Sunday, July 24, 2016

स्वप्ना आणि सत्या- भाग ३

अलार्म वाजला आणि ती धडपडत उठली. आज ओळीने चौथा दिवस तिने केलेला निश्चय पाळायचा.
तो: उठलीस?
ती: हं . (अजून झोपतच)
तो: कशाला नसते उद्योग लागतात तुला काय माहीत.
ती: हं . (अजून झोपतच)
तो: जा बरं झोप जा जरा वेळ.
ती: अं हं .
बंद डोळयांनीच तिने फ्रिजमधली भाजी काढली. एका भांड्यात पीठ घेऊन कणिक मळून घेतली.
तो: अगं काय हे? किती वेळा सांगितलंय मला रोज डबा नसला  तरी चालतो.
ती: हो पण मला चालत नाही ना. (आता ती जरा जागी झाली होती. )
तो: नुसती फिल्मी आहेस बघ.
ती: असू दे. जशी आहे ती अशीच आहे. (ती भाजी चिरत राहिली. )
तो: पण मला सांग तरी हा हट्ट कशाला?
ती: मला तुझ्यासाठी रोज डबा करायचाय.
तो: बरं, डबाच ना? मग मी कालची भाजी पोळी घेऊन जातो ना?
ती: नाही मला ताजा करायचाय.
तो: मग ते शिळं कोण खाणार?
ती: कोण म्हणजे? डोन्ट वरी, टाकून नाही देणार.
तो: म्हणजे तूच खाणार. मग मी खाल्लं तर काय होतंय?
ती: नको उगाच. लोक म्हणतील शिळं देते नवऱ्याला आणि स्वतः ताजं खाते.
तो: म्हणू देत. मग त्यांनाच ताजं करून आणायला सांगतो माझ्यासाठी.
ती: तू पण ना.
तो: हे बघ ते सिरीयल मध्ये बायका देत असतील आपल्या नवऱ्यांना रोज डबे. तू उगाच त्रास करून घेऊ नकोस.
ती: अगदी तसंच नाही, पण चांगलं वाटतं रे नवऱ्याला असं रोज गरम गरम डबा करून द्यायला.
तो: किती स्वप्नाळू  आहेस गं. जा झोप आणि स्वप्नं  बघ. मी आहे तेच घेऊन जातोय.
तिला जबरदस्ती झोपायला लावून तो कालचीच भाजी पोळी घेऊन गेला.
ती: (मनातल्या मनात) वेडाच आहे. चांगले बायको करून देतेय तर नाही म्हणतोय. काय होतंय थोडे कष्ट पडले तर?
तो: (मनातल्या मनात) वेडीच आहे. नाईट शिफ्ट करून पहाटे येते आणि म्हणे ताजा डबा करून द्यायचाय. काही होत नाही शिळं खाल्लं तर.

आज पहिल्यांदाच स्वप्नापेक्षा सत्य जास्त छान वाटत होतं. दोघांचं मन अजूनही मागेच रेंगाळत होतं.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: