गेल्या वर्षी नोकरी शोधत असताना एक वेगळाच अनुभव आला. इंटरव्ह्यूला गेले तर तिथे ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला ते मॅनेजर पाकिस्तानी होते. इंटरव्ह्यू छान झाला. अर्थात सर्व बोलणं इंग्लिश मधेच होत होतं आणि तेही अमेरिकेत त्यामुळे तसा विचार करायचं काही कारण नव्हतंच. सर्व बोलणी झाल्यावर मला त्यांनी एक प्रश्न विचारला,"तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना की आमचं ऑफशोअर चं ऑफिस पाकिस्तान मध्ये आहे?" खरंतर भारतीयांनी जगात आय टी मध्ये इतकं नाव मिळवलं आहे (चांगलं आणि वाईट दोन्हीही) की पाकिस्तान वगैरे मध्ये ऑफशोअर म्हणल्यावर मला जरा हसूच आलं. कधी असा विचारच केला नव्हता. अर्थात मला काय इथे बसूनच काम करायचं होतं. आणि याआधीही मी २-३ पाकिस्तानी लोकांसोबत काम केलं आहे. त्यामुळे मला असा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि मी तसं सांगितलंही.
पुढे होऊन त्यांनीच सांगितलं मग,"मी इथेच राहिलोय, वाढलोय आणि बरेच वर्षे काढलीत त्यामुळे माझे विचार जास्त विस्तारित आहेत. तिथे राहणाऱ्या लोकांची मनोवृत्ती थोडी संकुचित आहे. मी तर तिकडे टीममध्ये ३-४ हिंदू लोकांनाही घेतलं आहे. आणि त्यासाठी भांडलोही आहे. " आता हे ऐकून मात्र मला जरा भीतीशी वाटली. माझ्या आजवरच्या आयुष्यात कधीही अशी वेळ आली नव्हती जिथे कुणी केवळ हिंदू आहे म्हणून त्यांना ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आला आहे. आणि त्यांचे बोलणे ऐकून लोकांना तिथे काय त्रास होत असेल असा विचार करून थोडी भीतीही वाटली. पण खरं सांगायचं तर जे माझ्याशी बोलत होते ते मात्र एकदम छान, सुसंकृत होते आणि खूपच छान बोलले होते. पुढे जाऊन तिथे मला त्यांचा दुसरा कॉलही आला. पण तोवर दुसरीकडे नोकरी पक्की झाली होती त्यामुळे तिथे काम करण्याचा प्रश्न आला नाही. पण आजही त्या अनुभवाबद्दल विचार करते. खरंच एक स्त्री म्हणून आणि तीही भारतीय, मला तिथे कसे अनुभव आले असते? कदाचित एक वेगळे जग अनुभवायचा माझा चान्स हुकला. असो.
आज त्याबद्दल बोलायचं कारण म्हणजे गेल्या १०-१५ दिवसांत एक पाकिस्तानी सिरीयल पाहिली. बऱ्याच लोकांनी बऱ्याच दिवसांपासून सांगितली होती, शेवटी पाहिलीच. नाव आहे 'जिंदगी गुलजार है." आता ती कशी वाटली हे सांगायला नकोच. फवाद खान असलेली सिरीयल काय डॉक्युमेंटरी बघायलाही मी तयार आहे. सॉलिड फॅन झाले मी त्याची. फवाद खानचे दोन्ही चित्रपट मी पाहिले आहेत. त्यामुळे ती सिरीयल एका पाठोपाठ एक करत पटापट सर्व एपिसोड्स संपवले आणि एकदम महाभारत, रामायण, DDLJ, हम दिल दे चुके सनम वगैरे संपल्यावर वाटलं तसं वाटलं. असो त्याबद्दल तर काही करू शकत नाही. पण ती सिरीयल बघून वाटलं की पाकिस्तान मध्ये कितीतरी वेगळं वातावरण आहे. अगदी मॉडर्न म्हणून असलेल्या स्त्रियांचे कपडे पण पूर्ण अंगभर होते. तेच आपल्या सिरीयल मध्ये गुढघ्याच्यावर तरी असतेच किंवा ब्लाउज तरी बिनबाह्यांचे. अर्थात सिरीयल बघून देशाचा अनुमान काढता येत नाही. तरीही फरक जाणवलाच.
दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे आजपर्यंत मला तामिळ, तेलुगू आणि मल्याळम मुव्ही बघायलाही सबटायटल्स ची गरज पडली होती. पण ती सिरीयल पाहताना मला थोडेफार शब्द समजले नसतील पण बाकी पूर्ण समजत होते. आपण बोलतो ती भाषा इतकी सारखी असू शकते? बरेच बोलण्याचे संदर्भ, भाषा, कधी विचारच केला नव्हता की खरंच इतके साधर्म्य असेल. त्यांचे ते उच्चार ऐकून मला माझं बोलणं किती गावठी वाटत आहे असं वाटत होतं. किती सुंदर उच्चार, भाषा. गझल मला त्यामुळेच आवडत असतील. मनाला लागतात एकदम, कुठे तरी खूप आत. पुढे माझ्या लक्षात आले की त्या सिरीयल मध्ये इस्लामाबाद, लाहोर, कराची वगैरे जे नावं घेत होते ती सर्व मला ऐकून माहीत आहेत. पण कुठल्याही नकाशात मी कधी नीट लक्ष देऊन पाहिले नाहीये की खरंच किती अंतरावर आहेत ती शहरं, किंवा त्यांच्यात विशेष असं काय आहे. यातलं मला काहीच माहीत नाहीये. बरेच ठिकाणी भाज्या करण्याचे किंवा मटण किंवा बिर्याणीचे संदर्भ होते. मग माझ्या मनात विचार आला की तिथे लोक काय खात असतील नाश्त्याला रोज? तिथेही कुणी डोसा, इडली, पोहे उपीट खात असेल का? एखाद्या शेट्टीचे तिथेही हॉटेल असेल का? की फक्त पाकिस्तानीचं जेवण खात असतील? आणि असेल तरी काय असते ते? काहीच माहीत नाही मला.
गेल्या काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता साहिर लुधियानवी यांच्यावर. गुलजार, साहिर यांच्याकडून कितीतरी गाण्यांचा, शब्दांचा, भावनांचा खजिना आपल्याला तिकडून आणून दिला. इतक्या गझल ऐकायला मिळाल्या. आजही राहत फतेह अली खानच्या आवाज ऐकला की ऐकत बसावसं वाटतं. पहिली सिरीयल संपल्यावर अजून एक पाहिली, 'हमसफर' आणि त्यात एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे त्याचं टायटल सॉंग. काय आवाज आहे. संदीप म्हणालाही, "घंटा एक शब्द कळत नाहीये." खरंच बरेचसे उर्दू शब्द होते. पण त्या गाण्यात जे दु:खं, प्रेम ऐकलं ते केवळ शब्दांत सांगता येणार नाही. आता त्या गझल बद्दल आणि त्या गायिकेबद्दल माहिती काढायची आहे. एक ध्यासच लागलाय म्हणा ना?
आपल्या देशाला, मला माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला तिकडून मिळाल्या असतील. किंवा अनेक गोष्टी आहेत ज्या अजिबात माहीत नाहीयेत. अक्खा देश भारत-पाकिस्तान मॅच बघतो, आपण हरलो की रडतो, चिडतो. ते हरले की फटाके वाजवतो. त्यातला प्रत्येक खेळाडू आपल्याला तोंडपाठ असतो. कुठल्या मॅच मध्ये किती धावांनी आपण जिंकलो यावर तासन तास गप्पा होऊ शकतात. काश्मीरमध्ये चाललेला दहशतवाद, नेहमीची भांडणं, कधीही येऊ शकतं असं युध्दाचं सावट हे सर्व बघून खूप त्रास होतो. आपल्या एका सुंदर राज्याला इतके वर्षे इतका त्रास सहन करावा लागत आहे. तिथलं वातावरण बघून लोक कसे जगत असतील असा विचार नेहमी येत राहतो. भांडण, युद्ध, मॅचनंतर चे फटाके सर्व तर करूच पण निदान ते सर्व करताना त्या देशात अजून काय काय आहे हेही बघायला पाहिजे एकदा असं आज पहिल्यांदा वाटायला लागलं आहे. आणि शिवाय मुव्ही बघायला 'फवाद खान' ची भर झालीच आहे. ;)
आपल्या देशाला, मला माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला तिकडून मिळाल्या असतील. किंवा अनेक गोष्टी आहेत ज्या अजिबात माहीत नाहीयेत. अक्खा देश भारत-पाकिस्तान मॅच बघतो, आपण हरलो की रडतो, चिडतो. ते हरले की फटाके वाजवतो. त्यातला प्रत्येक खेळाडू आपल्याला तोंडपाठ असतो. कुठल्या मॅच मध्ये किती धावांनी आपण जिंकलो यावर तासन तास गप्पा होऊ शकतात. काश्मीरमध्ये चाललेला दहशतवाद, नेहमीची भांडणं, कधीही येऊ शकतं असं युध्दाचं सावट हे सर्व बघून खूप त्रास होतो. आपल्या एका सुंदर राज्याला इतके वर्षे इतका त्रास सहन करावा लागत आहे. तिथलं वातावरण बघून लोक कसे जगत असतील असा विचार नेहमी येत राहतो. भांडण, युद्ध, मॅचनंतर चे फटाके सर्व तर करूच पण निदान ते सर्व करताना त्या देशात अजून काय काय आहे हेही बघायला पाहिजे एकदा असं आज पहिल्यांदा वाटायला लागलं आहे. आणि शिवाय मुव्ही बघायला 'फवाद खान' ची भर झालीच आहे. ;)
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment