Wednesday, November 13, 2013

मी कुठली ?

       मोठ्या उत्साहाने पुण्यात  आले. तिथल्या अनेक आठवणी होत्याच पण स्वत:चं घरही होतं. पंधरा-वीस दिवस झाले आणि मला शिकागोची आठवण येऊ लागली. तिथल्या सगळ्याच गोष्टींची, घर, गाडी , ऑफिस, फ्रेंडस, हॉटेल्स, आवडत्या खायच्या गोष्टी, कपड्यांची दुकानं आणि पुणं आपलं वाटेनासं झालं. कारणं बरीच होती, संदीपला  यायला होणारा उशीर , मग एकट्याने संध्याकाळी केलेली धावपळ, इथे बरेच मित्र असले तरी गाडीअभावी शून्य झालेलं 'सोशल लाईफ'. 
         एकदा कुठेतरी वाचलं होतं की एखादी जागा, शहर आपलं वाटणं म्हणजे तरी काय? तिथे एखादं रुटीन असणं, एखादं ऑफिस जिथे एक दिवस नाही गेलं तर कुणी विचारेल 'सगळं ठीक?' , एखादं हॉटेल जिथे महिन्यातून एकदा का होईना जायचंच आणि गेल्यावर तिथे कुणी ना कुणी ओळखेल, एखादी भाजी, फळ जे तिथल्या ठराविक ऋतूमध्येच मिळतं आणि एखादा ऋतू जो सुरु होण्याची चाहूल लागताच त्या ऋतूच्या कित्येक वर्षाच्या आठवणी जाग्या होतील. हे सगळं मला आठवत होतं पण शिकागो मधलं.
        म्हटलं बघावं तरी पुण्यात सुरुवात करून. आता आठ वर्षं एका ठिकाणी राहिल्यावर असं होणारंच. इथेही प्रयत्न करून पाहायला हवा.  म्हणून शुक्रवारी घराजवळच्या डॉमिनोज मध्ये मुलांना घेऊन चालत गेले बरेचदा. पण तिथल्या थंड प्रतिसादाने परत जायची इच्छा होईना त्यात पावसाळा लागून गेला मग तेही राहीलं. एक दिवस मी ऑफिसमधून निघाले आणि कोपऱ्यावर एक रिक्षावाला म्हणाला 'मैडम वारजे ना?' . पुढे मग दोन तीन वेळा तोच आला.  मला वाटले अरे वा हे रुटीन चांगल आहे. पण नंतर नंतर मला कळले की त्याला तिकडे यायचेच नहिये. म्हटले जाऊ दे. आम्ही पूर्वी एका हॉटेल मध्ये जायचो म्हटले चल जाऊ तिकडे एकदा. तिथे गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या पण पहिल्याच भेटीमध्ये मला जाणवलं की तिथल्या खाण्यामध्ये किती रंग मिसळला होता ते. मुलीच्या ड्रेसवर सूप सांडलं तर त्याचा नारंगी डाग दिसू लागला. आणि  खाण्यावरून मन उडालं. 
      अशातच गणपती आले. मस्त वाटलं सणाला इथे राहायला, खूप दिवसांनी अनुभवायला. सोसायटी मध्ये अनेक कार्यक्रम झाले मुलांना मजा आली. आम्ही पण उत्साहाने फोटो काढण्याची जबाबदारी घेतली. पाच दिवसात फोटो संपले आणि सर्व पुन्हा आपल्या मार्गाला लागले. तिथल्या आपापसात होणाऱ्या गप्पांमध्ये आपण परके वाटतोय याची जाणीव असायची.  सहा महिने होऊन गेले तरी मला पुणं आपलंसं वाटत नव्हतं. अशातच शिकागोला महिनाभर जायचा प्लान ठरला आणि मला लक्षात आले की मी परत जायला जास्त उत्सुक होते. लगेच मैत्रीणीना फोन करून सांगितले कि मी येतेय त्यांनीही आनंद व्यक्त केला. काही लागलं तर सांग म्हणाल्या. मीही निर्धास्त होते. काही लागलेच तर निदान बाहेर जाऊन घेऊन यायला दुकाने तरी माहीत होती. मुलांच्या शाळेतूनही होकार आला एक महिना ठेऊन घ्यायला. तेही वाट बघत होते मुलांना भेटायला. 
       शिकागोला पोचल्यावर अजूनच भारी वाटलं अगदी घरी परत आल्यासारखं. कशाची काळजी नाही, एकटेपणा नाही की कंटाळा नाही. अगदी ऑफिसमधेही सर्वांनी उत्साहाने स्वागत केले. जेवणं ठरली, भेटायच्या वेळा ठरल्या, कार्यक्रमाची आमंत्रणं आली. गेले सहा महिने इथे नव्हतो असं वाटतच नव्हतं. अगदी रोजच्यासारखे रुटिन होते. पहिले दोन आठवडे तर नुसत्या भेटि घेण्यातच गेले. शॉपिंग, बाहेर खाणे, संध्याकाळी घरी लवकर परत येणे , मुलांना वेळ देणे, आणि सोशल लाईफ सर्व परत मिळालं होतं. मनात कणभरही शंका राहिली नाही की दोन वर्षांनी आपण परत इकडे यायचेच.
        तिसऱ्या आठवड्यात मुलाचा वाढदिवस होता तेव्हा मात्र घराची आठवण झाली. वाटलं त्याला आजी-आजोबा, मामा-मावश्या पाहिजेत लाड करायला. थोडाफार साजरा करून तो दिवस असाच निघून गेला. तिथल्या Organized social gathering च्या मर्यादा जाणवल्या. एखाद्याने आपल्या रोजच्या रुटिन मधून बाहेर काही करणं किती दुर्मिळ आहे असं वाटलं. ऑफिसच्या दिवशीही २०-२५ किमी प्रवास करून भाच्यांना भेटायला येणाऱ्या मामा-मावशीची आठवण झाली. दोन दिवसात दिवाळीही आली. तेव्हा गणपतीला केलेल्या सोसायटीमधील कार्यक्रमाची आठवण झाली. लोकांचा उत्साह आठवला. शिकागोमध्ये करून करून  काय करणार तर  मुलांना तयार करून पूजा करणार, मंदिरात जाणार आणि पॉटलक करून लोकांना भेटणार. एखादा सण साजरा करण्यासाठी तिथे असलेली केवळ चार भिंतीची मर्यादा अजून एकदा जाणवली. वाटलं पुण्यात असायला हवं होतं. 
          अशातच तिथे थंडी अजून वाढली आणि दे-लाईट सेविंग मुळे वेळही बदलली. संध्याकाळी ५ वाजता बाहेर पडले आणि एकदम अंधार दिसला. रस्त्यावर लोकांचं दर्शन दुर्मिळ झालं. घरी येऊन मुलांना थंडीत बाहेर नेणंही जमत नव्हतं . तेव्हा मला माझ्या पुण्याच्या रुटीनची आठवण झाली. पाच वाजता बाहेर पडलं की रहदारी, लोकांचा, गाड्यांचा आवाज, घरी गेलं की नेहेमी दार उघडं असलेले शेजारी, मग संध्याकाळी मुलांना खाली खेळायला नेणं, हे सर्व आठवलं. पुण्यातल्या घराचीही आठवण येऊ लागली होति. शनिवार-रविवारी मिळणारा निवांतपणा, घरात येणारं ऊन, उजेड, वारा, त्यांच्या सोबतीला चहा. कामाला येणाऱ्या मावशींच्या मदतीने सुखकारक होणारा सुट्टीचा दिवस, शनिवारी भाज्या आणणं, त्याही ठराविक व्यक्तीकडूनच. मग त्यांनी मुलांना खायला हातात दिलेले  वाटाणे, यांची आठवण येत होती. शेवटचा आठवडा वाट पहाण्यात संपून गेला. 
           घरी परत आले आणि कसं मस्त वाटलं. मुलांना आजी-आबा, काका-काकू, मामा भेटले. त्यांच्याकडे पाहून कळत होते कि त्यांनाही सर्वांची आठवण येत होती. कामाला येणाऱ्या मावशीही अगदी वेळेत आल्या आम्ही आल्यावर. घर छान स्वच्छ करून दिलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले तर तिथेही सर्वांनी चौकशी केली, आठवण काढली. बिल्डींगमध्ये सर्वांनी प्रेमाने विचारपूस केली. मुलांना 'मिस' केलं म्हणाले दिवाळीला. अगदी सोसायटीच्या दिवाळीच्या कार्यक्रमात फोटो काढायलाही आमची आठवण झाली म्हणे. :) पहिल्या दिवशी ऑफिसमधून परत येताना नवीन रोजचा रिक्षावाला उभा होता. मी आले कोपऱ्यावर की तो सीट झटकून रिक्षा सुरु करून थांबला. मला कुठे जायचंय हे सांगायची गरजही नव्हती. :) मी पुण्याची होतेय हे तिथून बाहेर गेल्यावर कळलं होतं. :)
 
विद्या. 

Friday, November 08, 2013

आय टी ची लॉटरी

      एक १५-१६ वर्षापूर्वी, मी आणि माझी आई स्वयंपाकघरात  बसलो होतो. तिचा स्वयंपाक आणि माझा गृहपाठ चालू होता. मध्येच आम्ही लॉटरीवरून गप्पा मारू लागलो. आपल्याला एका लाख रुपयाची लॉटरी लागली तर काय काय करता येईल, विकत घेता येईल  याचा विचार करत होतो. त्यात मग रंगीत टीव्ही, फोन, फ्रीज, इ गोष्टी होत्या. चार चाकी एखादी गाडी घ्यावी असं काही वाटलं नाही. ती आमच्या स्वप्नातही नव्हती. ती लॉटरी काही आम्हाला लागली नाही, पण थोड्या वर्षात एक वेगळीच लॉटरी लागली, ती म्हणजे I T ची. हो, त्याला लॉटरीच म्हणावी लागेल कारण बारावी नंतर केवळ डॉक्टर किंवा वकील नको व्हायला म्हणून मी इंजिनीयर झाले. मी कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी कोरेगावात एकही इंजिनीयर पाहीला नव्हता. त्यामुळे केवळ एका काल्पनिक पात्राकडे एक करियर म्हणून पाहणे आणि तो निर्णय योग्य ठरणे ही लॉटरीच नव्हे काय?
         तर मी इंजिनीयर होण्यामागे अजून एक हेतू होता, तो म्हणजे स्त्रियांसाठी हे क्षेत्र खूप चांगलं होतं म्हणे. एक तर लगेच नोकरी मिळत असल्याने गुंतवणुकीवर लगेच परतफेड मिळत होती आणि पुढे व्यवसायासाठी लागणारे भांडवल इ एका मुलीला कोण देणार होते? त्यापेक्षा करा नोकरी आयुष्यभर. त्यात कामही बैठे, म्हणजे शारिरीक त्रास कमी. १५-२० वर्षापूर्वी मी केवळ ठराविक क्षेत्रातच स्त्रिया पहिल्या होत्या. एक तर शाळेत मास्तर म्हणून, थोड्याफार वकिली करणाऱ्या होत्या पण त्यांची मिळकत किती असेल याची कल्पना नाही. मग त्यातल्या त्यात सुरक्षित नोकरी म्हणजे सरकारी, बँकेत किंवा टेलिफोन खात्यात, कुठे कचेरीत क्लार्क म्हणून. आणि खूपच पुढे गेलेल्या म्हणजे राजकारणात. आज काल मी बरेच स्त्रियांना पोलिसाच्या वेशात पाहिलंय, काही ट्राफिक पोलिस पाहिल्या, एक तर बसमध्ये कंडक्टर पण पाहिली. हे सर्व मी लहानपणी पाहिलं नाही हे नक्की. असो, एकूण माझा कॉम्पुटर इंजिनीयर व्हायचा निर्णय योग्य ठरला कारण माझ्यासोबत आपल्या देशालाही ही I T ची लॉटरी लागली होती.
           भारतात एक तर पहिल्यापासून गणित, शास्त्र आणि इंग्रजी या तीन विषयांवर शाळांमध्ये भर दिला जातो. त्यामुळे या तीन विषयांचे ज्ञान असलेला आणि बऱ्यापैकी कळेल असे इंग्रजी बोलणारा आणि स्वस्त असा मोठा कामगार वर्ग परकीयांना इथे मिळाला. अर्थात त्याच वेळी भारताची अर्थव्यवस्थाही जगाला नुकतीच खुली झाली होती आणि त्यामुळे परकीय गुंतवणूक थोडी वाढतही होती. त्याचसोबत इथल्या कामगार वर्गाची ओळखही होत होती. अर्थात Outsourcing हे काही नवीन नव्हते, तोवर आपण वेगवेगळ्या manufacturing कपन्यांसाठी काम करतच होतो पण या पांढरपेशा व्यवसायात पाय ठेवणे नवीनच होते. त्यात वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या भारतीय कापन्यांची मदतही झालीच. TCS, WIPRO, INFOSYS सारख्या  कपन्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट भारतात कसे आणता येतील यासाठी बरीच मेहनत घेतली. त्याचसोबत त्यासाठी लागणारे योग्य लोकंही त्यांनी इंजिनियरींग कॉलेजमध्ये जाऊन शोधून आणले.
         साधारण २००० सालच्या दरम्यान एका वेगळ्याच प्रश्नामुळे या लोकांसाठीची मागणी अजून वाढली. तो म्हणजे Y२K चा प्रॉब्लेम. तोपर्यंत बऱ्याचशा वित्तीय संस्थांमध्ये जे काही प्रोग्रामिंग केले गेले होते त्यात तारीख लिहिताना वर्ष हे 'YY' या दोन अंकात लिहिले जात होते. त्यामुळे २००० साली त्या सर्व प्रोग्राम मध्ये दोन तारखांची वजाबाकी करताना ००-९९ अशी वजाबाकी झाली असती आणि सर्व गणित चुकले असते. तर या अशा प्रोग्राम मध्ये दुरुस्ती करण्यासाठी बऱ्याच कंपन्यांची धावपळ उडाली. कोणी संगणकात थोडे फार ज्ञान असलेला माणूसही 'रिसोर्स' म्हणून कामाला लावला गेला. त्यामुळे मागणी वाढली की त्यासाठी पैसाही जास्त मागितला गेला. २००१ मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे थोडी मंदी आली होती पण तोवर जगाला भारताची I T व्यावसायिकांचा देश म्हणून ओळख झाली होती त्यामुळे आर्थिक मंदी कमी झाल्यावर पुन्हा एकदा हा व्यवसाय वाढतच राहिला.
          लोक आपल्या मुलांना इंजिनीयर बनवत होते आणि भारतीय कंपन्या त्यांचे परदेशातील वास्तव्य आणि प्रस्त वाढवत होते. त्याच वेळी भारतीय सरकारलाही या क्षेत्राचे महत्व लक्षात आले होते आणि त्यांनी वेगवेगळे उपक्रम आणि सवलती सुरु केले. सर्वात पहिले म्हणजे Information Tehcnology साठी एक स्वतंत्र खाते बनवले गेले. (अर्थात त्यात फायदा त्यांचाच होता, तेव्हढाच एक नवीन मंत्री आणि तेव्हढेच त्याचे मान-पान.)  २००० साली, Information Technology Act २००० प्रस्थापित केला. इलेक्ट्रोनिक स्वरुपात दिलेल्या- पाठवलेल्या माहितीला कायद्याने मान्यता मिळाली. सायबर गुन्ह्यांसाठी वेग-वेगळे नियम लागू करण्यात आले. या खात्याची वेगळी वेबसाईट ही आहे, http://deity.gov.in/.
संगणकीय मालावारील आयात कर कमी करण्यात आला आणि परकीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवर सवलती देण्यात आल्या. त्याचबरोबर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सोफ्टवेअर टेक्नोलॉजि पार्क आणि स्पेशल इकोनॉमी झोन या योजना राबवण्यात आल्या (STPI  आणि SEZ ).STPI मधून होणारी निर्यात अनेक पटींनी वाढली. २००८-०९ मध्ये STPI मध्ये नोंदवलेल्या कंपन्यांची निर्यात एकूण भारतीय निर्यातीच्या ९०% होती. अर्थातच  सरकारने त्यासाठी २०११ पर्यंत या कंपन्यांना कर सुट्टीच(Tax Holiday) दिली होती. तसेच सोफ्टवेअरशी संबंधित आयातीवरील करातही सवलती देण्यात आल्या. २००५ मध्ये वित्तीय आणि दळणवळण खात्याने खास झोनची स्थापना केली, SEZ,  स्पेशल इकोनॉमी झोन. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पायाभूत घटक भारतातही असले पाहिजेत या मूळ कल्पनेतून हे झोन बनवले गेले. त्यातून ही निर्यात जास्तीत जास्त सुरळीत आणि सोपी झाली. STPI आणि SEZ मध्ये मूळ फरक म्हणजे करातील सवलत सेझ मध्ये कमी करण्यात आली. पहिले पाच वर्षं, १००%, पुढचे पाच ५०% आणि त्यानंतर चे ५०% नफा आरक्षित साठ्यामध्ये ठेवण्याच्या अटीवर. या सर्व योजना अवाढव्य वाढणाऱ्या उद्योगासाठी नक्कीच फायदेशीर होता.
      दुर्दैव म्हणजे, या सवलती दिल्यामुळे जो पैसा सरकारला मिळाला असता आणि त्यातून पुढे जे आधुनिकीकरण करता आले असते ते काही झाले नाही.  पैसा मिळतो म्हणून बाकी क्षेत्रातील बरेचसे हुशार लोक इथे/परदेशात याच क्षेत्रात अडकून गेले. शिवाय इतके लोक सर्व परकीय कंपन्यासाठी काम करत असल्याने, भारतीय कार्यक्रमाना चांगले लोक मिळणे अवघड झाले. कित्येक बँका, सरकारी खात्यांच्या वेबसाईट इतक्या फालतू आणि हळू असतात की त्यावर जाणेच नको वाटते, अगदी आपली रेल्वेची साईट, पासपोर्टची साईट सुद्धा. म्हणावे तसे बाकी खात्यांचे संगणकीकरणही झाले नाही, ज्यामुळे अनेक लोकांचे कष्ट, पैसा आणि वेळ वाचला असता.
       अनेक सवलती आणि योजनामुळे या व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले. त्याचा फायदा माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांना अधिक झाला. जिथे एका शिक्षकाला १० हजार रुपये मिळवण्यासाठी कित्येक वर्षे खर्च करावी लागत होती तिथे पहिल्याच महिन्यात त्याच्या मुलाला १०-१५ हजार सहज मिळू लागले.  त्यातूनच पुढे परदेशातही जाण्याची संधी मिळू लागली. जिथे मराठी माणूस कधी उत्साहाने फिरायला म्हणून जात नव्हता तिथे मुले घेऊन जाऊ लागली. लोकांनी आयुष्यभर पैसा जमवून घर उभं करावं तेच आता कर्ज घेऊन का होईना तरुणपणीच घेण्याची हिम्मत होऊ लागली. अर्थात हि हिम्मत करायलाही थोडा वेळ गेलाच. कारण सरकारी नोकरीतील स्थिरतेमधुन बाहेर पडून प्रायोजित कंपनीत नोकरी करायची हे पटायला वेळ लागलाच. त्याचसोबत धनसंचय न करता न तो स्वत:साठी खर्च करण्याची पाश्चात्य देशातील मानसिकताही हळूहळू तरुण पिढीत आली.
         आपल्या गुंतवणुकीवर परतफेड इतल्या लवकर होत आहे हे पाहून लोकांनी जसे मुलांना अभियांत्रिकी विद्यालयात घालण्यासाठी वाट्टेल ते पैसे देण्याची हिम्मत केली तसेच वेळोवेळी फी वाढवणारी आणि पैसा बळकावणारी विद्यालये सुरु होऊ लागली. काळा पैसा तर या अशा संस्थांमधून पांढरा होऊ लागला. मुलाला ५०% मार्क असले तरी कितीही फी देऊन त्याला इंजिनियरच करायचे हे मात्र नक्की. त्यात मग आधीच घोकंपट्टीला बढावा देणारी शिक्षणसंस्था अजूनच मजबूत झाली. नुसती महाविद्यालये कशाला? त्यासाठी सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यमातून शिकवणाऱ्या शाळाही सुरु झाल्याच. International School म्हणून जिथे मुलाला घालतो ते खरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे का? हा विचार किती पालक करत असतील?
          या सगळ्या महागड्या शाळांमध्ये मुलांना घालण्यासाठी पालकही कष्ट करतच होते की. घरासाठी कर्ज, मुलासाठी कर्ज, हे सगळं फेडायचं म्हणजे कितीही त्रास झाला तरी नोकरी सोडता येत नाही ना. मग नवरा-बायको दोघांची नोकरी गरजेची. त्यासाठी आख्खं घर घड्याळाला टांगलेलं. नोकरीवर जायची घाई, यायची घाई, मुलांना शाळेत सोडायची घाई, आणायची घाई, अभ्यासाची, जेवायची आणि परत झोपयचीही घाईच. त्यात नोकरीतील तणावाचा नवरा बायको यांच्या संबंधांवर होणारा परिणाम आणि त्याचा मुलांवर होणार परिणाम हे वेगळेच. माझे बाबा शिक्षक होते. ते रोज ५.४५ पर्यंत घरी आले नाहीत की आम्ही सगळे दारात उभे अजून आले नाहीत का पाहायला. एखाद्या दिवशी ते गावाला गेले तर ते येईपर्यंत आम्ही गाडीवर पडून असलो तरी ते आल्यावरच झोप लागायची. त्यांच्यासोबत खेळणं, बोलणं इतकं होत नसेलही पण ते घरी होते न? अशा वेळी रात्री ८ वाजेपर्यंत आई-बाबांची वाट असणाऱ्या मुलांकडे पाहून खूप वाईट वाटतं.
         माझी आई तरी घरी होती. माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या मुलींचे आयुष्य तर कायमचे बदलून गेले. स्त्री-पुरुषांना बरोबरीने वागणूक देणे मिळणे, सर्व मान्य. पण त्यासाठी मुलं -बाळ संसार सर्व टांगून ठेवायला लागू लागला. बर हे क्षेत्र सुरक्षित, चांगला पगार, स्थैर्य हे सर्व आहे म्हणून कित्येक मुली यात आल्या. मग हळू हळू BPO सुरु झाले, अमेरीका, इंग्लंड वेळेतील शिफ्ट सुरु झाल्या. त्यासाठी ने-आण करायला ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनी अजून सुरक्षितता आणण्याचा प्रयत्न केला. तरीही समाजाची मानसिकता पूर्णपणे बदलत नाहीच ना? त्यामुळे लग्नासाठीही बघायला आलेले , 'मुलगी BPO , कॉल सेंटर मध्ये काम करते?  म्हणून  आधीच नाक मुरडू लागली आणि त्याहून त्यांचे आई-वडील. हे सर्व असले तरी आपणही स्वावलंबी होऊ शकतो हा विश्वास मुलींमध्ये हळूहळू येऊ लागला. मुलगीही मुलाइतकाच पगार मिळवू शकते, परदेशात जाऊ शकते, एकटी फिरू शकते याचा आई-वडिलानाही अभिमान वाटू लागला. बायकोसाठी नवराही थोडी घरची कामे करू लागला. तरीही ओढाताण होऊ लागली ती मुलं होताना. घराची जबाबदारी स्वीकारून, नोकरी आणि दमलेल शरीर हा सर्व मेळ घालणं अवघड होऊ लागलं. एक आई म्हणून मुलाला लोकांकडे सोडून  राहणं हे मानसिक ताण-तणावाचेच ना?
      सगळ्यासोबत अजून एक वेगळाच ग्रुप झाला तो म्हणजे अस्थायिक भारतीयांचा. त्यांच्याही मनाची अशीच परवड, फक्त भारतात राहायचे की परदेशात म्हणून. तिथल्या सोई-समृद्धी बघून तिथे स्थावर होणाऱ्या लोकांची संख्या वाढली. त्याचसोबत मुलांचे संगोपनाचे प्रश्नही. आता नको, थोड्या दिवसांनी जाऊ म्हणून कायम तिथे राहणारे आणि खरंच परत आले तरी इथे समाधान न मिळणारे असेही लोक त्यात आलेच. त्यांच्या सोबत त्यांच्या घराच्या लोकांचीही परवड. मुलाला भेटायला कधीतरीच तिकडे जायचे की तिथेच राहायचे? ज्या वयात मुलांनी-नातवांनी सोबत करावी त्यात एकटं राहणे हा वनवासच. आणि गेले तिकडे तरी आयुष्यभराचे नाते-गोटे सोडून तिकडे जायचे, तोही त्रासच.
       या क्षेत्राबाद्दला अजून म्हणजे लवकरच बाकीही देश स्पर्धेत येत आहेत. आपल्या सध्याच्या पिढीने थोडा जरी आळस केला तर चीन सारख्या कष्टाळू देशाने आपल्याला मागे टाकायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपली मानसिकता, शिक्षणसंस्था  बदलण्याची गरज आहेच. घरासोबत बाहेरही बरेच बदल झालेत. परकीय संस्कृतीची अजून जास्त ओळख पटत आहे. बाजारपेठेत नाव-नवीन वस्तू पाहायला आणि त्या घ्यायलाही जमत आहे. तिथे पाहून आलेली, आवडलेली, खाल्लेली एखादी पाककृती आता घरीही बनत आहे. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूही बाजारात सहजपणे मिळत आहेत.त्याचबरोबर आपण आपल्या संस्कृतीपासून दूर तर जात नाहीये न हे ही पहिले पाहिजे. एकूण काय की या क्षेत्रामुळे भारत जगाच्या नकाशावर आला. खूप चांगल्या गोष्टीतर घडल्याच,  पण त्याची किंमतही आपल्याला द्यावी लागली आहे . शेतीप्रधान देशातील सर्व लोक शहरांकडे वळू लागले आहेत, त्यामुळे शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या रोडावत आहेच. पण उद्या IT ला मंदी आल्यावर लोक कुठे जातील आणि काय व्यवसाय करतील याची योजना वेळीच केली नाही तर काय होईल माहित नाही. लवकरच याला पर्याय शोधणे आवश्यक आहे, आपल्या आणि मुलांच्या भविष्यासाठीही.
  आय टी
-विद्या

Wednesday, September 11, 2013

एक संस्था

         DCH चं वेगळे ठोके असलेलं मुझिक सुरु होतं आणि त्यासोबत नावाच्या पाट्या पडायला लागतात. सिनेमा संपला म्हणून नाईलाजाने उठून कामाला सुरुवात  करावी लागते. पण डोक्यातून तो जात नाही. त्या रेंगाळणाऱ्या दुपारी किंवा संध्याकाळी, तो सोबतच राहतो. तसंच ' जिंदगी मिलेगी ना दोबारा' चंही. 'सुरजकी रांहोमे अब है ये जिंदगी' सुरु होतं , कत्रिना आणि ह्रितिक नाच करीत येतात तरी उगाचच उदास वाटत असतं. या दोन्ही सिनेमांची थीम एकच, जिवलग मित्र, त्याचं जुनं जग मग, झालेली भांडणे आणि मग पुन्हा एकदा भेटणं. या सगळ्यात एक अदृष्य व्यक्तिमत्व असतं जे दिसत नाही पण त्याचा प्रभाव  दिसतो. ती म्हणजे एक संस्था, एक शाळा किंवा कॉलेज जिथे हे लोक भेटलेले असतात, हसतात, रडतात, भांडतात . ती एक कॉमन गोष्ट या लोकांना एकत्रित आणते आणि ठेवतेही.
           परवा भावाच्या पदवीदान समारंभासाठी संदिपसोबत COEP ला गेले. खरंतर तासाभराची सुट्टी घेऊन गेलो होतो  आणि   उशीरही झाला होता त्यामुळे पळत पळतच जात होतो. तरीही जाताना त्या संस्थेचे ठसे मनावर उमटत होते. तिथल्या मुलांकडे पाहून  कॉलेजची आठवण येत होती. त्यांच्याकडे पाहून वाटत होते अरे खरंच आपण वयाने मोठे झालो. ती मिसरूड फुटलेली, खुरटी दाढी, पाठीला पिशवी नाहीतर हातात वह्या, मळकी जीन्स सगळं सारखंच. मुलींच्या कपड्यांमध्ये थोडा बदल होता पण तीच सडसडीत अंगकाठी, चेहऱ्यावरचे कोवळेपण, बोलण्यात उत्साह, चालण्याची लकब सर्व तसंच, कॉलेजच्या मुलींसारखं. त्यांच्यामधून धावत गेलो तर प्रवेशद्वाराजवळ गार्ड म्हणाला, 'पेरेंट?' मोठे दिसत असलो तरी 'पेरेंट म्हटल्यावर वाईट वाटलं. असो.पुढे संदीपने दाखवलं 'हे आमचं डिपार्टमेंट', 'ही लायब्ररी', ' हे कम्पुटर डिपार्टमेंट, आमचा कधी संबंध नाही आला', इ.  काही ठिकाणी ' अरे? हे असं केलंय? ', 'हे बदललंय ' अशी उद्गारचिन्हही ! त्याच्या बोलण्यातून त्याच्या त्या संस्थेचा अभिमान दिसत होता. त्याच्या जागी मी  कॉलेजमध्ये गेले असते तरी असंच काही तरी झालं असतं, 'तेच गणपती मंदिर, माझं डिपार्टमेंट, मी न फिरकलेल डिपार्टमेंट, हॉस्टेल, कॅन्टिन. तोंडात रुळलेले काही शब्द, काही ग्रुप. लोकलाईट, हॉस्टेलाईट, सातारचे, सोलापूर, कोल्हापूरचे. या सगळ्यांची वेगळी ओळख तर मैत्रीची सरमिसळ. सगळीकडे सारखंच.
           होतं काय, की हे सिनेमे बघताना हे सगळं अनुभवल्यासारखं वाटतं, त्यांच्या हसण्या-बोलण्यात आपणच दिसतो, त्यांच्यासोबत पुन्हा भेटण्याचं स्वप्नही बघतो. ते स्वप्नं सिनेमासोबत संपून जातं आणि वास्तवात आल्यावर उदास व्हायला होतं. कारण एखादं भांडण अजून मिटलेलं नसतं, एखादा मित्र अजून तुटलेलाच असतो आणि एखादी मैत्रीण एका गावात असूनही संसारात अडकून पडलेली असते. तर अशा या सगळ्या मनांमध्ये 'ती संस्था' मात्र अजूनही त्याच लोकांसोबत तिथल्या आठवणींसोबत तशीच असते आणि अशा सिनेमांमधून दिसत राहते. अजूनही कधी कुणी भेटलं की म्हटलं जातं , 'अरे तू वालचंदची का? मी पण.' :)

-विद्या. 

Wednesday, August 07, 2013

योगायोग

            आपण लोक पण ना इतके वेडे असतो. म्हणजे कशानेही खूष होतो, अगदी कुठल्याही छोट्या कारणाने. मित्राने डब्यात भेंडीची भाजी आणली, खूष ! ऑफिसला येताना पाऊस पडला नाही आणि ऑफिस मध्ये आल्यावर सुरु झाला , हो खूष. बसमध्ये बसायला जागा मिळाली, हो खूष.  दोघांनीही एकाच वेळेस एक वाक्य बोलले, हो खूष आणि मग पुढे हीहीही…खिखिख. आता काल रस्त्यावरून जाताना खूप छान पेरू दिसले. आम्ही दोघेही मग उतरलो आणि मुलांसाठी घेऊ लागलो. चांगले पेरू मिळाले म्हणून आम्ही खूष आणि एकदम एक किलो पेरू घेणारे गिऱ्हाईक मिळाले म्हणून मालक खूष.
             तीच कथा काळजीची. आम्ही पेरू घेत असताना तिथे एक माणूस पेरू घेत होता. म्हणाला एक कडक द्या आणि एका जर मऊ द्या. मग त्याने स्वत:च दोन निवडून घेतले आणि बाजूला झाडाखाली गेला. तिथे एक वयस्कर माणूस उभा होता. त्याच्या कानाजवळ वाकून म्हणाला,' हा घ्या. तुमच्यासाठी मऊ बघून आणलाय'. ५-१० रुपयाची कथा पण किती काळजी आणि प्रेम वाटत होतं त्यात. कुणी गावाला चाललंय? मग सोडायला जा, रात्री उशीर झाला तर आणायला जा. फोन लागत नाही म्हणून काळजी, फोन उचलत नाही म्हणून काळजी, त्याचा फोन येणार तर चार्जिंग संपत आलंय म्हणून काळजी. आज रागावून गेला, चहा न घेताच गेला, रात्री सर्दीने झोपच नाही, काही न काही असतंच.
              माझा आणि माझ्या भावाचा वाढदिवस एकाच दिवशी असतो हे मी कित्येक लोकांना सांगितले आहे आणि प्रत्येक वेळी त्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षाही करते. तर हे असे योगायोग कुठे न कुठे घडतच असतात. पण ते सांगण्यात आणि प्रतिक्रिया देण्यातही किती आनंद आणि आश्चर्य?  मुलीची आणि एका मैत्रिणीच्या मुलाची जन्मतारीख एकच. तर ऑफिसमध्ये सर्वांना आम्ही लगेच सांगितलं. ते बिचारे काय करणार त्यात? आता एखादीला बाळ होण्यासाठी दिलेली तारीख समजली की त्यातही ती आपल्या, आपल्या नातेवाईकांच्या तारखेच्या किती जवळ आहे ते सांगत बसायचे. आता १० मार्च तारीख दिली असेल तर ते बाळ १९ मार्चपर्यंत कशाला थांबेल पोटात काकाच्या वाढदिवसाची वात बघत? काहीही !! कधी कधी तर जन्मतारीख आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस यांचाही धागा जोडायचा प्रयत्न करायचा. असो.
           कधी कधी आपण काही गोष्टी सोडूनही देतो. सासूने एखादा टोमणा मारला, जाऊ दे. ऑफिसमध्ये कुणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, जाऊ दे. कधी नवीन आणलेली छत्री, चप्पल पहिल्याच वापरात खराब झाली, जाऊ दे. रस्त्यावरून खड्डा चुकवला नाही असा एकही क्षण नाही, जाऊ दे. मुलाने पहिल्याच दिवशी नेलेली वस्तू हरवली, जाऊ दे. उठल्यापासून झोपेपर्यंत कित्येक गोष्टी अशाच सोडून देतो. पण कधी तेव्हढ्याच छोट्याशा गोष्टीवर भडकतो देखील. चालताना एखाद्याचा चुकून धक्का लागला, लगेच मागे वळून 'काय रे, दिसत नाही का म्हणतोच?' रिक्षावाल्याने १० रुपये जास्त मागितले की त्याला ऐकवतोच. धोब्याने कपड्याचा डाग नाही काढला , बाईने भांडं नीट नाही घासलं, आईने डब्यात सर्व दिलं पण चमचाच नाही दिला, बाबांना हजार वेळा सांगूनही रिक्षा न घेता बसच घेतली. चिडायला कुठलंही कारण पुरतं.
         वाटत किती क्षुद्र आयुष्य आहे नाही आपलं? कशानेही खूष होतो, कशानेही रडतो, हसतो, चिडतो. मोठ्या लोकांचं नसेल ना असं होत. म्हणजे एखाद्या अंबानीला भाजी स्वस्त झाली म्हणून थोडीच आनंद होणार आहे? की होणार आहे एखाद्या राजकारण्याला संताप रस्त्यात ट्राफिक लागलं म्हणून ? की  बसमधून उतरल्यावर लगेच रिक्षा मिळाली म्हणून कुणी शाहरुख आईला फोन करणार आहे? आपल्या या छोटेपणावर हसू येतं, पण त्यालाच जिवंत असणं म्हणत असावेत. सर्व भावनाच बोथट झाल्यावर आनंद कशाचा आणि दु:खं कशाचं ? असा विचार केल्यावर वाटतं बरं आहे छोटंच राहिलेलं. 

-विद्या.
 

Wednesday, July 17, 2013

झिम्मा- आठवणींचा गोफ

         आज रिक्षातून जाताना खूप रिकामं वाटत होतं. इतक्या दिवसांचा माझा आणि त्या पुस्तकाचा प्रवास संपला म्हणून. हे असं वाटणं म्हणजेच पुस्तक आवडलं बहुदा.   'झिम्मा' वाचायला घेतलं ते मुळात त्याबद्दलचे दोन रिव्ह्यू वाचल्यामुळे.
विजया मेहता यांनी त्यांच्या मराठी रंगभूमी, सिनेमा, टीव्ही अशा वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या कारकिर्दीचे त्यांच्या शब्दातील वर्णन. आत्मचरित्र म्हणता येईल पण त्यापेक्षा त्यांच्या रंगभूमीवरच्या अनुभवांची साठवण म्हणणं जास्त योग्य होईल. 
          सर्वात आधी सांगायचं म्हणजे माझी अजिबात लायकी नाही या पुस्तकाबद्दल, किंवा अशा मोठ्या व्यक्तीच्या एव्हढ्या मोठ्या कारकिर्दीबद्दल लिहिण्याची किंवा बोलण्याची. पण एक वाचक म्हणून काय वाटलं ते लिहिण्याचा प्रयत्न करतेय. तोही नीट जमत नाहीये, तर एव्हढं मोठं पुस्तक लिहिण्यात किती वेळ, विचार, उर्जा, लागली असेल याची कल्पनाच नको. गेल्या कित्येक वर्षातलं माझं वाचायाला घेतलेलं पहिलं मराठी पुस्तक. रोज दुपारी घरी जाताना रिक्षात २५ -३० मिनिटांचा वेळ तोच काय तो माझा. मग त्यात हे असं मोठं पुस्तक (४५०) वाचून होणार का अशी शंका आलीच मनात पण पुस्तकाने शेवटपर्यंत मला बांधून ठेवले. अर्थात त्यातले प्रसंग/वर्णनही एखादा सोडला तर उद्या वाचला तरी चालेल असा असल्याने ते फक्त रिक्षातच वाचलं गेलं. वेड्यासारखं वाचत सुटून संपवून टाकावं असं झालं नाही. (हे माझं मत. बाकी लोकांचं मत वेगळं असू शकतं असा डिस्क्लेमर आधीच दिलेला बरा.)
         तर  झिम्मा चार वेगवेगळ्या व्यक्तींच्या रुपात भेटतं. बेबी जयवंत, विजू जयवंत , विजया खोटे आणि विजया मेहेता.  सुरुवातीला ते लक्षात राहतं पण जसे जसे कामाचा आवाका आणि कारकीर्द वाढत जाते तसे या रेषा पुसट होत जातात. पहिल्या तिन्ही आयुष्यांबद्दल स्वत:ला तिसऱ्या ठिकाणी ठेवून स्वत:च्या आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोण मला थोडा खटकला. कदाचित वयाच्या सत्तरीनंतर तो दृष्टीकोण येतही असेल, मला तो उगाच परका वाटला. सुरुवातीची बेबी जयवंत वाचताना तो जास्त खटकला. त्याच सोबत बेबी जयवंत बद्दल पडलेला प्रश्न म्हणजे वयाच्या सत्तरीनंतर पाचव्या वर्षी काय केलं हे आठवू शकतं? की भासच ते? नंतर त्याच्या पलीकडे जाउन वाचायला सुरुवात केली. बेबीच्या आयुष्यातील दोन गोष्टी लक्षात राहिल्या.  त्या काळातील एकत्र कुटुंबामुळे बेबीच्या मावशीला जसे जयवंत कुटुंबाने जसे आपले केले तसे एखाद्या अनाथाला आजच्या चौकोनी घरात जागा मिळेल? हा प्रश्न. आणि त्यांनी केलेले कोकणातील त्या काळचे वर्णन. त्या काळातील समाजाची थोडीफार कल्पना ते वाचताना येते. त्याच्याशी एकदम विरोधी मुंबईतील वातावरण. तेव्हाही किती पुढारलेली होती मुंबई हे वाटल्याशिवाय राहत नाही.
         विजू जयवंत बद्दल वाचताना फार आश्चर्य वाटलं मला. ८०-९० च्या दशकात एका मुलगी म्हणून मलाही काही बंधनं पाळावी लागली. जरा जास्त कॉलेजच्या गप्पा आईला सांगितल्या की 'हेच करता का तिकडे?' असे टोमणेही ऐकायला लागले. तर मग ५० च्या दशकात नाटकांत भाग घेण्यासाठी परवानगी देणाऱ्या त्यांच्या भावाचे आणि आईचेही कौतुक वाटले. तेव्हा झालेल्या थोड्याफार विरोधाचे संदर्भ येतात अधे मध्ये, पण कडकडून निषेध, विरोध हे कुठे दिसले नाहीत. त्याचवेळेस, इतकी सवलत मिळाल्यानंतर एवढ्या मोठ्या वर्तुळात आत्मविश्वासाने वागणाऱ्या तरीही वाहवत न गेलेल्या विजू जयवंत चे जास्त कौतुक वाटले.
         हरीन खोटेशी ओळख, लग्न हे सर्व उत्सुकतेने वाचलं. लोकांच्या पर्सनल आयुष्यात पाहण्याची काय उत्सुकता असते काय माहीत? विजू खोटे होऊन जमशेदपूरला गेल्यावर मलाच टेन्शन. तिथे एक छोटासा का होईना नाटकाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न वाचून वाटले की खरंच इच्छा असेल तर माणूस काही ना काही करतोच. But she was not meant for it. पुढे बायकोच्या करियरसाठी दोघांनी थोडे दिवस का होईना जमवून घेणे, वेगळे राहणे, हे वाचून वाटले मग आज काल टीव्ही वर दिसतात ते लोक कुठल्या जगात वावरत असतात? आपण तेव्हा जर इतके पुढारलेले होतो तर आज नाहीये का? या सर्व व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टींबद्दल लिहिण्याचं कारण म्हणजे ते पुस्तक वाचताना एक स्त्री म्हणून माझी स्वत:शी, तेव्हाच्या-आताच्या समाजाची तुलना होत होती. हळूहळू त्यांच्या मराठी रंगभूमी वरच्या कार्याला वेग येऊ लागतो आणि ते वाचताना आपणही त्या नाटकाचा, नेपथ्याचा, त्यांच्या अभ्यासाचा एक भाग बनून जातो. 'रंगायन' सारखी इतका विचार करून बनवलेली संस्था,  त्याच्यामागचे विचारमंथन, लेखक, त्यांच्याशी झालेल्या चर्चा, एक संस्था म्हणून कार्यरत झाल्यावर आलेल्या अडचणी, त्याना मदत करणारी मंडळी हे वाचून आपल्याला किती उत्कृष्ठ इतिहास लाभलाय याचा अभिमान वाटतो.            
        पुढे विजू खोटे, विजया मेहेता कशा झाल्या याचा एका ठिकाणी संदर्भ येतो.  तोवर पुस्तकात खऱ्या अर्थाने रंगभूमीवरच्या कार्याला वेग आलेला दिसतो. त्यांचे पूर्व जर्मनीतील नाटकांचे प्रयोग, त्या मध्ये भेटलेले वेगवेगळे लोक, त्यांनी युरोपमध्ये केलेला अभ्यास, हे सर्व स्वप्नवतच. एक मराठी स्त्री चांगली नायिका म्हणून चित्रपटात काम करू शकत असताना, दिग्दर्शनात तेही मराठी रंगभूमीवर कशी पडू शकते हे फक्त त्यांनाच माहीत. त्यासाठी लागणारी दृष्टी, एक पूर्ण संकल्पना उभी करण्याचे सामर्थ्य, लोकांशी/ लेखकांशी, संगीतकारांशी , नेपथ्यकारांशी  चर्चा हे सर्व कसे केले असेल?  हे सर्व फक्त प्रायोगिक नाही तर लोकमान्य रंगभूमीवरही ! एखादी व्यक्ती रोज त्याच उत्साहाने ५० वर्षे काम करू शकते?नाटकातून मराठी सिनेमाकडे जाताना त्यांना आलेले अनुभव, नाटकाचेच सिनेमात रुपांतर केल्यावर त्यात करावे लागलेले बदल, मराठीतून हिंदी सिरियल, शोर्ट फिल्म्स, तिथून पुढे हिंदी चित्रपट, त्यांना मिळालेले पुरस्कार हे वाचायलाही आवडलं. बंगाली, मल्याळी नाटकातून कलातून त्यांना मिळालेले संदर्भ, इंग्रजी नाटकांची भाषांतरित नाटकं, त्याचं भारतीयकरण करण्यासाठी केलेला विचार,एखादी कलाकृती किंवा भूमिका करताना त्यात एकजीव 
होण्यासाठी लागलेले प्रयत्न खूप वाचनीय. पुस्तक संपताना उगाच उदास वाटायला लागलं हे सर्व थांबलं आणि आपण त्यातलं एकही नाटक पाहिलंही नाही म्हणून.     
         आयुष्यात दोनच आत्मचरित्र वाचली, हे त्यातलं एक. शाळेत असताना क्रिकेटच खूप वेड  लागलं आणि मग जे दिसेल, मिळेल  ते वाचत सुटले. त्यात एक म्हणजे डॉन ब्रॅडमन यांच्या काराकीर्दीवरील मराठी पुस्तक. (ते शाळेच्या लायब्ररीत काय करत होतं हा मोठा प्रश्नच आहे.) ते वाचायला घेताना खूप उत्साह होता. हळूहळू मात्र त्यातील वाचण्याची मजा गेली आणि राहिले ते फक्त आकडे. त्यांनी कुठे किती रन काढल्या, त्यात कसे आउट झाले, इ.इ. (उद्या सचिनने पुस्तक काढलं तर ब्रॅडमन सारखं काढू नये हे नक्की.) तर झिम्मा बद्दलही असंच काहीसं झालंय. म्हणजे बेसिकली विजयाबाईंच्या इतक्या अवाढव्य कारकिर्दीची तुलना मग ब्रॅडमन किंवा सचिनच्या कार्कीर्दीशीच होतेय. पण तरीही हे सर्व प्रत्यक्षात पाहिलं असतं तर सचिनला पहिल्यासारखा आनंद वाटला असता. पण आता सध्या ब्रॅडमन वाचल्यासारखे थोडे थोडे वाटत आहे. मराठी रंगभूमीच्या एव्हढ्या मोठ्या इतिहासाला आपण मुकलो, तरी तो वाचायला चुकलो नाही याचा आनंद आहेच. 
 
-विद्या. 

Thursday, July 04, 2013

अस्वस्थ

          गेले कित्येक दिवस हात शिवशिवत आहेत काहीतरी लिहायला पण विचारांची इतकी सरमिसळ होती की एक असं ठाम पोस्ट लिहिता येत नव्हतं. अर्थात लिहायची इच्छा होण्याचं कारण म्हणजे पाऊस !अगदी जूनच्या तिसऱ्या दिवशीच टपकला आणि एकदम रडू दाटून आलं. शिकागोमध्ये पडणाऱ्या पावसात ती ओढ नव्हती. (कदाचित तिथल्या हिमवर्षावात असेल ? ) पण पाऊस पडला आणि लोकांची फेसबुक वर गर्दी झाली स्टेटस अपडेट करण्यासाठी. कुणीतरी लिहिलंही की 'इतकाही पाऊस नाही पडला जितके स्टेटस अपडेट झालेत.'
हळूहळू मग लिहिण्याचे विचारही मागे पडत गेले. पण रोज घरातून निघताना, घरी जाताना, कपडे वाळत घालताना, मुलांना खेळायला नेताना दिसतच होता पाऊस आणि प्रत्येकवेळी अस्वस्थ व्हायचं. कशामुळे माहित नाही. ते टाळायला काय करायला हवं हे ही  माहित नाही. 
         शाळेत, १० -१२ वी पर्यंत असंच व्हायचं मला मावळत्या सूर्याकडे पाहताना. त्यातले रंग इतके अदभूत, सुंदर असायचे की वाटायचं मला का नाही हे असं चित्र रंगवता येत? इतके सारे रंग इतक्या सहजतेने एकत्र कसे आणता येत असतील? म्हणजे गडद गुलाबी आणि निळा, हळूहळू एकमेकांत असे मिसळून जातात की  त्यांना जोडणारी रेघ कुठेच दिसत नाही. खूप वाईट वाटायचं मला की देवाने मला ही कला दिली नाही म्हणून.  चित्रकार असते तर किती छान झाले असते. भरभर उतरवले असते ते सर्व रंग कागदवर.१२ वी नंतर कोरेगांव सुटलं आणि ते रंगही. पण ते तसेच राहिले माझ्या मनात आणि अजूनही असे कधीतरी ते आठवतात, कोरेगावच्या रस्त्यावरून जातानाचे ते मावळतीचे रंग. 
         कॉलेजमध्ये गेल्यावर एक वेगळाच अस्वस्थपणा यायचा. तो म्हणजे शब्दांचा. ते वयच तसं होतं. प्रेमात पडण्याचं. आता वाटत ते कुणातरी व्यक्तीपेक्षा प्रेमात पडण्याच्या कल्पनेवरचं प्रेम असावं. उगाचच एका व्यक्तीचा ध्यास घ्यायचा आणि मग दिवसभर तिचाच विचार करत बसायचं. दिवास्वप्नं बघत, कॉलेजच्या व्हरांड्यात त्याला/तिला शोधत, तासाला लक्ष न देत मनाला विरंगुळा म्हणून त्याला आठवत बसायचं . तेव्हा पहिल्यांदा जगजीत आणि चित्राची एक कसेट हातात पडली होती. ती ऐकताना अस्वस्थ व्हायला होई. कुठून आणतात हे असे शब्द, त्यांचे अर्थ, आणि बरोबर कसे लागतात काळजात आपल्या? त्या शब्दांसमोर माझे साधे मराठी शब्द फार तोकडे वाटायचे, अजूनही वाटतात. का नाही माझ्याकडे ती प्रतिभा ते कविमन, ते शब्द, त्या कल्पना?
        अर्थात लिहिण्याबद्दल अजूनही एक गोष्ट जाणवते. प्रेम करण्याच्या काळात/ वयात सुचलेले थोडेफार जे शब्द होते तेही रोजच्या संसारात विसरून/विरून गेले. पण या कवी लोकांचं नाही होत असं? किती वर्षं गुलजार प्रेमावर कविता लिहू शकतात? 'आ निंद का सौदा करे, एक ख्वाब दे, एक ख्वाब दे'. त्यांच्या मनात कसं हे प्रेम अजून तग धरून बसलंय? त्यांना नाहीये का संसार, मुलं-बाळ? आणि समजा व्यवसाय म्हणूनच करायचा तरीही त्यात विविधता येण्यासाठी तरी कुठून आणतात ते सर्व शब्द, कल्पना ?   गाण्यांच्या बाबतीतही तसंच. अगदी लता-आशा ताईंचा आवाज असो रफी किंवा किशोर कुमार असो आणि अगदी परवाच ऐकलेल्या आशिकी-२ मधल्या अरजित सिंग चा असो. कधी कधी मनात ना मी खूप सही गाणं म्हणत असते. पण तोंड उघडलं की बिघडलं. मला नक्की माहित असतं की या गाण्यात या शब्दाला असं नाजूक वळण आहे, इथे आवाज असा चढतो, वगैरे. पण ओठ उघडले आणि आवाज ऐकला स्वत:चा की थिटेपणा जाणवतो. मग तसंच मनातल्या मनात गाणं म्हणायचं आणि गप्प बसायचं.
         तर हे असं अस्वस्थ होणं नेहमीचंच पण पाऊस असला की अजून त्रास. लोकांच्या अनेक ब्लॉग, पुस्तकं वाचतानाही जाणवतं की कितीतरी प्रकारे कितीतरी विषयांवर कितीतरी उत्तम लिहिलं जाऊ शकतं. त्यात माझे पावसावरचे पोस्ट साधेच असणार आणि असे वेगळे तरी काय असणार? म्हणजे वारजे पुलापर्यंत २ किमी चालत येताना मला लिहावंसं वाटत होतं माझ्या होणाऱ्या धावपळीबद्दल. एक तर छत्री नाही. त्यात भली मोठी पर्स घेऊन नवी कोरी काळी प्यांट घालून मी पाण्यातून चालले होते. मागून स्कुल बस जोरदार येत होत्या.  आवाज आला की पळा डावीकडे. शेवटी उजवीकडूनच चालत राहिले. समोरून कुणी जोरात येताना दिसला की आधीच हात करून हळू म्हणून सांगायचे. एकजण तरी गेलाच उडवत शिंतोडे. मग १ मिनिट त्याला शिव्या देण्यासाठी तोंड फिरवून, मान वळवून बोलण्यात गेला. माझा जोश पाहून मागचा आधीच स्लो झाला. :)  मध्येच उडी मारून एखादा खळगा चुकवून २०  मिनिटात कशी बशी बस स्टोप वर पोचले. रिक्षा मिळत नव्हतीच. शेवटी बसनेच जावं म्हटलं.
        तिथे बायका साड्या पकडून उडणाऱ्या शिंतोड्याची पर्वा न करता वाकून आपली बस येतेय का बघत होत्या. शाळेला जाणारी मुलं उभी होती. त्यात छोट्या बहिणीला सांभाळत चढवून बसवणारी एक मुलगीही. कसं ना लहानपणीच आई-पण येतं? तेव्हढ्यात एकजण बाइक वरून आला. त्याचा झोपाळलेला चेहरा, विस्कटलेले केस आणि दिसेल ते घातलेले कपडे. त्याच्यामागून बायको उतरली त्याची. बायकोच असावी. तिच्यासाठी थांबला तो बारीक पडणाऱ्या पावसात भिजत. त्याच्या त्या असं सकाळी धडपडत झोपेतून उठून येण्यात, बस जाईपर्यंत वात पाहण्यात सॉलिड प्रेम वाटत होतं मला. ती एका बसमध्ये बसली आणि तो निघाला टांग मारून. मला शिवाजीनगर बस मिळाली. बसमध्येही झिम्मा वाचत बसले. डेक्कन कॉर्नर लाच उतरून रिक्षा केली. म्हटलं कुठे चालायचं परत. रिक्षामध्ये उग्र वास उदबत्तीचा. अर्थात असे रिक्षावाले मला सिगारेटच्या वासापेक्षा कधीही चांगले वाटतात. निदान धंद्याची पूजा तरी करतात असं वाटतं. 
         पावसात असा विविध साधनांनी प्रवास करायची गेल्या १० वर्षातली पहिलीच वेळ असेल. अमेरिकेत गाडी हे केवळ नाईलाज म्हणून घेतलेलं वाहन. पण त्यातून जाताना निसर्गापासून, रोजच्या या पळापळीपासून दूर गेलेय हे जाणवलंच नाही. म्हणजे पाऊस आहे तर ज्यादा कपडे, चप्पल घेऊन जा, पावसातून भिजून आलाय म्हणून गरम गरम चहा करून द्या, कधी वडापाव तर कधी भाजलेलं कणीस. वापरायला जुने कपडे, सुकत घातलेल्या कपड्यांवर सतत लक्ष की कधी पाऊस येईल. 'जरा थोड्या वेळाने निघ, पाऊस कमी झाल्यावर',' आता कुठे पावसा पाण्याची येतेस' अशी वाक्यं. सगळं विसरले होते मी गेल्या कित्येक वर्षांत ते गेल्या एका महिन्यात अनुभवलं. पण कुठं आणि कसं मांडावं हे कळत नव्हतं म्हणून हा अस्वस्थपणा. 
आता इतक्या वर्षात इतकं तरी कळलं की या त्रासातून सुटका नाही. पण त्या-त्या क्षणाला आपल्यातला कमीपणा जाणवून लोकांची प्रतिभा दिसण्याची बुद्धी तरी मिळाली हेही नसे थोडके. :)
 
-विद्या. 

Monday, May 06, 2013

फक्त माझ्यासाठीच

परत आले आणि घर माणसांनी भरलं,
महिन्याभरातच कौतुकही सरलं.
मग हळूहळू मला दिसायला लागलं
भोवतालचं जग, अगदी माझं , फक्त माझ्यासाठीचं.

माझ्यासाठीच छोटासा तुकडा जमिनीचा
हवेत बांधलेला आणि एक त्याच्या वरच्या आकाशाचाही.
त्याच्या गच्चीतून दिसणारी
माझ्यासाठीचीच १४ झाडं आणि २५५ तारे सुध्दा.

बाईने पुसलेलं स्वच्छ घर, फारतर अंगणही आणि बिल्डींगचं आवारही.
माझ्यासाठीची स्वच्छ हवा, ए. सी. मधली
आणि तोंडावर बांधलेल्या कापडाच्या तुकड्यामधली.
माझ्यासाठीची सुरक्षा फक्त बंद दाराच्या कुलूपामधली
आणि बँकेच्या लोकरमधली, माझ्या आणि माझ्या घरच्यांसाठी.

फक्त माझंच स्वातंत्र्य तुफान गाडी चालवायचं
आणि सिग्नलला हळूहळू पुढे सरकताना
मिळणारी जागाही माझीच.
'शेड'ही पर्सनल 'Ray- Ban' मधून मिळणारी.
माझ्या कानातलं मधुर संगीतही  माझ्यासाठीच
माझ्या खिशातल्या आयफोन मधलं .

तर असं माझं खास जग माझ्यासाठीच.
रात्री स्वनिकला चंद्र दिसला नाही.
म्हटलं, तोही गेल्या असेल दुसऱ्याच्या तुकड्यामध्ये
तोही आपलाच फक्त आपल्या पौर्णिमेपर्यंत.

-विद्या.
 

Tuesday, April 16, 2013

पोटभरून प्रेम

          पोचले एकदाची, म्हणजे भारतात. गेल्या कित्येक महिन्याची तयारी, कामाचा ताण, सामानाची बांधाबांध सर्व करून, पोरांना घेऊन सुखरूप पोचलो. त्या गेल्या काही दिवसात आम्हीच नाही, इकडे बाकी लोकांची तयारीही चालूच होती. आईने लगेच तुला तुरीची डाळ, उडीद डाळ, गहू, तांदूळ वर्षाला किती लागते याची चौकशी सुरु केली. आता रोज लागेल तसे सामान आणून ठेवणाऱ्या आमच्यासारख्या कामगार वर्गाला काय माहित किती किलो भात लागतो वर्षाला ते? त्यात मग म्हणे अगं, हरभऱ्याची पण लागते जास्त, बेसन गिरणीत करून आणतो ना? किती हे किचकट प्रश्न.
          एक दिवस आईचा फोन,'अगं, मामीकडे गेले तेव्हा मेतकुट होतं तिथे छान. तुला आवडतं म्हणून मामीने आहे तेव्हढ तरी घेऊन जा म्हणून बांधून दिलं'.
माझ्या मामीला मी गेल्या कित्येक वर्षात, १-२ तासापेक्षा जास्त भेटले नसेन, पण तरी मी येणार म्हटल्यावर तिने दुकानात चौकशी केली, नाही मिळत तर आहे ते तरी घेऊन जा म्हणून सांगिलते. मला वाटलं,काय धागा असतो या लोकांच्या मनात प्रेमाचा? जो कितीही वर्षं झाली तरी तसाच टिकून असतो. अजिबात झिजत नाही कि तुटत नाही. मग पुढचा प्रश्न आला मनात. हे असं प्रेम नेहमी खाण्यातूनच कसं दिसतं? म्हणजे अगदी जगभरात सगळीकडेच.हे खाण्यातून, वाढण्यातून, पोट भरून खायला घालण्यातून दिसणारं प्रेम कसलं?
         आम्ही परत येणार म्हटल्यावर तिथे ऑफिसमधले लोकही म्हणाले,'We should go for lunch sometime'. वेगवेगळ्या लोकांच्या, कधी घरी, कधी बाहेर जेवण सुरु झाले. आता भेटायचेच तर नुसते चहा पाणी करूनही भेटता येतेच की. मग जेवणच का? त्यातही मग तुला जे आवडते तेच करते इ. ऑफिसमधले सगळेजण बाहेर जेवायला जातानाही मला जे आवडते तेच ठिकाण बघू इ. विषय. मला लाड करून घ्यायला काहीच प्रोब्लेम नाहीये. :) पण सांगायची गोष्ट म्हणजे, रित एकच, मग ते भारतीय असो, अमेरिकन किंवा व्हिएतनामि.  अगदी मी पुण्यातील कंपनीतून जाताना 'काका हलवाई चे पेढे' आणण्यातले आणि शिकागोतील आपल्या आईकडून खास माझ्यासाठी केक बनवून घेण्यातही तेच प्रेम.
         या झाल्या नेहमीच्या रिति. अगदी नवरा बायकोमधेही प्रेम हे असंच व्यक्त होतं ना. नवीन लग्न झाल्यावर काहीतरी वेगळं, आवडीचं करून वाढायची इच्छा, मग ते कसं झालंय हे पाहण्याची उत्सुकता आणि पोटभरून खाल्ल्यावर मिळणारा आनंद हे सर्वच कसं गोड. ते मग अगदी म्हातारे झाल्यावर पोळी मोडायला त्रास होतो म्हणून तूप लावून गुंडाळून झाकून ठेवण्यापर्यंत कायम चालूच राहतं. आता आजकाल पोरांच्या आवडी निवडीची त्यात भर पडली आहे. नुसत्या उकडलेल्या भाज्या आवडतात म्हणून त्या देण्यापासून पालक पनीर पर्यंत सर्व केलं मी. आणि त्यांनी पोटभर खाल्लं की आपलंच पोट भरल्याचा आनंद.
         माझं जाऊ दे, मुलांनाही इकडे आल्यापासून मिळाले नाही म्हणून, त्यांच्या मावशी, मामाने पास्ता आणून दिला, अंडी करून खायला घातली भेटल्यावर. आणि किती आवडीने खात आहेत हे पहात राहीले. :) काल आई परत आली भेटायला, तर येताना घरून थालीपिठ घेऊन आली. म्हटलं, 'अगं दही नाहीये सायीचं'. तर म्हणे, 'तेही घेऊन आलेय'. :) म्हणजे मुलं लहान असली काय आणि मोठी काय, हौस तीच.आता जरा मिळतेच आहे संधी तर लाड करूनच घेते थोडे दिवस तरी. आणि हे असं पोटभरून प्रेमही करवून घेते सर्वांकडून.  :) बाकी शिकागो ते पुणे प्रवासाबद्दल पुढच्या वेळी.
-विद्या.

Friday, March 01, 2013

एक पत्र

एक पत्र छान रंगवलेलं
अगदी सुंदर अक्षरात लिहिलेलं,
परवा रात्री कपाटात खालच्या कप्प्यात मिळालं. (सो ss टिपिकल)
तुझ्या जुन्या पिशवीत.

'कधी लिहिलेलं रे मी हे?' मी विचारलं.
तो नुसताच हसला. पण मला आठवू नये हे नवलंच, नाही?
'मी कित्ती पत्रं लिहिली याची गणतीच नाही', तो.
'हो, कारण तू लिहिलीच नाहीस', मी. हे बरं आठवलं?

बरं आठवलं कधी लिहिलंय ते.
पण प्रत्येक वाक्यात 'सोनू,सोनू'करणारी ती
आणि पोरं झोपलीत तोवर सफाई उरकून घेऊ
म्हणत घाई करणारी मी
सारखीच मात्र वाटली नाही.

अर्थात मळक्या बनियनमध्ये बसून
वायरी गुंडाळून नीट लावून ठेवणारा तू
आणि मला भेटायला आवरूनच येणारा तो
हे तरी कुठे सारखे होते? नाहीच.

होतं तरी काय त्या पत्रात?
एका वेड्या मुलीची वेडी स्वप्नं.
हेच, घर, संसार, पोरं, बाळं, सगळं.
वाचताना जाणवलं, बरं ती वेडी
पण देव तरी किती वेडा?
सगळं देऊन टाकलं?
द्यायचच होतं सर्व तर विसरायला का लावलं?
म्हटलं बरं झालं बाई
पत्रात टिपून तरी ठेवलेलं.

डोळ्यात दोन थेंब येउन बंद करून टाकलं.
त्याच्यासोबत पोरांचं एक खेळणंही बॉक्समध्ये टाकलं.
इतकं आवरून दमल्यावरही
पोरांना मायेनं कुरवाळताना त्याला पाहिलं,
वाटलं, हे क्षण डोळ्यात भरून ठेवण्यासाठीच बहुतेक
पूर्वीचं विसरायला लावलं.

-विद्या. 

Monday, January 21, 2013

शब्द

           काही दिवसांपूर्वी एक ओळखीची व्यक्ती भारतात जाणार होती लग्नाला. त्याने सानूला विचारले होते की 'काय आणू तुझ्यासाठी येताना?'. तिने तिची नेहमीची लिस्ट सांगितली. 'चोकलेट, गुलाबजाम, म&म(M & M ),इ.'. तो परत आल्यावर तिचा पहिला प्रश्न होता,' माझे M & M आणलेस?' आता तो बिचारा लग्नाच्या घाईत असणार. अजून ब्यागही उघडल्या नसाव्यात त्याने. असो, एकूण काय त्यादिवशी त्याने काही आणले नव्हते. मग पुढच्या वेळी भेटल्यावरही तोच प्रश्न. तेव्हाही तो असाच घाईत आला होता. आता अशावेळी तिला कसे समजवायचे म्हणून मग मी माझ्याकडे असलेल्या काही गोळ्या तिला दिल्या आणि सांगितले कि त्यांनी दिल्या आहेत. आता मुले म्हटली की असे छोटे मोठे किस्से होतच राहतात. म्हणजे सानू तर एकदम वसुली खाते आहे. एकदा तिने पहाटे विचारले की काल रात्री डाळिंब देणार होता ते दिले का नाही म्हणून. पण मला तिचा निरागसपणा पाहून वाईट वाटले आणि भीतीही. की अशा निरागस पोरांना बाहेरच्या जगात कसे सोडून देणार म्हणून. तिच्यासाठी एखाद्याने सहजपणे बोललेले वाक्यही 'काळ्या दगडावरची रेष' आहे. समोरचा जे  काही बोलत आहे तो तसाच वागणार याची खात्री, विश्वास.
           मग मी आठवायला लागले माझ्यासाठीही अशीच प्रत्येक वाक्य एक 'काळ्या दगडावरची रेष' असेल कधीतरी, मी लहान असताना. पण ती कधी पुसली गेली ते काही आठवेना. अगदी सहावी, सातवीपर्यंत आठवतंय की मी दादांना सातारला गेले की 'नवनीत व्यवसायमाला' आणायला सांगायचे.(अभ्यासासाठी कुणी असे मागे लागेल का? असो.) तर दोन-वेळा त्यांनी नाहीच आणली. ते त्यांच्या कामात असतील, त्यात माझे पुस्तक महत्वाचे नसेलही. पण ते 'आणतो' म्हणाल्यावर ते आणणार हे माझ्या मनात पक्कं असायचं. त्यांनी ते न आणल्यावर मी रडून घातलेला गोंधळही आठवतो. म्हणजे निदान तोवर तरी समोरच्या माणसाने दिलेला शब्द तो पळणार याची मला निरागस खात्री होती. मग ती कधी पुसली गेली?
         माझा तो विश्वास बहुदा शाळेतल्या अनुभवानंतर 'अपेक्षा' या गटात गेला असावा. कारण तोवर एखाद्याने शब्द दिला तरी तो/ती तो शब्द ठेवणार की नाही ते त्या व्यक्तीच्या स्वभावावरून, आधीच्या वागण्यावरून मला कळू लागलं होतं. पण मग तरीही त्या एका खास व्यक्तीने दिलेला शब्द तेव्हढाच महत्वाचा वाटायचा. 'त्याने का केला नसेल फोन? का नसेल पोचला वेळेवर इतक्या वेळा सांगूनही?' असे मोठे मोठे प्रश्न मला पडायचे. म्हणजे लोकांची पारख करणं,अनुकूल परिस्थिती नसेल हे सगळं समजण्याचं वय असूनही 'तो' एक शब्द माझ्यासाठी 'काळ्या दगडावरची रेष' असायचा. मग पुढे या नात्यातही अपेक्षा, अपेक्षाभंग,भांडणे, दु:ख हे सगळं आलंच. पण त्या सगळ्यांमधून जाताना प्रत्येकवेळी मी माझ्यातल्या त्या छोट्या निरागस मुलीला मागे टाकत होते का? हो बहुतेक.
          बर हे सगळं झालं माझ्यावर होणारा लोकांच्या वागण्याचा परिणाम. माझ्या वागण्याचं काय? दिवसातून आपण कितीवेळा असे शब्द बोलतो जे आपण पूर्ण करू शकणार नाही हे आपल्याला मनातून माहित असतं? साधी गोष्ट, सकाळी एक मेल येते क्लायंटची एखादं काम करण्यासाठी. जेव्हा ती येते तेव्हाच माहित असतं की इतकं काम आहे की आज शक्यच होणार नाही. पण तरी लिहितोच 'आज संध्याकाळ पर्यंत करून टाकेन काम'. म्यानेजरला एखादी गोष्ट करून घेण्यासाठी मागे लागतो, तो म्हणतोही करेन, पण तो प्रयत्नही करत नाही आणि आपण फक्त त्याने ते करावं म्हणून अपेक्षा करत राहतो. एखाद्या वाढदिवसाला जायचं असतं, जायचा कंटाळा आलेला असतो, पण ते सरळ न सांगता 'कळवते मी. सांगेन तुला तसं . इ. ' निरोप ठेवतो. एखाद्याकडून निघाल्यावर म्हणतोही, 'घरी पोचल्यावर फोन करते.' पण घरी आले की समोर जे दिसतंय ते काम करत राहतो आणि मग नंतर फोन केल्यावर कारणं सांगत बसतो. आणि मी या सगळ्या लिहिलेल्या गुन्ह्यामध्ये दोषी आहे. माझ्या शब्दाला माझ्या मते काहीच किंमत नाहीये का म्हणजे? केवळ बोलायचं म्हणून बोलते का मी? आणि जर माहित आहे की एखादी गोष्ट शक्य नाही होणार तर मग आधीच खरं का नाही सांगत? स्पष्ट बोलायला लोक जरा जास्तच टाळायला लागले आहेत असं वाटतं मला आजकाल. का नाही बोलायचं खरं? आणि बोललेलं का नाही करायचं खरं?
          कधी संदीप सानुला प्रोमिस करायला लागतो तेव्हा मी त्याला थांबवते कारण मला माहित असतं की ते शक्य नाही होणार तर मग उगाच तिला खोट्या आशा का दाखवायची म्हणून. तर हे पोस्ट लिहिता-लिहिता मला वाटलं की का नाही मी पण तसंच वागायचं रोजच्या आयुष्यात? तर आजपासून मीच माझ्या शब्दाला किंमंत द्यायचं ठरवलं आहे.

-विद्या.


Tuesday, January 15, 2013

खुसपूस, कुई-कुई आणि भोकाड

         जुन्या पोस्ट वाचताना लक्षात आले की माझ्या पोस्ट माझं त्या-त्या वेळचं आयुष्य रिफ्लेक्ट करतात. आणि ते योग्यच असाव कारण तोच तर या ब्लॉगचा हेतू आहे. आणि माझी सध्याची फेज ही मुलं सांभाळून नोकरी अशी आहे असं वाटतंय. कारण ही पोस्ट त्याबद्दलच आहे. रोज रात्री दहा वाजेपर्यत मुलांना झोपवून एक तासभर तरी टी व्ही पहायला मिळवणे हे एकच ध्येय असतं संध्याकाळी घरी आलं की. रात्री १० वाजेपर्यंत ते झोपले की अगदी जग जिंकल्याचा आनंद होतो. मग जरा फेसबुक, मेल, डील्स, टी व्ही या सगळ्या गोष्टींना निवांत पणा मिळतो. पण हा सर्व आनंद सकाळीही चेहऱ्यावर असेलच असं नाही.
         घड्याळ्यात बारा वाजल्याशिवाय डोळे मिटायचे नाहीत हा आमचा दोघांचा अलिखित नियम. डोळ्याच्या खाचा झाल्या तरी चालतील मग. तर आम्ही असे बारा वाजता जाऊन टेकतो आणि झोप काय लगेच लागतेच. निजेला  खरंच मला धोंडासुद्धा चालेल इतकी दमलेली असते मी. आणि लोक जे म्हणतात ना की आई झाल्यावर मुलाच्या आवाजाने जाग येतेच, कान हलके होतात, इ, इ हे सर्व एकतर खोटं आहे किंवा संदीप आमच्या मुलांची 'आई' आहे. तर साधारण साडेबारा-पाऊण च्या दरम्यान  स्वनिकची हालचाल सुरु होते. मी झोपलेलीच. संदिपच उठून दूध आणतो त्याला देतो आणि दोघेही झोपून जातात. ही झाली बेस्ट केस. त्याला स्टेप वन म्हणू.
          तर बेस्ट केस नसली तर मात्र, स्टेप वन मुळे थोडा वेळ हालचाल थांबते. पाच दहा मिनिटांनी खुस-खूस सुरु. अशा फालतू खुस-खुशीला कुणी लक्ष देत नाही. जो पर्यंत ही खुस-खूस बारीक रडण्यात आणि बारीक रडण्यावरून 'भोकाड' या टीपेला जात नाही तोवर कुणीही लक्ष देणार नसतं. हे ओळखून स्वनिकही लगेच वरची टीप धरतोच. अर्थात हे सर्व संदीपलाच ऐकू येत असतं. त्याचे रडगाणे जोरात सुरु झाल्यावर काहीतरी करणं मग भाग पडतंच. संदीप मग त्याच्या उशीजवळ पडलेला पॅसिफायर शोधायला लागतो. गादीवर गोल गोल फिरून तो स्वनिकाने कुठे टाकलेला असेल हे सांगता येत नाही. आणि अगदी स्वत:च्या डोक्याजवळ असलाच तरी तो लगेच मिळेल असं नाही. तर एकूण नशीब चांगले असेल तर पॅसिफायर लगेच मिळतो आणि स्वनिकला तोंडात तो देऊन सर्व परत बेक टू झोप. आता ही झाली सेकंड बेस्ट केस.
            दुध झाले, पॅसिफायर झाला. तरीही खुस-खूस संपत नाही. पाच दहा मिनिट शांतता आणि परत भोकाड चालूच. बराच वेळ झाला आवाज बंद का होत नाही म्हटल्यावर 'आई' म्हणणाऱ्या मला काहीतरी त्रास व्हायला लागतो कानाला. मी,'काय रे, काय झालं. अजून का झोपत नाहीये? ' . 'पोटात दुखत असेल का?' संदीपचा प्रश्न. मग त्याला ग्राईप वॉटर द्यायचे की इथे एक Infant Gas Relief औषध मिळते ते द्यायचे त्यावर निर्णय घ्यायला लागतो. दोन्ही पैकी काहीतरी एक देऊन त्याला झोपवायाचा प्रयत्न करतो आणि आम्हीही तसेच आडवे पडून जातो. यात माझा सहभाग फक्त स्वनिकला पकडणे इतकाच असतो. बाकी औषध आणणे, ते स्वनिकला देणे, तो रडत असताना तोंड पकडून तोंडात घालणे, इ. संदिपकडेच. नशिब चांगले असेल तर जे काही त्याला दिले आहे ते काम करते आणि आम्ही सर्व सकाळपर्यंत डाराडूर.
          पण कधी त्यानेही फरक पडत नाही. मग अजून तासाभराने खुसपूस, कुई-कुई आणि मग भोकाड या स्टेजेस येतात. आता मात्र मी वैतागते. आणि खरंच काहीतरी गडबड आहे असं म्हणून सूत्र माझ्या हातात घेते. एकतर रात्री थंडी असेल तर आम्ही मस्त गरम पांघरूण घेऊन झोपलेलो असतो आणि स्वनिक तसाच. त्यामुळे त्याला थंडी वाजत असेल का? किंवा उन्हाळ्यात गरम होता असेल का असे प्रश्न आम्ही एकमेकांना विचारतो. एक मात्र नक्की असतं. जे काही त्याला होत आहे याच्या एकदम उलट माझं तंत्र असतं. तर आम्ही त्याला काय होत असेल हे बोलत असताना रडण्याचा आवाज आता अशक्य मोठा झालेला असतो. त्यात मग शेजारच्या रुममध्ये झोपलेली सानू उठते की काय म्हणून अजून भीती.
आणि जसा आवाज वाढेल तसा संदीपला अस्वस्थ होऊन गरम व्हायला लागते. मग तो हळूहळू ती-शर्ट काढ, ए-सी लाव असे प्रकार सुरु करतो.
          कधी डायपर बदलून बघतो. तर कधी अजून एखादा कपडा घालतो थंडी वाजत असेल म्हणून. तर कधी खांद्यावर घेऊन झोपवतो, कधी मांडीवर घेऊन बसतो. जसा झोपेल तसा, ज्या कुशीवर असेल तसे. कधी मग ताप तर नाहीये ना रे? म्हणून थर्मामीटर आणून चेक करतो. तर कधी कान दुखत असेल का म्हणून त्याला दुध देऊन बघतो. (कान दुखत असेल तर मुलं काही प्यायला नको म्हणतात. कारण गिळताना कान दुखतो.) कधी त्याला अगदीच बरं वाटत नाहीये असं वाटलं तर मध्यरात्रीच उद्या सुट्टी कुणी घ्यायची ऑफिसमध्ये यावर बोलून घेतो. या सगळ्यात नक्की कशाने त्याला फरक पडला असेल हा विचार करायला सवड कुणाला असते? तो जर झोपलाच परत तर पटकन आम्हीही गुडूप होऊन जातो.
        सकाळी उठल्यावर हे महाशय एकदम ताजेतवाने आणि आमचे तारवटलेले डोळे. काल रात्री काय झालं होतं विचार करायालाही वेळ मिळत नाही की सकाळची धावपळ सुरु होते. मग पुन्हा तेच चक्र.  हे सर्व एकाच रात्रीत होते असे नाही किंवा रोजच असेही नाही. पण दोघंच असं मुलांना सांभाळणं म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या निर्णयापर्यत सर्वच करायचं म्हटलं की ही अशी रोजची कसरत सुरु असते. त्यात असे रात्री झोपलेल्या अवस्थेत योग्य निर्णय घेतोच असेही नाही. घरात कुणी मोठं माणूस असलं की किती फरक पडत असेल असं वाटतं कधी. घरी नंतर फोन करून किंवा इन्टरनेटवर असताना हे सर्व सांगितलं की घराचे सूचना द्यायला लागतात. आणि मग आमच्यासारखे 'शिकलेले' म्हणवणारे लोकही मग नेटवरून आईकडून पोरांची दृष्ट काढून घेतात. :)
-विद्या.

Saturday, January 12, 2013

फक्त पाच मिनिट

शनिवारची दुपार आहे मस्त. बाहेर जरा ढगाळ वातावरण आहे. संदीप, सानू आणि स्वनिक तिघेही झोपलेत. म्हटलं निवांत टिव्ही बघत बसावे, म्हणून रिसिव्हर सुरु केला तर रेडिओ सुरु झाला होता मघाशी लावलेला आणि त्यावर 'बिल्लू बार्बर' मधलं, 'चांद या सितारा कोई' लागलं होतं. सही वाटलं. म्हटलं कुठे लावायचा टीव्ही ऐकत बसावं गाणीच अशी शांततेत. मग हे असं वातावरण, गाणी आणि शांतता मिळाले की हात शिवशिवायला लागतात लिहायला. हे लिहितेय तोवर,'मेरे ब्रदर की दुल्हन' मधलं, 'इस्क रिस्क' लागलंय. म्हणजे नुसती एकावर एक आवडती गाणी लागताहेत आणि मी त्यांच्या मागे धावतेय असं वाटतंय. :) असो. तर हे असं गाणी ऐकण्यावरून आठवलं. शाळेत असताना ना सकाळी आकाशवाणी वर १० ते १०.३० पर्यंत जुनी हिंदी गाणी लागायची. तर कधी मराठी भावगीते. आणि मी अभ्यास करत बसलेली असायचे. पण मग असं एखादं गाणं लागायचं की वाटायचं 'या अभ्यासाच्या विचारातून फक्त फक्त पाच मिनिटे बाहेरपडू देत. मग परत पुस्तकात जाईन.' अर्थात कुणाचं बंधन नसायचं पण तरी त्या गाण्याला पूर्ण वाव देण्यासाठी स्वत;च असं स्वत:ला मोकळं सोडायचं. :)
तसंच परीक्षेच्या वेळी व्हायचं. आईने लायब्ररीमधून एखादं पुस्तक आणलेलं असायचं. पण त्याला वेळ द्यायला कुठे परमिशन असायची? समोर पुस्तक दिसतंय पण हातात भूगोलाचं पुस्तक. :( वाटायचं 'फक्त पाच मिनिट वाचते. मग परत येते तुझ्याकडे.' :) आता ४०० पानाच्या पुस्तकाला पाच मिनिट काय पुरणार? पण तरी मी आई येत नाहीये ना बघून पटकन हावरट सारखी ते पुस्तक हातात घ्यायचे. बर अजून एक पान अजून एक पान असं करत अधाशा सारखे वाचत सुटायचे. तेच परीक्षा संपल्यावर हक्काने ते पुस्तक परत वाचायला घ्यायचा काय तो आनंद असायचा. एकदा तर मी आईशी भांडले पण आहे. परीक्षा संपली म्हणून आनंदात आहे तर आईने आपलं पापड, कुरडया करायला काढलेलं आणि माझी पुस्तके परत बाजूला. मग काय? भांडले खूप. :)
पुढे कॉलेज आणि नोकरीत असताना 'त्याचे' विचार यायचे मनात. आता हातातलं काम तर सोडून बसता येत नाही ना? एक तर कॉलेज मध्ये अभ्यास शेवटच्या दिवशी, तसंच कामही अगदी घाईच. पण त्यात वाटायचं एक पाच मिनिट 'त्याचा' विचार करते. बस पाचच मिनिट. मग परत कामाला लागेन. मग हातातलं काम सोडून उगाच काल काय बोलणं झालं, मग नंतर कधी भेटायचं, पुढच्या ५-१० वर्षाची स्वप्नंही त्या पाच मिनिटात बघून घ्यायची. :) आणि मग पुढ्यातल काम उरकायचं.
आत्ताही बाहेर जायचं आहे, पण ही गाणी, जुन्या आठवणी, आणि त्यबद्दल लिहायचं सोडून जायची इच्छा होत नाहीये. ते पण काम पाच मिनिटात उरकून येता आलं असतं तर बरं झालं असतं. असो निघतेच आता. :(

-विद्या.

Thursday, January 10, 2013

विरोधाभास

गेले दोन दिवस, डोक्याचा पार भुगा झाला आहे. ऑफिसमध्ये दिवसभराची सलग मिटिंग म्हणजे किती त्रास असतो हे कळलं आहे. आता कामाबद्दल असं ब्लॉगवर माझं लिहिणं कधी झालं नाही किंवा तितकं ते महत्वाचंही वाटलं नाही. पण मागच्या माझ्या 'कस्टम-मेड' पोस्ट नंतर या मिटींगमध्ये गेल्यावर स्वत:वरच हसू आलं. म्हणजे माणसाची आवड आणि काम या दोन गोष्टी किती वेगळ्या असू शकतात याचं उदाहरण होतं ते. मागच्या पोस्ट मध्ये मला कसे इथे कपडे खरेदी करायला आवडत नाही आणि भारतात ड्रेस शिवून घेणं किती मस्त कार्यक्रम आहे यावर मी भरभरून लिहिलं होतं. त्यानंतर गेला महिना काही लिहिणं झालं नाही.
पण आज एकदम एक विचार मनात आला आणि लिहायची इच्छा झाली.
गेले काही दिवस एका प्रोजेक्टवर काम चालू आहे ज्यात प्रत्येक काम जास्त वेगाने आणि कमी लोक वापरून कसं करता येईल यावर बोलणं चालू आहे. अर्थात ते काही नवीन नाही. पण विषय आहे, 'इम्ब्रोयडरी'  सारखी कलाकुसर तुम्हाला ड्रेस वर करून हवी असेल तर ती मशीनने कशी करून घ्यायची. :) मग त्यात परत तेच विषय आले. कापड कुठल्या प्रकारच आहे? जर जाड असेल तर त्याला कुठल्या प्रकारची शिवण लागेल? जर कुणी बारीक मुलीने ड्रेस मागवला असेल तर तिचा साईझ आला, 'small'. मग त्यावर समजा तिचं नाव निघालं ३५ अक्षरी तर मग ते तिच्या बाही खालून जाऊन पाठीवर नाही का जाणार? त्यासाठी काय करायचं? एखादा हुशार म्हणाला मला माझं नाव माझ्या शर्टाच्या खिशावर लिहून हवंय, तर मग खिसा आधी शिवलेला असेल तर त्यावर शिवण कशी घालणार ना? त्यासाठी काय केलं पाहिजे? समजा एखाद्याने सांगितले की मला काळ्या शर्टावर काळ्याच रंगाने नाव लिहून हवंय तर? तर त्यावर उत्तर मिळालं,  'कॉमन सेन्स' वापरायचा ना माणसाने? :) मग शेवटी ठरलं फक्त नोट लिहायची 'फॉर्म' वर की बाबा तू जर गडद रंगाचा कपडा आणि गडद रंगाची इम्ब्रोयडरी सांगत असशील तर विचार करूनच 'कन्फर्म' कर. आता मग तो काय ठरवेल ती त्याची चूक.
एखाद्याने जर शर्ट आणि पॅंट दोन्ही मागवलं असेल तर ते घेऊन तर यायचे वेअर हाउस मधून एकत्र. पण मग ते इम्ब्रोयडरी साठी वेगळे होतील ना? मग ते एकत्र राहतील याची 'खात्री' कशी करायची? आणि समजा ते एकत्रच ठेवले इम्ब्रोयडरी करतानाही तर मग त्याच्यावर धागे, दोरे, धूळ नाही का बसणार? मग काय करायचं?
तर आता हे काम फास्ट व्हायला पाहिजे, कमी लोकही पाहिजेत आणि चांगले काम पण झाले पाहिजे. मग त्यासाठी खूप भारी मशिनरी मागवली. म्हणजे एकावेळी १२ वेगळे मशिन्स एकत्र चालतील असे. त्यामुळे माझ्यासोबत अजून अकरा लोकांचं कामही त्याच मशिनवर करता येईल. पण मग मला हवा तो रंग, फोन्ट वेगळा असेल बाकी ११ लोकांपेक्षा तर? तर मग त्यासाठी वेगळे सोफ्टवेअर ज्यात बाराही लोकांचे काम एकदम फीड करून ते एकाच मशीन वर केले  जाईल एकाच वेळेला. :)
आता डिसाईनर म्हणून ते सर्व मला करायला खूप मजा येतेय कारण माणसाचं काम मशीनमध्ये बसवायचं म्हटलं की नेहमीच गोंधळ असतो. :) त्या मेंदूत जी गणितं माणूस करतो ती सगळी मशीनमध्ये बसवायला. पण गेल्या पोस्ट मध्ये मी जे लिहिलं होतं माझ्या अनुभवाबद्दल त्याच्या एकदम विरुद्ध काम मी करतेय हे जाणवलं आणि हसू आलं. असो.

विद्या.

Friday, January 04, 2013

My 2 cents -English

         So now I am one of those people too, you know, the ones who have been writing about the recent rape incident. So there have been demos, discussions,Facebook posts and lot of imaginative options to punish the rapists. Even i shared all the information I got on facebook 'blindliy' just in case if it saved anyone's life. But its not something different than what all of us have done so far. Rather I have even skipped reading some of the news and people's views on their blogs about this news. But I always wondered who are these people? I mean what 'type' of people are they? I couldnt get an answer because we havent defined profiles of these criminals at all. Being a girl I never felt any difference in behaviour towards me in my life except for certain times. As a kid, I always thought my parents liked my brother more than me and just to have a boy we 3 daughters were born. But apart from that, in school never I felt any less while competing with my classmates for the highest ranks. Rather my grand-pa was upset about me getting less marks in Sanskrit. But never thought, what I am going to do anyways with good grades.

         Even later I went on studying and getting a job and had a good friend circle with many of them boys/men. Why didnt I ever meet one these animals there? Rather there have been friends who took care of me, gave me a lift home whenever it was late and made sure I was safe. There have been times when I competed with the same people for good ranks and good ratings in office and also had fights over right and wrong. But never did I an animal like this. Rather after the Delhi incident I saw many of the blogs written by men, none by a girl. I dont know why. But then the question is 'who are these people? These rapists?'For a minute I wanted to say to all my family and friends that I want to thank them for treating me equally so far. But then I realised, I dont have to thank them, its my right. But maybe I should respect them for their treatment towards to me. So again, 'who are these people?'. are they the poor,illiterate ones? Cause I am sure there must many rich ones in the list too. Rather even heard of the news where the father was killed while saving the girl from eve-teasing. So definitely not just 'poor' and 'illiterate'.Forget about rape, will these poor, illiterate people save money to terminate the girl fetus?
         So who are these people? I thought maybe I should start with asking my close ones about this. If they could have some insight and see if they have ever done a discrimination? Though a collegue/friend may have respected me as a team-mate and treated me equally, has he been the same way in personal life as well? During the marriage, have you asked or expected something from your in-laws directly/indirectly? You may not have asked but have your let your parents do that? Have there been different rule in household for a girl and boy? Have you stayed late out of the house while your sister had to be home by 7? Have you been a parent where you saved for your's son's education instead of your daughter's? Have you been protective of your friend to avoid her from eve-teasing but participated in it for others? Have you called a girl 'maal','chikni','cheez' or 'item' ever? Lets say you let your daughter get all the education she wanted, but still saved something for dowry for her marriage? Have you ever fought with your wife for she gave money to her parents? When you got all that education and got good job, you became part of the upper-middle class. Have you ever ignored the incidents that happened at your village just because you didnt want to get into it? Well, I have done that and believe me it feels terrible. I dont know if I had done something had I knows earlier. But not anymore. I wouldnt let something like this go by me and stay away from it.
So my question to all my friends and family is, if we have been part of any of the above things, havent we been one 'those' people as well? At least 5%,10% or 50%. But we have been. What do you say?

-Vidya.

My 2 cents

        चला आता बाकीच्या लोकांमध्ये माझी पण भर पडलीच. हेच, बलात्कार, स्त्री-मुक्ती, वगैरे लिहीनारया मध्ये. बाकी आपण करायचे तरी काय? तर निषेध झाले, आंदोलने झाली, नेत्यांवर टीका झाल्या, फेसबुक वर काल्पनिक शिक्षा पण झाल्या. मग जमेल ती माहिती 'शेयर' करून झाली. कुणाचे प्राण वाचलेच त्याने तर बरंच की. तर एकूण या सगळ्यात बाकी लोकांपेक्षा मीही काही वेगळं केलं नाहीये. म्हणजे अगदी एखादा मराठी ब्लॉग स्किप पण केला की  काय तेच तेच वाचायचे म्हणून. पण मनातला विचार थांबत नव्हता. की  हे असले रानटी लोक असतात तरी कोण? म्हणजे मुला-मुलींमध्ये भेदभाव, वेगळी वागणूक वगैरे कधी खूप जाणवलं नाही मला घरी तरी. कधी लहान भावाचे लाड फक्त को मुलगा आहे म्हणून होतात असं वाटायचं आणि मुलगाच हवा म्हणून आम्ही तीन मुली झालो त्याच्या आधी तेव्हढंच. पण शाळेत मुलांशी अभ्यासात स्पर्धा विशेष करून दहावी मध्ये. अगदी जीव तोडून अभ्यास केला. आणि करू नकोस असं कुणी म्हटलंच नाही. उलट संस्कृत मध्ये मार्क कमी पडले म्हणून आजोबा नाराजच झाले. पण मुलगी म्हणून काय करायचे आहे जास्त मार्कांचे असे कधी वाटले नाही.
          पुढे हट्टाने दुसऱ्या गावात शिकायला राहिले, नोकरीला राहिले, पण हे असले लोक मला दिसले कसे नाहीत? रानटी, हैवान? जे मित्र होते ते तर सर्व काळजीने साथ देणारे, उशीर झाला तर घरी सोडणारे, माझ्याशी स्पर्धा करून पुढे जाणारे आणि वेळ आल्यावर हिम्मत देणारे. मग मला कसे नाही दिसले त्यांच्यामध्ये हे हैवान? अगदी बरचसे ब्लॉगही मुलांनीच लिहिलेले. एकही मुलीचा नाहीच दिसला. मग जर या मुलांना, पुरुषाना आपल्या मुलींची, बहिणींची, बायको, आईची इतकी काळजी आहे तर मग हे असले लोक आले कुठून? गरीब, आडाणी असलेले? पण त्यांच्याकडे तर गरिबीतून वर यायलाच वेळ नसेल तर ते ही असली कामे कुठून करत असतील. बर समजा असतील फक्त गरीबच, अडाणी लोक असे वागणारे. मग ते मुलीची छेड काढल्यावर बाप उलटला म्हणून एका पोलिसाला मारले तोही असाच होता का कुणी गरीब, अडाणी? ज्यांच्याकडे जेवायला पैसे नाहीत ते लोक भ्रूणहत्येसाठी करत हसतील का पैसे जमा कसेतरी?
         तर प्रश्न असा की हे लोक आहेत तरी कोण? आधी वाटले माझ्या घरच्यांना आणि माझ्या सर्व मित्रांना आभार मानावेत की मला तुम्ही आजपर्यंत माणूस म्हणून वागणूक दिलीत. पण त्यात आभार कसले? तो तर माझा हक्क होता. मग वाटले निदान अभिमान तरी वाटलाच की इतके चांगले लोक भेटले आयुष्यात म्हणून. मग म्हटले त्या सर्वांनाच एक पडताळा करून घ्यायला सांगावा अगदी मीही. म्हणजे असं की प्रत्येक पावलावर त्यांनी मला एक परकी स्त्री म्हणून आदराने वागणूक दिली असेल. पण त्यांनी स्वत:च्या आयुष्यातही तेच केले आहे का? त्या लोकांमध्ये हो पोस्त वाचणारे मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकही येतात. तर प्रश्न हा विचारायचा की व्यक्तिगत आयुष्यात मी दुटप्पी पणाने वागलो आहे का?
         ऑफिसमध्ये टीम-मेट सोबत समानतेने वागले तरी लग्नाची वेळ आल्यावर मला सासऱ्याकडून अमुकच भेट हवी असा वाद आपण घातलाय का? बर नसेल घातला तरी आई-वडिलांना घालू दिलाय का? मुलगी कितीही हुशार असली तरी तिची फी न भरता मुलासाठी बचत केलीय का? अगदी साधं म्हणजे मुलीला सातच्या आत घरात आणि मुलाला १० असे वेगळे नियम ठेवले आहेत का आणि अशा नियमाचा फायदा घेत खरंच दहाला घरी आलाय का?  मैत्रिणीला चिडवू नये कुणी म्हणून गाडीवरून सोडलं असेल, पण स्वत: कुणा मुलीला 'आयटम','माल', 'चिकणी','चीज' म्हणून चिडवलं आहे का? अगदी शिकवलं मुलीला खूप पण लग्नाची वेळ आल्यावर हुंडा द्यायची तयारी ठेवलीच आहे का? बायको माहेरी पैसे देतेय म्हणून चिडलाय का? हे सगळे झाले छोटे प्रसंग. आपण शिकलो, मोठे झालो, बरेचसे लोक गरिबीतून वर आले चांगली नोकरी लागली, इ. पण तरीही गावाकडे कुणी नातेवाईक आहेच जो अजूनही जुन्याच रिती पाळत आहे. त्याने केला असा भेदभाव. तर त्याला कधी थांबवले आहे का? आपण कशाला पडायचे मध्ये म्हणून गप्प राहिलाय का? मी राहिलेय. आणि त्याची टोचणी जात नाहीये केव्हापासून. काय करायचं सुचत नाहीये. कदाचित आधी कळल असतं तर काही केलं असतं का मी? माहित नाही? आणि आता बोलूनही उपयोग नाही. कारण आता परत असं कधी गप्प राहणारच नाही.
          क्षणाक्षणाला जर आपण असे दुटप्पी निर्णय घेत असू तर आपणच नाहीये का ते पशु? म्हणजे १००% नसलो तरी ५%,१०%, ५०%? काहीतरी असूच ना? त्यामुळे सध्या मला हे असले लोक कोण असतील याच्यापेक्षा आपल्यातच आहे का? असा प्रश्न पडलाय. तुम्ही पण करा पडताळा जमेल तर.

-विद्या.