच की?",चिराग.
"आई काय म्हणाली माहितेय? अगदीच बरोबरीचे वाटत होते उंचीत." तिने सांगितलं.
"हो का? आणि तू सावळी म्हणे आमची आई. काय पण या आया ना? उगाच खुसपट काढत असतात. "
"जाऊ दे रे. पण हे असं फुल-टू परमिशन घेऊन भेटायला भारी वाटतंय ना? नो टेन्शन.."दीपू खूष होती.
"म्हणून तर बोलावलं. आणि एकदम खरं वाटलं पाहिजे ना नाटक. त्याशिवाय मजा काय? म्हातारपणी याच आपल्या आठवणी होतील, होय की नाही?", चिराग म्हणाला.
त्याच्या हुशारीचं भारी कौतुक वाटलं तिला. :) तिने होकारार्थी मान डोलावली. निवांत गप्पा मारून, आपली नेहमीची ऑर्डर खाऊन-पिऊन झाल्यावर ते निघाले.
"ए बास हा आता, आजच फोन करून सांगून टाक होकाराचा." दीपू म्हणाली.
"बाप रे, किती ती घाई.... हो...हो.. करतो गं. काळजी करू नकोस." चिरागने आश्वासन दिलं.
रात्री दोघांचं आपापल्या घरी बोलणं झालं. बराच वेळ तिने फोनची वाट पाहिली. रात्री अकरा नंतर तिने अपेक्षा सोडून दिली.
'फोन का केला नाही?' तिने मेसेज केला रात्री उशिरा.
'बाबा म्हणाले इतकी काय घाई आहे? करू की सावकाश?', त्याचं उत्तर.
त्याच्या 'गुड नाईट..'ला तिचं उत्तर आलं नव्हतं.
-----------------------------------------
शेवटी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी एकदाचा फोन वाजला. बाबांच्या बोलण्याकडे कान लावून ती जेवत होती. फोन ठेवल्यावर आई विचारणार हे माहीतच होतं. त्यामुळे तिने अजिबात घाई केली नाही.
"काय म्हणाले?", आई.
"होकार आहे म्हणाले मुलाचा. मग मीही सांगितलं आमच्याकडून 'हो' आहे म्हणून.",बाबा.
"मग?", आई.
"काही नाही. याद्यांना कधी बसायचं याचा मुहूर्त काढू म्हणाले. ते बघतीलच, मीही उद्या जाऊन येतो भटजींकडे.", बाबा म्हणाले.
न राहवून तिने विचारलं,"याद्या? ते कशाला?", दीपूला आतून चिरागवर प्रचंड संताप होत होता.
"अगं कशाला म्हणजे? सगळं लग्नाचं, देवाणघेवाण ठरवायला नको का?", आईने समजावलं.
तिने भराभर चार घास गिळले आणि आतल्या गच्चीतून तिने त्याला फोन केला. त्याने तो कट केला होता.
शेवटी तिने मेसेज केला,"काय रे याद्या कशाला?".
"मी सांगून पाहिलं ऐकत नाहीयेत, सॉरी. मघाशी तेच बोलत होतो तुझा कॉल आला तेंव्हा. उद्या कॅफे मध्ये बोलू. शांत हो." त्याचं उत्तर आलं होतं.
घरी दोघांनीही बोलून त्यांचं कुणी ऐकलं नव्हतं. आता इतकं सर्व होत आहे तर पुढे काही बोलताही येत नव्हतं.
एकदा चिराग बोललाही,"कशाला देवाण-घेवाण?" तर आई म्हणाली होती,"दोन दिवसांत तुला भारीच जवळीक झालेली दिसतेय त्या मुलीशी."
हा असा संशय घेतल्यावर तो गप्पच बसला. आता घरच्यांना 'काय करायचे ते करू दे' असा विचार दोघांनी केला. ते ठीक आहेत तर आपण कशाला अडवायचं?
-----------------------------------------
एकेक दिवस सरत गेला. याद्यांसाठी चिरागच्या घरचे आणि जवळचे नातेवाईक येणार होते. तिच्या घरीही केटरिंग, साफसफाई हे चालूच होतं. याद्या पार पडल्या तर लगेचच 'साखरपुडाही करून घेऊ' म्हणाले होते बाबा. दीपूला घरातले एकेक खर्च दिसत होते आणि तिची चिडचिड होत होती. तिकडे चिरागच्या घरीही तेवढंच काम होतं.
"मुलीसाठी साडी घ्यायची आहे. कधी जायचं?",आई म्हणाली.
"मी जातो ना? एखाद्या मैत्रिणीला घेऊन जातो ऑफिसमधल्या", तो म्हणाला.
आईने संशयाने पाहिलं.
"अगं म्हणजे काय ती फॅशन वगैरे बघून घेतील ना?" चिरागने सारवासारव केली.
"अरे वा, किती काळजी फॅशनची, बघितलं का हो?मला कधी घेतली नाहीस ते?", आईचे टोमणे काही सुटत नव्हते.
"बरं बाई नाही जात. तुला घेऊ ना लग्नाची. तू म्हणशील तिथून.", चिराग बोलला.
"जाऊ दे, घेऊन ये पाहिजे तशी. पण हां उगाच महागाची घेऊ नकोस हं. घे आपली हजार-बाराशे पर्यंत." आईने बजावलं.
चिराग मग दीपूला हवी तशी साडी तिच्यासोबत जाऊनच घेऊन आला. रिसीट मात्र सोयीस्कररीत्या त्याने हरवली होती. अर्थात साडीच्या किमतीची कल्पना आईला बघूनच आली होती.
-----------------------------------------
याद्यांच्या दिवशी दीपूचं घर पाहुण्यांनी भरून गेलं होतं. तीही एकदम सजून-नटून तयार होत होती. आई-बाबा, काका-काकू, मावशी सगळे कामाला लागले होते. नाश्ता,चहा पाणी झालं. दोन्ही घरातले पुढारी आपली जागा पकडून बसले. याद्यांना सुरुवात झाली.
त्याचे मामा बोलले,"हे बघा, फार पटकन होऊन जाईल काम. तीनच गोष्टी आहेत. आपापले मान-पान त्या-त्या बाजूने करायचं. लग्नं मुलीकडच्यांनी लावून द्यावं. आम्ही रिसेप्शन करू. मंगळसूत्र आमच्याकडे आणि बाकी तुमच्याकडून तुम्ही काय ते ७-८ तोळे सोनं घाला मुलीला. काय वाटतं काका?",मामांनी दीपूच्या काकांना विचारलं.
मागणी आली तसे आपापल्या बाजूला मागे बसलेले चिराग आणि दीपू दोघेही दचकले. प्रेमात या सगळ्या गोतावळ्याला जमवून मोठाच घोळ घातलाय आपण हे त्यांना कळलं होतं.
तिचे बाबा काकांशेजारीच बसले होते. ते काकांच्या कानात काहीतरी बोलले.
"लग्नं गावातच करू इथे, चांगला हॉल वगैरे बघू. पण आपापले पाहुणे मात्र जेवण-झोपायची व्यवस्था तुम्ही बघून घ्या.काय वाटतं? ",काका म्हणाले.
"अहो असं काय करताय? पाहुणचार नको का पाहुण्यांचा आमच्या? पहिलंच लग्न आमच्या घरचं हे, मोठं नको का करायला?",मामा.
इकडे दीपूचा राग वाढतच होता. ती आत गेली आणि तिने त्याला मेसेज केला,"अरे काय चाललंय? बोल की काहीतरी?"
"काय बोलू? इतके लोक आहेत समोर, उगाच नाटक नको." चिरागचं उत्तर.
"तू बोलतोस का मी बोलू?" तिने विचारलं.
तो उत्तर देणार इतक्यात शेजारी बसलेले मावशीचे मिस्टर त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागले. त्याला नाईलाजाने फोन बंद करावा लागला.
"अहो आमचे पण पाहुणे येतीलच ना गावाकडून. दोघांचंही आम्हीच करायचं? बाकी सगळं मान्य आहे. आमची एकुलती एक पोरगी आहे. सगळं हौसेनं करू."काका आग्रहाने बोलले.
मामांनी शेजारी बसलेल्या त्याच्या वडिलांच्या कानात खुसपूस केली आणि मान हलवली. दोन्ही कडच्या मंडळींनी सह्या केल्या, याद्या झाल्या. दोन्हीकडची मंडळी काहीच झालं नाही या आविर्भावात एकमेकांना हसून खेळून बोलू लागली.
"साखरपुड्याची तयारी करा." भटजींनी आरोळी ठोकली.
त्याच्या घरच्या बायका जमल्या, तिच्यासाठी ओटी तयार केली. तीही दिलेली साडी नेसून बाहेर आली. त्याच्या मावशीने तिच्या साडीच्या पदराला हात लावून पाहिला."छान आहे हं साडी.", मावशी म्हणाली.
"चिरागची पसंती आमच्या",आईने तत्परतेनं उत्तर दिलं होतं.
दोघांचे पाट समोरासमोर मांडले गेले. दोघांनी अंगठ्यांची अदलाबदल केली. टाळ्या वाजल्या.
"आमची झाली हो पोरगी",म्हणत त्याच्या मावशीने तिला जवळ ओढलं होतं.
दीपूला मात्र कशातच आनंद वाटत नव्हता. चिरागला तिच्या चेहऱ्यावरची नाराजी अजूनही दिसत होती. ज्या क्षणाची दोघे इतकी वाट बघत होते तो प्रत्यक्षात येत असताना, दोघांच्याही चेहरयावर आनंद मात्र दिसत नव्हता.
क्रमश:
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment