काल खूप दिवसांनी हाताने कपडे धुतले. म्हणजे खरंच स्वयंपाकघरातले रूमाल हाताने धुतले. (उगाच आपलं.) तर होतं काय? आता मी उगाच छोट्या गोष्टींचा बाऊ करून माझं दुःख किती मोठं वगैरे लिहीत नाहीये. फक्त जे झालं किंवा होतं ते सांगते. तर, वॉशिंग मशीन मध्ये बाकी कपड्यांसोबत हे रुमाल धुवायला टाकता येत नाही. म्हणजे येतात, पण मला आवडत नाही. मग दोन रुमाल, (हो, रुमाल म्हणजे नॅपकिन्स बरं का. ) मशीनमध्ये फिरवण्यासाठी कोण धुवायला टाकणार? हाताने धुवायचे तर ते नेहमी विसरून जातं. शेवटी परवा रात्री, साबणाच्या पाण्यात ते रुमाल भिजत घातले आणि काल दुपारी ते बाथटब मध्ये बसून खसाखसा हाताने धुतले. अगदी बदडून वगैरे. आणि बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या.
कोरेगावला अनेकदा उन्हाळ्यात नळाला पाणी नसायचं पुरेसं. दारात विहीर होती पण अजून त्यावर मोटार बसवली नव्हती. दारातल्या शेताच्या पलीकडेच एक ओढा वाहायचा. आई मग ओढ्याला कपडे घेऊन जायची धुवायला. आम्हाला पण आवडायचं ओढ्याला जायला. पण आईला ते आवडायचं नाही. एकदा मला आठवतंय, स्कॉलरशिपच्या गणिताच्या चाचणीचा अभ्यास देऊन आई ओढ्याला गेली होती आणि मला अभ्यास करायला लागतो म्हणून राग आला होता. आता वाईट वाटलं आठवून. आई परत येईपर्यंत पार दमलेली असायची आणि आम्हाला कपडे वाळत घालायला सांगितले तरी आम्ही आळस करायचो. आता सानूला मला उलटी उत्तरं देताना पाहून वाटतं, माझ्याच पापाची फळं भोगतीय. दुसरं काय? तर ओढ्यावर पाण्यात पाय बुचकळायला, आईच्या सोबत अजून एक मैत्रीण यायची तिची, त्यांच्या मुलीसोबत खेळायला मजा यायची. कपडे धुण्यासाठी, एक त्यातल्या त्यात चांगला दगड असलेली जागा पकडायची चढाओढही आठवते, अंधुकशी.
पाण्यावरून आठवलं, आमच्या दारात सरकारी नळ बसायच्या आधी रस्ता ओलांडून एका कॉमन नळावरून पाणी भरून आणायचो, प्यायचं फक्त. पण शाळा सुरु होण्याआधी मुलं दारातून जाताना दिसू लागली की मला घरातल्या अवतारात पाणी घेऊन यायची लाज वाटायची. आंघोळीला मात्र आम्ही विहिरीचं पाणी घ्यायचो. दादा खोल विहिरीत बदली टाकून आढ्याला ओढून भरलेली बादली वर काढायचे. प्रचंड जोर लागतो अशी बादली वर ओढायला. दोन लोक असतील तर दोघांचा ताळमेळही जमावा लागतो. आम्हांला शक्यतो ही कामं करून दिली नाहीत. तर त्या भरलेल्या बादल्या विहिरीवरून घराच्या मागच्या बाजूच्या मोरीत नेईपर्यंत हातांची वाट लागायची. नंतर दारात नळ आला, विहिरीवर मोटर लागली. बाथरूमच्या छतावर टाकीही आली. अनेक वर्षं दारातला तांब्याचा बंब मात्र चालू होता अगदी गेल्या एक दोन वर्षांपर्यंत. थंडीत त्या बंबात दादा काटक्या टाकून पेटवत असतांना आम्ही बाजूला उभे राहून शेकोटी करायचो.आमची शाळा ११-५ असायची. शनिवारी मात्र ८ ला शाळेत जायला जीवावर यायचं. अशा थंडीत इतक्या लवकर उठून त्या शेकोटीजवळ बसायची आणि आईने आवरण्यासाठी केलेली आरडाओरड आठवते.
हां तर कपडे. नंतर कधीतरी आमच्या घरी कपडे, भांडी या सर्वांसाठी बाई येऊ लागली. बहुतेक मी कॉलेजला सांगलीला गेले तेंव्हापासून असेल. कारण तिचं अस्तित्व फक्त मला ओझरतंच आठवतं. असं पहिली ओळख वगैरे काही आठवत नाही. त्यावरून आठवलं, मी पहिल्या वर्षी सांगलीला गेले कॉलेजला तेव्हा पहिले १५ दिवसांतच घराची ओढ लागली. मग एका शुक्रवारी दुपारी दांडी मारून आम्ही मैत्रिणी घरी जायचं ठरवलं. शुक्रवारी जाण्यात विशेष काय? खरंतर शनिवारी ट्रेनने गेले तर पॅसेंजरला बरंच कमी तिकीट असायचं, २० रुपये. तरीही न राहवून मी शुक्रवारी बसने गेले, तिकीट ५७ रुपये सातारा पर्यंत, पुढे कोरेगांव १०-१२ रु असेल. दुपारी घरी पोचले तर बाहेर आजोबांकडे शिकवणीला मुलं आलेली. आणि ओसरीवर ही बाई फरशी पुसत होती. मी रिक्षातून बाहेर पडून आबांच्या शिकवणीच्या मुलांमधून पळत, पुसत असलेल्या फरशीवरुन पळत जाऊन आईला मिठी मारली होती आणि खूप जोरात रडले होते.
तर कपडे. कॉलेजमध्ये मोजकेच ड्रेसेस होते. पहिले दोनेक वर्ष तर आठवड्याचे ५-६ च ड्रेस आणि घरी घालायचे कपडे. मग दर रविवारी ते भिजवून, धुवून, सुकवून घेणे हे मोठं कामच असायचं. एखाद्या रविवारी हे चुकलं की पुन्हा तेच कपडे रिपीट, म्हणजे बाकीच्यांना त्रास. :) त्यासाठी घरी गेलेलं परवडायचं. धुवून, अगदी इस्त्रीलाही देता यायचे. पुढचे दोन वर्षं अजून २-४ जास्त कपड्यांची भर पडली असावी पण एकूण ते ८-१० ड्रेस धुवेपर्यंत वाट लागायची. कपडे धुवायच्या दिवशी मी चुडीदारची पॅन्ट आणि एखादा टीशर्ट घालायचे. नंतर तीच फॅशन 'जब वी मेट' मध्ये करीनाची होती. तेव्हा वाटलं अरे आम्ही हे तर आधीच शोधलं होतं. या कॉलेजच्या दिवसांमध्ये माझ्या रूममध्ये मार्क वॉ आणि स्टीव्ह वॉचं पीटर इंग्लंडच्या जाहिरातीचं पोस्टर मी लावलेलं होतं. एकतर दोघे चिकणे होते म्हणून आणि मी म्हणायचे, माझ्या नवऱ्याचा वार्डरोब असा असेल तर माझा कसा असेल? असा वार्डरोब पाहिजे. आता कपडे आहेत, पण कपाट अजून थोडं मोठं हवंय असं वाटतंय. :)
मला कॉटनच्या, खादीच्या ड्रेसेसचं फार आकर्षण. नोकरी लागल्यावर मग सर्व कॉटनचे चुडीदार शिवून घेतले. आता हे धुणे म्हणजे मोठं जिकिरीचं काम. अनेकदा रंग जाऊ नये म्हणून दोन कपडे सुटे भिजवावे लागायचे. कुणी म्हणायचं, रंग जाऊन नये म्हणून मिठाच्या पाण्यात भिजवायचे. पण ते सर्व साफ खोटं. थोडे दिवस धुवून इस्त्रीही धोब्याकडेच करून घ्यायचे चोचलेही केले. पण ते काही टिकले नाही जास्त दिवस. मुंबईत, लखनवी कॉटनचे ६-७ ड्रेस होते. ते ड्रेस, त्यांच्या ओढण्या धुणे नाजूक काम असायचं. एकदा माझा एक ड्रेस दुसऱ्या ड्रेसचा रंग लागून खराब झाला. आजही तो आठवला तर प्रचंड वाईट वाटतं. मुंबईतून अमेरिका, कॅनडा वगैरे सुरु झाल्यावर मात्र एकूणच हाताने कपडे धुणे बंदच झालं. सान्वी झाल्यावर थोडे दिवस आईने तिचे कपडे धुतले होते. साड्या वगैरे मात्र जास्त काही हाताने धुतलं जात नाही. बरेचसे कपडे मशीनमध्येच धुतले जातात त्यामुळे फारतर वर्षातून अशी वेळ येत असावी.
आता कधी कधी स्वतःच्या कपड्यांकडे पाहून आपण कुठून कुठे आलोय वगैरे फिलिंग येते. पण ती क्षणांपुरतीच. कारण पुढच्याच मिनिटाला, अजून नवीन काय काय घ्यायचं आहे याची आठवण होते आणि मग नव्याने खरेदीला जाते. :) आज हे सर्व त्या दोन रुमाल धुण्यावरून आठवलं. पुढच्या वेळी ते मशीनमध्येच टाकलेलं बरं.
विद्या भुतकर.
1 comment:
नमस्कार विद्या ताई,
छान लिहिता तुम्ही.
तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते.
मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू.
धन्यवाद ,
डॉक्टर स्पर्शिका जोशी.
स्त्री रोग तज्ज्ञ
M.D. D.G.O.
मुंबई
Post a Comment