गेल्या कित्येक दिवसांपासून हे लिहायचं होतं पण वेळ मिळत नव्हता. यावेळी माझी दोनच आठवड्यांची सुट्टी झाली. पोरं, नवरा मस्त दीड महिना राहिले भारतात, हो मला सोडून. त्यामुळे भारतात पोहोचले आणि वाटलं, 'बास आता तुमचे लाड पुरे आता फक्त माझेच'. मग पहिल्याच दिवशी नवरा आणि बहिणीशी भांडले, रोज सकाळी दुधावरची साय आणि साखर मीच खाणार म्हणून. :) पुढचे कितीतरी दिवस बिचारे घाबरूनच खात नव्हते. तर हे माझं नेहमीचंच. मग ती रात्री तापवलेल्या दुधावरची सकाळी आलेली घट्ट साय असो किंवा रात्रीची शिळी भाकरी असो. नशीब पोरांना अजून कळत नाही, नाहीतर म्हणणार आई काय इतक्याशा गोष्टींवरून भांडते. सायीवरून आठवलं, आमच्या मावशीचा हातचा चहा मला खूप आवडायचा. कॉलेजमध्ये असताना
मावशीकडे गेलं की ती साय काढल्यानंतर खाली तुपकट दूध असायचं ते चहात घालून
द्यायची. तर तसा तो चहा अजूनही आठवतो.
सायीवरून अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे इथे दुधावर काही अशी साय येत नाही. त्यामुळे दही, ताक, लोणी या सर्वांची सवय राहिली नव्हती. भारतात दोन वर्ष राहिले तेंव्हा सासूबाईच ती साय घेऊन जायच्या आणि ताक लोणी वगैरे काढायच्या. आता 'मला हे सर्व जमणारच नाही' असं कुणी गृहीत धरलं की मग झालंच. हट्टानं त्यांना सांगितलं की 'तुम्ही नका करू मीच करेन यापुढे'. पण ते सोपं नव्हतं. रोज आठवणीनं साय एकाच भांड्यात काढून ठेवायची. चार दिवसांनी त्याचं विरजण लावायचं. मग ते आंबट व्हायच्या आधी त्याचं लोणी काढायचं. काढलेलं ताक कढीला वापरायचं आणि लोणी वेळेत तापवून तूप कढवायचं. अगदी कढलेलं तूपही डब्यात भरून भांड्यातली बेरी खाऊन ते भांडं वेळेत धुवायला टाकायचं. ही सगळी शिस्त लागायला मला एक वर्ष गेलं असेल. :) पण हट्टानं ते केलं. असो.
यावेळी भारतात १५ दिवसांत जे काही करायचं होतं, ज्यांना भेटायचं होतं, जे काही खायचं होतं ते जवळ जवळ सर्व पूर्ण झालं. म्हणजे मावशी, मावसभाऊ-त्याचं कुटुंब, बहीण, तिचं कुटुंब सगळे आवर्जून भेटायला घरी येऊन गेले, तेही मला surprise. अगदी भाऊ, बहीण, आई-दादाही माझ्याकडेच राहिले. भर पावसांत पोरांना गाडीवरून घेऊन येणाऱ्या तर परगावाहून येणारी अशा मैत्रिणीही होत्या. घर पाहुण्यांनी, माणसांनी सतत भरलेलं होतं. मग त्यांच्याशी मी बोलत असताना कुणीतरी चहा पाण्याचं बघत होतं, कुणी पोरांना जेवायला भरवत होतं. मी आपली आपल्याच धुंदीत, या सर्वांना भेटल्याचा आनंदात. नुसते मित्र-मैत्रिणी, पाहुणे नाही तर दूरदुरून आलेल्या वाचकांशीही भेट झाली. ऑडिओ बुकच्या रेकॉर्डिंगची सुरुवातही करून झाली. त्या सर्वांच्या भेटीचा आनंद अजूनही आठवत राहते मी.
भेटीगाठी झाल्या ते ठीकच. पण खायचेही लाडच. बिल्डिंगमध्ये पोहोचले त्याच दिवशी श्रावणसरी म्हणून कार्यक्रम होता. तिथे भेटलेल्या प्रत्येकाने आवर्जून ,चौकशी केली. तिथेच मिसळ-पाव, वडा-पाव खाऊन झालं. भावाच्या मित्राने मिरजेहून खास माझा आवडता 'खाजा' दोन किलो पाठवून दिला. बहिणीनं केलेले गुलाबजाम, आईचे लाडू, मैत्रिणीने आणलेली भेळ, तिच्याकडे केलेलं पुरणपोळीचं जेवण, आग्रहाने खायला लावलेलं 'फायर-पान', मैत्रिणीकडे खाल्लेली पाणीपुरी, अगदी शेवटच्या दिवशी मिळालेली डॉलर जिलेबी आणि सासूबाई जावेने केलेली दाल-बट्टी. मी तिकडे पोहोचले त्याच दिवशी श्रावण झाला. तरीही शेजारच्या दोघी काकूंनी मिळून माझ्यासाठी चिकन आणि कोंबडीवडे बनवले, स्वतः खात नसूनही. अगदी, 'अगं तुला कधी वेळ आहे?' असं आवर्जून विचारून माझी आवडती दाबेलीही खाऊ घातली. तर हे असं सगळं. लाड लाड म्हणतात ते हेच. नाही का?
ज्या दिवशी आमचे दादा मला भेटायला कोरेगाववरुन आले तेंव्हा मी त्यांना मिठी मारली आणि पटकन बहिणीचा तीन वर्षांचा छोटा मुलगा त्यांच्या पायाशी लगडला. आणि 'माझे आबा' म्हणून मला मारू लागला. त्यांना आणि मलाही हसू आवरेना. मग दिवसभर तो 'आबा-आबा' करत त्यांच्या पुढे-मागे करत राहिला. दुपारी आम्ही बहिणी-आई खरेदीला बाहेर पडत होतो तर दादा आणि भाचा एकमेकांच्या शेजारी गाढ झोपले होते. दादा नेहमीप्रमाणे लगेचच परत घरी जायचा हट्ट करू लागले तर भाच्याचं नाव सांगून त्यांना आम्ही थांबवून घेतलं. तेही राहिले. ते परत जायचं म्हणाले त्यादिवशीही भाच्याला कसं सांभाळायचं असा विचार करत होतो कारण त्यांनी पँट घातली तरी हा त्यांना जाऊन चिकटणार. त्या दोघांना एकत्र असं पाहून मला वाटलं 'साय-साखर' म्हणतात ती हीच, त्यांच्या प्रेमाची. नाही का?
हे सर्व करण्यात दोन आठवडे कधी संपले कळलंही नाही. तिथून निघताना मन जड असलं तरी, परत आल्यावरही इथे आवर्जून फोन करून चौकशी करणारे, घ्यायला येऊ का विचारणारे, 'कित्येक दिवस भेटलो नाहीये, जेयावलाच या' म्हणणारेही मित्र-मैत्रिणी होतेच की. हे सर्व पाहून मला वाटतं, आता आजोबा आणि नातवाचं प्रेम तर समजू शकते. पण या सगळ्या इतक्या लोकांचं प्रेम मिळण्यासाठी मी असं काय केलंय? त्या दोन आठवड्यात मिळालेलं सर्व घेऊन इकडे परत आलीय आणि अजूनही एक प्रश्न आहे मनात, माझ्या फॅट-फ्री, पाणचट दुधावर इतक्या लोकांच्या प्रेमाची साय कशी काय?
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment