Wednesday, October 24, 2007

मन वढाय वढाय...

ब्लॉग आणि तोही भर दुपारी ऑफिसमधे :-) बऱ्याच दिवसांनी अशी संधी मिळालीय. :-)) अर्थात त्याआधी मेल लिहिणे, चेक करणे, हा पेपर ,तो पेपर सगळं उघडून झालं.म्हटलं चला जरासं लिहूनही बघावं. खरंतर मी विचार करत होते की आता लिहीन....तर ते घरी गेल्यावरंच....पण त्याआधीच संधी मिळाली. तर त्याचं असं झालं.....एकाच कंटाळवाण्य़ा प्रोजेक्टवर काम करून मी बरीच कंटाळले. मधे मेघनाने एका पोस्ट मध्ये लिहिलं होतं तसं पळून जाण्यात काय मजा आहे, स्वत:ला प्रूव करूनच जायचं असा अट्टाहासही केला. आणि खरंच एकेका दिव्यातून पार पडत एक प्रोजेक्ट पूर्ण केलाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, वेळ आल्यास कुठलीही गोष्ट स्वत: अभ्यास करूनही पूर्ण करण्याचा आत्मविश्वास तर मिळालाच पण न कंटाळता काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंदही.
त्यात १०० वेळा 'Are you there?' असं विचारल्यावर एकदाच उत्तर देणारा , बग आहे हे माहीत असूनही तॊ शेवटपर्यंत न कळवणारा, आणि शेवटी त्याला सांगण्य़ापेक्षा स्वत:च मेलेलं बरं असा वाटणारा भारतातील एक टीममेंबर. कितीही वेळा प्रोजेक्टचं स्टेट्स सांगितल्यानंतरही मग याचं काय आणि त्याचं काय असं विचारून पिडणारां मॅनेजर, आणि सगळ्य़ा कटकटीतून बाहेर पडलेतर मग Time Sheet Defaulter म्हणून आलेला एखादा फालतू मेल...अशा सगळ्या दिव्यातुन पार पडत शेवटी काल डेमो पण पूर्ण झाला आणि आता जरा कुठे हुश्श होतंय असं वाटलं.
हे सगळं होतं असतानाच एक गोष्ट जाणवली होती. एव्हढी मरमर करूनही मिळावी तितकी शाबासकी नाहीच...आणि ती कधी मिळणारही नाही हे कळलं तेव्हाच यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. तसं बरंच अवघड वाटत होतं, दोन वर्ष अगदी घर ,रोजचा येण्याजाण्याचा रस्ता काय, काहीच बदलावं लागलं नाही. अशा स्थिरतेकडून अस्थिरतेकडे जायला मन धजावत नव्हतं. पण प्रत्येक वेळी एक असा क्षण येतो ना तेव्हा वाटतं की बस्स...खूप झालं आता. सुदैवाने म्हणा तसा क्षण लवकरच आला आणि मग पावलं हळूहळू त्या मार्गाने वळू लागली. आता हो-नाही करत माझी रीलीज पक्की झाली, लवकरच माझ्या जागी येणाऱ्या माणसाची पण आयात झाली. मग काय, त्याला फक्त काय काय केलंय ते सांगायचं आणि सुटायचं. त्यातही १०-१२ documents वाचायला दिले की आपली अजून थोडी सुटका. गेले दीडेक आठवडा तेच करत आहे. :-) एक-दोन तास बडबड करायची, काही documents लिहून ठेवायची,इ.इ.
खरं सांगायचं तर त्यातही मी जाणार म्हटल्यावर असं वाटलं की मी अचानक विरुद्ध गटात आलीय आणि माझ्यासोबत मॅनेजरबद्द्ल गॉसिपिंग करणारी मुलगी, मी काही issues अर्धवट तर टाकत नाही ना हे बघण्यासाठी एकदम दुसऱ्या गटात गेली. लोक कसे फिरतात ना? असो. इतके दिवस प्रोजेक्टवर काम केल्यावर सगळं दुसऱ्याच्या हातात देणंही अवघड जात होतं. वाटलं ही गोष्ट करताना आपल्याला किती कष्ट पडले होते, ती केली तेव्हा कसे प्रोब्लेम आले होते. :-) हे सगळं सोडून देणं जितकं सोप्पं वाटलं होतं तितकं नाहीये हे ही जाणवलं. असो, या सगळ्य़ांपेक्षा आता फक्त १५-२० दिवस राहिलेत घरी जाण्यासाठी हेच महत्वाचं वाटतंय आणि बाकी सगळं फालतू वाटत आहे. कुणाचं आपल्यावाचून अडणार आहे? आता घरी जाऊन हे करणार, ते करणार, अशी दिवास्वप्नं बघत आहे. :-) कधी कधी तर मी १५-२० दिवसांत घरी असेन या कल्पनेनंच काही काम सुचत नाही. असो... इतके दिवस सरले..हेही सरतील.... :-))

आता मात्र लिहीन ते.....घरी गेल्यावरच........

-विद्या.

Monday, October 08, 2007

दोन टोकं

तू आणि मी... किती वेगळे. म्हणजे दोन टोकं म्हणण्यासाठीही मध्ये काहीतरी हवं ना? मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं की काय म्हणून आपण जवळ आलो असू? काहीतरी असायलाच हवं ना? त्याशिवाय का आपण भेटत राहिलो दर थोड्या दिवसांनतर, ते ही परत तोंडही पहायचं नाही असं ठरवून. हां, नाही म्हणायला मला एक वाटायचं, आपण दोघेही जरा वेडे होतोच. सुरुवातीला एकमेकांसाठी आणि नंतर..... ते सुरुवातीचे स्वप्नातले दिवस सोडले तर बाकी काय होतं सांग ना? आपल्या आवडी-निवडी, स्वभाव सगळंच वेगवेगळं होतं. तरीही किती विचित्र असतं ना माणसाचं मन? दरवेळी त्या मंतरलेल्या दिवसांच्या मागे मागे धावून पुन्हा तुझ्याकडे यायचे आणि तूही माझ्याकडे. मग थोडे दिवस पुन्हा तो खेळ, एका हव्या असलेल्या, हरवलेल्या स्वप्नाला नवीन जोमाने एकमेकांत शोधायचं. साहजिकच तीच भांडणं, तोच अपेक्षाभंग आणि तेच अजूनच दुखावलेलं मन. पुन्हा एकदा वेगळं होणं, थोड्या दिवसांनी हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेत परत येण्यासाठी. तुला नंतर कळलंच असेल म्हणा, मला तुझ्या आधीच कळला हा खेळ. तेव्हापासून तर तुझी चिडचिड अजूनच वाढली माझा तटस्थपणा बघून.तुला काय त्रास होत असेल चांगलंच कळत होतं मला, पण मी तरी काय करणार होते? तुला समजावणं अवघड होतं रे, हे असं धावणं किती व्यर्थ आहे. पण मागच्यावेळी भेटले तेव्हा, तुझ्या डोळ्यांत तो शोध थांबलेला दिसला आणि किती बरं वाटलं, माझ्यासाठी नव्हे, तुझा त्रास, छळ अखेर संपला म्हणून.
पण खरं सांगू? त्या रात्री झोप लागली नाही मला. शेवटी दोन टोकं जोडणारा धागा तुटला होता.
-विद्या.

Wednesday, October 03, 2007

जे जे उत्तम...

नंदनने टॅग केल्यावर जरा गडबडलेच होते. :-) हो, नुसत्या छान,सुंदर अशा प्रतिक्रिया देताना सोप्पं असतं पण जावे त्यांच्या वंशा..... असो. मी त्याच्या 'जे जे उत्तम' या उपक्रमाबद्दल बोलतेय.
त्याच्या म्हणण्यानुसार...."पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. "
तर मी बराच बिचार केला की कुठला उतारा द्यावा बरं इथे.पण मला काही केल्या आठवेनाच एखादं पुस्तक आणि आठवलं तरी ते आता जवळ नसल्याने त्यातला उतारा देणं अवघडच होतं. विचार केला त्याला सांगाबं की 'मी जेव्हा भारतात परत जाईन ना, तेव्हा लिहिते,चालेल का?' :-) पण तेही योग्य वाटेना. तेव्हाच मला गेल्या काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाची अर्धवट का होईना PDF फ़ाईल वाचायला मिळाली होती ती आठवली. ज्यादिवशी ती मिळाली तेव्हाच वाचून पूर्ण केली होती आणि त्यातलाच एक उतारा जो मला कित्येक दिवस अस्वस्थ करत राहिला.
-----------------------------------------------------------------
".......आप्पांना मृत्यू मोठा छान आला. ....डॉक्टर मला म्हणाले,"त्यांना आलेला ऍटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळा राहतीलसे". आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पानी प्राण सोडला.
बिच्याऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती, वाचा, भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पैसा, मनुष्यबळ, काही कमी नव्हते.पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले.तिथे सगळी मुले, नातवंडे, लेकी, सुना-सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होती. कामे वाटून घेऊन करत होती. तिऱ़्हाईताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान! कुणी कमी पडून देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुद्धीने, नाईलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करत होती, अद्याप करतेय. समजा, तिच्याऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार, सेवासुश्रुषा, नवसायास करत राहिली असती. तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षाच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वत:चे औषधपाणी स्वत;च करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करयेत आणि दुसरं कुणी तिची सेवासुश्रुषा करतंय असं दृष्य प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला न मानवणारी. आणि दुर्दैवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्यासेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.
आई गेली. मुलेबाळे,नातवंडे,लेकीसुना, अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता त्याबद्दल लिहून मी दु:ख उकरून काढतेय,का? हे दु:खं नव्हे, हा वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलट्सुलट विचारांचा, भावनाम्चा गुंता आहे. तो सोडवता आला तर पहावा, त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रत्न करावायासाठी हा सारा खटाटोप. या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत, दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन.उरलेल्या वेळात माझ्या सव्त:च्या व्यापातच गुंतले होते, घर संसार,प्रुफे, नव्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोट्या व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगैरे-वगैरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतही सतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोन छोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कवितावाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आनंत्रिंसाठीचे वगैरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमात काही अडथळा तर येणार नाही? ऎनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण किती स्वार्थी, कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. ..."
".....मी म्हणे लहानपणी लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वत:ची, चुलत दिराची, बरीच मुलेमाणसे घरात होती. स्वैपाकपाणी, आले-गेले, सर्वांचा अभ्यास करून घेणे, सणवार, एअव्हढ्या मोठ्या घर संसारात त्याकाळच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार, जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील! माझ्यापुरते तरी कृतद्न्यतेच्या भावनेने मी तिच्यासाठी काही करायला नको का?आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार? ...."
पुस्तक - आहे मनोहर तरी
लेखिका - सुनिता देशपांडे
-------------------------------------------------------
मी बऱ्यापैकी ब्लॉगवर पाहिलंय की कुणी यांना टॅग केलं नाहीये ना तरी चुकून चुकल्यास चु.भू.दे.घे.
केतन(बरेच दिवसांत तुझं लिखाण वाचायला मिळालं नाहीये..यानिमित्ताने....)
अमित(तुझा 'पुस्तकांची मांदियाळि' मला खूप आवडला म्हणून हा खो.)
कोहम(तुझाही वाढदिवसानंतर हा पहिला पोस्ट होईला ना?:-) या पोस्टमधे काय असेल याची उत्सुकता आहे.)
स्वाती(तुझ्या अनेक सुंदर कवितांसारखी याचीही वाट पहात आहे.)
बडबडी स्नेहल(तुझ्या आवेशपूर्ण लेखांसारखाच एखादा आवेशपूर्ण उताराही वाचायला मिळावा ही सदिच्छा.)

-विद्या.


Tuesday, September 25, 2007

एक बरस बीत गया...

काहीतरी लिहायचं म्हणून......
आता सगळ्य़ा Annevarsaries साजरी करण्याची सवयच झालीय. दिल चाहता है मध्ये नाही का तो एक नमुना आहे सोनाली बेंद्रेबरोबर. "यहां हम इस तारीख को,इतने बजे मिले थे...". तसं, जरा काही झालं की Annevarsary करा साजरी. पण तीही करण्यात जरा उशीरच झाला. मग काय? Belated Celebrations? Belated Wishes? I hate to do that. मला एक कळत नाही एखाद्याला दोन दिवसांनंतर 'हॅप्पी बर्थडे' असं म्हणून काय उपयोग? साजरा करण्याचा दिवस तर निघून गेलाय आणि नंतर तुम्ही त्याला शुभेच्छा दिल्यावर त्या माणसाने काय करावं?
असो, उशीरा का होईना याबद्दल मला काही तरी लिहायचंच होतं. कशाबद्दल? माझ्या ब्लॉग लिहिण्याला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. :-) २० सप्टेंबरला,एक वर्षापूर्वी मी पहिला पोस्ट लिहिला. तेव्हा मी इतकी उत्साहात होते तरीही मला कमीत कमी दोन तास लागले असतील काही ओळी पूर्ण करायला. पण मी तेव्हा इतकी खूष होते की मला मराठीमध्ये काहीतरी लिहायला मिळेल. त्याचबरोबर मला बाकी लोकांचे ब्लॉग बघूनही इतकं आश्चर्य वाटत होतं. कसं लिहीत असतील हे लोकं एव्ह्ढं सगळं, तेही इतक्या छान भाषेत आणि इतक्या नियमितपणे. तशी थोडी भीतीही वाटली होती की आपल्याला कुठे लिहायला जमेल असं. पण माझ्या उत्साहापुढे बाकी सगळ्या गोष्टी फिक्या होत्या.
पहिले दोन-चार ब्लॉग लिहिले आणि मला एक गोष्ट जाणवली. मला जो काही मराठीचा अभिमान होता तो अगदी ढासळत होता. मला मराठीमध्ये विचारच करता येत नव्ह्ता. मला एक कळलं होतं, कित्येक वर्षात माझ्या मराठी बोलण्यात विशेष फरक पडला नसला तरी माझी विचार करण्याची प्रोसेस(परत इंग्लिश) इंग्लिश मधूनच होत होती. म्हणजे मला इंग्रजीमध्ये विचार करून त्याचं मराठीत भाषांतर करायला लागत होतं. मग त्यातही मराठी शब्द आठवण्याची मारामारी. मग बाकीचे ब्लॉग वाचताना हळूहळू 'याददाश्त वापस आ रही है' असं झालं. :-)
मी मराठीमध्ये विचार करायला लागले, काही लिहायची इच्छा होत असताना शब्द जरा वेगात डोक्यात येऊ लागले.पण अजून एक गोष्ट होती. विचार करताना मला असं वाटायचं की मला हे लिहायचंय, असं म्हणायचंय. प्रत्यक्षात लिहायला घेतल्यावर मात्र काय आणि कसं लिहायचंय हे कळायचं नाही किंवा लिहिल्यावर वाटायचं की अरे मला असं म्हणायचं नव्हतं, इ.इ. आता सवयीने हेही कळलंय की प्रत्यक्षात शब्दात मांडताना बरेचसे विचार स्पष्ट व्हायला लागतात आणि डोक्यातले गोंधळही जरा कमी होतात. बाकी माझ्या लिखाणातून हे संदर्भ निघतील ते वेगळेच.
दुसरी गोष्ट म्हणजे, नियमितपणा. सुरुवातीचे काही दिवस मी रोजच विचार करायचे काय लिहायचं त्याबद्दल. तेव्हा अर्थात इतक्या वर्षाचं साठलेलं देखील होतं जे लिहायचं होतं, नंतर त्यातला उत्साह कमी झाला. मला वाटलं आता माझ्या आळसामुळे ही गोष्टही अशीच अर्धवट राहील की काय. पण प्रत्येक महिन्यात २-४ का होईना पोस्ट लिहिले गेले आणि आज मला बरं वाटतंय की, गेल्या दोनेक महिन्यांना वगळता बऱ्यापैकी नियमितपणे लिहिलं गेलं. आणि आता जरासं लिखाणाच्या विषयांबद्दलही. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की मला प्रत्येक गोष्टीवर,सभोवतालाच्या घडणाऱ्या घटनांवर माझं असं मत असेल जे मला मांडायचंय. आता मला कळलंय की मला खास अशी काही वेगळी मत नाहीयेत मांडण्यासाठी. :-)) तरीही असाच एकदा डोक्यात विचार आला आणि एक लघुकथा(?)लिहिली आणि मग लिहीतच गेले, त्यात तथ्यं असो वा नसो. जरा बरं वाटलं काहीतरी वेगळं करायला लागल्यावर. थोड्या दिवसांत तेही कमी झालं कारण मी दुसऱ्याच व्यक्तीच्या दॄष्टीकोणातून हे सर्व बघतेय असं वाटलं. माझं 'मी' पण हरवलंय असं वाटलं. (अजून ते सापडलं नाहीये हे खरं, शोध चालू आहे.) आधी खूप काही लिहिण्यासाठी धावणाऱ्या मला,'माझिया मना जरा थांब ना' असं म्हणावं लागत होतं, ते 'माझिया मना जरा धाव ना' असं म्हणायची वेळ आली. सर्वात वाईट मला कविता न करता येण्याचं वाटलं. जुन्या कविता वाचताना ती जुनी मी आता कुठेतरी हरवून गेलेय असं वाटलं. तो विचार करण्य़ातला हळवेपणा, नात्यांतला नाजूकपणा सर्व नाहीसे झालेत असं वाटलं. आणि दु:खं याचं की ते हरवत असताना मला कळलं देखील नाही. अचानक चार वर्षांनी ते जाणवून काही उपयोगही नाही. :-(( असो.
ब्लॉगमुळे अनेक लोक भेटले आणि आवडलेही. त्यांच्या लिखाणातून हरवलेले संदर्भही मिळाले. तसंच,लिहून झाल्यावर प्रतिकियांची उत्सुकताही. Something to look forward to....माझ्या नेहमीच्या चार चौकटीतल्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळाल्याचा आनंद आणि कित्येक वर्षात जे केलं नाही ते केल्याचं समाधान. हे सर्व माझ्यातले बदल मला लिहायचेच होते,म्हणून या पोस्टचा प्रपंच.....माहीत नाही की अजून किती दिवस हे सुरळीतपणे चालू शकेल पण 'एक बरस बीत गया'. असंच चालू रहावं म्हणून मी प्रयत्न नक्की करणार आहे. बघू कितपत जमतंय ते.
-विद्या.

Friday, September 14, 2007

आलीस का गौराई?

मी चौथीत होते तेव्हा पहिल्यांदा आईने मला एक दिवस दुपारीच घरी परत बोलावले. आपल्याला काय? सुट्टी मिळाल्याशी मतलब. :-) तर त्यादिवशी गौरी घरी आणायच्या होत्या. आईने मला आज उपवासच कर असं सांगितलं होतं, त्यामुळे जोरदार भूक लागली होती. पूजेची तयारी चालूच होती. आईने मग वेगवेगळ्या पाच प्रकारची फुले की पाने काहीतरी आणली होती, एका तांब्याला सजवून त्यात ती व्यवस्थित लावूनही ठेवली. मग सामानाच्या खोलीतून चार पत्र्याचे डबे काढले आणि त्यातल्या एकातून त्या दोघी बाहेर आल्या. अगदी अलगद आईने दोन मुखवटे एका ताटात ठेवले आणि त्यासोबत तो तांब्या पण.माझ्या हातात ते ताट देऊन आई म्हणाली,'हां आता आत ये, आधी उजवं पाऊल टाक. मग देवघर, स्वयंपाकघर, मग ओसरी असं करत मी जाईन तशी पाऊलं टाकत पुढे ये. ते ताट तसं बरंच जड होतं आणि त्यात ते नाजूक मुखवटे, त्यामुळे कसं बसं सांभाळत मी पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळी पहिल्यांदा त्या गौरी माझ्यासोबत घरात आल्या. आईने मला सांगितलं होतं की पुढे काय करायचं आहे.
मी पहिलं पाऊल टाकल्यावर आईने प्रश्न विचारला,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"सुखसमृद्धीच्या पावलाने".

आई,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"मुलाबाळांच्या पावलाने"....."धनधान्यांच्या पावलाने"....."सौभाग्याच्या पावलाने".....असं करत कुंकवाच्या पावलांनी मी घर फिरून आले होते.
त्यानंतर आईने घाईघाइने शेपूची भाजी आणि भाकरी, लाह्या केल्या आणि नैवेद्य दाखवला. गौराया सासराहून माहेरी आल्या होत्या ना. त्यांना खाऊपिऊ घालायचे होते. नैवेद्य दाखविला आणि मी लगेचच जेवून घेतलं. :-) आणि हेच रुटीन पुढचे ८ वर्षें तरी चालू होतं.
कुणी एखाद्याला विचारलं की तुला ऎश्वर्या राय आवडते का? तर तो उत्तर देताना म्हणतो की मला तिच्यापेक्षा सुश्मिता सेन जास्त आवडते. तसं गणेशोत्सव आवडतो का? तर माझं उत्तर असतं, हो मला तो दिवाळीपेक्षा जास्त आवडतो.(न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सवयच आहे मला. :-)) ) एकूण काय, गणेशोत्सव हा माझा आवडता सण. आमच्या घरी गणपती पाच दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी गणपतीसाठी आरास करण्याची धावपळ, आधीच सिलेक्ट करून ठेवलेली मूर्ती घरी आल्यावर आरती वगैरे सर्वांकडे होतं तसंच. खरी मजा येते ती दुसऱ्या दिवशी सकाळपासून. गावात कुठेतरी सकाळी ५.३० च्या भोंग्याला गणपतीची गाणी सुरु होतात. माझं आवडतं गाणं म्हणजे,'गणराज रंगी नाचतो,नाचतो....'. त्या गाण्यांबरोबर दिवसाची सुरुवात होते. पुढचे दोन दिवस गणपतीची आरती आणि त्यासोबत अजून एक काम असतं ते म्हणजे, फराळाचे पदार्थ. गौरीच्या आरासेसाठी आई अनेक पदार्थ बनवते. त्याचा फोटो टाकतेच आहे मी खाली. तिसऱ्या दिवशी मी वर लिहिलंय तसं गौरीचं आगमन होतं.
भाकरी-शेपूची भाजी,वरण भात असं जेवण झाल्यावर आई कामाला लागते. गौरींना बसवायचं,सजवायचं. आमच्या घरच्या गौरी उभ्या असतात. मग अडीच-तीन पुट उंचीच्या गौरी उभ्या करताना आई त्यांना सहावारी साडी कशी नेसवते हे पाहण्यासारखं असतं. मागच्या वेळी मी व्हिडीओ शूटींग घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अगदीच अमेरिकन व्हर्जन आहे सगळ्या गोष्टी करण्याचं. मग कॅमेरा सोडून मी नुसतं बघत बसले. साडी नेसलेल्या गौरी गणपतीच्या दोन्ही बाजूनी उभ्या राहिल्या की या सणाची खरी शोभा येते. मग यावेळच्या साड्य़ांमध्ये गौरी कशा दिसतात हे बोलण्यात, बघण्यातच जास्त मजा येते. तर हा झाला गौरींचा पहिला दिवस. दुसरा दिवस त्यांचा लाड करण्याचा. त्यादिवशी पुरण्पोळीचा नैवेद्य असतो. पोळ्यांचा स्वयंपाक होईपर्यंत आणी खाऊन झाल्यावर सगळे अगदी पेंगुळलेले असतात, पण मुख्य काम तर बाकीच असतं, सवाष्णींना हळदी-कुंकवासाठी आमंत्रण देण्याचं. रडत-खडत का होईना आम्हा बहिणींपैकी एक घराच्या एका बाजूला तर दुसरी दुसऱ्या बाजूला जाऊन सगळ्यांना आमंत्रण देऊन येतं असू. त्यातच एखादी आपलं काम पण करून घ्यायची. म्हणणार, आता बरीच कामं आहेत, त्यामुळे तुमच्या घरी सांगायला काही येता येणार नाही, तूच तुमच्या आईला पण सांग आमच्याकडे या म्हणून.
सगळी आमंत्रणं देऊन आल्यानंतर मग घरी येऊन आमची नटण्यासाठी घाई असायची. मग साडी नेसायची की नाही, कुठली नेसायची, कोण हळदी-कुंकू लावणार, कोण अत्तर लावणार इ. आधीच ठरवून घ्यायचो. तोपर्यंत संध्याकाळ्चे पाच वाजलेले असायचे आणि आई अजून स्वत:च आवरते आहे तोवर बायका घरी यायला सुरुवात व्हायची. दादांचं त्यानंतर काही कामं नसायचं त्यामुळे ते आणि आजोबा अंगणात खुर्ची टाकून बसलेले असायचे. :-) आई म्हणायची की त्यादिवशी गौरींचं तेज काही औरचं असतं. आणि मलाही ते पटलंय. त्या नेहमीच्याच मुखवट्यांवर काही वेगळेच तेज वाटायचं. सगळ्या जणी कौतुकाने आरास, गौरींच्या साड्या, फराळाचे पदार्थ यांच्यावर गप्पा मारत संध्याकाळ भुर्रकन निघून जाते. रात्री कंटाळून झोपायला जाताना त्या दोघींकडे एकदाचं शेवटंचं बघणं अपरिहार्य असतं. जेवण झाल्यावर आई त्यांची 'दॄष्ट'ही काढते. :-) आणि हो आमचीही, आम्ही पण गौरायाच नाही का? :-)
पाचव्या दिवशी सकाळी आई मुखवटे उतरवून ठेवते आणि घर एकदम भकास वाटायला लागतं. संध्याकाळी आरती करून, त्यांब्यातील गौरी आणि गणपती विसर्जन होतं आणि एक प्रकारची उदासी मनात येते. खरंच आपल्या घरी कुणी पाहुणे आले होते आणि ते गेले आहेत असं वाटायला लागतं.मी १२वी नंतर गणपतीला घरी गेले पण गौरी घरी आणण्याचा मान तोपर्यंत माझ्या छोट्या बहिणीकडे गेला होता. :-( दोन वर्षांपूर्वीही मी घरी होते गणपतीला पण गावात जाऊन सर्वांना आमंत्रण द्यायला काही मी गेले नाही. अर्थात कित्येक घरात आज्या जाऊन काकूंची बढती सासूपदावर झाली असल्याने, नवीन सुनांनी तुम्ही कोण म्हटलं की बरं वाटत नाही ना. जे कोणी घरी आले त्यांना भेटले,बोलले आणि पूर्ण संध्याकाळ ते जुने दिवस आठवत राहले. ह्म्म्म... असो.तेव्हाचाच एक गौरी-गणपतीचा फोटो.
चार दिवसांपूर्वी काही विशेष घडतंच नाहीये असं म्हणलं खरं पण आमच्या पार्क बटरफील्ड अपार्टमेंटमधे गेल्या २-४ दिवसांपासून धावपळ सुरु झाली आहे, गणपतीच्या स्वागताची? खासकरून GT च्या घरचा गणपती मागच्या वर्षी ज्या जोशात साजरा झाला त्यामुळे तर अजूनच. GT म्हणजे आमचे शेजारी. मागच्या वर्षी १० दिवस संध्याकाळी आम्ही जवळ-जवळ १५-२० लोक असायचॊ आरतीला त्यांच्या घरी. मग कुणी म्हणणार आज प्रसाद मी करते गं, तर कधी ५ आरत्या म्हणायच्या की ७ अशी डिस्क्शन्स पण व्हायची. खूप वर्षांनी असा गणेशोत्सव साजरा झाला होता. पण स्वत:च्या घरी मी काही केलं नव्हतं. का? माहीत नाही. या वर्षी मात्र मला सर्वांकडे पाहून जोर चढलाय. आज हरताळका आहेत. घरी गणपती बसवणार नाहीये पण पूजा,आरती करणं, मोदक वनवणं हे तरी करू शकते ना? :-) बघू कसा होतोय कार्यक्रम ते. जमलं तर लिहिनंच त्याबद्दल...तोपर्यंत...गणपती बाप्पा.....मोरया.....
-विद्या.

Tuesday, September 11, 2007

मग? अजून काय विशेष?

काही महिन्यांपूर्वी,मी जेव्हा बऱ्यापैकी नियमितपणे लिहित होते, एका ओळखीच्या माणसाने मला मेल केली होती,"छान लिहीतेस गं तू. मला माहीत नव्हतं. बाकी काय? आजकाल ऑफिसमध्ये बराच रिकामा वेळ दिसतोय, एव्हढं लिहायचं म्हणजे.." सॉलिड चिडचिड झाली होती माझी. त्याला कौतुक करायचं होतं की टोमणा मारायचा होता हे अजूनही माहीत नाही. :-) पण गेल्या काही दिवसांत कामाचा ताण खरंच वाढल्यामुळे लिहिणं जमलंच नाही, त्यामुळे 'त्या' मेलची आठवण झाली. :-) तसं नुसतं काम हेच काही कारण नाहीये, द्यायची म्हटलं तर बरीच आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'कंटाळा'. सगळ्याच गोष्टींचा कंटाळा. घरात शेजारी पडलेली वस्तू उचलायचा कंटाळा, जेवण बनवायचा कंटाळा, उत्साहाने फिरायला जायचा कंटाळा, अगदी कुठली मोठी गोष्ट घडली तरी त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचाही कंटाळा.... आणि बराच काही. असो.
आजकाल कुणाशी बोलताना एका प्रश्नाची भीती वाटत राहते,"मग? अजून काय विशेष?" काय विशेष असणार कप्पाळ? दर दोन दिवसात काय विशेष होणार?
तसं आजकाल काही विशेष घडतंही नाही म्हणा.आमचे दादा त्यांची डायरी लिहितात तसं,
"आज सकाळी ८ ला उठले. आवरून ९.३० ला ऑफिसला पोचले. संध्याकाळी ६.३० ते ८ ला जिमला जाऊन आले. रात्री स्वयंपाक,जेवण, टिव्ही इ. उरकून लवकर झोपी गेले. "
बरं अगदीच ताणायचा म्हणला तर हे असं.....मी आज उशीरा उठले की लवकर, एखादा नवीन ड्रेस घातला. तो चांगला दिसला आणि कुणी compliments दिल्या तर (आजकाल तेही कमीच असतं म्हणा, :-) ) ऑफिसमध्ये एखादी मिटींग होती तिला (नेहमीप्रमाणे) उशीरच झाला, किंवा मॅनेजरने (नेहमीप्रमाणे) कशी कटकट केली, त्यानंतर घरी आल्यावरही जिमला जायचा कसा कंटाळा आला होता किंवा हिंमत करून गेलेच असेन तर अंग कसं दुखत आहे. मग आज कालची भाजी शिल्लक आहे की भाजी आणण्यापासून तयारी. बरं त्यातही रोज नवीन काय बनवणार. काही बनवलंच तर अजून २ मिनीटं ते कसं बनवलं यावर गप्पा.
बस्स....झाला एक दिवस, एकच दिवस काय,महिना, वर्षं काय, अशीच म्हणायची. म्हणजे या सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं घडणं आवश्यक आहे लिहिण्यासाठी असं वाटलं.दोन आठवड्यांपूर्वी मग ओरलॅंडोला गेलो होतो. म्हटलं चला जरा ब्रेक मिळेल नेहमीच्या कामातून.तिथं गेल्यावर जाणवलं की हा ब्रेक वगैरे जो म्हणतात तो फक्त निमित्त आहे कामाची टाळाटाळ करायचं, मला कुणी महिन्याभराचा ब्रेक दिला तरी परत आल्यावर माझी तीच ती जुनी रोजीनिशी सुरु होईल. :-) असो. तर तिथे गेल्यावरही जी काही उत्सुकता जाणवायला हवी ती मला वाटली नाही. त्यात एक दिवस Sea World ला गेले होते, आता मला माशांबद्दल किती उत्सुकता असेल सांगायलाच नको. एखाद दुसरा माशांचा खेळ पाहिल्यावर होता तो उत्साह ही सरला. मग त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर भटकणे, नासा,केनेडी स्पेस सेंटरला जाऊनही ठिकठाक वाटलं. माझ्या या असल्या निरस वर्णनात कुणाला रस असेल, अगदी मलाही नाहीये.पण त्या ट्रीपनंतर मला जे काही डोक्यात आलं ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करून बघते जमतंय का.
१. कुणाच्या डायरीबद्दल असं बोलणं बरं नव्हे पण दादांच्या २५ वर्षांच्या डायऱ्या केवळ चार ओळींच्या दिनक्रमात संपून गेल्या. मग मलाच काही तरी वेगळं हवं असण्याची इच्छा का, आणि ते मिळत असतानाही त्याला असमाधानाची झालर का? अगदी प्रत्येक emotion (भावना हा शब्द योग्य वाटला नाही म्हणून emotion) शब्दात टाकायची जबरदस्ती का? म्हणजे दादांनाही काही तीव्र विचार मनात आले असतील, पण त्याबद्दल लिहिलं नाही म्हणून त्यांची डायरी थांबली नाही, मग माझीच का? त्यांनाही अनेक संकटं आली पण तरीही त्यांची डायरी थांबली नाही, मग मलाच का प्रत्येक छोट्या गोष्टींचाही बाऊ करायची हौस? जरा कुठे खुट झालं की मला homesickness,sadness,nervousness, depression येतं. आणि मलाच त्यातून ब्रेक घ्यायची इच्छा का? एकदा मी घरी फोनवर बोलताना म्हटलं, मला खूप बोअर होतंय. आई तेव्हा जे म्हणाली ते मला अजूनही विसरता येत नाही. बरं ती ते अगदी सहजपणे म्हणाली होती, टोमणा म्हणून नव्हे. आई म्हणाली, "मघाशी पिंकीचा फोन आला होता, तीही म्हणे बोअर होतंय, आता तुला बोअर होतंय. आम्हालाच बोअर व्हायलाही वेळ नाहीये. उद्या कडधान्य साफ करून औषध लावून ठेवायचंय, परवा ते पिंकीला भेटायला जायचं म्हणताहेत, ....इ.इ." आणि विचार करताना मला खरंच असं जाणवलं की या दोघांनी कधीच मला कंटाळा आलाय,किंवा बोअर होतंय म्हणून सांगितलं नाहिये. मग सगळं व्यवस्थित चालू असतानाही मलाच का 'बोअर' होतं?
२. एकदा मी मावशीला फोन केला होता. म्हटलं काय चाललंय? मावशी म्हणे आईसक्रिम खातेय, येतेस का खायला? :-) तिच्या आवाजातही आईसक्रिम खाण्यातला आनंद जाणवत होता.माझी मावशीही पन्नाशीची असेल, म्हणजे हा निरागस आनंद काही वयासोबत कमी होत नाही हेही खरंच ना. एकीकडे मी छोट्या गोष्टींवर जास्तच विचार करतेय आणि त्याच्याविरुद्ध पूर्वी जसा एखाद्या लहानशा गोष्टीतून आनंद मिळायचा तो गमावतेय.
३. बरं छोट्या जाऊ दे, काही मोठं झालं तरी मला कितीसा फरक पडतॊ? देशाची परिस्थिती कशी आणि राजकारण कसं आहे यावर बोलण्याचा माझा हक्कही नाहीये, पण व्यक्तिगत आयुष्यात तरी मला कशाने फारसा फरक पडतो? प्रमोशन मिळाल्याचा आनंदही एखादा दिवस टिकला असेल. तसंच या ट्रीपमध्येही. मला आधी वाटायचं लोक किती सही असतात, सगळीकडे फिरून घेतात, डिस्नेला जातात, नासाला भेट देतात, इकडे-तिकडे जातात. शिकागो डाउनटाऊनमध्ये पहिल्यांदा मी जेव्हा आले तेव्हा माझ्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले होते, आणि रात्री झोपल्यावरही डोळ्यासमोर प्रत्येक इमारत येत होती. पण त्याच्या तुलनेत आता मी बरीच स्थिरावलेय म्हणायचे. जसा आनंद तसंच दु:खं, थोड्यावेळासाठीचं. फारतर एखादा दिवस-अगदीच एखादा आठवडा, मग मी परत माझ्या साच्यात.
४. या सगळ्यात एक चांगली गोष्टही कळाली, माझ्या जिवंतपणाचं एक लक्षणच म्हणा ना. ट्रीपला जायचं म्हणल्यावर कृष्णाला भेटणं तर नक्की होतंच. गेल्या अनेक वर्षात भल्याबुऱ्या प्रसंगात त्याने सोबत केली, पण आजकाल त्याच्याशीही बोलणं कमी झालं आहे. तरीही त्याला भेटायचंच होतं. त्याला सांगितलं की बाबा आम्ही तुझ्या राज्यात येतोय, भेटशील का आम्हाला? पण एक-दोन आठवड्यात त्याने सांगितलं की मला वीकेंडला काम असेल, त्यामुळे आपण भेटू शकतो, पण मी गाडी चालवून तिकडे येऊ शकत नाही. अजून एक चिडचिड. आता एव्हढ्या जवळ आलोय, तर दोन तास गाडी चालवायला काय जातं याचं? असा विचार करून तर वाटलं ,मी पण का जाऊ तिकडे मग? इतक्या आधी सांगूनही त्याने असं केलं, इ.इ. त्याच्याकडे जायला निघालो त्यावेळी पण मी चिडलेले नव्हते पण काही खूप आनंद पण नव्हता. पण....
त्याच्या बिल्डींगच्या फाटकातून आत जाताना त्याचा तो दात काढलेला चेहरा दिसला आणि मला जाणवलं की ...काही नाती कधीच बदलत नाहीत....कितीही वर्षे,कितीही दूर रहा तुम्ही.....त्याला बारीक झालेला पाहून तर डोळ्यांतलं पाणी आवरणं अवघड झालं होतं. त्याच्याबरोबरचा अख्खा दिवस भुर्रकन उडून गेला.दुसऱ्या दिवशी भेटायचं असं ठरवूनही भेट झाली नाही आणि परतल्यावर ती रुखरुख लागून राहीली की नीट भेटच झाली नाही.....
असो. अजूनही असेच काही मुद्दे असतील पण अजून तरी ते गुंत्यातून बाहेर पडले नाहीयेत.आता हे सगळं मुद्दे टाकून लिहायची काय गरज? पण ही विचारांची गुंतवळ एकदा सोडवायचीच होती. लिहायच्या आधी वाटत होतं की हे लिहायचंय, ते लिहायचंय,पण प्रत्यक्षात सुरुवात केल्यावर जाणवतं की मलाच माहीत नाहिये काय लिहायचंय ते आणि मग गाडी Reverse मध्ये जाऊन मला नक्की काय वाटतंय यावर येते. असं करत अनेकदा लिखाण अर्धवट टाकून दिलं. पण आज कदाचित थोडं फार तरी समजलंय असं वाटतंय. हम्म्म....आज तरी पोस्ट करून टाकते म्हणजे एक उत्तर राहील आज कुणी परत विचारलं की ....'मग? अजून काय विशेष?'...
-विद्या.

Monday, August 06, 2007

आवडतं काम?

सोमवारी सकाळी ९ च्या आत ऑफीसमध्ये येऊन बसलेय. म्हटलं चला अजून एक प्रयत्न करून पहावा, तुझ्यासारखं बनण्याचा. का? त्याचं एक कारण थोडीच आहे, पण मी तुझं कौतुक कशाला करू. :-) असो. तर बरेच दिवस तुला सांगावं म्हणत होते, अरे, तुला तो 'रॉड फार्मर' आठवतोय ना? आठवेलच म्हणा, रोज १०० मेल करून तू त्याला नको करून सोडलं होतंस. तर तो किती खडूस आहे हे तुला माहीत आहेच. मी केलेली एखादी मेल किंवा मेसेज तो ढूंकूनही बघत नाही. अशा या रॉडने परवा चक्क तुझ्याबद्दल विचारलं आणि तुझं कौतुकही केलं. म्हणे, 'I liked that guy'. अरे? म्हणजे आम्ही कामे करणारे लोक काहीच नाही? बरं तू इथे असताना तरी तो कुठे नीट बोलायचा तुझ्याशी? आणि आता तू नसताना म्हणे,'I liked that guy'. असो. तर मुद्द्याचा भाग असा की तू असं काय बरं केलं होतंस या माणसाला पटवायला? :-(
तुला वाटेल मी कामंच नाही करत तर मग असंच होणार ना? पण अरे मला वाटतं की हे कामंच किती बोअर आहे.मला ज्या technology वर काम करायचं ते तर आजतागायत मिळालं नाही. आणि इथल्या मॅनेजर बरोबर तर अजूनच त्रासदायक. त्यामुळे अगदी नको वाटतं बघ वेळेवर ऑफिसमध्ये यायला, काही काम मन लावून करायला. मी दिवसभर नुसताच टाईमपास करत बसते. मित्र-मैत्रिणींशी गप्पा, मेल, फोन, मोठा लंच ब्रेक इ. कामाबद्दल म्हणशील तर, तेही करते तसं बऱ्यापैकी, पण अगदीच शेवटच्या क्षणाला. जोपर्यंत गळ्याशी येत नाही तोपर्यंत आराम करते, मग थोडीफार धावपळ आणि I am done. तशा काही खूप तक्रारी नसतात माझ्याबद्दल(किंवा मला तरी असं वाटतं) तरीही दिवसाच्या शेवटी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आपण पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत असं वाटतं. तुला खरं सांगते, माझं आवडतं काम असतं तर मी नक्की मन लावून केलं असतं. (पण आजकाल तर असं वाटतं की आवडतं काम मिळालं तरी मला ते करायला जमेल की नाही माहीत नाही. बरं, या 'आवडत्या कामाची' व्याख्या तरी काय नक्की? माहीत नाही. Oracle, Java, की अजून काही? )
मला सांग, तुला आवडायचं का इथलं काम, नाही ना? तरीही मग कसं केलंस तू ते? बघ ना, अगदी त्या कंटाळवाण्या मिटींग्स, MS Word आणि Excel मधले documents? किती नीरस काम आहे ते, पण तू ते केलंसच आणि ते ही इतकं व्यवस्थित.तुझे ते सर्व नीट ठेवलेले documents नसते तर माझं काय झालं असतं माहीत नाही. तू एव्ह्ढा मन लावून का काम करायचास ते मला आजपर्यंत कळलं नव्हतं. अरे, या अशा कंपन्यांमध्ये नुसते दिखाऊ कामे चालतात, कुणी खऱ्या कामाला किंमत देत नाही. तरीही तू करत राहिलास. म्हणजे 'कर्मण्येवाधिकारस्ये, मा फलेषु कदाचन' हे वचन अगदी रोज पाळत होतास की. मला वाटलं होतं की शेवटी काय झालं, तुला इथून गेल्यावरच तुला तुझं आवडतं काम मिळालं ना? तुझ्या कष्टांची योग्य ती किंमत मिळाली ना? पण...
पण...त्यादिवशी रॉडने तुझं नाव घेतल्यावर कळलं की तुला तुझ्या कर्माचं फळ मिळतंच होतं, फक्त ते तुला माहीत नव्हतं आणि मलाही.... आवडतं काम असेल तर काय रे, ते तर सगळेच करतात, पण जे असेल ते काम मनापासून करणारे तुझ्यासारखे कमीच...होय ना?
-विद्या.

Tuesday, July 10, 2007

माझं तुझ्यावर प्रेम आहेच...पण....

            तू जाणार हे फायनल झालं तर. म्हणजे तू सगळ्यात पहिल्यांदा मलाच सांगितलं होतं आणि सांगायलाही हवं होतंच. शेवटी, आपण दोघे गेले वर्षभर एकाच प्रोजेक्टमध्ये राहिलो होतो आणि आनंदाने राहिलो होतो. आता तू असल्यावर मी काम कसली करतेय. :-) त्यामुळे माझं आरामातंच चाललं होतं. पण तुला जाणं गरजेचं होतं. महत्वाकांक्षा, करियरसारख्या गोष्टी होत्याच की विचार करायला. मग हो नाही करत, आज-उद्या करत शेवटचा दिवस आला. शुक्रवारी माझ्याकडेच सर्व वस्तू दिल्यास परत करायला. आणि हो, तू सर्वांचा निरोप घेत असतानाही मी सोबतच होते. मला फार कसंतरी वाटत होतं. वाटलं, रोज शेजारी बसायचो, जेवायला-बोलायला सोबत, अगदी त्या बोअरींग मिटींगमध्ये पण सोबत असायचो. वाटलं दिवसभर तुझ्याशिवाय रहायचं. आणि प्रत्येकजण तुला 'बाय' म्हणताना जणू मलाच एक प्रश्न विचारत होता नजरेनं की 'तुझं कसं होणार?'. मी अगदी मोठ्या तोंडाने सांगितलं की तुझ्या जागी येईल कुणीतरी लवकरच... पण 'तुझी जागा घेणं'?..... अवघड होतं.......आपण संध्याकाळी भेटूच हे माहीत असूनसुद्धा...सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटायचं नाही....?
         सोमवार उजाडल्यावर डोक्यात पहिला विचार तोच आला. आज एकटंच ऑफिसला जायचं. सोमवार तसा नेहमीप्रमाणे कंटाळवाणाच होता. पण अगदी आकाश भरून वगैरे काही आलं नव्हतं.चक्क लखलखीत उन पडलं होतं. हवं तसं निवांत आवरून बाहेर पडले. कधीतरी स्वत:साठीच आवरून खूष होण्यातही मजा असते नाही? :-) वाटलं गाडीत बसून एकटंच जाताना तरी थोडं वाईट वाटेल. उलट आज आवडत्या जुन्या गाण्य़ांची सिडी उत्साहाने लावलई. तसा तुला मी कुठलीही गाणी लावली तरी फारसा फरक नाही पडायचा. पण आज एकटंच गाणी ऎकत जाण्यात वेगळंच सुख होतं. अगदी 'आपकी याद आती रही रातभर.....' गाणं ऎकतानाही गाण्याकडेच लक्ष होतं.
          ऑफिसमध्ये गेल्यावर तुझ्या खुर्चीकडे नजर टाकायलाही उसंत मिळाली नाही की कामाचा भडीमार झाला. आधी वाटलं होतं की तू नाहीस म्हटल्यावर सगळी जबाबदारी माझ्यावरच...:-( काही चुकलं तर? पण अंगावर पडल्यावर माणूस आपोआप काम करतोच. मग उलट जरा बरंच वाटलं की चला ब़ऱ्याच दिवसांनी स्वत:चं डोकं लावलं कुठेतरी. त्यानंतर मग जरा गूगलवर गप्पा आणि मेल,इ. मी आधीही हे करायचेच, मी असं नाही म्हणणार की तू चौकीदारी करत असायचास. स्वत: जरा काम केल्यावर थोडा टाईमपास करायला बरं वाटतं होतं. I deserved it. :-) तुला माहीतेय, मला गूगलवर,मेलवरही सगळ्यांनी हाच प्रश्न विचारला,'कसं वाटतंय मग तुला आज? तो नाहीये तर एकटं वाटत असेल ना?'. त्यांना कसं सांगणार की मी काही अगदीच दु:खात नाहीये. लोकांना जे अपेक्षित होतं तेच उत्तर दिलं मी. काय करणार ना?
         दुपारच्या जेवणासाठीही बदल म्हणून दुसऱ्या लोकांसोबत, दुसऱ्या विषयांवर बोलणं चांगलं वाटत होतं. जेवणानंतरचं आईसक्रिम खाताना जाणवलं की हे दुखं: वगैरे सगळं विसरायला होतं बघ...मला खायला दिलं की. :-)) गंमत म्हणजे ती मुलगी आहे ना, जिच्याशी माझं फारसं बोलणं होतं नाही बघ?आज तीही चक्क माझ्याशी बोलायला आली होती. तिने तुझ्याबद्दल विचारलं, मग जाता जाता म्हणालीही,' कधी कंटाळा आला तर ये माझ्याकडे गप्पा मारायला'.आपण लोकांबद्दल कसे ग्रह बनवून ठेवतो ना? आणि ते असे मोडले जातात, नकळतपणे. मला बरं वाटलं. त्यानंतर उरलेला दिवस पटकन निघून गेला.संध्याकाळी शेवटच्या अर्ध्यातासात मात्र मला राहवलं गेलं नाही. मी पटापट आपलं दुकान(संगणक) बंद करून बाहेर पडले. ट्रॅफिकमधून गर्दीतून माझी वाट काढताना' तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै' चा इफेक्ट (नेहमीप्रमाणेच) जाणवल्याशिवाय राहिला नाही.
          तुला दिवसभरानंतर पाहिल्यावर मला परत एकदा प्रेमात पडावसं वाटलं. :-) तुझा पहिला दिवस कसा गेला वगैरे ठीक आहे रे. पण मला मात्र विचारु नकोस. बाकीच्यांना खोटं सांगायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुला खरं सांगितल्याशिवाय राहवणार नाही. सांगू? खरं सांगू? .....माझं तुझ्यावर प्रेम आहेच रे...पण....माझं माझ्यावरही खूप प्रेम आहे. :-) आणि एकांतात ते वाढतंच जातं. :-).....

-विद्या.

Friday, June 15, 2007

तुझ्यासोबत

कधीतरी पहाटे
एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी,
आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी,
यासारखं सुख ते काय?

कधीतरी भांडताना
एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी,
आणि ती छॊटीशी जखम
दिवसभर छळत रहावी,
यासारखं दु:ख ते काय?

कधीतरी रविवारी
सगळं घर पसरलेलं,
आणि दुपार नुसतं पडून
आळसात घालवावी,
यासारखी मजा ती काय?

कधीतरी रडताना
तू एखादं वाक्य टाकावं,
आणि मी रडता रडता हसले
की पटकन कवेत घ्यावं,
यासारखा आधार तो काय?

कधीतरी लढताना
सगळे माझ्या विरुद्ध,
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर
एका नजरेतंच समर्थन मिळावं,
यासारखं बळ ते काय?

कधीतरी चुकताना
मला तू वेळोवेळी बजावावं,
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर
पुन्हा एकदा समजून सांगावं,
यासारखं प्रेम ते काय?

कधीतरी हसताना
तुझ्या डोळ्यांत पहावं,
आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं
सार्थक झालं असं वाटावं,
यासारखं समाधान ते काय?

कधीतरी जगताना
जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस
असं म्हणता यावं,
यासारखं आयुष्य ते काय?

-विद्या.

Tuesday, June 12, 2007

आठवतं तुला..?

ती म्हणाली,
" आठवतं तुला...
त्या अनोळखी रस्त्यांवरून
तू माझ्याबरोबर यायचास
मदत म्हणून..
आज सारे रस्ते ओळखीचे झालेत
म्हणून तू अनोळखी व्हावं
असं थोडीच आहे?

मला रस्तेच हवे असते
तर कसेही शोधले असते
त्यासाठी कुणाच्या
ओळखीची गरज नव्हती
मला तुझी मदत नको,
सोबत हवी होती..."

तो उत्तरला,
"आठवतं तुला .....
तू दबकत चालत जायचीस
त्या रस्त्यावरच्या फुलांना
दुखवू नये म्हणून..
तुझा क्षणिक स्पर्शही
त्यांना पुरेसा झाला असता...
माझ्या प्रेमाचं सार्थक करण्यासाठी.

तुला कधी समजलंच नाही
ती मीच अंथरली होती...तुझ्यासाठी.
ज्या स्वप्नांना तू अस्पर्श सोडून गेलीस
आपली नाहीत समजून
तुला कधी उमजलंच नाही
ती फक्त तुझीच होती म्हणून...."
-विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज:

Monday, June 04, 2007

कॉफी

तुला आठवतंय, तू माझ्या डीपार्टमेंटच्या बाजूने जायचास मला दिसशील अशा हेतूने, अगदी शक्य तितक्या सावकाश आणि वेळ काढत. माझं लक्ष नसताना तुझा किती हिरमोड झाला असेल माहीत नाही. पण माझं अचानक लक्ष गेल्यावर तुझ्या ओठतलं हसू पटकन सांडायचं आणि माझ्या शेजारच्या त्या ढापण्या काकू टायपिंग सोडून माझ्याकडेच बघायच्या. पण तोपर्यंत मलाही हसू आवरता यायचं नाही आणि केव्हा एकद कॉफी मशिनकडे येतेय असं व्हायचं. सोबत बॉस असेल तर मग अवघडच. त्यांनाही दिसत असेल का रे माझं हसू? असू दे मेलं.
मग त्या मशिनजवळ पोचताना दोन-दोन पायऱ्या चढत यायचे. :-) आता ती कॉफी कशी होती माहीत नाही पण अख्ख्या जगाला आपल्याबद्दल माहीत असूनही नॉर्मल होऊन बोलणं अवघडच होतं नाही का? ते एकमेकांसारखे दिसणारे दोन कारकून, तुझे साहेब, तर कधी तुझ्याच डीपार्टमेंटचा एखादा वर्कर, सगळे फक्त 'काय साहेब?' म्हणून जायचे. त्यांचं ते मिश्कील हसू पाहून पळून जावंसं वाटायचं,but who cared? :-)ते कॉफीमशिन म्हणे महिन्या-दोन महिन्यात कधीतरी साफ करायचे म्हणे. कुणीतरी एकदा एक माशी तोंडात आली हे ही सांगितलेलं. But who cared? :-) माझ्या कंपनीतल्या शेवटच्या दिवशी आपण ५.३० ला तिथे भेटलो होतो, मला आठवतंय चांगलं. चार लोकांत अवघडलेपण आलेलं आणि एकटं भेटल्यावर केव्हा एकदा मिठीत येऊन रडेन असं झालेलं. हम्म्म्म्म्म...चार-पाच वर्षं झाली त्याला. होय ना?......
तुला इथली कॉफी आवडते का रे? फार कडू असते, अगदी उलटी येईल इतकी कडू. दुपारी नाईलाज म्हणून किंवा सकाळी भुकेवर एक उपाय म्हणून घेते मी कधीतरी. तुला आवडली असती का रे अशी कडू कॉफी? माहीत नाही. :-( आज-काल तसं तुझ्याबद्दल काहीच माहीत नसतं मला म्हणा. असो. तर ही कॉफी ना, इतकी कडू असते. मग मी त्यात दूध ओतते बरचसं, पण तेही मेलं पातळ पाणी. तरीही ओततेच.कितीही प्रयत्न केले तरी रंग काही सुधारत नाही त्याचा. मग बाकी लोक एखादं पाकीट साखर घालत असतील तर मी ४-५ घालते. पण तरीही कडूच. :-( असो. सगळ्य़ाच गोष्टी हव्या तशा थोडीच मिळतात, फक्त कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करता येतो इतकंच.
-विद्या.

Monday, May 21, 2007

मी कुठे आहे?

मी जेव्हा हा ब्लोग लिहायला सुरुवात केली तेव्हा फक्त मनातले विचार कागदावर उतरवायचे हा एकच विचार होता. पूर्वी कविता करायचे, आजकाल तितके सुसंबद्ध किंवा तीव्र विचारही मनात येत नाहीत म्हणून डायरीसारखं काहीतरी लिहायचं होतं. पण गेल्या काही दिवसाच्या पोस्टस पहात होते, तेव्हा जाणवलं की एखादी कविता सोडली तर बऱ्याचशा छोट्या कथाच आहेत. मला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर, कधी सुचलेल्या कल्पनांवर काहीतरी लिहावसं वाटलं आणि ते किस्से मी कथेसारखे लिहीले. त्यांना कथा म्हणता येईल की नाही हे ही माहीत नाही.दोन दिवसांपासून वाटतंय की या कथांतूनही माझेच विचार येत असले तरी प्रत्यक्षात मी कुठेच नाही येत. दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वत:ला ठेवून त्याच्यां मनातले विचार काय असतील हे स्वत:च अंदाज लावून लिहायचे. यात मी कुठे येते?
कित्येक दिवसांत फक्त माझ्याबददल, माझ्या मनातलं काही लिहीलंच नाहीये असं वाटतंय. असं वाटतंय की कित्येक दिवसांत मी या ब्लोगवर कुठे नव्हतेच मुळी. अगदी आताही सुरुवात कुठून करायची, शेवट काय करायचा, असले काही तरी विचार डोक्यात येताहेत. पण मला हे नकोय. I want to write about me, myself and my thoughts only ! मला मुक्त व्हायचंय या विचारातून, विचारांच्या साच्यातून. अगदी वाट्टेल तसं, वाट्टेल त्य विषयावर लिहायचंय. माझा एक मित्र म्हणालाही होता,"दुसऱ्यांना काय हवं ते नको लिहूस, तुला काय वाटतं ते लिही." आता कळतंय की तो काय म्हणत होता.
काही दिवसांपूर्वी सोनू निगम, आशा भोसलेच्या Live Concert ची तिकीटे बुक केली होती. मागच्या शुक्रवारी मग त्या कार्यक्रमाला गेले होते.तिथे डोक्यात खूप काही विचार येऊन गेले. ते लिहीतानाही उगाचच लिहीतेय असं वाटलं. मग परत खोडून लिहायला सुरुवात केलीय. बघू काही होतं का.
तिकीटे बुक करताना संदीपचं म्हणणं की हे असले कार्यक्रम काही कामाचेच नाहीत. इतक्या दुरून कोणी दिसत नाही त्यापेक्षा घरी राहून टी.व्ही. वर पहा तेच. पण हट्ट करून मी तिकीट काढलंच. नेहमीप्रमाणे उशीराच पोहचलो तिथे. अंधाऱ्या थिएटर मधून शोधत आपल्या जागी पोहचलो आणि सगळ्यात पहिली गोष्ट मला स्ट्राईक झाली ती की मला खरंच इथं मजा येणार आहे का? I was scared of that first thought, I had just entered the room and I wanted to get out of there. का? माहीत नाही. खूप सारे अनोळखी लोक दिसत होते. कदाचित दोन-अडीच हजार. आमचे शेजारी अजून पोहचले नव्ह्ते. तोपर्यंत कुठलीतरी लोकल मुलगी स्टेजवर येऊन गाणी म्हणूण गेली. तिच्या आवाजात 'क्रेझी किया रे' आणि 'बिडी जलयले' ही गाणी ऎकातना पळून जावसं वाटलं. बाजूचे लोक मस्त टाळ्या वाजवत होते, पण मला मात्र फार अस्वस्थ होत होतं.
कोलेजनंतर बहुतेक हा असा पहिलाच कार्यक्रम मी अटेंड केलेला. अर्थात त्यालाही आता ६ वर्ष झाली पण मला खूप आठवअण येत होती सगळ्य़ांची. माझ्या मित्र-मैत्रिणींची आणि अशा भरलेल्या स्टेडीयमवर कुणीही भसाड्या आवाजात गायिलं तरी टाळ्या वाजवतं नाचण्याची. :-( It was a very odd and scary feeling. To suddenly miss someone whom you havent met in years and rarely talked to. आणि अजून एक भितीही मला वाटली. कदाचित हे असले कार्यक्रम मला त्या वयातच आवडत होते आणि आता नाही आवडत. Am I too old to enjoy these programs? अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या विचारांतूनही स्वत:ला रोखून ठेवत मी बसून राहीले,इकडे-तिकडे पहात, आमच्या शेजाऱ्यांची वाट पहात. तसं पाहीलं तर ते ही मला नवीनच होते. गेल्या महीन्याभराची तर ओळख आमची. तिकीटे सोबत काढली म्हणूण शेजारी बसत होतो, काही दिवसात जरा ओळख झाली होती, पण तरीही ते मित्र म्हणता येतील असे नाहीत. असं असूनही मी त्यांची वाट पहात होते. कदाचित या अशा कार्यक्रमात अनोळखी लोकांबरोबर असतानाच ओळखीची जास्त गरज वाटते. I was searching for someone,someone I knew.
आमचे शेजारी आता येऊन बसले होते, माझं लक्ष जरा स्टेजकडे लागलं. लवकरच कुनाल गांजावाला येऊन गाणी म्हणून गेला. त्याचं 'भीगे होंठ तेरे' ही जास्त मनापासून ऎकावंसं वाटलं नाही. त्यानंतर मात्र जे झालं तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणता येईल(आतातरी). She came, she sang and she won hearts of all those people in the stadium. आशा भोसले, लता मंगेशकर अशी नावं आपण रोज घेतो आणि ऎकतोही पण प्रत्यक्षात आशा भोसलेना पाहील्यावर उभं राहून अभिवादन केल्याशिवाय राहवलं नाही. We all gave her a standing ovation. माझ्या अंगावर रोमांच उभे राहीले होते. पुढचा पाऊण तास मग भर्रकन गेला आणि मी रुळले. कैलाश खेरचा आवाज ऎकल्यावरही तीच feeling. रोमांचकारी !!! तसाच सोनू निगमही. प्रत्येक गाण्यामागच्या आठवणी जाग्या करत आणि नवीन तयार करत तो आला आणि निघूनही गेला.
यासर्व प्रकारात मी बसून टाळ्या वाजवण्यापासून उभे राहून नाचण्यापर्यंत प्रगती केली होती. माझ्या शेजाऱ्यांसोबतही खूप मजा आली."चांगले आहेत बिचारे" ही additional note माझ्या मनाने करूनही घेतली. मला याचा आनंद होता की एक प्रश्न तरी सुटला, माझं आरडा-ओरडा करण्याचं, सोनू निगमला पाहून 'हाय........' होण्याचं वय अजून गेलेलं नाही. कार्यक्रमाच्या शेवटी 'बरं झालं आलो, मस्त वाटलं एकदम' ही feeling घेऊन घरी गेले. माहित नाही की पुढच्या वेळी अशा कार्यक्रमात मला हे माझे शेजारी आठवतील की जुनेच मित्र-मैत्रिणी.
'Is it going to be a LIVE Conert ever or just bunch Memories everytime?'
-विद्या.

Monday, April 30, 2007

अशी पाखरे येती

    आज सकाळी स्कूलबसला अगदी धावत पळत पोचलो. गाडीतून उतरून स्वनिक धावत पळत बसमध्ये जाऊन बसला. त्याची धावपळ बघून जरा वाईट वाटलं. या लहानग्या वयात दप्तर घेऊन असं पळापळ करायला लागते पाहून कसंतरी झालं. सकाळपासून डोक्यात तेच चित्र होतं. काहीतरी लिहिण्याचा विचार होता पण १० वर्षांपूर्वी माझ्या ब्लॉगवर लिहिलेली ही पोस्ट आठवली. इथल्या वाचकांना  वाचण्यासाठी पोस्ट करत आहे. बरेचसे संदर्भ १० वर्षे जुने आहेत. सध्या आपल्याकडे बस आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अजूनच दुर्दैवी घटना घडत आहेत आणि संकटे वाढत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. आता पुरती हि जुनी पोस्ट. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  ऑफिसला जाताना समोर एखादी स्कूलबस लागली की आम्ही वैतागतो. अरे एक तर ती दिलेल्या स्पीडलिमिट्च्या एक मैल वर जात नाही, शिवाय रेल्वे क्रॉसिंगला थांबते, सिग्नल पिवळा होण्याच्या खूप आधीच थांबते आणि हो जर त्यात मुले चढणार किंवा उतरणार असतील तर 'Stop' लिहिलेला आपला मोठा दांडा आडवा टाकून मागच्या सर्व गाड्या थांबविते. त्यातही मुलेच ती,कुठेही जातील, पळतील म्हणून पलीकडच्या बाजूने जाणाऱ्या गाड्यांनीही थांबायचे म्हणे. मग कुणाची चिडचिड होणार नाही? या बसेसना बाकीच्या सुरक्षा व्यवस्थाही खूप असतात म्हणे. त्याच्या खिडक्या आपल्या नेहमीच्या बससारख्या खालून वर जाणाऱ्या नसतात, तर वरच्या बाजूने उघड्या असतात का तर मुलांनी हात बाहेर काढायला नको, खिडकी जोरात आदळून हातावर पडायला नको.(लहानपणी माझ्या हातावर एकदा पडली होती. ) दरवाजा उघडून मुले आत येऊन बसल्यावर दरवाजा बंद होतो आणि मगच बस हालते....... किती हा खटाटोप. नसते लाड...नाहीतर काय?

       कांदिवलीच्या लोखंडवाला अपार्टमेंटसच्या मागील रस्ता,हायवेकडे जाणारा, सकाळी ७ वाजल्यापासून तुम्ही तिथे उभे राहिलात तर कुठे एखादी रिक्षा मिळण्याची शक्यता, तीही अनोळखी माणसांसोबत वाटून घेतलेली. मख्ख चेहऱ्याने बसून फक्त २ कि.मी. रिक्षाने जाण्यासाठी ४०-५० मिनिटे घालवायची.अगदीच उशीर झाला तर हायवे वर येणारी कंपनीची बस चुकेल या भीतीने तंगड्या तोडत गर्दीतून वाट काढत पूर्ण रस्ता चालत जायचे नाहीतर मग बस मिळाली तर अर्ध्या अंतरावर उतरून चालत जायचे. गेले कित्येक महीने तिथे रस्ता बांधकाम( खोदकाम?) चालू आहे आणि माझ्यासारख्या आळशी माणसांना रिक्षा मिळत नसल्याने अतिशय गैरसोय झाली आहे. बसमध्ये चढल्यावर सुटे पैसे शोधण्यात निम्मा वेळ जायचा आणि तोपर्यंत माझा स्टॊप यायचाही. उरलेल्या वेळात मी माझ्या ड्रेसची ओढणी खराब होते की कंपनीची बस चुकते या काळजीत.

     त्या भागात कुठेतरी झोपडपट्टी होती म्हणे. भडक निळ्या रंगाचे युनिफॉर्म घातलेली पोरे-सोरें तिकडून कुठून तरी यायची. काही माझ्याबरोबरच चढायची(की पळत-पळत पकडायची?) . हातातला पास दाखवून आपल्या मित्र-मैत्रिणीशी त्यांचा गप्पा सुरूही व्हायच्या. काही जण जागा असेल तर बसच्या पायऱ्यांवर आरामात बसायची नाहीतर बसच्या पायऱ्या चढून गेल्यावर जो खांब असतो त्याला पकडून उभी राहायची.वरच्या दांड्याला मलाही अजून नीट पकडता येत नाही. एकदा मी माझ्या जागेवरून उठून एका मुलीला बसायलाही सांगितले पण तिला तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत खांबाला धरूनच उभे राहायचे होते. मी सकाळ-सकाळी किती वैतागून प्रवास करायचे आणि ही पोरे मात्र आरामात धक्के सहन करत, मजेत गप्पा मारत जायची. आणि हो,आपले कंडक्टरसाहेबही फार प्रेमळ. लोकांना उतरण्यासाठी ते गाडी थांबवतच नाहीत, मुलांसाठी मात्र १०-१५ सेकंद थांबवतातच.

    एकदा मी आईबरोबर सातारला गेले होते. साताऱ्याच्या मुख्य चौकात दोन्ही बाजूंनी रिक्षा, भाजीवाले, गाड्यावाले यांच्या आणि बसच्या मध्ये असलेल्या जागेतून स्वतः:ला बसमध्ये घुसवताना एका चिंगीला मी पाहिले आणि अक्षरशः: शहारले. तिचा एकच हात बसच्या दाराला पकडू शकला होता आणि बस निघाली. आजूबाजूला लोकांनी मग दुसऱ्या हाताला पकडून तिला आत घेण्याचे महान कार्य केले होते. आजचा दिवस तरी ती घरी (सुखरूप?) पोहोचणार होती. बसच काय रिक्षाने जाणाऱ्या मुलांचेही हाल असेच असतात. बसमध्ये चालक हा सरकारी कर्मचारी तरी असतो आणि त्याला पुरेसे शिक्षण दिले असण्याची थोडीफार शक्यता असते.रिक्षांत मात्र, चालकाने जर पैसे भरून चालन-परवाना काढला असेल किंवा त्याला ही गिऱ्हाईके पोचवून बाकीही कामे करायची असतील तर?

      मी दुसरी-तिसरीत असताना, घर शाळेपासून दूर असल्याने मी व माझ्या बहिणीसाठी रिक्षा लावली होती. आता लहानपणापसूनच उशीरा उठण्याची सवय असल्याने आम्ही सगळ्यात शेवटी रिक्षात चढायचो. त्यामुळे कडेची जागाच काय पूर्ण सीटच भरलेली असायची. मग सीटच्या पुढे उभे राहणे आणि अजून उशिरा गेले की रिक्षावाल्या काकांच्या बाजूला अर्ध्या जागेत बसणे अशी कसरत करायला लागायची.त्यातही सीटवर बसलेल्या मुलांना पुढच्या मुलाचे दप्तर किंवा त्यातली एखादी टोकदार वस्तू लागून झालेले छोटे-मोठे अपघात, भांडणे यांची भर. अर्थात अगदी ४-५ वर्षापूर्वीपर्यंत माझे वजन(की उंची?) त्यातल्या त्यात कमी असल्याने, ३ पेक्षा जास्त लोक असल्यावर, मी आईच्या मांडीवर बसून रिक्षातून प्रवास केला आहे ही गोष्ट वेगळी.

       आमच्या शाळेत एका मोठ्या फळ्यावर 'अशी पाखरे येती' असं टायटल देऊन आजूबाजूच्या किती गावांतून मुले शिकायला येतात त्या गावांची नावे दिली होती. त्यातले कितीतरी जण अगदी पाचवीपासूनच २-६मैल सायकलवर येतात किंवा मग बस लौकर येते म्हणून सकाळीच १०वाजण्याच्या आतच शाळेत येतात आणि संध्याकाळी ६ नंतर घरी पोचतात. ८वीत असताना माझी एक मैत्रीण जवळच्या एका गावाहून बसने यायची आणि ती लौकर येत असल्याने माझीही जागा पकडून ठेवायची त्याचा मला तेव्हा फार आनंद व्हायचा. पण आज मी एव्हढ्या लहान वयात मुले किती थकून जात असतील याची कल्पनाच करू शकत नाही. सायकलवरून येणारी मुले पावसाळ्यात कशी येत असतील बरे? चिखलाने भरलेले पाय शाळेजवळ आल्यावर पावसाच्या पाण्यातच धुताना उड्या मारणारी मुले आनंदी म्हणायची की निरागस असल्याने त्यांच्याच कष्टाशी अनोळखी?

     माझ्या सुदैवाने शाळेतच काय पण ११-१२वीलाही गावातल्या कॉलेजातच गेल्याने कधी बसचा प्रवास आला नव्हता किंवा पुढच्या शिक्षणातही. आणि त्यानंतरही मुंबईत थोडा-फार प्रवास केला तो कंपनीच्या बसमधूनच त्यामुळे धक्काबुक्की कमीच. पण तिथल्या लोकलमध्येही चतुराईने चढून जाण्याऱ्या, परीक्षेच्या वेळी उभ्या उभ्याच अभ्यास करणाऱ्या इवल्याश्या जिवांना पाहिल्यावर मलाच भीती वाटायची. त्यांच्या आईबाबांना माहीत असेल काय की आपला मुलगा/मुलगी इतके धक्के खात, पळापळ करत, जीव धोल्यात घालत प्रवास करतात? की तेही असेच अजून कुठल्यातरी बसमध्ये लटकून रोज प्रवास करतात? की अजूनही अशी अनेक गावे आहेत जिथे चौथीनंतर गावात शिकताच येत नाही?की त्यांना, शाळा कितीही दूर असली तरी, आपल्या मुलाला चांगल्याच शाळेत घालायचे असते? की शाळेत जाण्याआधीच त्यांना आयुष्याच्या शाळेत जगण्याचं खरंखुरं शिक्षण मिळतं?की मलाच हे सगळं Complicated वाटतंय आणि त्यांच्यादृष्टीने हे सगळं रुटीन असतं? असो.....इथल्या स्कूलबसमधल्या पाखरांना पाहताना मला आपल्या गावच्या पाखरांची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

-विद्या भुतकर .

Tuesday, April 24, 2007

त्राण निघून गेले....

पुन्हा एकदा वसंत आला आणि पालवी दिसू लागली. पण अजूनही काही सुकलेली झाडे-वेली पाहून काहीतरी लिहावंसं वाटलं ते असं...


दर सहा महिन्यांनी माझ्या सुकलेल्या फांद्यांवर,
तू तुझे किरण घेऊन आलास आणि मी मोहरून गेले.

कुठे लपला होतास जेव्हा मी
वाऱ्यात झडून गेले, थंडीत गारठून गेले.

तुझं हे असं खूप दिवस चाललंय
किती सहन करणार, मी आता थकून गेले.

यावेळी जरा उशीर केलास, पुन्हा मी फुलणार नाही...
तुझी वाट पाहण्यात सारे त्राण निघून गेले....

-विद्या.

Friday, April 20, 2007

एक किराणामालाची यादी

'आज-उद्या करत शेवटी जिम लावली एकदाची. आळस नाही हो, थंडी हा माणसाचा मोठा शत्रू आहे मग मी तरी काय करणार.तर आता इतक्या दिवसांनी व्यायामशाळेत आल्यावर मी धड राहिले तर नवलच.मेले हातपाय पण माझ्यासारखेच आहेत जरा काही बदल झाला की किरकिर करायला लागतात. पाठ आणि पोट तर पहिले चार दिवस ना हसू देत होते ना रडू. उठता-बसता त्या ट्रेनरला शिव्या घातल्या आणि स्वतः:लाही(नको ते उद्योग करायची सवयच आहे मला). असो. संध्याकाली ऑफिसातून परत आल्यावर कसाबसा चहा घ्यायचा आणि व्यायामाला पळायचे. मग परत येताना जी भूक लागते, कुठलाही खाद्यपदार्थ आठवून त्रास होतो. घरी पोचल्यावर इतका कंटाळा आलेला असतो की जेवण बनवणे ही अशक्य गोष्ट असते. मग सर्वात लौकर आणि कमी कष्टात जे काही बनविता येईल ते बनविण्याकडे माझा कल असतो. :-) मागच्या आठवड्यात भाजी आणायलाही वेळ मिळाला नाही, ना बाकी काही मसाले. शेवटी आज वेळ काढून भारतीय किराणामालाच्या दुकानात आम्ही गेलो. आणि......
गेल्यागेल्या तिथल्या समोशाच्या वासाने माझी भूक चाळवली गेली. :-( समोसा?....तेल, बटाटे.... क्यालरीज सगळं आठवून मी स्वतः:ला आवरलं.लगेचच माझी सामानाची खरेदी सुरू झाली. ती अशी:
१. सकाळी नाश्त्याला चहाबरोबर बिस्किटे,टोस्ट, खारी, केक रस्क. चहा, साखर तर काय लागतंच.
२. डाळी, पिठं, इ. जास्त घेऊन तसेच पडून राहतात, त्यामुळे जरा लहानच पाकिटे घ्यावी.
३. पुढचा माझा आवडता विभाग होता. तयार भाजण्या,पिठे.
इडली मिक्स, डोसा मिक्स,रवा इडली मिक्स, रवा डोसा मिक्स,खमण ढोकळा मिक्स, बरेच दिवसांत दही वडा खाल्ला नव्हता, त्यामुळे वडा मिक्स. आजकाल भजी साठी पण एक मिक्स मिळतं, ते मागच्या वेळी ट्राय केलं पण विशेष आवडलं नाही, ते cancel.
केप्रची थालीपीठ भाजणी.केप्रचीच उपवासाची भाजणी.अरे हो पाहुणे येणार असले की MTR चं पायसम मिक्स,गिट्सचं बासुंदी मिक्स.फारच कष्ट करायची इच्छा असेल तर गुलाबजाम मिक्स. :-)
४. पुढचा अतिशीत (फ्रोझन) विभाग:
दीप कंपनीचे आलू पराठे,साधे पराठे,मेथी पराठे,यावेळी 'बाजरा रोटी' ही घेतली आहे, बघू कशी लागते ती.भरलेले(स्टफड) पराठे आणि हो विसरलेच....पुरणपोळी. मागे एकदा मला वाटलं होतं की पुरणपोळी करावी पण जर २ मिनिटांत मला गरम-गरम पोळी मिळणार असेल तर मी एव्हढे कष्ट करावे का? आणि का करावे? :-)अतिशीत समोसे.काही कच्चे तर काही नुसते ओव्ह्नमधे गरम करणारे पण मिळतात. त्यांना तळायचीही गरज लागत नाही.अतिशीत ढोकळा,त्याची चटणीही सोबत असते.मांसाहारी लोकांसाठी कबाबही मिळतात. एकदा मी मोती कबाब आणले होते. काय असेल बरं ते? साबुदाण्याचे वडे. तेही बरे होते म्हणायचे.
आमचे दक्षिण भारतीय बंधू यातही मागे नाहीत बरं. या विभागातही डोसा,इडली,उत्तपम,त्यांची चटणी,सांबारही मिळते.
प्रत्येक पराठ्याची दोन-दोन पाकिटे घेतली की १-२ महीने सहज जातात. बाकी चटपटीत खाण्यातील ३-४ पाकिटे तर घेतलीच जातात.
५. अतिशीत विभागाच्या जवळच चिरलेल्या अतिशीत भाज्या मिळतात. त्यात पावटा, कारली(क्वचितच), ओलं खोबरं, शेवग्याच्या शेंगा, घेवडा या काही आपल्याकडील नेहमीच्या गोष्टी ज्या इथल्या दुकानांत मिळत नाहीत.चिरलेल्या मिक्स भाज्य़ाही भातात, सांबारमध्ये चांगल्या लागतात आणि कष्टही फार वाचतात.
६.एव्हढे सर्व होऊनही सटर-फटर खाण्याचे पदार्थे लागतातच.हल्दिरामचे आलू भुजिया,मूंगदाल,मटरी, मसालेवाले शेंगदाणे.स्वादची पाणीपुरी,भेलपुरी(यामध्ये चटणीही तयार असते),चितळ्यांचा मक्याचा चिवडा, यापैकी २-३ पाकिटे.
७. जेवतानाही नौरचे सूप आणि आठवड्यात कधीतरी लागतेच म्हणून मॅगी (देव त्यांचं भलं करो).तसे खूप साऱ्या 'रेडी टू ईट' भाज्याही मिळतात पण मला त्या आवडल्या नाहीत त्यामुळे Cancel.
८. सर्वात शेवटी मी मसाल्यांच्या विभागात जाते. सांबार मसाला, पावभाजी मसाला, किचनकिंग मसाला, बिर्याणी मसाला, परंपराचा पनीर माखनवाला मसाला, कोल्हापुरी मटन मसाला( परंपराच्या मसाल्यात तर तेल वगैरेही असते.फक्त दह्यात घालून चांगले एकजीव करायचे आणि भांड्यात टाकले की रस्सा तयार.
हे सर्व कमी आहे म्हणून की काय, मी काल मोड आलेली कडधान्ये, घरगुती इडली पीठ, पेढे, जिलबी सारखी मिठाई माझी वाट बघत असतात. :-( हुश्श.....हे सर्व घेईपर्यंत माझं बिल साधारण १०० डॉलर होतंच आणि घरी जाऊन पटकन काहीतरी खावं म्हणून मी तिथले रोज ताजे(?) बनवलेले समोसे/ढोकळे/कचोरी घेऊन घरी पळते. ही होती भारतीय किराणामालाची यादी,त्यातही काही पदार्थ राहून गेले असतील. इथल्या दुकानांत मिळणाऱ्या केक मिक्स,कुकी मिक्स,पास्ता सॉस, अतिशीत पिझ्झा याबद्दल पुन्हा कधीतरी......
मी विचार करतेय बऱ्याचवेळा अमेरिकेतले लोक काय खात असतील यावर आमची चर्चा होते. किती तयार अन्न खातात हे. काहीही घरी बनवत नाहीत असं म्हणणाऱ्या मला कोण काय म्हणेल? माझी आई मी काही सांगितले तर आता फक्त हसते. तिलाही कळलंय हिच्यासमोर डोकं फोडण्यात काही अर्थ नाही. इंटरनेटवर विविध पाककृती प्रसिद्ध करणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो मला माफ करा. या सर्व तयार वस्तू मी रोजच वापरेन असं नाही पण दिवसांत कधी ना कधी एखादा का होईना पदार्थ वापरला/खाल्ला जातोच. यासर्वांतून मी किती प्रिझर्वड अन्न पोटात घालते हे मलाही माहीत नाही पण जिमला जायला वेळ मिळण्यासाठी माझा आटापिटा चालूच राहतो.
-विद्या.

भित्री भागुबाई

काल आमच्या सोसायटीमध्ये चोरी झाली. तेही गेल्या चार दिवसांतील दुसरी चोरी. दोन्हीमध्ये एक गोष्ट सारखी होती. दोन्हीही घरे भारतीय माणसाची होती आणि त्यांचे सर्व सोने चोरीला गेले. काल तर जिथे चोरी झाली तिथली बाई लॉन्ड्रीरुमध्ये गेली होती, ती परत आली तेव्हा टॊयलेटमधील फ्लशचा आवाज आला. तिला वाटले तिचा नवराच दुपारी परत आलाय आणि तेव्हढ्यात एक काळा (अफ्रिकन अमेरिकन) माणूस बंदूक घेऊन समोर आला आणि त्याने तिला 'सोने कुठे आहे?' असे विचारले. तिने आतल्या खोलीत आहे असे सांगताच तो आत गेला आणि संधी साधून ती बाई बाहेर पळून आली. मग तिच्या शेजाऱ्यानेच पोलिसांना फोन केला. ....त्यांचे पुढे काय झाले माहीत नाही पण मला मात्र रात्री लवकर झोप आली नाही. चार वेळा दार बंद केले आहे ना याची खात्री करून घेतली. :-) तेव्हाच माझ्या मनात इतके विचार येत होते, म्हटलं आता लिहूनच काढावेत.
गेले एक वर्ष मी एकाच गावात, एकाच ऑफिसात जातेय. पण त्याआधी जवळ-जवळ ७-८ महिने मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकटी राहिलेय. माझं सुदैवच म्हणायचं की तेव्हा मी सुखरूप राहिले.त्यासाठी घरी आणि बाहेरही खूप कौतुक करून घेतलं त्याबद्दल. "एकटी कशी राहलीस गं? बोअर नाही का झालं? भीती नाही वाटत? एअक्ट्यासाठी जेवण बनवणं किती कंटाळवाणं आहे, इ.इ." पण बाहेरून मी कितीही शूरवीर दिसले तरी खरं काय ते माझं मलाच माहीत होतं. तेच आज लिहायचा प्रयत्न करतेय.
खरंतर मी तोपर्यंत ६ वर्षे तरी घराबाहेर राहिले होते पण नेहमी कुणीतरी रूममेट होतीच.पण २००४ साली काही महिने अमेरिकेत काम केले आणि त्यानंतर पुढचा प्रोजेक्ट टोरोंटो (क्यानडा) चा मिळाला. तिथे गेल्यावर कळलं की जवळ-जवळ सगळीच टीम कलकत्त्याची आहे. थोड्या फार ज्या स्त्रिया होत्या त्या एकट्या राहणार होत्या किंवा कुटुंबीयासोबत. आणि मुलांसोबत राहणे मला अवघड गेले असते.हॉटेलवर राहून बाहेरचं खाणं तरी किती दिवस खाणार? Paying Guest च्या ही काही जाहिराती मी पाहिल्या पण तिथे स्वयंपाक घर मिळणार नव्हतं. पुन्हा एकदा दुसऱ्याच्या हातचे/बाहेरचं खाणे मला अशक्य होतं. बरं चांगले अपार्टमेंट घ्यायचे तर १-२ वर्षाचा करार करावा लागणार होता. मला तर फक्त ६ महीनेच राहायचं होतं. त्यामुळे लगेचच घर शोधायचे तर, एकटी राहण्याशिवाय मला पर्याय नव्हता. बरीच घरे पाहिल्यानंतर एका मराठी कुटुंबाकडे तळघरात राहण्याचा निर्णय मी घेतला.
ते लोक बोलायला चांगले होते आणि खूप दिवसांनी मराठी बोलणारं कुणीतरी भेटल्यामुळे मला आनंदही झाला होता. ते घर तसे माझ्या ऑफिसापासून बरेच दूर होते. लवकरच मी बसचा मार्ग वगैरे शोधला, पण कळले की २ बस बदलूनही शेवटी १० मिनिटे चालत जावे लागते. थंडीचे दिवस होते, साधारण वजा १०-१५ तापमान असायचे तेव्हा. पहिल्या दिवशी मी परत येताना बसमधून उतरले आणि त्या अंधारातून जाताना इतकी भिती वाटत होती. नवीन आल्यामुळे अजून मोबाईलही नव्हता. मी पटापट चालत चालले होते. सगळ्यात भितीदायक गोष्ट म्हणजे बर्फातून त्यांच्या घराच्या मागून जिन्याने खाली जायचे. त्या तळघरात कोंडल्यासारखे वाटायचे. आणि तळघराची खिडकी वरच्या बाजूला असते ना, त्यामुळे असं वाटायचं कुणी वाकून घरात बघत असेल तर?दोन दिवस तर काढले पण रात्री परतत असताना खूप भिती वाटायची. आणि इथे तर रस्त्यावर माणसंही नसतात आणि काळी कुत्रीही.ना रिक्षावाले, ना किराणा मालाची दुकाने ना फोन बूथ. एकदा माझ्याशेजारी एक गाडी येऊन थांबली तरी मी सरळच जात होते, नंतर मला कळलं की आमचे घरमालकच होते आणि मला लिफ्ट देणार होते. :-)
इंटरनेट हाच काय तो आधार होता रात्री मला.एकदा मी माझ्या एका मित्राशी गप्पा मारताना त्याला कळले की मी एकटीच आहे आणि घाबरत आहे, तर तो मला म्ह्नाला, 'मागे बघ ना तुझ्या....काय आहे.....कुणीतरी उभं आहे....' असंच काहीतरी. मी इतकी घाबरले, त्या मित्राशी पुढचे काही महीने तर मी बोलले नव्हते. तळघरातही मी ज्या रूममध्ये राहायचे ती एका टोकाला होती आणि आजू बाजूला कुठेही आवाज झाला तरी माझे कान टवकारलेले असत. १० दिवसातच मी त्या अंधारकोठडीला कंटाळले आणि दुसरीकडे एक घर शोधले. तेही असेच एका भारतीय माणसाचे होते आणि तळघरातच होते. पण एक चांगले होते की जरी घराचा प्रवेश तळघरासारखा होता तरी मागून ते जमिनीलगतच होते. त्यामुळे दिवसभर पूर्वेकडून छान उजेड यायचा. एकदा नक्की केल्यावर मी एका तळघरातून माझ्या प्रचंड मोठ्या ब्यागा आणि १० दिवसात जमविलेले सामान (गादी, सफाईचे सामान, खाद्यपदार्थ,भांडी) सगळं कसंबसं बाहेर काढलं. दुसरं मोठं काम म्हणजे ते पुन्हा एकदा तळघरात न्यायचं. शेवटी तर मी ब्याग जिन्यावरून घसरत नेल्या. :-( वाटलं चला आता सुटले.पण...
त्या नवीन घरात दोन खोल्या होत्या ,किचन आणि बाथरुम. मी एक मोठी खोली व्यापली, पण त्या घराचे Heating (Central heating) घरमालकाकडे होते, त्यामुळे साहेबांनी त्यांना हवं तसं सेट केलं होतं. तळघर मुळातच थंड असतं त्यामुळे रात्रभर मी काकडत काढली. दुसरं म्हणजे आता माझी खोली जमिनीलगत होती त्यामुळे डोकं खिडकीकडे केलं तर कुणी चोर आला तर कसं कळणार? आणि खिडकीकडे पाय केले तर ती खिडकी सारखी डोळ्यासमोर राहणार. :-( अजून एक रात्र मी रडत,कुडकुडत काढली होती. दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन मोठ्या चादरी घेऊन आले, तरी थंडी जाईना. मग घरमालकांना सांगितले, तर त्यांनीही लाइट बिलाचं कारण सांगितलं. जेवण बनवायला उभं राहणंही अशक्य होतं. शेवटी वैतागून मी किचनमधल्या सगळ्या शेगड्या चालू ठेवल्या आणि पांघरूण घेऊन बसून राहिले.
माझे जुने घरमालक मराठी तरी होते, हे लोक बिहारी होते आणि आमचा संवाद काही फारसा प्रेमळ नव्हता. मग मी त्यांच्याशी बोलून तात्पुरते त्यांचे इंटरनेट वापरण्याचा करण्याचा प्रयत्न केला पण तेही होत नव्हते. त्यामुळे घरी आले की जेवण बनविणे आणि काहीतरी गाणी लावून झोपणे हेच करत होते.रात्रभर तो laptopचालू ठेवायचे की त्याच्या आवाजात झोप तरी लागेल. ७-८ दिवसांत नवीन इंटरनेट कनेक्शनचा अर्ज दिला, मोबाई फोनही शोधला. आणि साधारण १० दिवसांत माझा बाहेरच्या जगाशी संपर्क आला. मला तोपर्यंत वाटायचे, मला खाली काही झाले तर काय करणार, कुणाला फोनही नाही करता येणार ना मेल. टीव्ही तर मी कित्येक वर्षात पाहिला नव्हता.
नवीन घर ऑफिसापासून खूप जवळ होते. बसने साधारण ७-१० मिनिटे लागत. पण आता कामही जोरात सुरू झाले होते. रात्री ७-८ नंतर बसस्टॊपपासून घरापर्यंत यायला ५-७ मिनिटे लागत. आणि तिथे एकदा त्या कॊलनी मध्ये आलं की कुठेही माणूस दिसत नसे. मी जवळ-जवळ पळतच घरी यायचे. कुणी मागून चालत येतंय असं वाटलं तरी मागे न बघता चालत राहायचे. बरेचदा चालताना मी मित्र-मैत्रिणींना कुणाला तरी फोन करायचे.आणि शेवटी दरवाज्यातून आत जाऊन पटापट सर्व लाइट्स सुरू करायचे. एकदा पळापळीत जिन्यावरून घसरून पाठही मोडून घेतली. :-(रोज रात्री मी २-३ वाजेपर्यंत जागी राहायचे आणि भारतात असणाऱ्या मित्र-मैत्रिणींशी बोलायचे. बरेचदा कुणीतरी रात्री मला याहू वर मेसेजही पाठवायचं आणि मी मध्यरात्री उठून त्यांना उत्तरही द्यायचे.कधीकधी आरशात पाहताना वाटायचं मागून कुणाचा चेहरा दिसला तर? (हे सगळे भयानक चित्रपट आणि कादंबऱ्या वाचण्याचे परिणाम. :-) )
पण एक-दोन महिन्यांत उन्हाळा सुरू झाला आणि सूर्यास्त उशिरा होऊ लागला. मग जरा ओळखीही वाढल्या तोपर्यंत आणि मी जरा भटकून घेतलं. टोरोंटो मला खूपच आवडलं,डाऊनटाऊन(?), ओंटारिओ तळं(की समुद्र? ),तळ्याच्या मध्ये असलेलं छोटंसं बेट, बस-ट्रेनची व्यवस्था, विविधता, सगळंच. एका ट्यूलिप फेस्टिव्हललाही जाऊन आले. नायगारा तर तिथून फारच जवळ असल्याने दोन वेळा बघितला.तीन दिवसांची, मॊन्ट्रियाल,ओटावा, क्युबेकची ट्रीपही केली. छान वाटलं.पाच महिने कसे पटकन संपून गेले. माझी माझ्या घरमालकांशीही चांगली ओळख झाली. आम्ही मग खाद्यपदार्थांची , पाककृतींची देवाण-घेवाणही केली. मी त्यांना मग वेबक्यामेरा कसा वापरायचा, कुठल्या साईटवर हिंदी गाणी मिळतात, अशी शैक्षणिक माहितीही दिली. :-)
शेवटच्या महिन्यात माझे घरमालक भारतात आले होते काही दिवसांसाठी. त्यांनी मला जाताना सांगितलं, "हे emergency contact numbers आहेत. मी माझ्या एका नातेवाईकाला सांगितलं आहे दर थोड्या दिवसांत फेरी मारायला."
एकतर ह्या मालकाची पाच अपत्ये होती. त्यांचा दिवसभर चालणारा गोंधळ एकदम बंद झाला होता आणि त्यात त्यांचा हा नातेवाईक कधी येणार-जाणार माहीत नाही. त्याच्याऎवजी दुसराच कुणीतरी आला तर? तोच माणूस खाली आला तर? त्यांनी घराची विद्युत सुरक्षाही केली होती पण ती मध्येच बंद पडली तर? इथे मालक नसलेलं घर लगेच कळतं, त्यामुळे त्यांची सर्व पत्रे मी माझ्याकडे जमा करून ठेवली. मला घर सोडून एक वर्ष होऊन गेलं होतं. आता लवकरच परत जायला मिळेल याची उत्सुकता होती, त्यात उगाचच हे टेन्शन. कसेबसे दिवस काढत मी महिना घालवला. रोज घरी नेण्यासाठी सामान आणायचं, ब्यागेत ठेवायचं, आधी आणलेलं सामान पुन्हा काढून नीट लावायचं. मी १५ दिवस आधीच कपडे घड्या घालून ठेवले होते. :-)
अखेर तो दिवस आला होता, घरी जायचा. ६ तास आधीच मी विमानतळावर जाऊन बसले होते. कंटाळवाण्या,लांब प्रवासानंतर आई-बाबांना भेटल्यावर अश्रू आले नसते तरच नवल होतं. त्यानंतर चार महिने भारतात राहून मी परत अमेरिकेत आले होते. दोन महिने एका हॉटेलवर राहिले आणि भीती, एकटेपणा हे पुन्हा एकदा अनुभवलं होतं. खूप वेळा भारतात, नातेवाईकांना,मित्र-मैत्रिणींना,भाऊ-बहिणींना भांडताना पाहिल्यावर मला ते एकटे दिवस आठवतात, जेव्हा कुणाशी तरी बोलण्यासाठी-भेटण्यासाठी मला २-२ दिवस वाट पाहायला लागायची. एकटं खाताना, घरची आठवण यायची. आणि त्यात भरीला माझ्या मनाचे भित्रे कोपरे तर कधीच मला सोडायचे नाहीत. ते आठवलं की माणसांची, आपल्या माणसांची किंमत कळते. आजारी असताना, स्वतः:च सगळं करताना रडायलाही यायचं आणि कशाला हे सगळं हवंय, कुणी सांगितलंय इथं राहायला,असंही वाटायचं. पण आज वाटतं त्याच दिवसांनी मला स्वत:चा वेळ स्वत:साठी आनंदात कसा घालवायचा हे शिकवलं. ते अनुभव आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहेत याचाच आनंद आहे. . :-)
-विद्या.

Friday, April 13, 2007

कुणीतरी हवं असतं.....

मी Engg साठी बाहेर पडल्यानंतर घरी २-३ दिवसांत तरी फोन व्हायचाच. एरवी मी आईशी कितीही बोलले तरी परिक्षेच्या वेळी मात्र दादांशी आधी बोलायचे. का? कारण मी अभ्यास करत नाही, नुसती भटकंती करते, आणि पूर्वीसारखे मार्कही मिळत नाही याबद्दल आईकडे कितीही तक्रार केली तरी माझ्याशी फोनवर बोलताना ते प्रेमाने नेहमीच्या सूचना देतच असत. "कशाचं जास्त टेन्शन घेऊ नकोस. ज्या प्रश्नांच उत्तर येतं ते आधी लिही, मग बाकीच्यांचा विचार कर, आधीच्या पेपरचाही विचार करु नकोस. इ.इ....." आजही कधीतरी घरी फोन करून सांगितलं ना की काम खूप आहे, कामाचा कंटाळा आला आहे, इथं रहावंस वाटत नाही, की ते म्हणतात, त्रास होत असेल तर नको राहूस तिकडे. निघून ये परत. आपल्याला काही नोकरीवाचून अडलं नाहीये. कधीतरी ते असंही म्हणाले होते की, "तुला काय वर्षाला एखादं ज्वारीचं पोत पुरेसं होईल, कशाला तो नोकरीचा त्रास? " :-) आता माझं एका ज्वारीच्या पोत्याने भागणार असतं तर किती बरं झालं असतं. पण केवळ बोलल्यामुळेही किती बरं वाटतं. असंच कुणीतरी हवं असतं.....
कितीतरी वेळा सगळी गणित चुकत जातात आणि मागे फिरून ती दुरुस्त करणंही अशक्य होऊन जातं.बरेच वेळा सर्व प्रयत्न करुनही आपल्या हातात काहीच नसतं. मग तेव्हा कुणीतरी हवं असतं आपल्याला सांगणारं,समजावणारं, "सर्व काही ठीक होईल". दोघांनाही माहीत असतं की सगळं ठीक होणं अवघड आहे, तरी त्या शब्दांनी जो धीर मिळतो तो वेगळाच. कधी वाटतं, झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून धीर देण्याइतकं प्रेम कुणी आपल्यावर कसं करु शकतं? ते फक्त आई-बाबाच करु शकतात किंवा आपले खरे मित्र-मैत्रिणी.नाहीतर माझ्यासारखे लोक आधी, 'बघ, मी सांगितलं होतं.....' या वाक्यानेच सुरुवात करतात. :-) कुठल्याही अडचणीत असताना, उपाय शोधायचं सोडून ती चूक तुझ्यामुळे झाली की माझ्यामुळे यावरच वाद घालत बसतात आणि मग नंतर साथ न दिल्याचा पश्चाताप करतात. जित्याची खोड....! मी कशीही असले तरीही मी निराश असताना सांभाळणारं, समजावणारं कुणीतरी हवंच असतं......
-विद्या.

Tuesday, March 27, 2007

तू !

तू आहेस तुझी, तुझ्या स्वप्नांची,
माहित आहे मला
आहेस तू त्या पावसाची,
ज्याच बरसणं भुलवितं तुला.
त्या गोड-गुलाबी थंडीची,
जिच्या कुशीत अलगद शिरावसं वाटतं तुला.

तू असतेस बऱ्याच वेळा
तुझ्या कल्पनांची,तुझ्या भावनांची
आणि केवळ तुझ्या कवितांची.
या सर्वांहूनही वेगळी असतेस तू
तुझ्या अनेक प्रिय व्यक्तींची,
त्यांच्यासोबतच्य़ा तुझ्या क्षणांची,
हरवून गेलेल्या त्यांच्या काही आठवणींची.

या सर्वांचा खूप हेवा वाटतॊ,
पण राग येत नाही,
कारण तू 'त्यांचं' असणं
हेच तुझं 'तू' पण आहे.
प्रत्येकवेळी तुझ्या नव्या रुपांना पाहताना,
मी मनापासून भुललो आहे.

पण हे असं भुलतानाही...
माझं 'मी' पण संपत नाही,
तू कधीतरी माझी असावीस
असं वाटल्यावाचून राहत नाही.
खरंच, तुझ्या सर्व क्षणांहूनही वेगळा
असा एखादा क्षण येईल?
जो तुला केवळ
माझीच आठवण करून देईल?

-विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, March 20, 2007

व्यवहार

त्याचं म्हणणं मला
कधी पटलंच नाही,
अंतर वाढलं म्हणून
प्रेम कमी होतं का काही?

म्हणे या जगात
कुणाचं कुणावाचून अडत नाही,
पण तू सोबत नसशील
तर आयुष्यात राहतं का काही?

म्हणे, देऊ तेव्हढं सर्वांना
परत मिळतंच असं नाही,
पण माझं प्रेम तुझ्यापेक्षा
कमी होतं का जराही?

म्हणे, आजचा क्षण आपला
बाकी कशाचीच शाश्वती नाही.
माहीत नव्हतं,त्या क्षणासारखाच
तू ही परत येणार नाही.

तू सांगितलेली प्रत्येक गोष्टं
जरी पटली नाही,
ठेच लागून धडपडताना
जगाने शिकवले बरेच काही.

म्हणे, भावनेपेक्षा
व्यवहारातच आहे सारं काही.
मग आज माझ्या सुकलेल्या डोळ्यांत
पाण्याची तुला अपेक्षा का राही?

काळाबरोबर विसरून जाशील सारं
तूच म्हणालास ना हेही?
कसं सांगू, जवळ नसलास तू तरी
येतोस माझ्या स्वप्नात आजही.

-विद्या.

Friday, March 16, 2007

मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !

इंजिनीयरींगच्या दुसऱ्या वर्षाची गोष्ट, एका रविवारची. माझ्या जीवलग मैत्रिणी माझ्याकडे येवून मला म्हणाल्या की आम्ही Sorry म्हणायला इथे आलो आहोत. मला कळत नव्हतं की हे कशावद्दल? तर त्या म्हणाल्या, 'आम्ही तुला सोडून सिनेमाला गेलो होतो,ते ही तुला खोटं सांगून.' (आज विचार करता मला हसू येतं की तेव्हा आपण किती बावळट होतो आणि किती छोट्या-छोट्या गोष्टीही 'महाभयंकर' वाटायच्या तेव्हा. :-) ) हा किस्सा आजही मला आठवतो म्हणजे मी हे सांगायला नको की मला किती वाईट वाटलं होतं त्यादिवशी.त्यानंतर पुढची ३ वर्ष आम्ही हसत-खेळत,भांडत,मजा करत काढली. आम्ही सगळ्याजणी आजही तितक्याच प्रिय आणि जवळ आहोत एकमेकींच्या.
खरंतर माझ्या मैत्रिणींनी मला त्या दिवशी सांगितलं नसतं तर मला कळलंही नसतं आणि माझ्या मनात ते राहिलंही नसतं.पण मग त्यांनी ते सांगायला हवं होतं की नको?सांगितल्यामुळे आम्ही अजूनच दूर गेलो असतो तर? किंवा न बोलल्याने मनातली अढी अजूनच वाढते , तसे आम्हीही दुरावलो असतो तर? की बोलल्यामुळेच मनातंलं सगळं बाहेर येऊन मनही आभाळासारखं निरभ्र होतं?असे अनेक प्रश्न मनात येतात. त्या एकाच बाबतीत नाही, तशाच अनेक घटना घडल्यात, घडतात आणि हा प्रश्न पुन्हा सामोरा येतो.
माझं म्हणाल तर, मला काहीही मनात ठेवता येत नाही. चूक माझी असेल तरी किंवा समोरच्याची एखादी गोष्ट पटली नाही तरी. ती व्यक्ती प्रिय असेल तर अजिबातच नाही. मग मी लवकरात लवकर सगळं सांगेपर्यंत डोक्यातून विचार जात नाहीत. पण कधीकधी होतं काय की समोरच्या माणसाने सहज बोललेली गोष्ट आपल्याला लागते (त्याच्या नकळतही) त्यामुळे त्याने असं बोलण्याचा काय हेतू होता हे कळत नाही आणि ते कळलं नाही तर गैरसमजामूळे मन अजूनच दुखावतं. बरं स्पष्ट सांगायचं तरी त्यात 'तुला असं वाटलंच कसं' असं बोललं की आपणच चुकीचा विचार केल्याचा त्रास. :-( मला वाटतं की तुम्ही जर आपलं मत समोरच्या माणसाला स्पष्ट सांगू शकत नसाल तर ते नातं मनमोकळं होईल का? मग तुमच्या ऒफिसातल्या साहेब/सहकाऱ्यापेक्षा हे नात वेगळं होईल का?
दोघंही आपल्या जागी बरोबर असतात. मग चुकतं कुणाचं आणि त्याचा नात्यांवर होणारा परिणाम टाळायचा कसा? Love makes people do crazy things.:-) मला वाटतं एकमेकांबद्दलचं प्रेम,नात्याबद्दलचा आदर, समजून घेण्याची (बरेचदा माफ करण्याचीही) इच्छा असेल तर हे नक्कीच होऊ शकतं. कधीकधी स्वाभिमानही आडवा येतो तर कधी तो नुसताच अहंकार असतो. तेव्हा डोळे बंद करून त्या व्यक्तीबरोबर घालवलेले आनंदाचे,दु:खाचे,प्रेमाचे क्षण आठवले ना, मग सगळं मनातलं मळभ दूर होतं. राहते ती फक्त इच्छा पुन्हा एकदा नातं होतं तसं करण्याची. मग जे वाट्लं ते स्पष्टपणे सांगून मोकळं व्हायचं. स्वीकारायचं, सोडून द्यायचं की मनावर घ्यायचं हे सारं समोरच्यावर सोडायचं. खरंच जर ते नात जवळंच असेल तर तो फक्त एक क्षण बनतो एकमेकांना अजूनच जवळ आणणारा. मग अशीच अडथळ्यांची शर्यत पार करुन नात्यांची वीण अजूनच घट्ट होते. :-) होय ना? या बाबतीतच 'मरासिम' अल्बममधील गुलजार साहेबांनी म्हटलेली ही काही वाक्ये. मला खूपच आवडतात.
"मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !
अक्सर तुझको देखा है की ताना बुनते
जब कोई टूट गया या खत्म हुआ
फ़िर से बांध के और सिरा कोई जोड के उस्मे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने मैं लेकीन
एक भी गांठ गिरह बुंतर की
देख नही सकता है कोई
मैने तो एक बार बुना था एक ही रिश्ता
लेकीन उस्की सारी गिरहें साफ़ नजर आती हैं मेरे यार जुलाहे !
मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !"
-विद्या.

Friday, March 09, 2007

गटबदल

काही काळापूर्वी मी एक लघुकथा लिहीली होती, 'त्रिशंकू'. त्याचा नायक आमच्य़ा ऑफिसमधला 'खलनायक'च (आमचा बॉस) होता. दोन आठवड्यापूर्वी आम्हाला कळलं की त्याचा 'मायबाप' बॉस आता बदलणार आहे आणि काय आश्चर्य, साहेबांची गाडी कधी नव्हे ते आमच्या छोट्याशा खुराड्याकडे (cubicle) कडे वळली. आम्हाला दुपारी जेवायला बरोबर येणार का विचारल्यावर तर नशिबच उजाडले. आता त्याने थोडा फार प्रयत्न केला आमच्या गटात यायचा पण पहिल्या २-४ दिवसातच त्याला आम्ही आमच्या गटातून कटाप केले होते. आणि त्याच्या कारवाया जाणल्यानंतर तर त्याला पुन्हा सामावून घेणे 'मुश्किल ही नही नामुमकीन' होते. पण आता त्याचे छायाछत्र हरविल्याने तो अगदीच बिचारा, फारच गरीब वाटत होता. त्याच्याकडे पाहील्यावर मला 'गटबदला' चा एक उत्तम नमुना मिळाला होता.
तसे भारताच्या इतिहासाच्या पुस्तकातच हे गटबदलाचे धोरण शिकविले जाते. मग ते मुघलांना शरण जाणारे असो वा इंग्रजांना. आज काल तर राजकारणी लोक घर बदलावे तसे पक्ष बदलतात.मग आमचा हा छोटा बॉस काय चीज आहे?कामापेक्षा बाकीच्या लोकांबद्दलच्या चहाड्या वरच्या साहेबाकडे करणे हेच त्याचं मुख्य काम असे. आणि आता तोच बदलल्यामुळे त्याला पुन्हा एकदा कुणाला तरी हाताला धरण्याची गरज भासत असावी.असो. आता नवीन माणूस नवं धोरण याप्रमाणे आमच्या यादीतील कामांची priority बदलली आणि नवीन साहेबाला खूश करण्यासाठी त्याची धावपळ सुरु झाली. आम्ही काय? आहे ते काम करणे आणि ५ वाजता घरी जाणे हे धोरण कायम ठेवलं आहे. :-) पण मला त्याचं आश्चर्य वाटलं जेव्हा एका जुन्या कामाचं श्रेय घेण्यासाठी सध्या तो आमच्या जुन्या साहेबाशीच स्पर्धा करु लागला. तसं पाहीलं तर काम करणारे आम्ही डेव्हलपर्स, आणि भांडण यांचं. :-) असो.
मला असं वाटतं की जर त्यानी खरचं काम केलं असतं तर त्यांना त्यांच श्रेय आपोआपच मिळालं असतं, त्यासाठी भांडायची गरज लागली नसती. (पण मला काय वाटतं याने कुणाला काय फरक पडतो म्हणा. ) अजून एक गोष्ट, जर त्याचे आपल्या जुन्या साहेबाशी चांगले नाते असते तर दोघांनाही एकमेकांबद्दल आदर वाटला असता आणि त्यांची मैत्री कायम राहिली असती. पण केवळ कामापुरता संबंध ठेवून स्वत:च्या कामापुरते गोड बोलणा़ऱ्या या लोकांना किती खरे मित्र लाभत असतील?मला मान्य आहे की मलाही आता शाळेत,कॊलेजसारखे जीवाभावाचे मित्र-मैत्रिणी येथे मिळणार नाहीत. पण मग हे नुसतं नाटकी आयुष्य किती दिवस चालणार? त्यापेक्षा स्पष्टपणे,प्रामाणिकपणे वागणं सोपं नाही का? साहेबाची हांजी-हांजी केल्याने तुमचा फायदा होतंही असेल. पण तो किती दिवस? कधी ना कधी तर स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर एखादी गोष्ट मिळवावी असं या लोकांना वाटत नसेल काय?
बरं हे लोक जसे स्वत: वागतात तसेच बाकीचेही असतील असंच त्यांना वाटत राहतं आणि त्यांची असुरक्षिततेची भावना जास्तच वाढते. उदा: आमच्या या म्यानेजरला नेहमी वाटत असतं की आम्ही त्याला सर्व माहिती देत नाहीये, किंवा तो कामावर आला नसेल तर आम्हीही घरुनच काम करत आहे. याचं कारण? तो स्वत: तसेच करतो, वागतो. मग पुन्हा एकदा टीममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, एकाची माहिती दुसऱ्याला विचारणे, यासारख्या गोष्टी आल्याच. हा सर्व त्रास घेण्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांवरही त्याने विश्वास ठेवला तर त्याची कामे सोपी होतील असं नाही वाटत?
अशा लोकांची अजून एक मानसिकता म्हणजे 'Scarcity Mentality'. ही संकल्पना 'Seven habits of the Highly Effective People' मध्ये मी वाचली होती. (पुन्हा एकदा हे पुस्तक वाचायला हवं. चांगला होतं. :-) ) मी माझ्या त्या म्यानेजर मध्ये हीच मानसिकता पाहतेय.तर अशी मानसिकता असलेले लोक आपल्या सहकाऱ्यापेक्षा वरचढ दिसण्यासाठीही असं वागत असतील. त्याच्या अशा विचारांमुळे कुणाचेही मनमोकळे कौतुक करणे, एखाद्याला त्याच्या कामात सपोर्ट(मदत?) करणे हेही जमतच नाही.(अशा लोकांचा बाकीच्यांना किती त्रास होतो हे कळतंय. त्यामुळे मी तरी अशी मानसिकता नसण्याचा प्रयत्न करतेय.)
This is how the author defines Scarcity Mentality people.
"They see life as having only so much, as though there were only one pie out there. And if someone were to get a big piece of the pie, it would mean less for everybody else. .........
.....People with a Scarcity Mentality have a very difficult time sharing recognition and credit, power or profit -- even with those who help in the production. They also have a very hard time being genuinely happy for the successes of other people -- even, and sometimes especially, members of their own family or close friends and associates. It's almost as if something is being taken from them when someone else receives special recognition or windfall gain or has remarkable success or achievement. "
आता मला काय कुणालाही आपल्या साहेबाला शिव्या घालायचं काम दिलं तर याहूनही मोठा निबंध होईल.:-) शिवाय कामाशी संबंधित कुठल्याही बाबीचा विचार जास्तवेळ करु नये, नाही तर मग आयुष्यच कचेरीमय होऊन जातं. पण गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या काही घटनांमुळे मनात हे सगळे विचार आले आणि ते लिहिले. असो.
या गटबदलाने मलाही काही गोष्टी शिकवल्या Corporate Culture बद्दल. पण सध्यातरी एव्हढंच. I am a good learner. :-) त्यामुळे पुढेही नवीन शिकवण मिळेलच, तेव्हा लिहीन. मी कुठेतरी वाचलं होतं की नोकरी करणारे बरेच लोक केवळ आपल्या उच्चाधिका़ऱ्याला ( बॉसला ) कंटाळून नोकरी सोडतात. आज-काल मी ही किती टिकेन याचाच विचार चालू आहे. :-) कृष्णाला काय जात होतं हो म्हणायला,'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' .आता मध्येच कृष्ण कुठून आला?(:-?) आपलं नाही बाबा खडूस लोकांशी जमत, खोटं-खोटं हसून काम करवून घेणं जमत आणि चुगल्या करून साहेबाला खूश करणंही नाही. बघू किती दिवस या वातावरणात टिकतो ते. जमलं तर राह्यचं नाही तर जायचं. :-) असो,मी माझं Corporate प्रवचन थांबवते आता आणि कामाचं बघते. :-ड हो ना, blog लिहायचे अजून तरी काही पैसे मिळत नाहीत,त्यामुळे काम करणं आवश्यक आहे.
-विद्या.

Tuesday, March 06, 2007

एक अर्धी पोस्ट...

रात्री ११ वाजता सिनेमा संपला आणि आम्ही दोघं घरी येण्यासाठी गाडीत बसलॊ. आम्ही प्रत्येकवेळी घरी जाताना आमचा वाद व्हायचा एका कारणावरून. परत यायला त्या थिएटरकडून दोन रस्ते होते, एक आम्ही डोळे झाकूनही घेऊ शकतो असा आणि दुसरा फक्त अस्तित्वात आहे हे माहीत होतं. त्यामुळे रात्री ११ नंतर माहीत नसलेल्या रस्त्यावरून जायची माझी इच्छा नसायची आणि त्याला तो रस्ता कसा आहे तो पहायचाच होता. आज तर पाऊसही पडत होता. शेवटी माझं न ऎकता त्याने दुसऱ्या रस्ता पकडला. मग थोडे अंतर गेल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटून त्याने मला गाडीतला नकाशा काढायला सांगितला. मग मी आपण सध्या कुठे आहे,कुठे जायचे आहे हे पहात चुकत, धडपडत जवळ जवळ दीड तासाने घरी पोहोचलो.मी त्या दिवशी बराच वाद घातला(नेहमीप्रमाणे :-) ) की नेहेमीचा रस्ता असताना नवीन शोधायची काय गरज आहे हे कळत नव्हतं.
मला वाटतं माझ्यासारखेच कितीतरी लोक मी आजू बाजूला पाहते आहे.बहुतेक, आयुष्य खूपच सरळ, सोपं झालंय.(Touch wood :-) ) अर्थात ते सरळ होणं ही इतकं सोप्पं नव्हतं पण गेलं एक वर्ष आरामात गेलंय आणि हात खरंच सोन्याचे झालेत की काय असं वाटतंय. कधी काहीतरी करायची, वेगळं करायची इच्छा असते तर कधी-कधी तो नुसता सिनेमाचा 'After effect' असतो. पण होतं काहीच नाहीये. चार लोक चालतात त्याच सरधोपट मार्गाने चालायचं, पैसे मिळवायचे आणि आपले सोन्याचे हात अजूनच जपायचे.पुढे जाताना जरा कुठली वेगळी वाट समोर दिसली की पुन्हा एकदा मागे जायचे आणि अजून एक जुनीच वाट शोधायची. एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत झटत राह्यचं आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायचे असं आज-काल का होत नाही याचा विचार करतेय.
"तुटण्याचा फुटण्याचा,
देहाला छंद हवा.
सोन्याच्या हातांना
घामाचा गंध हवा !"
-माधव मुतालिक


माझ्या जुन्या डायरीमध्ये ही नोंद सापडली मला.मी कॊलेज मध्ये असताना एक कविसंमेलन नियोजित केलं होतं आणि माधव मुतालिक यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं.त्या समारंभानंतर मी माझी ती डायरी त्यांच्या स्वाक्षरीसाठी घेऊन गेले होते. तेव्हांची ही नोंद. मला आठवत नाहिये मला त्यांच्या या ओळींचा अर्थ किती समजला होता आणि हे ही माहित नाही की कुठल्या अर्थाने त्यांनी त्या ओळी लिहील्यात.पण आज त्याच वाचताना बरेच विचार डोक्यात येत आहेत आणि आता तरी ते लिहणं जमत नाहीये.
जाऊ दे. आज एव्हढंच.
-विद्या.

Monday, February 26, 2007

मनातलं

स्वप्नांची फुले चुरगाळून टाकण्याऱ्या
नियतीला आज मी पाहिलं
आणि प्रथमच मला
हसण्याचं भय वाटलं.
उद्ध्वस्त झालीत ती स्वप्नं
जी पाहताना ह्सले होते
अगदी मनभरून...
हातातल्या चांदण्यांचे काटे झालेत
अन कधीतरी हव्याहव्याशा वाटण्याऱ्या,
रात्रीच्या एकांतात ते टोचू लागलेत.

कशी विसरू ती स्वप्नं?
आणि कशी सामोरी जाऊ
या भयाणं वास्तवाला?
दैवावर हवाला ठेऊन बसले होते,
त्यानेच दगा दिल्यावर,
येणाऱ्या परिस्थितीचा सामान करायचा
तो तरी कशाचा आधारावर ?

वाटतंय, स्वीकारायला हवी प्रत्येक गोष्ट
माझ्या मनाच्या,बुद्धीच्या ताकदीवर,
आणि ठेवायला हवा विश्वास
फक्त स्वत:च्या प्रयत्नांवर.
पण कशासाआठी सारं?कशाची ही शिक्षा?
स्वप्नं पाहण्याचीच असेल तर
ती भोगायला मी तयार आहे.

पाहीन अजूनही खूप सारी स्वप्नं
अन कधीतरी खरीही करून दाखवीन.
ती भंगल्यावर त्याचे काटेही बोचून घेईन.
कारण स्वप्नांची फुले माझी नसली तरी
काटे माझे असतील.
साऱ्या संकटातून पार झाल्यावर
कधीतरी....माझेही दिवस येतील.

-विद्या.

Thursday, February 22, 2007

२४ x ७

मी जर प्रश्न विचारला की तुम्हाला एक आख्खा दिवस दिलाय फक्त तुमच्यासाठी. बाकी घरी एकटच राहायचं आहे, भेटायला, बोलायला जवळ कोणीही नाहीये पण त्याचबरोबर कसले काम,चिंता किंवा कसली घाईही नाहीये. अशा एखादा दिवस तुम्हाला मिळाला तर काय कराल? मला जर असा एखादा दिवस मिळाला तर काय करू आणि काय नको असे होईल. झोप तर काय माझी आवडती गोष्ट. सकाळी आरामात १० वाजता उठून,निवांत गाणी ऎकत आवरून, गरम गरम चहा हातात घ्यावा आणि खूप दिवसांपासून अर्धवट राहिलेली एखादी कादंबरी वाचत बसावं. किंवा खूप दिवस झाले पाव-भाजी किंवा गरम-गरम पिठले-भात( वरतून तूप पण) घेऊन खाल्लेच नाहीये असे वाटल्यावर सामान आणण्यापासून तयारी असली तरी मग मी सामान आणून का होईना पण बनवून खाईनच.त्यात एकटीसाठी कुठे बनवणार असा विचारही करणार नाही.

पण माझ्या आईला जर मी हाच प्रश्न विचारला तर ती मला किती तरी गोष्टी सांगेल, अगं ती वरची माळ्यावरची भांडी बरेच दिवस पडली आहेत, ती साफ करावी म्हणते. ताईच्या चं बारसं आहे काहीतरी आणीन म्हणते....आणि अशी बरीच....पण त्यातलं एक तरी तिचं स्वत:साठी असेल का? मला नाही वाटत. हवी ती गाणी ऎकणे, चित्र काढणे, पुस्तक वाचणे, खाणे,मनसोक्त लोळत पडणे, आणि अश्याच कितीतरी छोट्यामोठ्या गोष्टी आपल्या आवडीच्या होत्या, त्यातली एखादी आज करावी वगैरे असले विचार त्यांच्या ध्यानीमनी पण येत नाहीत. का? आता आई आपल्यासाठी सर्व त्याग करते, आपल्याला वाढवते, आजारपणे काढते आणि बरंच काही करते. आपणही मग तिला थोर, महान असल्या उपाध्या लावून आपले कर्तव्य करतो. पण आपण बाहेर पडल्यावर त्यांचं इतके दिवस कष्टात जाणारं आयुष्य थांबून जातं, मग देवधर्म, शेजारी, नातेवाईक यामध्ये ती स्वत:ला गुंतवू लागते. असो. मला आईवर काही लिहायचं नाहीये आज.

मी परदेशात आल्यापासून बरीच भारतीय कुटुंबे पाहिली. एखाद्या पार्टीमध्ये किंवा सणावाराला भेटिगाठी होतं तेव्हा कुणी ओळख करून देताना विचारलं की तुम्ही काय करता की कुठल्याही ग्रुहिणीचे उत्तर काय? "काही नाही!' बस्स?? काही नाही?? म्हणजे दिवसातून ८-१० तास काम करणारी स्त्री 'नोकरी' करते हे अभिमानाने सांगते आणि २४ तास काही ना काही काम करत राहणारी स्त्री कसंनुसं 'काही नाही' हे उत्तर देते. त्यातही बरीचशी कामं करणं हा नाईलाज म्हणून, शिवाय़ नवरा नोकरी करत असताना घरी एकटं राहणं, नाहीतर मुलांचं एकट्यानेच सर्व करणं आणि कधी-कधी का होईना, 'तू काय दिवसभर घरीच असतेस की तरी कामं कशी संपत नाही', हे ऎकणं.मला फार अस्वस्थ वाटलं. पण या गोष्टी मी अधिक जवळून पाहताना वाटलं की एक नुकतंच लग्न झालेली मुलगी ते अशी एक गृहिणी यामध्ये होणाया बदलास बाकी लोकांइतकीच ती स्वत: पण जबाबदार असते. हे कसं?

लग्नानंतर नविन घरात सामावून जाणं, सासरच्या लोकांशी जुळवून घेणं,नंतर मुले,त्यांची शिक्षणं या सगळ्या जबाबदा र्या स्वीकारून त्या पार पाडणं कष्टाचं काम आहे हे कबूल. पण त्या सगळ्यांत आपण स्वत्व तर गमावत नाहीये ना हे ही पाहणं गरजेचं नाही का? मला वाटतं की माणूस घरी असला की त्याला गृहीत धरलं जाणं हे स्वाभाविक आहे, पण त्यांना ते तसं न करू देणं ही प्रत्येक स्त्री ची जबाबदारी नाही का? जसे घरात प्रत्येकाला आपापल्या कामासाठी वेळ ठरलेली असते उदा. शाळेत जाण्यासाठी,नोकरीवर जाण्यासाठी, किंवा एखादे काम संपवण्यासाठीही.ती पाळण्यासाठी प्रत्येकाची घाई चाललेली असते.मी बरेच वेळा पाहिले आहे की बरेच आजी-आजोबा पूजेची,मंदिरात जाण्याची किंवा फिरण्याची वेळ ठरवून ठेवतात आणि ती वेळ न चुकता पाळतात. काही लोक तर अगदी या वेळेला मला हाक मारू नका, डिस्टर्ब करू नका असेही सांगतात.तसेच मग घरी असणार्या गृहिणीनेही आपल्याला आवडणार्या गोष्टीसाठी/आपल्या एखाद्या छंदासाठी वेळ ठरवायला हवी आणि ती प्रत्येकाने पाळण्याचे बंधन घालायला हवे.

आता कुणी म्हणेल मुलांना, पतीराजांना समजावणे हे काही इतके सोपे नाही. हो हे अवघड आहे जर तुम्ही अचानक ५-१० वर्षांनी सांगाल तर. पण पहिल्यापासूनच अशा गोष्टी वळणात बसल्या तर मग पुढे अवघड जात नाही. उदा. लग्नानंतरही तुम्ही एखादा छंद जोपासत असाल आणि आपल्या पती कडून त्याला प्रोत्साहन मिळवले तर मग पुढे मुलांनाही हे माहित होते की आईची ही वेळ तिच्या कामाची आहे.माझी आई रोज सकाळी कितीही घाई असली १० मिनीट पेपर वाचण्यासाठी काढत असे. मला आठवतं की मला शाळेला उशीर होतं असेल तर माझी चिडचिड व्हायची कधीकदधी. पण आज विचार करता वाटतं की किती चांगलं करत होती ती. दिवस भरात कामातून सवड मिळणार नाही म्हणून ते १० मिनीट का होईना वाचण्यात घालविणं याला म्हणता येईल 'स्वत्व' जपणं.

बरं, यात अजून एक मुद्दा येतो,तो म्हणजे 'छंद' म्हणजे नक्की काय? आता, वेगवेगळ्या पाककॄतींवर चर्चा करणे,'किटी पार्टिज' अटेंड करणे, मैत्रिणींशी 'चौकशा' करणे नाहीतर मग घर,मुले,नवरा यांच्याबाबत गप्पा.... असे बरेच प्रकार नेहमीच्या असतात की जे मी ही पाहिले आहेत. पण या सर्वांमध्ये तुमची करमणूक ही दुसया व्यक्तींवर अवलंबून आहे असे वाटत नाही का? माझा सगळ्यात पहिला प्रश्न होता की एकटं असताना तुम्ही काय कराल? जिथे कुणीही बोलण्यास नाहिय़े,फक्त तुम्ही आहात.माझं असं म्हणणं आहे की असा एखादा 'छंद' असावा जो फक्त स्वत:च्या आनंदासाठी आहे आणि जो कुणावरही अवलंबून नाहीये.

काय होतं असेल अशा छंदाने की जो फक्त आपल्यासाठीच आहे? एकतर त्यातून आपल्याला आनंद मिळतो काही तरी आवडीचं केल्याचा आणि घरातल्या रोजच्या अडचणींना सामोर जाण्याची शक्तीही.मन गुंतून राहीलं की बाकी सगळ्या विचारातून सुटका होते आणि आयुष्य नव्या जोमाने जगण्याची इच्छा ही होते.आपली घरात एक वेगळी, स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रतिमाही.मग अशी एखादी गृहिणीही म्हणू शकेल की मी एक कलाकार आहे जी चित्र काढते किंवा सजावटिच्या/कलाकुसरीच्या वस्तू बनविते, आणि हो जर पाककलाच तुमचा छंद असेल तर अभिमानाने सांगावं की मी एक उत्तम स्वैपाकीण आहे म्हणून. कारण एखादं चांगलं चित्र काढून पूर्ण झाल्याचा, एखादा पदार्थ मस्त बनल्याचा किंवा आपल्या आवडीचं गाणं किंवा पुस्तक वाचल्याचा, काहीतरी केल्याचा, यश मिळाल्याचा जो आनंद असतो तो बाकी कशातूनच मिळणार नाही.

मला असं वाटतं की सुरुवातीला वेळं मिळत नाही म्हणून आणि नंतर वेळ मिळाला तरी 'आता वय नाही राहीलं, उत्साह नाही पूर्वीसारखा' अशी कारणं देऊन स्त्री आपल्यातल्या युवतीला, कलाकाराला किंवा काही वेगळं करण्याच्या उत्सुकतेला मारून टाकते. त्यामुळे बरेच वेळा नवरा प्रोत्साहन देत असला तरी कंटाळा करून एखादी गोष्ट टाळण्याची वृत्ती निर्माण होते. तर अशा या वृत्तीला आळा घालण्याचं काम आपलंच नाही का? का आपण मुले,संसार,घर अशी कारणं द्यायची? कुणी जेव्हा नोकरी करते तेव्हा 'पैसे' हा हेतू असला तरी नोकरीतही आपल्याला आवडणारे काम करण्याचाच आपण प्रयत्न करतो ना? तेव्हा जर दिवसातले ८ तास देता येत असतील कुणाला तर मग घरी असताना आपल्यासाठी तासभर का नाही देता येणार? म्हणून मला वाटतं की आपल्या २४ बाय ७ च्या या रकान्यातून सुटका करणं हे आपल्याच हातात असतं.

वेळ मिळेल तेव्हा करू असं म्हणून आयुष्य निघून जातं आणि शेवटी फक्त एकांत उरतो.मी अशी कितीतरी घरं पाहिलीत जिथं स्त्रि लग्नाआधी एक उत्तम कलाकार होती पण संसार सुरु झाला आणि सगळं संपलं.संसार हा एकाचा शेवट आणि एकाची सुरुवात नसून ती दोघांच्या आयुष्याची जोडीनं,जोमानं केलेली सुरुवात असते. आयुष्याच्या शेवटी असं कधी वाटू नये की अरे मी कशी होते आणि कशी झाले. हे करायचं जमलं नाही, ते करायचं राहीलं....आपल्या आवडीच्या गोष्टं असं सोडून देण्यासाठी हे आयुष्य खूप छोटं आहे...तसंच केवळ इतरांसाठी जगण्यासाठी खूप मोठं...मुलांना वाढवणं,घर चालविणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य असतं जे ती आपापल्या परीन करत असते. पण आयुष्याच्या शेवटी तीच मुलं आपापलं घरटं बांधतात तेव्हा आपल्या घरट्यातलं घरपण आपणच जपायचं असतं आपल्यातल्या 'व्यक्तिमत्वानं' ,बरोबर ना?

-विद्या.

Monday, February 19, 2007

सुख

कधीतरी पहाटे
एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी
आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी
यासारखं सुख अजून काय?


-विद्या.

Thursday, February 15, 2007

उगाचच....

काही कारण नसताना
उदास वाटत राहतं, उगाचच..

कधी चार लोकांत, तर कधी एकटं
हसू येतं गालातंच..

भूक लागल्यावर खावं म्हटलं तरी
घास राहतओ हातातच..

सगळी कामं सोडून
नजर खिळून राहते दारातच..

नवे कपडे घालून
वाटतं, पहात रहावं आरशातंच..

कुणालाही हाक मारताना
ओठांत नाव येतं त्याचंच..

त्याने प्रेमाने मारलेली हाक
घुमत राहते कानात सततंच..

दिवसभरात तू भेटला नाहीस
तेव्हा मी होते जरा नाराजच..

संध्याकाळी, तू प्रेमाने घेतलंस मिठीत
आणि मी विसरले माझे सर्वस्वच..

खरं आहे का हे सारं?
की मी अजूनही आहे स्वप्नातंच..

माहीत नाही असं का होतं!
बहुदा होतं असावं फक्त प्रेमातंच..

Wednesday, February 07, 2007

सूर्य

चारीबाजूला बर्फच बर्फ
आणि मनावर त्याचा थंडपणा
एकटं असल्याची जाणीव करून देतात
या परदेशात..उगाचच...
पूर्ण बंद होऊन चाललेले लोक,
आपल्यातले असले तरी
ओळख देत नाहीत...

तू ही पहिल्यासारखा येत नाहीस
ऊब द्यायला,
माझ्या गालावर टिचकी देऊन उठवायला...
आणि आलास तरी थांबतोस कुठे
मी घरी येईपर्यंत?

वाटतं आज नाही आलास,
उद्या येशील,
थोडसं हसू,थोडी उब देऊन जाशील...
उद्याही नसलास की
सर्व थंड वाटतं... अजूनच...

मागच्या वर्षी सोबत घालवलेले क्षण
आठवत राहतात
त्यांचीच काय ती साथ आता
तू पुन्हा येईपर्यंत.....
कदाचित मार्च, कदाचित एप्रिलपर्य़ंत??

-विद्या.

Tuesday, January 30, 2007

आंघोळ

चार दिवसांचा कंटाळवाळा अभ्यास, परिक्षेचं टेन्शन या सर्वानंतर संध्याकाळी घरी आल्यावर गरम पाण्य़ाने आंघोळ केली आणि बरं वाटलं. तीन-चार दिवसांचा थकवा, मनातले विचार , होणारा त्रास सगळे पाण्याबरोबर जणू वाहून जात होते. आजच नाही, बरेचदा मला असा अनुभव आला आहे.रडून एखादी रात्र घालवावी आणि सकाळी आंघोळ झाल्यावर वाटावं जणू गेली रात्र गेली, नवा दिवस उगवलाय. एखाद्या मस्त ट्रेकवरून आल्यावर, निसर्गसौदर्याची, प्रवासाची, पावसाची आठवण काढत आलेला शीण एकदम पळून जातो. आता हे सगळं खरं असलं तरी घरी असलं की आईचे नियम, जेवायच्या आधी आंघोळ करा, आज पूजा आहे घरी आंघोळ करा, पाहूणे येणार आहेत आवरून घ्या हे ऎकलं की चिडचिड होते. सुट्टी,विषेशता: रविवार हा या असल्या कामांसाठी नसतोच मुळी. अरे?? आंघोळीची स्वछता हा भाग सोडून बाकीची सगळी कारणं फक्त Logical च आहेत ना?: -)
अगदी दिवाळीचं 'अभ्यंगस्नान' ही. पहाटे-पहाटे,कडक थंडीत, कुडकुडत, उटणं लावून घेवून गरम्म्म्म पाण्याने आंघोळ करणं म्हणजे दिवाळीची खरी सुरुवात. मी असं ऎकलंय की पूर्वी साधारण वर्षाच्या या काळात शेतकरी आपले धान्य घरी आणत त्यामुळे कष्टाने थकलेलं शरीर साफ करून मग आलेल्या धान्याचा, संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी हा सण साजरा करत.हे झालं एक कारण, अशी बरीच आहेत. मला पडलेला प्रश्न म्हणजे, वर्षभराच्या कष्टानंतर हे अभ्यंगस्नान खरंच त्यांना शुद्ध करत असेल काय?
तसेच अजून एक म्हणजे, गंगास्नान. मी आजपर्यंत गंगा नदी पाहीलेली नाहिये, पण अनेक चित्रपटात त्याचा उल्लेख मात्र जरूर पाहिलाय. तिथे जाऊन म्हणे आजपर्यंत केलेली सगळी पापं धुवून निघतात.आतापर्यंत इतक्या लोकांनी तिचं पाणी दुषित केलं असेल, मग उतारवयाला लागल्यानंतर आपण केलेल्या पापांची जाणीव होऊन तिथेपर्यंत गेलेल्या एखाद्या वॄदधाची पापं धुवून निघत असतील काय?असो.
आपल्याकडे एखादया मॄत व्यक्तीला अग्नी देऊन आल्यानंतर कशालाही न शिवता लोक आंघोळ करतात. मला कुणीतरी याचं शास्त्रीय कारण सांगितलं होतं. मॄतव्यक्ती एखाद्या आजारपणाने गेली असेल तर त्या व्यक्तीभोवती असलेल्या विषाणूची बाधा बाकी लोकांना होऊ नये म्हणून ही खबरदारी. आपली प्रिय व्यक्ती कायमची दुरावल्यावर तिचे अंतिमसंस्कार करून झाल्यावर, त्या आंघोळीने तिच्या आठवणीही, ती गेल्याचं दु:ख, सगळं धुवून जात असेल काय?
परवा मी अर्णवला(आमच्या शेजारांचा सव्वा वर्षाचा मुलगा) बाथटब मध्ये आंघोळ करताना पाहिलं. इतका गोड दिसत होता तो. :-) दोन्ही हातानी पाणी उडवण्य़ाचा त्याचा खेळ चालू होता. त्याचा तो निरागस चेहरा पाहून वाटलं, रोज आंघोळ करताना आपलं निरागसपण, तो आनंद आणि ते सुखद बालपण या पाण्याबरोबर हळूहळू धुवून जात असेल काय?
-विद्या.

Sunday, January 21, 2007

....मला प्रेम दिसतं !


तो मला नेहेमी म्हणतो,
प्रेम-बीम झूट असतं
एकटं जगणं सुखी असतं
तरीही त्याचं माझ्यावर प्रेम आहे
असं मला का वाटतं?

कुणी सांगितलीय बायकोची चाकरी
असं त्यानं म्हटलं तरी,
मी आजारी असताना काळजी करायचं
त्याला काय कारण असतं?
त्याच्या हक्कानं रागावण्यात.....मला प्रेम दिसतं.

मुली म्हणजे निव्वळ मूर्ख
त्यांना समजणं नेहेमीच व्यर्थ
मग तरीही माझ्या बालिश वागण्याचं
त्याला कौतुक का असतं?
त्याच्या अवखळ हसण्यात.....मला प्रेम दिसतं.

सगळ्या अशाच बेशिस्त
आवरण्यात जातो वेळ जास्त
उशीर झाल्यावर चिडला तरी
मला आवरलेलं पाहून, ओठांवर हसू का असतं?
त्याच्या 'चला' म्हणण्यात……मला प्रेम दिसतं.

मुलं-बाळं म्हणजे नुसता ताप,
संसाराचा असतो किती उपदव्याप
असं म्हणलं तरी, मी किचनमध्ये असताना
माझ्याकडे पाहणं त्याला का आवडतं?
त्याच्या भावुक डोळ्यांमध्य़े.....मला प्रेम दिसतं.

ओठांत एक आणि मनात एक,
शब्दात एक आणि स्पर्शात एक,
तो कसाही वागला, काहीही बोलला,
तरी असं का होतं?
त्याच्या प्रत्येक गोष्टीत.....मला प्रेम दिसतं !

-विद्या.

Friday, January 12, 2007

माझी झोप

आजपर्यंतचं आयुष्य सगळं फुकट गेलं, म्हणजे झोपेत गेलं. आता हे मला निम्मं आयुष्य संपल्यावर का आठवलं? तर त्याचं असं झालं, गेले काही दिवस मी एक Computer based training session ऐकतेय. हो, ऐकतेय, त्या Session मध्ये स्क्रिन वर एका कोपयात एक माणूस येऊन बोलत राहतो आणि बाजूला प्रेझेंटेशन चालू राहतं. तर हे ट्रेनिंग सुरु झालं की १५ मिनिटांत मी गार, गाढ झोपेत. ४-५ वेळा तरी असं झालंय आणि मी वैतागलेय याला. हो ना, वाटलं होतं की कधीतरी हे दुष्टचक्र थांबेल. पण नाही, शाळा, कॊलेज झाले, नोकरी लागली तरी झोपेच हे दुष्टचक्र चालूच आहे.

शाळेत प्रत्येक तासाला झोप यायची, अगदी असह्य व्हायची, मग कधी पेंगुळलेल्या डोळ्यांना फळ्यावरची अक्शरं दिसली नाहीत तर कधी बाई काय सांगतात याची शुद्ध रहायची नाही. आश्चर्य म्हणजे घंटा वाजली रे वाजली की झोप गायब. वाटायचं घरी जाऊन तरी वाचू काय शिकवलं होतं ते, पण तिथेही तसंच, पुस्तक हातात घेतलं की झोप येणारच. कशी-बशी शाळा उरकली, कोलेजात तर काय, रुमवर पडून राहण्यातच दिवस गेला, झोप यायची नाही ती रात्री, भटकताना, गप्पा मारताना, पिक्चर पाहताना. :-) तेंव्हा तर अभ्यास फक्त शेवटचे २५-३० दिवस करायचा असायचा,त्यात पण माझी आणि झोपेची लढाई! उपहासाची गोष्ट म्हणजे परिक्शा संपल्यावर मात्र कधी पेपरला उशीरा गेलो, कधी नापास झालो तर कधी वेगळ्याच विषयाचा अभ्यास करून गेलो असली भयानक स्वप्नं पडतात. असो.

वाटलं नोकरी लागल्यावर आपल्याला थोडेच लेक्चर ऎकावे लागतात. तिथे तरी आपण काहितरी मोठे करू, अगदी दिवस रात्र कष्ट करू. आणि आता मला कळलंय की तेही शक्य नाहीये. मला मिटींगमध्ये झोप येते, दुपारी काम करताना झोपअ येते, सकाळी उठायचा कंटाळा कारण झोप येते. कुणाला वाटेल किती आळशी बाई आहे ही. पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र मला काहीही काम सांगा मी लगेच तयार.

कधी-कधी वाटतं नकॊ हा झोपेचा त्रास, धुडकावून ध्यावी ती झोप आणि पटापटा सगळी कामं संपवून टाकावी.सकाळी सहा वाजता उठावं, नाहीच जमलं तर ७ वाजता का होईना उठावं, मस्त Gym मध्ये जावून यावं, ८.३०-९ ला ओफिसात पोहोचावं.आता मी तसे प्रयत्नही केले लवकर उठण्याचे,बरेचसे सफलही झाले, पण मग दुपारी अशी असह्य झोप येते की काही केल्या आवरत नाही. :-(( कधी वाटलं झोपून घ्यावं जितकं हवं तितकं, अगदी मनसोक्त की परत झोपेच नाव नको डोळ्यात. होतं काय की मी मला कितीही झोप दिली तरी कमीच. फार कमी वेळा असं झालंय की मला झोपच येत नाहीये. अगदीच अडचणीची वेळ असणार ती नक्की.

पण आज-काल अमेरीकन च्य़नेल्स वर झोप न येणार्या लोकांसाठी खास ऒषधे, वेगळे डिसाईन केलेले 'बेड्स' यांच्या जाहीराती पाहिल्यावर वाटतं की निद्रादेवीची कृपा माझ्यावर अशीच राहो.जाऊ दे, जास्त बोलून तरी काय होणार? आजपर्यंत मी केलेले एवढे निश्चय मातीस मिळाले, अजून एक करून तरी काय होणार आहे? माझे 'झोपपुराण' आता मी थांबविते आणि पडी टाकते.

-विद्या.

Saturday, January 06, 2007

कातरवेळ

शनिवार अगदी नेहमीप्रमाणे उशीरा सुरू झाला. मग आवराआवरी, आठवड्याची सफाईची कामे पण झाली. नुकताच संध्याकाळचा चहा झालाय, म्हटलं चला जरा वाचत बसू. वाचण्यात काही लक्ष लागत नाहीये. ही वेळच तशी असते ना, कातरवेळ. मग 'कातरवेळ'च्या खूप आठवणी, एक प्रकारच्या उदास भावना मनात येत राहिल्या. आजपर्यंत अशा कित्येक संध्याकाळी मला अस्वस्थ करून गेल्यात,वाटलं काहीतरी लिहावं त्याबद्दल. शाळेत एक धडा होता आम्हाला 'कातरवेळ' नावाचा. त्याच्याबद्दल मला काही विशेष आठवत नव्हतं म्हणून मी Google वर गेले. मला भली मोठी यादी मिळाली 'कातरवेळ' या शब्दावर. ती यादी वाचून मला हसू आलं कारण यावर मी लिहिण्यासारखं काही नव्हतच. :-)) प्रत्येकाने ही अस्वस्थतेची भावना अनुभवलेली दिसतेय. असो.माझी संध्याकाळ या शब्दावर मिळालेल्य़ा blog वर जाण्यात आणि ते वाचण्यात संपून गेलीय. :-) तेव्हा यावरचं लिखाण पुन्हा कधीतरी !

-विद्या.

Tuesday, January 02, 2007

Some fortune cookies...

First day of new year, 2007. Well it wasnt different than any other holidays as I got up at noon. I was tired of cooking and didnt feel like getting ready too. But there was one thing I wanted to do. I wanted to go to one of my favourite restaurant 'Bamboo Garden' , it serves Indian-Chinese food. As I had my first tea at 2.30 pm :-), I kept on thinking if I should go to that place or not. I was saying 'no' only because, I eat a lot there and the food is very oily sometimes. Finally I confirmed on 'NO' and started making dinner at home. Just before starting the dinner, my friends came over and they were planning to go to the same hotel. They asked us and I couldnt say 'NO' this time. :-))
So was it a really strong desire and my friends were just catalyst? I was glad that my wish, my desire was fulfiiled finally. So is it going to be a year of fulfilling desires and having dreams come true? May be....or may be not because....At the end of dinner came the funny part, fortune cookie. I love these cookies. They are different, sweet but not very sweet. So when I opened this fortune cookie it said....
"Some fortune cookies do not contain any fortune". ( :-) this one is sarcastic)
Anyway, its just the beginning. Lets wait and watch another battle of our dreams and destiny!!!
Wish you all a very happy new year !
-Vidya.