Saturday, January 12, 2013

फक्त पाच मिनिट

शनिवारची दुपार आहे मस्त. बाहेर जरा ढगाळ वातावरण आहे. संदीप, सानू आणि स्वनिक तिघेही झोपलेत. म्हटलं निवांत टिव्ही बघत बसावे, म्हणून रिसिव्हर सुरु केला तर रेडिओ सुरु झाला होता मघाशी लावलेला आणि त्यावर 'बिल्लू बार्बर' मधलं, 'चांद या सितारा कोई' लागलं होतं. सही वाटलं. म्हटलं कुठे लावायचा टीव्ही ऐकत बसावं गाणीच अशी शांततेत. मग हे असं वातावरण, गाणी आणि शांतता मिळाले की हात शिवशिवायला लागतात लिहायला. हे लिहितेय तोवर,'मेरे ब्रदर की दुल्हन' मधलं, 'इस्क रिस्क' लागलंय. म्हणजे नुसती एकावर एक आवडती गाणी लागताहेत आणि मी त्यांच्या मागे धावतेय असं वाटतंय. :) असो. तर हे असं गाणी ऐकण्यावरून आठवलं. शाळेत असताना ना सकाळी आकाशवाणी वर १० ते १०.३० पर्यंत जुनी हिंदी गाणी लागायची. तर कधी मराठी भावगीते. आणि मी अभ्यास करत बसलेली असायचे. पण मग असं एखादं गाणं लागायचं की वाटायचं 'या अभ्यासाच्या विचारातून फक्त फक्त पाच मिनिटे बाहेरपडू देत. मग परत पुस्तकात जाईन.' अर्थात कुणाचं बंधन नसायचं पण तरी त्या गाण्याला पूर्ण वाव देण्यासाठी स्वत;च असं स्वत:ला मोकळं सोडायचं. :)
तसंच परीक्षेच्या वेळी व्हायचं. आईने लायब्ररीमधून एखादं पुस्तक आणलेलं असायचं. पण त्याला वेळ द्यायला कुठे परमिशन असायची? समोर पुस्तक दिसतंय पण हातात भूगोलाचं पुस्तक. :( वाटायचं 'फक्त पाच मिनिट वाचते. मग परत येते तुझ्याकडे.' :) आता ४०० पानाच्या पुस्तकाला पाच मिनिट काय पुरणार? पण तरी मी आई येत नाहीये ना बघून पटकन हावरट सारखी ते पुस्तक हातात घ्यायचे. बर अजून एक पान अजून एक पान असं करत अधाशा सारखे वाचत सुटायचे. तेच परीक्षा संपल्यावर हक्काने ते पुस्तक परत वाचायला घ्यायचा काय तो आनंद असायचा. एकदा तर मी आईशी भांडले पण आहे. परीक्षा संपली म्हणून आनंदात आहे तर आईने आपलं पापड, कुरडया करायला काढलेलं आणि माझी पुस्तके परत बाजूला. मग काय? भांडले खूप. :)
पुढे कॉलेज आणि नोकरीत असताना 'त्याचे' विचार यायचे मनात. आता हातातलं काम तर सोडून बसता येत नाही ना? एक तर कॉलेज मध्ये अभ्यास शेवटच्या दिवशी, तसंच कामही अगदी घाईच. पण त्यात वाटायचं एक पाच मिनिट 'त्याचा' विचार करते. बस पाचच मिनिट. मग परत कामाला लागेन. मग हातातलं काम सोडून उगाच काल काय बोलणं झालं, मग नंतर कधी भेटायचं, पुढच्या ५-१० वर्षाची स्वप्नंही त्या पाच मिनिटात बघून घ्यायची. :) आणि मग पुढ्यातल काम उरकायचं.
आत्ताही बाहेर जायचं आहे, पण ही गाणी, जुन्या आठवणी, आणि त्यबद्दल लिहायचं सोडून जायची इच्छा होत नाहीये. ते पण काम पाच मिनिटात उरकून येता आलं असतं तर बरं झालं असतं. असो निघतेच आता. :(

-विद्या.

7 comments:

aativas said...

'पाच मिनिटं' .. किंवा खरं तर 'एक मिनिट' किती महत्त्वाचं असतं ना अशा प्रसंगी! ही जणू प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी आणि तरीही खास व्यक्तिगत गोष्ट ..

Manasi said...

मस्त पोस्ट आहे :)
असं पाच मिनिटात ऑन-ऑफ होता येणं हे खरं कौशल्याचं काम आहे!

इंद्रधनु said...

मस्त लिहिलंय... माझंही हापिसात असताना कधीकधी असं होतं की पाचच मिनिटं फेसबुकवर जाउन यावं फक्त पाचच मिनिटं.... किंवा पाचच मिनिटं एखादा ब्लॉग वाचून यावा.... :)

Vidya Bhutkar said...

Thanks अतिवास, मानसी आणि इंद्रधनू. मी तरी विसरले लिहायला. आज काल काम करताना मधेच मुलांची आठवण येते. वाटतं दोन मिनिट त्यांच्या फोटो कडे बघत बसावं. दे-केयर मध्ये काय करत असतील, रात्री कसे हसले, काय बोलले हे आठवावं. :) छोटीच गोष्ट पण त्या दोन-पाच मिनिटांनी किती फ्रेश वाटतं. :)

-विद्या.

Meghana Bhuskute said...

मस्त आहे हे पोस्ट. मला ’पाच मिनिटं’ म्हणताक्षणी सकाळ आठवते. अनंत वेळा मी ठरवलं असेल, रोज सकाळी उठून भटकायला जायचं, पण पाच मिनिटं घात करतात! असं बहुतेक सगळ्याच कंटाळवाण्या पण आवश्यक कामांच्या बाबतीत.
चालायचंच!

Vidya Bhutkar said...

Thanks मेघना. हो ते सकाळचे '५ मिनिट' मी विसरलेच. त्याच्यामुळे आयुष्यात कितीतरी गोंधळ झालेले आहेत. :)

-विद्या.

vishal said...

तुमची पोस्ट दोन मिनटात वाचून झाली ...पण पाच मिनिटे विचार करायला लावणारी होती ...आवडली :)