Wednesday, April 29, 2020

डिप्लोमे From युट्यूब युनिव्हर्सिटी

      मागच्याच आठवड्यात आमचं पावपुराण ऐकवलं. पण निरनिराळे पदार्थ बनवण्यात फेल होणे सोडून बाकीचीही कामं होतीच की. त्यात सुडोकु शिकणे आणि ते सोडवताना झोप लागल्यावर दोन तासापेक्षा जास्त न झोपणे, कॅरम खेळताना पोरांसमोर शायनींग मारणे, टिव्हीवर एकेका सिरियलीचा फडशा पाडणे अशी महत्वाची कामेही होतीच. पण या सगळ्या गोष्टीही किती करणार ना? त्यातल्या त्यात शनिवार, रविवारी अजूनच बोअर व्हायला होतं. 
थोड्या दिवसांपूर्वी एक दिवस स्वनिक म्हणाला,"मला सारखं काहीतरी कानात आहे असं वाटतंय. आणि प्रत्येक वेळी हात लावला की कळतं की माझे केसच आहेत ते." 
त्याचे कल्ले ८० च्या दशकातल्या हिरोसारखे झाले होते. मग म्हटलं, चला कात्रीने तेव्हढेच कापून टाकू. मागे एकदा बाबाने घरी केस कापण्याचा प्रकार केला होता, त्याचा त्याने धसका घेतला होता. त्यामुळे मीच ते काम पार पाडलं. 
         पण इतक्यातच थांबलो तर कसं चालेल ना? युट्यूब युनिव्हर्सिटीतून एकेक डिप्लोमे मिळवायचं ठरवलं. रोज नवीन काहीतरी शिकायला हवंच ना? पूर्वी कधीतरी नवऱ्याने घरी आणलेलं केस कापायचं किट होतंच.
स्वनिकला म्हटलं, "चल की तुझे केस कापू घरी. तितकेच दोन तास टाईमपास होईल." नवरा तर काय तयारच होता.
आम्ही दोघेही मागे लागलोय म्हटल्यावर तो बिचारा पळून बेडखाली लपून बसला. 
मी जरा प्रेमाने त्याला म्हटलं, "हे बघ किती दिवस दुकानं बंद असतील माहित नाही. परत अजून वाढले तर नीट कापताही येणार नाहीत. त्यापेक्षा आताच करु." शेवटी तो कसाबसा तयार झाला.
        मी आणि नवरा लगेच टीव्ही वरच युट्यूब लावून नीट सर्व व्हिडीओ बघायला लागलो. एका क्षणाला नवऱ्याचा जोश इतका अनावर झाला की त्याने व्हिडीओ पूर्ण व्हायच्या आतच बाथरुममध्ये सेटअप लावायला सुरुवात केली. मी मात्र तग धरुन पूर्ण व्हिडीओ पाहिला. आपलं असंच असतं. तोवर नवऱ्याने बाथरुममध्ये पूर्ण सेटअप  करुन ठेवला. पोरगं बिचारं घाबरुन स्टुलावर बसलं. 
        (तर प्रोसेस अशी की प्रत्येक कटरला वेगवेगळे नंबर. जितका छोटा नंबर तितके बारीक केस कापले जाणार. अर्थात हे कदाचित सर्वांना माहित असेल. मला पहिल्यांदाच कळलं.) यामध्ये दोन अप्रोच होते. एक बॉटम -अप म्हणजे, मागचे केस मशीनच्या नंबर १,२,५ ने कापत जायचं, बाजूचे ही त्या त्या लेव्हलच्या नुसार कापायचे आणि वरचे कात्रीने थोडे मोठे ठेवून कापायचे. कानाच्या बाजूचे वगैरे वेगळ्या नंबरच्या मशीनने. दुसरा अप्रोच म्हणजे टॉप-डाऊन. वरुन मोठ्या नंबरचे मशीन फिरवून खाली बारीक करत आणायचं. आणि मग खालचे बारीक करायचे. आम्ही पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये मुळातच अप्रोच वेगवेगळे होते. त्यामुळे बराच वेळ कुठून सुरुवात करायची यावरच वाद झाला. 
आता याच्यामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदाच असं मशीन हातात धरत होते त्यामुळे पोराच्या जीवाची काळजी होतीच. म्हणून मी जरा नमतं घेतलं. (नवऱ्याने हे आधी केलेलं पण त्या भयानक कट बद्दल न बोललेलं बरं.) तर शेवटी आम्ही दोघांनी एकेक बाजू निवडली. नवरा मागचे छोटे छोटे करत वरपर्यंत सरकत होता. दुसऱ्या बाजूने मी. पहिल्या पाच मिनिटांतच स्वनिकने विचारलं,"झालं का?". त्याला दटावून गप्प बसवलं.
           जिथे दोन नंबरचे केस एकत्र येतात तिथले नीट कसे मिक्स करायचे यावर आमचे थोडे वाद झाले. पण अजून वाद झाले तर अंगावरचे केस घेऊन स्वनिक बाहेर पळून गेला असता. म्हणून जसे जमतील तसे कापले. वरचे केस नीट भांग पाडता येतील असे हवे होते. पण नवरा म्हणाला," हे बघ १६ नंबरने कापून घेऊ आणि मग बघू. ". आता मला काय माहित १६ नंबर काय ते? मी आपला फिरवला. तर हे... भराभर सगळे केस छोटे झाले. आता ते पाहून कळलं की यात कात्रीने कापायला काही राहिलं नाहीये. केस कापले गेल्यावर काय बोलणार? दोन तास मारामाऱ्या करुन शेवटी ठीकठाक केस कापले होते. बाथरुमभर बारीक बारीक पडलेले केस. ते गोळा करुन, सर्व साफ होईपर्यंत पुरे झालं. पोराची अंघोळ झाल्यावर चिडचिड करुन झाली की किती बारीक कापलेत वगैरे. टाईमपास झाला आणि शिवाय अजून दोनेक महिने तरी परत केस वाढणार नव्हते. 
         पोरावर प्रयोग झाल्यावर मी जरा कॉन्फिडन्ट झाले होते. त्यामुळे पुढच्याच आठवड्यात परत बोअर झालं.  आणि नवऱ्याचे केस कापू असं ठरवलं. म्हणून परत व्हिडीओ पाहिले. एक दोनदा मी मशीन सुरु केल्यावर नवरा घाबरत होता. 
म्हटलं, नक्की काय प्रॉब्लेम आहे?'. 
तर म्हणे, ' तू चुकून माझ्या भुवया उडवल्यास तर?'. 
मी म्हटलं, 'अरे डोकं कुठे, कपाळ कुठे आणि भुवया कुठे?'. 
        पण तरी त्याला टेन्शन होतंच. माझ्या ओव्हर कॉन्फिडन्सची त्याला जास्त भीती वाटते. मी उत्साहाच्या भरात पाच नंबरने एका बाजूला खालून केस कापायला सुरुवात करुन  कानाच्या वरपर्यंत कापून टाकले आणि एकदम टेन्शन आलं. वर तो पाच नंबर खूपच बारीक वाटत होता. मग परत वादावादी. शेवटी नऊ नंबरने कानापासून वरचे केस कापले. त्यामुळे एका बाजूचे थोडे पाच, बाकी नऊ, मग खाली सात असे करत कापत राहिले. पण तो तेव्हढाच एक बारीक केसांचा पॅच राहिला होता ना? वरचे केस भांग पडल्यावर तो लपतोय ना याची खात्री करुन घेतली आणि मग जरा जिवात जीव आला. पुढच्या महिन्यात त्याचा वाढदिवस आहे. उगाच नेमका तेव्हा असे भयानक कापलेले केस बरे दिसले नसते ना? म्हणून इतकी चिंता. पण सुटलो. बऱ्यापैकी चांगला कट झाला होता. तेही रक्त न सांडता वगैरे. 
          तर असं हे आमचं केशपुराण. माझं एक बरं होतं. भारतातून येतानाच पतंजलीची मेहंदी वगैरे आणलेली असल्याने तशी मी निवांतच होते. काय एकेक गोष्टीचा विचार करायला लागतोय सध्या. नाही का? पण पहिल्या थोड्या दिवसांतच मला कळलं की बाकी काही झालं नाही तरी माझ्या भुवया मात्र लवकरच करिष्मा कपूर आणि मग क्रूरसिंग सारख्या होणार होत्या. मग फोटोंचं काय ना? वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस... आता काय करायचं म्हणून मी घरात सर्वात पहिला तो केस उपटायचा चिमटा शोधून काढला. म्हटलं, फक्त नवीन आलेलेच उपटून काढायचे आहेत ना? सोप्पंय ! 
         मी एक दिवस आरशासमोर उभी राहून एकेक केस उपटायला लागले सुरुवात केली. च्यायला ! पहिल्याच केसाला डोळ्यांत टचकन पाणी आलं. शिवाय कुठला डोळा बंद करुन कुठला उघडायचा हेही पटकन कळत नव्हतं. म्हटलं हे काय खरं नाय. पण हिंमत करुन चार पाच केस काढले. मग ठरवलं रोज इतकंच करायचं. फक्त ४-५ केस. असंही काम काय होतं? एकदा तर एकेक करुन केस काढून माझ्या भुवयांना मधेच टक्कल पडल्याचं स्वप्नही पडलं होतं. तेव्हापासून जरा हाताला आवर घातलाय. बाकी डाव्या डोळ्याला जरा अवघड जातं डाव्या हाताने चिमटा धरुन ओढणे वगैरे. पण जमतंय. सर्वात गंमत म्हणजे, ते उभे राहिलेले, वाढलेले केस कात्रीने कापतात ना, ते आरशात बघून कसं करायचं हे कळत नाही. त्यात डाव्या हाताने कात्री चालतही नाही. आता कधीतरी डाव्या हाताची कात्रीही आणावी म्हणतेय. रोज मी आरशासमोर उभी राहिले की नवरा विचारतो, "झालं का कोरीवकाम?".  त्याला काय माहित, आमच्या शाळेच्या मैत्रिणींच्या ग्रुपचॅट वर किती कौतुक झालं माझ्या भुवयांचं? या सगळ्या आयडिया मी त्या मैत्रिणींनाही दिल्या पण त्या काय ऐकत नाय. म्हटलं तुम्हांला तरी सांगाव्यात. 
         तर हे असं ! पुढच्या दोन महिन्यांत अजून कुठकुठले डिप्लोमे मिळतील सांगेनच तुम्हांला. तुमचेही चालूच असतील की !

विद्या भुतकर. 

No comments: