Monday, September 10, 2018

चिकू

        सकाळची कामाची लगबग सुरु झाली तशी चिकूला जाग आली. तो उठणार इतक्यात आजीने, माईने त्याला आपल्या जवळ घेतलं आणि थोपटू लागली. तोही मग माईजवळ पडून राहिला. एरवी तिच्या थापटण्याने त्याची पुन्हा झोप लागून गेली असतीही. पण आज मात्र त्याला झोप येत नव्हती. पाहुणे येणार म्हणून घर गेल्या दोन दिवसांपासून तयारीत होतं. त्यात चिकूचा लाडका आदी येणार म्हणून त्याच्यात अजून उत्साह संचारला होता. चिकूला चैन पडेना. तो उठून बाहेर आला. आई दारात सडा रांगोळी करत होती. त्याच्याकडे पाहून तिला कळलं होतं की हा झोपणार नाही परत.
"ब्रश करुन, तोंड धुवून घे पटकन, मी आलेच दूध द्यायला.", आई बोलली.
तोही पडत्या फळाची आज्ञा मानून आवरायला लागला. दूध पिऊन झालं. माईकडून अंघोळ करुन घेतली गेली.  पेपरमधलं सुट्टीतलं  कोडंही सोडवून झालं. तरीही आत्याचा पत्ता नव्हता.
         शेवटी दुपारी एकदाची दारात रिक्षा उभी राहिली आणि आख्ख घर दाराशी लोटलं. जणू पाहुण्यांना पहिलं कोण बघणार याची स्पर्धाच लागली होती.माई -आबा, आई पप्पा सगळ्यांचे चेहरे खुलले. सर्वात पुढे होता तो चिकू. त्याला केव्हा एकदा आत्या घरात येतेय असं झालं होतं. शेवटी माहेरवाशीण सहा महिन्यांनी घरी आली होती. तिची पोरं, जावईबापू सर्वांचं स्वागत करायला धावत येणारच ना? बाजूच्या घरातल्या दोघी तिघी पण कौतुकाने बाहेर आल्या होत्या. सुजाता, पोरं रिक्षातून बाहेर पडून बॅग बाहेर काढत होते इतक्यात आबा पुढे आले.  त्यांनी सामान घेतलं. जावईबापूना पैसे काही देऊ दिले नाहीत त्यांनी. रिक्षावाल्याला पैसे देऊन सर्व उरकलं. भाचे 'मामा' म्हणून चिकूच्या पप्पांना बिलगले. सुजाताने माईला मिठी मारली आणि दोघींचा रडण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. इतक्यात चिकूच्या आईनं पळत जाऊन आतून भाकरीचा तुकडा, तांब्यात पाणी आणलं होतं. पोरांच्या, लेकीच्या जावयाच्या अंगावरून उतरवून भाकरीचं तुकडे माईंनी दोन्ही बाजूना टाकले. तांब्यातलं पाणी त्यांच्या पायांवर घातलं. हातांची  बोटं कपाळाच्या दोन्ही बाजूला कडाकडा मोडली. पोरं हालचाल करत होती तर त्यांना सुजातानं दामटून गप्प उभं केलं. त्यांच्या डोळ्यांना पाणी लावून मगच माईनं सगळ्यांना घरात घेतलं.
         
        आदित्य सुजाताचा मोठा मुलगा, चिकूइतकाच ९-१० वर्षांचा, छोटा ओजस ४ वर्षांचा. पोरं प्रवासानं दमली होती पण सगळे भेटल्यावर एकदम उड्या मारायला लागली. घरात आल्या आल्या आदित्यनं बॅग उघडायला सुरुवात केली. 
तशी माई ओरडलीच,"अरे बॅगा कशाला उचकताय? ठिवा बाजूला. चला जेवाय आधी."
पण पोरांना दम नव्हता. आदित्यनं त्याच्या लाडक्या चिकूसाठी बॅट आणली होती. ती बॅट पाहून चिकू खुश झाला. 
"आता जेवाय बस नायतर त्या बॅटीनच मारीन", असं माई बोलली आणि पोरं ताटावर बसली. 
माई, चिकूची आई पाहुण्यांना हवं, नको ते बघत होत्या. तोवर सुजातानं घराची पाहणी करून घेतली. माहेरी आल्यावर जणू आपल्या घराची पुन्हा एकदा ओळख पटवून घ्यावीशी वाटते. 
        जेवायला बसलं तरी चिकूचं बोलण्यांतच लक्ष जास्त. तो काही नीट जेवेना म्हणून माई त्याच्या शेजारी बसली आणि त्याचं ताट समोर घेऊन त्याला एकेक घास भरवू लागली. तो सवयीने तिच्या हातून घास घेत आदित्यशी बोलू लागला. 
त्याला असं घास भरवताना पाहून सुजाता म्हणालीच, "अगं माई किती मोठा झालाय तो, जेवू दे की त्याच्या हातानं?". 
तशी माई हसली. 
चिकूची आईही बोलली,"मी सांगते त्यांना सारकं, सवय लागू द्या त्याला हातानं जेवायची. पण लाडका नातू तो."
"असू दे गं, लहान हाय लेकरू. है की नाय चिकू? ये रे आदी, मी तुला पन भरवतो. ", माई त्याच्याकडे बघून हसत बोलली. 
"राहू दे, त्याला पण बिघडू नकोस. आणि ते चिकू चिकू काय करताय? त्याला नावानं हाक मारायची ना?", सुजाता बोलली. 
"हां, अर्जुन!", आबा मधेच बोलले. त्यांना असं आपलं नाव घेताना ऐकून चिकू लाजला. 
जेवण पटकन उरकून पोरं लगेच बॅट बॉल घेऊन पळाली. बाहेर ओसरीवर चटया टाकून पाहुणे पहुडले आणि आत मायलेकी आणि सून. माई आडव्या पडलेल्या लेकीकडं पाहून बोलली, "तब्येत सुधरली नाय पावण्यांची?". 
"होय की नाय? तरी त्यांना सांगतोय जरा चालायला जावा, पण ऐकत नाही.", सुजाता रागानं बोलली. 
"अगं, चिडतीस कशाला? चांगलं हाय की?", माई. 
"चांगलं कसलं, उगा ते दुखनं कशाला मानसाला?", सुजाता. 
"बरं ते जावू दे, हे बग हिच्या गळ्यातल्यात भर घालून आनली पर्वा", म्हणत माईनं सुनेच्या गळ्याकडे हात केला. तिनंही मग पुढे होऊन तिचं मंगळसूत्र दाखवलं. 
"चांगलं झालंय  गं? कितीची भर घातली तरी? बरंय आता जरा घसघशीत वाटतंय.", सुजाता म्हणाली. 
"होय की, किती दिवस राह्यलेलं. मीच म्हटलं जाऊन करून ये.", माई बोलली. 
"हे बग हे कानातलं नवीन केलं.", सुजातानंही दाखवलं कान पुढे करून. 
"हां मला वाटलं तरी नवीन.", माई म्हणाली.
"ते मोठ्या सोनाराकडनं घेतलं पुण्यातल्या. भारी डिजाईन होती एकेक. टीव्ही वर दाखवतात तसली. ", सुजाता विचारात गुंगली. 
"संध्या आली का गं सुट्टीला?", तिने मधेच आठवून विचारलं. 
"न्हाई, तिचं तिसरं पोटात हाय, आता बाळंतपणालाच यील. अलका भेटलेली बाजारात ती सांगत हुती. तुजी नणंद कधी येनार हाय? ", माईने विचारलं. 
"हां त्यांचं रद्द झालं म्हणून तर आम्ही आलो. म्हटलं दोन चार दिवस काय मिळालं ते राहून घेतो.", सुजाता. 
"तिचं पायाचं दुखणं बरं झालं का ग?", माई. 
"नाय ना अजून, काय बाई एकेक ताप डोक्याला. नुसतं गाडीवरून पडल्याचं निमित्त झालंय. सासुबाई गेल्याच लगेच मदतीला.", सुजाता. 
शेजारी झोपलेल्या धाकट्या नातवाच्या डोक्यावर हात फिरवत माई बोलली,"दमलं पोर.". 
"होय की, सकाळी लवकर निघालेलो. त्यात गाडीत उलटी झाली त्याला.", सुजाता बोलली. 

त्या दोघी बोलत असतानाच पोरं पाणी प्यायला आत आली. दोघांची तोंडं उन्हानं लाल झालेली. आत येऊन दोघांनी घटाघटा पाणी पिलं आणि परत पळणार इतक्यात सुजाता ओरडली, "आदित्य, इकडं ये. अर्जुन तू पन!". 
तिचा आवाज ऐकून दोघेही थांबले. तिने दोघांना शेजारी बसवलं. दोघांचे हात पाय काळवंडलेले, चेहरे लालबुंद, धाप लागलेली. बसले तरी त्यांची चुळबुळ कमी होईना. 
"आदी, गप मुकाट्याने झोप जरा वेळ. ", ती त्याला रागावली.
"इतक्या उन्हाचं बाहेर भटकत नाहीत ना नेहमी? त्यामुळं उगाच त्रास नको दोन दिवसांसाठी.", ती तिच्या वहिनीकडे बघत बोलली. 
पोराला शेजारी आडवं पाडून ती पुन्हा बोलू लागली. चिकूला गप्प बसवेना. तो उठून बाहेर पळून गेला,"मी पप्पांकडं जातो", म्हणून. 
त्याला जाताना बघून सुजाता बोलली,"केव्हढा उंच झाला. पन रापलाय किती."
"सारखं दिवसभर मातीत, उन्हांत खेळ कमी हाय का त्याचा? किती अंग घासलं तरी तसंच. ", माई बोलली. 
"किती सांगायचं त्याला, पण ऐकत न्हाई अजिबात.", चिकूच्या आईला आपल्या पोराला असं बोलल्यावर थोडं वाईट वाटलं होतं. शेजारी पहुडलेल्या आदीचे कपडेही तिला एकदम नीटनेटके वाटले. 
      बराच वेळ कुणी काही बोललं नाही मग. सगळ्यांची झोप लागून गेली. संध्याकाळी चहा पाणी, पुन्हा स्वयंपाकाची तयारी सुरु झाली. सुजाता आणि पाहुण्यांना घेऊन चिकू, त्याचे पप्पा, आबा, दोन्ही पोरं अशी सगळी वरात गावच्या देवाला निघाली. पोरांनी येताना गाडीवर आईस्क्रीमचा हट्ट केला. मग काय, सगळ्यांना कोन मिळाले. घरी आल्या आल्या जेवायची ताटं घेतली गेली परत. तोवर टीव्ही वर डान्सचा कार्यक्रम सुरु झालेला. पोरं जेवत जेवत तो बघत असताना सुजाता बोलली,"आदीला लावलाय डान्सचा क्लास. आदी करून दाखव नंतर जेवण झाल्यावर, बरं का?". 
त्यानेही मान हलवली. जेवणानंतर अंगणात बसून पोरांचा डान्स सुरु झाला मग. आबांनी आणलेल्या कुल्फ्याही खाल्ल्या गेल्या. पोरांना असं नाचताना बघून माई खुश झाली एकदम. घर किती दिवसांनी पोरांनी भरलं होतं. मधेच तिला काय सुचलं काय माहित,"चिकू ते तुझी प्रतिज्ञा म्हणून दाखव की?". 
"अगं आजे ती प्रतिज्ञा हाय. गाणं न्हाई.",चिकू बोलला. 
"माई तू आधी त्याला अर्जुन म्हण बरं. सारखं काय चिकू चिकू?", सुजाता परत बोलली. 
"बरं अर्जुना, तुझी ती प्रतिज्ञा म्हणून दाखव की. अगं लै भारी इंग्रजीत बोलतोय.", माई बोलली. 
चिकूने प्रतिज्ञा म्हणून दाखवली आणि सर्वांपेक्षा जास्त आनंद माईलाच झाला होता. आपल्या पोराच्या इंग्रजी बोलण्यावर भारी खुश होती माई. रात्र पुन्हा गप्पांमध्ये सरली.
        दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून झालं तसं चिकू आईला म्हणाला, "आई मी विऱ्याकड जाऊ का?"
"आता कशाला? पाव्हणं हायेत ना घरात?", त्याची आई बोलली. 
"त्यालाच न्यायचाय विऱ्याकड. त्यानं सांगितलं हुतं आन याला म्हनून.",चिकू बोलला. 
"तुज्या पप्पाना विचार", म्हणून त्याची आई परत कामाला लागली.
 "आता पप्पाना कुटं इचारायचं?", असा विचार करून चिकू आदीला घेऊन बाहेर पडला.
विऱ्याचं  घर जवळच होतं. पायात स्लीपर अडकवल्या, आदीने त्याचे सॅन्डल घातले आणि दोघे निघाले. विऱ्याकडे दोघे गेले तेंव्हा त्याची अजून सकाळ व्हायची होती. त्याला त्याच्या आईनं उठवलं 'चिकू आलाय' म्हणून. त्यांना आलेलं पाहून विऱ्या थेट बाथरूमला पळाला. कसंतरी तोंड धुवून तो त्यांच्यासोबत चिकूची नवीन बॅट पाहू लागला. 
"जबरा बॅटाय रं. एकदम कोली सारखीच वाटतीय. ", विऱ्या बोलला. 
त्यांची तिथेच बॅटिंग सुरु झाली. त्यांना बघून शेजारीची अजून दोन पोरं आली होती. खेळात भांडणं वाढली तशी चिकूने आपली बॅट उचलली आणि तो निघायला लागला. 
विऱ्याने चिकूला विचारलं, "पतंग उडवायचा का?". 
         चिकूचे डोळे लकाकले. तिघांनी मिळून मग कागदाचे तुकडे करून घेतले. मांज्यासाठी दोरा आणला. आईकडनं भात  मागून घेतला वेताच्या काड्या चिकटवायला. पण काड्या तीन पतंगांना पुरेशा नव्हत्या. मग ते तिघे बोहरी आळीकडं निघाले. आळीकडं जायला चिकूला थोडी भीती वाटायची. नेहमीपेक्षा जरा जास्त लांबचा रस्ता होता तो. ओढ्याकडनं जायला लागायचं. आताशी कुठं तो भैरोबाच्या देवळापर्यंत जायला लागला होता. पण आदी सोबत होता, त्यामुळं जाणं भाग होतं. ओढ्याकडून जातांना पाण्यांत त्यांना बारीक मासळी दिसली. त्यानं मग आदीला ती बारीक मासळी दाखवली. एक दोन पकडूनही दाखवली. घोटाभर पाण्यात स्थिर उभं राहून, वाकून पाण्याकडे बघत बसायचं आणि मग पटकन झडप घालायची. हजार वेळा दाखवूनही आदीला काय ते जमेना. बराच वेळ त्यांचा पाण्यात खेळ चालला मग. पाण्यातून उड्या मारत तिघेही बोहरी आळीच्या बाजूला आले. तिथे विऱ्याचा मित्र राहायचा. त्याच्याकडनं दोन चार वेताच्या काड्या घेतल्या. त्यालाही चिक्याची नवीन बॅट खूप आवडली. त्याच्याबरोबर जरा वेळ खेळून पोरं परतीला लागली. तोवर दुपार होऊन गेलेली. 
         माघारी येताना परत ओढ्यात उतरायचा हट्ट आदीनं केला. त्याला ती मासळी पकडायचीच होती. कितीतरी वेळानं शेवटी त्याला एक मासळी मिळाली. पण तिच्या गिळगिळीत स्पर्शानं त्याला कसंतरी झालं आणि ती सटकून परत पाण्यात पडली. तो नाद सोडून वडाच्या सावलीत ओढ्यात तिघंही चालत राहिले एकसलग. वड संपून शेताचा बांध कधी सुरु झाला त्यांना कळलंच नाही. जसा बांध लागला तशी बाभळ आली. सुकलेल्या त्या बाभळीचा डिंक काढून दाखवायचा होता चिकूला. ते प्रत्येक झाडाला डिंक शोधू लागले. जसा डिंक मिळाला, चिकूला एकदम खजिना मिळाल्याचा आनंद झाला. त्यानं आदीला हाक मारून खायला दिला. दोन दातात तो डिंक अडकवून चिकट झाल्यावर चिकटलेले दात उघडायचा प्रयत्न करत तिघेही हसू लागले. हसत हसत माघारी फिरताना एक काटा आदीच्या सँडलमधून आत घुसला ते एकदम इंचभर. काटा इतका घुसल्यावर आदीने तिथेच रडायला सुरुवात केली. काटा चांगलाच आतवर गेलेला होता. 
         विऱ्याने त्याला खाली बसवला. चिकूने सँडलमधून काटा बाहेर ओढायचा प्रयत्न केला पण काटा एकदम जोरात घुसलेला होता. त्याच्या बारीक बोटांनी तो निघेना. त्याने हात लावला तसा आदी अजूनच रडायला लागला. बरं सॅन्डल काढायची तरी कशी? तिच्या आरपार जाऊन काटा पायात रुतलेला. सॅन्डल काढतानाही दुखल्याशिवाय नीट निघेना. त्याला रडताना पाहून बाकी दोघांना घाम फुटायला लागला. की ते दुपारचं कडक ऊन होतं काय माहित? शेवटी सॅन्डल ओढून काढायचं ठरलं. मागून त्याचा बेल्ट काढून दोन्ही पोरांनी मिळून ती सॅन्डल खेचली आणि आदी जे बोंबलला ! सॅन्डल निघताना काटा अर्धवट तुटला होता. त्यामुळं उभं राहिल्यावर आदीला चालता येईना. शेवटी दोघांनी त्याच्या खांद्याखाली हात घालून त्याला लंगडी घालत घरी न्यायचं ठरवलं. तीन पायांची शर्यत असते तशी त्यांची वरात घराकडे निघाली. त्यांच्या वेगाने घरी पोहोचायला चार वाजून गेले होते. पायातून काटा हलवल्यामुळं रक्त यायला लागलं होतं. 
        तिघे घरी पोहोचले तर वातावरण एक तंग होतं. पोरांना समोर बघून माईने रडायलाच सुरुवात केली. चिकूची सुजाता एकदम धावत आली, तिने तिच्या पोराला आधार देत घरात नेलं. आणि चिकूच्या पहिली कानाखाली बसली. तीही रडणाऱ्या आईच्या हातून. 
"कुटं फिरत होतास दिवसभर? सकाळपासनं काय खाल्लं पन नाही. ", आई रडतेय का हे चिकूला कळत नव्हतं. 
"तुला म्हनलेलो की विऱ्या कड जातो म्हनून.", चिकू हळू आवाजात बोलला. 
"तुला नको म्हनलेलं ना? एकदा सांगून कळत न्हाई का तुला?", असं म्हणत तिने अजून दोन चार धपाटे पोराला घातले. 
"तुजं पप्पा, पाव्हणं सगळी तुम्हाला शोदायला गेलीत, अजून आला न्हाई म्हनून.", माई सावरत बोलली. तिथलं वातावरण बघून विऱ्या हळूच पळून गेला होता. 
           तिकडे सुजातानं पोराच्या पायाकडे बघून रडायला सुरुवात केली होती. त्याचं रक्त पुसून काट्याच्या आजूबाजूची मातीही साफ केली होती. साडीपिन, बारीक चिमटा सगळं करूनही तो बारीक आत राहिलेला काटा निघत नव्हता. त्यात जरा हात लागला की आदीचं रडणं. दोन तास सगळ्यांनी प्रयत्न करून करूनही शेवटी तो बारीक आत राहिलेला काळा काट्याचा तुकडा निघत नव्हता. मग त्याला डॉक्टरकडे न्यायचं ठरलं. तोवर चिकूच्या पप्पाना, पाव्हण्यांना फोन करून घरी परत बोलावलं होतं. ते घरी आले आणि चिकूला अजून एक कानाखाली बसली. 
"तुला काय पण कळत न्हाई का? दिवसभर कुटं फिरवत बसलाय पोराला?", त्यांनी विचारलं. 
"जाऊ दे आता, तुमी आधी याचं बगा", असं माई बोलली. 
      चिकूला घरी ठेवून त्याचे पप्पा, पाव्हणे आणि आत्या डॉक्टरकडे गेले. चिकूची आई, माई कामाला लागल्या. सकाळपासून निघून गेलेली पोरं परत आल्यावर सगळ्यांच्या जिवात जीव आला होता. स्वयंपाक होईपर्यंत 
रडून आणि सगळ्यांना उत्तर देऊन चिकूचा जीव दमला होता. आदी परत येईपर्यंत एका कोपऱ्यात पडून चिकूची झोप लागून गेली होती. बाकीचे लोकही मग सगळं लवकर आटपून झोपून गेले. अख्खा दिवसच दमवणारा होता. 
         सकाळी चिकूला जाग आली तेव्हा सगळं बरंच ठीकठाक झालेलं होतं. चिकूला जोरदार भूक लागली होती. त्याने मुकाट्याने आवरून घेतलं. पण आई मात्र अजूनही रागवलेलीच दिसत होती. सकाळी लवकर जेवण करून पाहुणे परतीच्या प्रवासाला लागणार होते. आदी मुकाट्याने पाय धरून बसला होता. सगळे इतक्या लगेच परतणार म्हणून चिकू नाराज होताच पण आज त्याचं कुणी ऐकणार नव्हतं. गाडीची वेळ झाल्यावर, माईनं लेकीची ओटी भरून दिली, पोरांच्या हातात १००-१०० रुपये ठेवले. तिच्यासाठी आणलेलं सामान तिच्याबरोबर दिलं आणि रिक्षा त्यांना घेऊन निघालीही.
          पाहुणे निघून गेल्यावर सगळं जरा शांतच झालेलं. कितीतरी वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही. शेवटी वाट बघून माई जेवायला बसली. तिने चिकूला हाक मारली आणि शेजारी बसवलं. मग ती त्याला 'काल कुठं कुठं गेलेला' हे विचारत एकेक घास भरवू लागली. 

समाप्त.

विद्या भुतकर. 

No comments: