आज भर उन्हाचं, आठ मैल चालले, दोन तास पाच मिनिटं २३ सेकंद वगैरे, मोजून. त्यात विशेष सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत होते वेग वाढवण्याचा. पूर्वी प्रत्येक मैल साधारण १३ मिनिटांत पूर्ण व्हायचा. मग पाठीच्या दुखण्यानंतर सगळं मागं पडलं. काही दिवस झाले प्रयत्न करत होते निदान १६ मिनिटांच्या आत तरी एक मैल पूर्ण करावा पण तेही जमत नव्हतं. आज ते जमलं. कसं ते माहित नाही. खरंतर नवऱ्याचा वेग माझ्या दुप्पट. म्हणजे जे अंतर मी १६ मिनिटात पार करते तो ते ८-९ मिनिटांत करतो. पण माझी तुलना त्याच्याशी नसतेच. हा विजय माझा, माझ्यापुरताच, आजच्या पुरताच. उद्या तिथे नवीन काहीतरी असेल. ते नवीन काहीतरी असेपर्यंत, या छोट्या विजयाचा आनंद का मानायचा नाही मी? असो.
तर आजची पोस्ट चालण्याबद्दलची. हे वरचं उगाच आपलं शायनिंग मारण्यासाठी. :) कधी तुम्ही एकटे चाललाय? एकटं म्हणजे एकटं. ते तसं चालायला मिळणं यासारखी चैन नाही. हो खरंच. आज सलग एकटी चालले तसं, माझ्यासोबतच. अर्थात आज काही पहिल्यांदा नाहीये हे. उलट आता त्याचं व्यसन लागलंय म्हणायला हवं. हां तर चैन. चालण्यासाठी तेव्हढा वेळ, वेग, शारीरिक क्षमता, जागा, वातावरण आणि मनस्थिती सर्व एकत्र असणं ही चैन नाहीतर काय आहे? आजूबाजूच्या छोट्यामोठ्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती यांना पाहात, एकसलग पडणाऱ्या आपल्या पावलांची जाणीवही न होता सलग चालत राहणं.
रोज सतत हातात फोन, टीव्ही, आजूबाजूला बोलायला असणाऱ्या अनेक व्यक्ती, करावी लागणारी कामं, एखाद्या गोष्टीवरून नाराज असलेलं मन, कशामुळे तरी वाटणारी काळजी, दुःख, आनंद हे सगळं गर्दीत चालू असतं. त्या सगळ्यातून स्वतःला बाहेर काढून कुठून तरी कुठेवर तरी चालत राहणं. त्यात मग आपलेच आपल्याशीच होणारे संवाद, आपल्या प्रिय व्यक्त्तींशी त्यांच्या परस्पर होणारे संवाद, कुणासोबत तरी चालण्याच्या जुन्या आठवणी चाळवत असताना समोर दिसणाऱ्या छोट्या चायनीज मुलाची त्याच्या आजोबांसोबत पाहिल्याची नवीन आठवणही कुठेतरी मनात बसून जाते. एखादं गाणं कानात चालू असताना त्यावर नकळत वाढलेला पावलांचा वेग आणि 'अँड वी ट्विस्ट' गाण्यावर जागच्या जागीच केलेला ट्विस्ट. हे सर्व कधी अनुभवलंय?
बरं हे चालत असताना डोक्यातले विचार काही कमी असतात का? त्या प्रत्येक विचाराला सामोरं जाणं. एकटं वाटत असताना एकटं चालून अजूनच एकटं वाटून घेणं तरीही त्या एकटेपणाला सामोरं जाणं. किंवा आयुष्यात त्या त्या वेळी चाललेले संघर्ष, व्याप यांचा परत परत विचार करणं. 'त्यातून उपाय काय?' हा निरर्थक विचारही करणं आणि विचारातून काही हाती लागलं नाहीच तर, शेजारून जाणाऱ्या सायकलिस्टला पाहून लाईन मारणं. असे कितीतरी तास चाललेय मी अनेकदा, त्या त्या वेळी चालू असलेल्या घटना, विचार, संघर्ष आणि गाणी घेऊन.
आता हे चालणं काही केवळ व्यायाम म्हणून सांगत नाहीये मी. वेगवेगळ्या चालण्याच्या जुन्या आठवणीही आहेत. एक ठराविक एकटं चालण्याची आठवण म्हणजे, मला पहिली नोकरी मिळाली हे फोनवरून कळलं आणि ते मित्र-मैत्रिणींना सांगण्यासाठी पळत सुटलेली एकटी मी. त्या चालण्याचा वेग, उड्या मारणारं मन आणि केवळ एखादा किलोमीटर असलेलं अंतर. ते तितकंच अंतर पण स्वतःसोबत चाललेलं ते अविस्मरणीय अंतर आहे, आजतागायत. टोरांटो, न्यू जर्सीच्या बस स्टॉपपासून रूमपर्यंत थंडीत, अंधारात, भीतीने चाललेलं मोजकं अंतरही असंच लक्षात राहणारं. अगदी सध्याही ट्रेन स्टेशनपासून ऑफिसपर्यंत एकटीने पार केलेलं थोडंसं अंतर. पुण्याच्या चांदणी चौकातून पुढे जाऊन फुटपाथवर भाजीवाल्यांच्या शेजारून चाललेलं किंवा पुण्यात घराजवळ चालताना इतक्या सकाळी कुणी कुत्रं मागं लागणार नाही ना? या भीतीने दबकत चाललेलं अंतरही आहेच. कितीतरी विचार, कितीतरी घटना, कितीतरी भावना. सर्व माझंच, माझ्यापुरतं, माझ्या पावलांसोबत.

घरी परत आल्यावर दमलेल्या पायांची जाणीव होते, आपण माणसात आलोय हे लक्षात येतं. पण तोवर आपल्यासोबत घालवलेला आपला तो वेळ मनाला कायमचा चिकटून गेलेला असतो. नवीन एखादा निर्णय घेऊन झालेला असतो, प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तरी त्याला सामोरं जाण्याचं बळ मिळालेलं असतं. काही नाही तरी कुणी आयतं बनवून दिलेलं जेवण जेवून मस्त ताणून देण्याइतके तरी दमलेले असतो. तशी झोप झाल्यावर अजूनच भारी वाटणार असतं. निदान त्या भारी वाटण्यासाठी का होईना एकटं चाललं पाहिजे.
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment