Tuesday, July 26, 2016

एक रोजची सकाळ

         आजकाल सकाळी जाग येते ती खरं तर Jet lag मुळे. :) तिकडच्या-इथल्या दिवस-रात्रीच्या फरकाचा अमल हळूहळू उतरत आहे. पण सकाळी जाग यायला लागली आणि बोस्टनला जायच्या आधीचे दिवस लगेच डोक्यात आले. प्रत्येक देशाची, त्या त्या ऋतूची, प्रत्येक घराची एक सकाळ असते. ती त्या घरात राहूनच अनुभवता येते. कुणाला अशी सांगून समजावता येणार नाही. तरीही प्रयत्न करतेच. :) आज सकाळी जाग आली, चहा-पाणी झालं. त्यामुळे थोडा निवांत वेळ मिळाला, म्हटलं लिहीत बसावं जरा वेळ. :) मस्त वाटत आहे वातावरण. त्यात गेले दोन दिवस पाऊस नाहीये त्यामुळे थंड, कोरड्या वातावरणात अजून छान.
          बॉस्टनमध्ये रोज घराच्या स्वयंपाकघरातून सूर्य प्रकाश येतो. खिडकीचे पडदे उघडले की बाहेर काय चित्र असेल असे विचार मनात येत असतात. कारण काय तर, तिथे हवामान इतके बदलत असते कि थंडीत कधी ४-५ फुटाचा बर्फ बाहेर असू शकते. मग घरासमोर पांढरे शुभ्र रस्ते, घरांचे छत हे बघून छान वाटते. कधी पाऊस आहे असा अंदाज असूनही मस्त उबदार सकाळ असते. बाकी मुलांचे आवरणे, ट्रॅफिक, ट्रेन हे सर्व तर तिथल्या रोजच्या दिनचर्येचा भाग असतेच. तिथली सकाळ कितीही धावपळीची असली तरी ती धावपळ फक्त आमच्या चौघांची असते. आमचा आरडा ओरडा, मुलांची रडारड, काही सामान घरात राहिले तर परत कुलूप काढून जाताना होणारी चिडचिड हे सर्व फक्त आमचंच असतं. ऑफिसला पोचले की मागे कितीही रामायण झाले असले तरी लोक दिसल्यावर 'गुड मॉर्निग' म्हणावंच लागतं.
        गेल्या आठवड्याभरात मात्र आमच्या घरची इथली सकाळ अनुभवायला फारंच मस्त वाटत आहे. आमच्या बिल्डिंगलाही स्वतःची अशी एक सकाळ आहे. आणि इथे राहून खऱ्या अर्थाने दिवस उजाडणे काय असेल याचा अर्थ समजतो. रोज सकाळी येणारा पाखरांचा किलबिलाट( हो अजूनही येतो इथे तो. ), रिक्षा-गाड्यांचे हॉर्न, कधी लोकांच्या घरात लवकर वाजणाऱ्या कुकरच्या शिट्ट्या, दुधवाल्यानी वाजवलेली दारावरची बेल, शेजारच्या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या मंदिरातली घंटा या सर्व आवाजात दिवस उजाडतो. 
        पडदे उघडले की कधी दूरवर दिसणारे ढग, पडणारा पाऊस, हिवाळ्यात थंड प्रसन्न वाटणारी तर उन्हाळ्यात एकदम गरम ऊन घेऊन बसणारी गच्ची. बाल्कनीचं दार उघडलं की सकाळ जणू घरात येते. दुधावरची साय काढणे, दूध उकळणे, चहा करणे यातही वेगळेपण असतं. तिकडे आमच्या दुधाला साय येत नाही. त्यामुळे कॅन मधून ओतून घ्यायचं, यात विरजण वगैरे बऱ्याच स्टेप वगळून जातात. कधी ऊन पडलंय म्हणून कपडे लवकर मशीनला लावून वाळत घालणे, कधी धूळ साफ करणे अशी छोटी मोठी कामं चालू असतात. आता ही तर तिकडेही करायला हवीत, पण तिथे सर्व कामं फक्त शनिवार-रविवार मध्ये होतात. त्यामुळे रोजच्या-रोज अशी ही काम करायची वेळ येत नाही.
       घरात लवकरच पोळ्या करायला येणाऱ्या, भांडी केर फरशी करायला येणाऱ्या मावशी यांची ये-जा चालू होते.  मुलांची शाळेची तयारी सुरु झाली की घर जागं होतं. घराप्रमाणेच, खालीही ही वर्दळ सुरु होते. खाली वेगवेगळ्या वेळेला येणाऱ्या अनेक शाळांच्या बस, सकाळी फिरायला-चालायला जाणारे लोक, दूध-ब्रेड, भाज्या घ्यायला डेअरीवर-दुकानात  जाणारे लोक, योगा क्लासवरून येणाऱ्या मैत्रिणी, गेटमधून ऑफिस साठी बाहेर पडणाऱ्या गाड्या अशा एक ना अनेक गोष्टी चालू असतात. मी इथे रनिंगला जायचे तेंव्हा हे सर्व ठरलेलं असायचं. कधी कधी मी पळत असताना सकाळ-सकाळी कुत्री भुंकत माझ्या मागे लागतील अशी भीतीही मला वाटलेली आहे. त्यामुळे कित्येकदा मी कुत्रे दिसले की चालत जायचे आणि थोडे पुढे गेले की परत पळणे सुरु. :) तर हे सर्व केवळ इथेच.
         सर्वात जास्त छान वाटतं ते  आमच्या रोजच्या धावपळीत बाकीच्यांचाही सहभाग असतो. रात्री झोपताना बाय केलं असलं तरी सकाळी ५ मिनिट का होईना शेजाऱ्यांशी गप्पा. कधी कधी तर काकूंनी सानुला उशीर होत असताना तिचे केसही बांधून दिले आहेत. किंवा आई-दादांचा(सासू-सासऱ्यांचा) हातभार, मग ते सानूला सोडायला जात असताना झोपलेल्या स्वनिककडे पाहणे असो किंवा एकीकडे डबा भारत असताना सानूच्या मागे 'दूध पी' म्हणून आईंनी हातात धरलेला कप असो, रोजच्या सकाळ मध्ये या सर्वांचा सहभाग असतो. आम्ही इथे असताना स्वनिक समोरच्या काकांकडे सकाळी चादर घेऊन जायचा आणि त्यांच्या सोफ्यावर पडून रहायचा. ते फक्त तो इथेच करू शकतो. मी ऑफिसला लवकर जायचे त्यामुळे सकाळी संदीपला अनेक मदतीचे हात असायचे. अगदी आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशीही त्यांच्या कामापलीकडे जाऊन मदत करायच्या. कधी कुणी स्कुलबसला थांबवून ठेवायचं.
       कितीतरी गोष्टी, किती लोक आणि किती ती गडबड. सध्या पुन्हा हे सर्व नव्याने अनुभवत आहे. तर या अशा अनेक गोष्टीमुळे आमची इथली सकाळ फक्त इथली म्हणून खास अशी राहते.  नाहीतर, सूर्य काय सगळीकडेच उगवतो. :)

विद्या भुतकर.

No comments: