परवा नेटफ्लिक्स वर 'लस्ट स्टोरीज' पाहिला/पाहिल्या. होय, पाहिल्या आणि आवडल्याही. त्यावर लिहायचं होतं, पण मग नेहमीसारखं, 'लोक काय म्हणतील?' सारखे फडतूस विचार येतात. त्यामुळेच हे लिहायलाही ८-१० दिवस गेले. आता पोस्ट करायचं की नाही हा विचार करायला अजून काही. असो. तर लस्ट स्टोरीज, आवडल्या. चारही ! वेगवेगळ्या कारणांसाठी. बांधलेल्या नात्यांतून बाहेर पडून सुख शोधण्याच्या प्रयत्न करणाऱ्या, जीवाची तगमग दाखवून देणाऱ्या. त्यात 'लस्ट' कुठे दिसलीच नाही. उलट एकेक जीवाला चटका लावणारी.
तर त्या स्टोरीतली, त्यातली सर्वात शेवटची होती ती टिपिकल लग्नातल्या जोडप्याची. करण जोहरची. तसं पाहिलं तर बाकीच्या तीन मला जास्त आवडल्या. चौकटीतल्या नात्यांना डावलून असलेल्या. ही त्यामानाने टिपिकलंच. आणि शिवाय 'वीरें दी वेडिंग' मधल्या स्वरा भास्करच्या 'चरम सुख' चा सीनही चर्चा करून झालेला. त्यानंतर पुन्हा त्याच विषयांवर असलेली ही गोष्ट पाहण्यात विशेष काही वाटलं नाही. आपणही बोलणं किंवा लिहिणं गरजेचं आहे का असं वाटलं. पण खाज, दुसरं काय.
तर असतं काय या गोष्टीत, विकी कौशल, आपला साधा भोळा भारतीय पुरुष. बायको एकदम सुंदर. सुहाग-रात च्या वेळी जो त्याचा रतीब सुरु होतो, तो इतर नवीन जोडप्यांप्रमाणे मजेत चालू असतो. बायको बिचारी हातांची पाच बोटं मोजेपर्यंत याचं काम झालेलं. त्याचं काम झालं की हा झोपणार डाराडूर. बायको समजावण्याचा प्रयत्न करते, पण याला कुठे काय समजतंय? शिवाय हा बायकोला म्हणतो, "तुझी पण मजा चालूय". इकडे बायको फ्रस्ट्रेटेड. तर एकूण सर्व प्रकार बघायला एकदम मजेशीर. खूप हसले बघताना. पण मूळ मुद्दा जरा जास्त गंभीर आहेच.
संभोग! आपल्याकडे यात किती स्त्रियांना यात भोग मिळतो? सुख मिळतं? पुरुषांचं बरं आहे, समोर दिसतोही पुरावा. शिवाय नसेलंच बाई किंवा बायको तरीही सेल्फ हेल्प वगैरे असतेच. आपला हात. पण बाईचं काय? तिलाही या सुखाची इच्छा असते. ती तितकीशी सहज समजण्याइतकी सोपी नाही, पण आयुष्याचा साथीदार म्हणून ते समजून घ्यायची काही गरज वाटते की नाही? अगदी, लग्नाआधी एकमेकांचे चांगले मित्र असले तरीही नवरा बायको या विषयावर स्पष्टपणे बोलतात की नाही मला शंका आहे. आता शंका म्हणतेय, कारण मी काही कुणाला विचारायला गेले नाही. (अर्थात तसा सर्व्हे करून बघायला हरकत नाही. )
तर मला वाटतं की दोघांनी एकमेकांशी स्पष्टपणे या विषयावर बोलण्याची, संवाद साधायची गरज असते. गरज आहे. आपण, स्त्रियांना समान हक्क वगैरे साठी लढतो. पण माणसाच्या या मूलभूत गरजांमध्येच नवरा-बायकोत संवाद नसेल तर काय उपयोग? मी तर म्हणते, प्रत्येक बाईने भांडायला हवं आपल्या या हक्कासाठी. नाहीतर, असा दानधर्म किती दिवस करत राहणार? आणि त्यामुळेच मला वाटतं की एकदा मुलं झाली की संभोगातला भारतीय स्त्रियांचा रस अजून कमी होत असावा. त्या स्टोरी मध्ये सासू म्हणते तसं,"जब हो जाये बरकत, क्यों करनी कसरत". जाम हसले या वाक्यावर. पण ज्या कामात आपल्याला काही मिळतंच नाही ते करणार तरी किती दिवस? तर माझं म्हणणं इतकंच, आजवर कधी बायको म्हणून नवऱ्याला पुढे होऊन आपल्याला संभोगात काय हवं हे सांगितलं नसेल तर सांगावं आणि नवरा म्हणून एखाद्याने विचारलं नसेल तर त्याने स्वतःहून विचारावं. कारण नाही म्हटलं तरी, प्रत्येक नात्यात देवाण घेवाण ही असतेच. मग ती अशी नीट बोलून होत असेल तर का नको?
आणि हो, बाकी लस्ट स्टोरीज बद्दल पुन्हा कधीतरी.
आणि हो, बाकी लस्ट स्टोरीज बद्दल पुन्हा कधीतरी.
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment