Sunday, September 16, 2018

नातिचरामि

        मागच्या आठवड्यात मेघना पेठे यांचं 'नातिचरामि' पुस्तक वाचून पूर्ण झालं. आपण ते इतक्या उशिरा वाचतोय याची मला थोडी लाज वाटलीच पण कधीच न वाचण्यापेक्षा बरंच ना? खरंतर मला पुस्तकांची समीक्षा लिहिता येत नाही. होतं काय की वाचताना  वाहवत जातो आणि पुस्तक संपल्यावर त्यातल्या ठराविकच  लिहायच्या तर पुन्हा त्यावर विचार करायला लागतो. जे शक्य होत नाही. पण मागच्या वेळी अनेकांनी एका वाचलेल्या पुस्तकाबद्दल विचारलं की ते मला कसं वाटलं होतं. म्हणून चार ओळी का होईना आवर्जून लिहायला घेतल्या. 
         तर 'नातिचरामि' हे पुस्तक नसून एक अनुभव आहे. त्यातल्या पहिल्या पानापासून जे जग निरनिराळ्या भागांतून उभं राहतं ते अनुभवणं वर्णनातीत आहे. पुस्तक छोटं असूनही मी अनेक दिवस वाचत राहिले, बसमधून, ट्रेनमधून जाताना. कधी कधी तर असं झालं की जे वाचलंय ते इतकं पटलंय मनाला, इतकं लागलंय किंवा 'अरे मलाही हे असंच वाटतं' असं झालं. आणि मग मी पुस्तक मिटून तशीच बसून राहिलेय. जे समोर येतंय ते समजून घ्यायला. 
लेखिकेची शैलीही अशी आहे की मला अनेकदा वाटलं की मी तिचाच एक भाग आहे. आजवर कुठलंही पुस्तक इतकं जवळचं वाटलं नाहीये जितकं हे वाटलं. कुणी इतकं हळुवार, इतकं क्रूर, इतकं खरं लिहू शकतं असं वाटलं अनेकदा. 
           अजून जास्त काही लिहावंसं वाटत नाहीये. त्यातल्या पहिल्या भागात ही वाक्यं होती ती वाचली आणि पटकन डोळ्यांत पाणी आलं. कदाचित संदर्भाशिवाय त्याची तीव्रता जाणवणार नाही, तरीही देत आहे: 
"विजांना घाबरणारा एक माणूस विजा संपेपर्यंत दुसरया माणसाचा हात धरतो. विजा संपल्यावर निघून जातो. यांत दोघांनीही कुठल्या संस्थेचं सभासद असण्याची काय गरज आहे? आहे? आणि कुठल्या संस्थेचं सभासदत्व रद्द करण्याची? आहे?"  

विद्या भुतकर.

No comments: