आज पिठलं बनवत होते, गाठीचं, म्हणजे ज्यात बारीक बारीक गाठी दिसतात असं. मला ते घोटलेलं आवडत नाही. असो. तर ते बनवताना त्यात मी भरडलेले शेंगदाणे टाकते. ते माझ्याकडे असलेल्या कुटामधून निवडून टाकत होते. त्यावरून पुढे मग बरंच काही आठवलं. आणि वाटलं 'शेंगदाणे' या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण अजून लिहिलं कसं नाहीये? म्हणून सुरुवातीपासून सुरवात करतेय.
तर शेंगदाणे सासरी आणि माहेरीही जिवाभावाचा विषय. आम्ही शाळेत असताना आमच्या शेतात भुईमूग लावला जायचा. त्यात पावसाळ्यात निघणाऱ्या भुईमुगाच्या विशेष आठवणी आहेत. काढलेल्या शेंगा घरी आल्यावर सुकवणे म्हणजे कठीण काम. कधी बायकांकडून शेंगा काढून आणलेल्या असायच्या तर कधी डहाळ्यांच्या शेंगा तोडून काढलेलंही आठवतं. दारात सुकायला टाकायच्या म्हटलं तरी पावसाकडे सारखं लक्ष ठेवायला लागायचं. पाऊस आला की ती ताडपद्री, पोती पटापट आत उचलून न्यायला लागायची. आणि मग ओल्या झाल्या शेंगा तर कधी भुरा आला की अजून चिडचिड. एकूणच ते चिखल असलेल्या शेंगा म्हटलं की नको वाटायचं. तरीही पावसाळ्यात भाजलेल्या शेंगा खाल्ल्या जायच्याच. :)
एकदा शेंगा सुकल्या की मग वर्षभर त्याच वापरात यायच्या. शनिवार- रविवारी, आई शेंगा घेऊन बसायची, आम्हाला खूप राग यायचा, पिक्चर बघताना शेंगा सोलायला लागतात म्हणून. पण पिक्चर संपेपर्यंत भांडंभर दाणे होऊन जायचे. शिवाय त्यात शनिवार असेल तर उपवासाच्या खिचडीसाठी कूटही करून व्हायचा. कूट बनवतानाही मला तेव्हाची आठवण येते. दादांना खिचडीत दाण्याचे कण आलेले आवडत नाहीत त्यामुळे त्याच्या खिचडीचा कूट बारीक असतो एकदम. तर सोमवारी आईच्या उपवासाच्या खिचडीत भरडलेला कूट असायचा जो मला आवडतो. असो. ओल्या शेंगा घरी आल्यावर त्या मोठ्या भांड्यामधे मीठ घालून शिजवून, सुकवल्या जायच्या. अशा सुकलेल्या शेंगांचे दाणे इतके भारी लागायचे. दादा नेहमी खायचे आणि अर्थातच आम्हीही. कोरेगांव मध्ये तेलाच्या गिरणही आहेत. एकदा तर दिवाळीला घरच्या शेंगदाण्याचे तेलही बनवून आणले होते. अर्थातच आता घरी शेंगतेल वापरले जात नाहीच, तब्येतीच्या कारणांनीं. पण अशा काही लहानपणीच्या आठवणी शेंगदाण्याचा.
सासरीही जवळजवळ सर्वच भाज्यांत शेंगदाणे किंवा कूट वापरला जातो. बाय द वे, आमच्याकडे 'दाणे' म्हणत नाहीत, 'शेंगदाणे'च म्हणतात. :) असो. तर नवऱ्यालाही कशातही शेंगदाणे घातलेले चालतात. मला वाटतं जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक पोह्यांमधले शेंगदाणे आवडीने खाणारे आणि दुसरे न खाणारे. :) मला वाटतं की सतत दाणे तोंडात येत असल्याने पोह्यांची चव जाते, तर नवऱ्याला वाटतं की प्रत्येक घासात दोन-चार दाणे तरी आलेच पाहिजे. त्याचा एक साऊथ इंडियन मित्र म्हणतो की, 'तू काय चहातही शेंगदाणे घालून खाशील'. तर कुठल्या भाज्या किंवा पदार्थांत किती प्रमाणात शेंगदाणे किंवा कूट घातला पाहिजे या गोष्टीवर अनेकवेळा काथ्याकूट होतोच. उदा: उपिटात शेंगदाणे घालायचे की नाही? वाटाणा-बटाटा-फ्लॉवर भाजीत कूट घालायचा की नाही, वगैरे. एकदा एका मैत्रिणीकडे त्याला भेंडीची भाजी आवडली होती. घरी आल्यावर म्हणाला, 'छान झाली होती'. का? तर अर्थातच त्यात कूट घातला होता. :) सासर जळगावचं असल्याने एक गोष्ट मात्र नक्की सवयीची झाली ती म्हणजे वांग्याच्या भरतात घातले जाणारे शेंगदाणे. आमच्याकडे घालत नाहीत. पण खानदेशी भरीत आवडीने खाते आणि बनवले तरी तसेच बनवते.
इथे माझ्याकडे शेंगदाणे एकदा भाजले की त्याचा लगेचच कूट करावा लागतो, नाहीतर नंतर कूट करायला काहीही शिल्लक राहात नाही. कारण पॅन्ट्री मध्ये त्या डब्याशेजारीच गुळाची ढेपही असते. :) त्यामुळे भाजतानाच जे काही मिळतील ते. मुलंही शेंगदाणे भाजायला घेतले की एकदम धावत येतात, अर्थातच बाबावर गेलेत हे सांगायची संधी मी सोडत नाही. कूट करण्यातही ठराविक आवडीनिवडी असतात. वर म्हणाले तसे, आईला भरडलेला आवडतो, तर वडिलांना बारीक, सासूबाई दाणे कमी तावावर भाजतात, त्यांना जास्त काळपट रंगाचा कूट आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या दाण्यांचा कूट एकदम सफेद आणि एकसारखा बारीक केलेला असतो. काही लोकांना मायक्रोवेव्ह मध्ये भाजतानाही पाहिले आहे. मला मात्र भांड्यात आणि थोडे जास्त भाजलेले दाणे आवडतात. त्यांच्या कुटामुळे वांग्याची भाजी किंवा सिमला मिरचीची सुकी भाजी वगैरेला छान रंग येतो. नाहीतर कूट सफेद असेल तर भाजीचा रंग ही फिका होतो असे मला वाटते. त्यात, नवऱ्याचं म्हणणं असतं की कशाला ती टरफलं सोलायची, मला मात्र तसाच कूट करणं जमत नाही. अगदीच घाई असेल तरच केला जातो.
अर्थात आमच्या घरात शेंगदाणे किंवा कूट नाही म्हणजे 'आणीबाणी' च आहे असं मानलं जातं हे वेगळं सांगायला नको. काही वर्षांपूर्वी शेंगदाणे खूप महाग झाले होते. अगदी बदाम आणि शेंगदाण्याची किंमत एकच झाली होती. सोळा डॉलरचे ४ पौंड(म्हणजे दोन किलोही नाही). फार वाईट दिवस होते, त्याने घरात शेंगदाणे आणणं कमी झालं नव्हतंच, तरीही झळ लागली होतीच. भारतात गेले की सासूबाई हमखास विचारतात, 'तुला न्यायला कूट करुन देऊ का?'. मी त्यांना सांगत राहते की असतो माझ्याकडे, तुम्ही काळजी करु नका. :) वडील महाबळेश्वरला गेले की तिथं जे मीठ लावून भाजलेले शेंगदाणे मिळतात ते खास जावयासाठी घेऊन येतात. आणि हो, शेंगदाण्याची सर्व प्रकारची चिक्की. (किती ते लाड त्याचे, वगैरे डोळे फिरवणारा स्मायली टाकला पाहिजे इथे. असो.)
वर सुरुवात करताना म्हटलं होतं ना, माझ्या पिठल्यात भरडलेले शेंगदाणे टाकत होते. तर तुम्हीही टाकून बघा. माझ्या आजोळी सांगलीला जे पिठलं करतात ना त्यात असायचे, तर आईकडे पिठलं भाकरीसोबत बाजूला घेऊन खायचे. मी मात्र त्यातच घालते. तर त्या पिठल्यावरुन इतकं सगळं रामायण लिहिलं. पण असतात अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी, ज्याच्या त्याच्या. :) तुमच्याही असतीलच.
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment