Monday, November 06, 2017

तो, ती आणि किशोर

गुलाबी थंडीची ती रात्र. तो गाडी चालवत होता. ती बराच वेळ शेजारी बाहेर बघत बसली होती. मध्येच तिने सीडींचा बॉक्स काढला. शोधत शोधत ती 'किशोर कुमार' लिहिलेल्या सीडीवर थांबली. तिने सीडी टाकली आणि पहिलंच गाणं ..... 'मेरे मेहबूब इनायत होगी...... '  लागलं. 
'वाह ....!' ती उद्गारली. तिच्या 'वाह' वरच त्याला कळलं ती आता नॉर्मल होत आहे. 

       एकेक गाणं येऊ लागलं तशी ती त्या गाण्यांसोबत आपल्या भसाड्या आवाजात गाऊ लागली. तो हळूच हसलाही. तिने ते पाहिलं होतं. पण समोरच्या गाण्याचे बोल सोडून त्याच्याशी बोलायला ब्रेक घ्यायची तिची इच्छा नव्हती. 
'.......तुम जो केह दो तो आज की रात चाँद डूबेगा नहीं ईईईई ' . गाडी गर्दीतून वाट काढत घरी चालली होती. 
'इस मोड से जाते है...... ' तिने तान घेताना हातांनाही वळण दिलं होतं. 'इन रेशमी राहों में एक राह तो वो होगी.......  तुम तक जो पहुँचती है........ उस मोड़ से जाते  है एएए ....... '. एकापाठोपाठ एक गाणं चालू होतं. 

ती अशी गाण्यांत गुंतली की तो नेहमी हसायचा. इतकं काय त्या गाण्यात अडकायचं? आहे आवाज सुंदर आणि शब्दही... पण इतकं काय असतं त्या गाण्यात, मला नाही कळत', तो म्हणायचा. 

'जाऊ दे तुला कळणार पण नाही. असते एखाद्याची आवड. आणि तुला सांगू, नाहीच आवडलं प्रत्येक गाणं तरीही एखादं गाणं असतंच असं, ते स्वतःला लागतं ना तेव्हाच त्यातला भाव जाणवतो, दुखतो, मनात राहतो. पण तुला काय?' म्हणत ती पुन्हा गुणगुणायला लागायची. 

तोही तिचा वेडेपणा आहे म्हणून सोडून द्यायचा. 

आज मात्र तिचा आनंद पाहून त्यानेही तिला साथ दिली होती, 'आज रपट जाये तो हमें ना उठइयो            आ हा..ओ हो...... " स्टिअरिंग वरचा एकेक हात उचलत त्याचा डान्स पाहून ती हसली. शेवटी घर आलं. तिला गाणी सोडून घरात जायची इच्छा होत नव्हती. एरवी तिने गाणं पूर्ण होईपर्यंत थांबायचं म्हटलं की त्याला चिडचिड व्हायची. घराजवळ येऊनही गाडी चालू ठेवून उगाच काय बसायचं. घराजवळ आल्यावर आज पुन्हा तेच होणार तिला वाटलं. गाणं चालू असतानाही त्याने गाडी बंद केलीच. ती गप्प बसली. पण निघताना त्याने ती सीडी काढून घेतली. घरात येऊन तिने चप्पल कपाटात ठेवले, हातातलं सामान फ्रिजमध्ये ठेवायला गेली तेव्हढ्यात म्युझिक सिस्टीम अर्धवट राहिलेलं गाणं सुरु झालं होतं. ती खूष होऊन हॉलमध्ये आली. तोही हसला. 

'आपकी आँखो में कुछ.... ' सुरु झालं होतं. ती त्याला म्हणाली,'मला ना खूप इच्छा होती माझ्यासाठी कुणीतरी हे गाणं म्हणावं."

'अच्छा?', त्याने विचारलं. 

तेव्हढ्यात गाणं पुढे सरकलं होतं. 'लब हिले तो मोगरे के फूल खिलतें कही....' पर्यंत आल्यावर आपल्या भसाड्या आवाजातून मोगऱ्याची नाही, तर झेंडूची फुले पडतील असं तिला वाटून हसू आलं. तोही तिचा विचार ओळखून तिच्याकडे बघून हसला. पुढे मग प्रत्येक गाण्यांत गमती सुरु झाल्या.

         त्यांचा पायांवर पाय ठेवून डान्स सुरु असतानाच 'अभिमान' मधलं गाणं सुरु झालं. 
'ओ ...... आ ....... तेरे मेरे मिलन की ये रैना..... ' आणि तो थबकला. 
तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..... 
          
          आज तिच्या डॉक्टरकडे जाऊन आले होते ते. गेल्या ८-१० वर्षांतल्या अनेक व्हिझिट्स पैकी अजून एक. अनेक उपचार, औषधं, आय व्ही एफ, आणि अनेक वेळा झालेलं मिस-कॅरेज. त्यातून होणारे अनेक प्रश्न आणि प्रॉब्लेम्स. तिचा प्रत्येक वेळी होणारा हार्मोनल इम्बॅलन्स. प्रेग्नन्ट असताना उंचावलेल्या अपेक्षा आणि होणारा अपेक्षाभंग. त्यातून होणारी तिची चिडचिड, मग भांडणं. तिला आलेलं एकाकीपण, घरातली सुन्नता. सगळं गेल्या काही वर्षांपासून चालू होतं. शेवटचा एक प्रयत्न करायचा आणि त्यातून काही अपेक्षा नाही ठेवायची हेही ठरवून यावेळी आय व्ही एफ साठी ते गेले होते. दरवेळी तीन महिन्यांतच मिस-कॅरेज व्हायचं. आज चार महिने उलटून गेले होते आणि आज तपासून आल्यावर सर्व काही ठीक आहे म्हणून डॉक्टरनी सांगितलं होतं. 
आज खूप दिवसांनी त्यांच्या घरातली ती भयाण शांतता भंग पावली होती. 

मागे गाणं चालूच होतं आणि त्याचा आवाज दाटला होता,'जैसे चन्दा खेले बादल में... '. 

ते गाणं त्याच्या मनाला भिडलं होतं. 

विद्या भुतकर. 

No comments: