Tuesday, December 13, 2016

थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - ३

आज लिहायला थोडा उशीर झाला. ठेचा बनवायचं  काम चालू होतं ना. :) असो. आजचं सूप आहे 'क्रीम ऑफ मश्रूम सूप'. मला स्वतःला मश्रूम आवडत नाहीत त्यामुळे हे सूप अगदी हल्ली हल्ली बनवू लागले तेही मुलांसाठी म्हणून. पण आता आम्हालाही ते आवडतं. मुख्य म्हणजे प्रोसेस एकदम सोपी आहे. अर्थातच यात 'क्रीम' नाही घातले तरी चालते. निदान मला तरी. मी थोडं फार दूध घालते. नको असेल तर नाही घातलं तरी चालतं. यामध्ये मश्रूममुळे प्रोटिन्स भरपूर मिळतात. थोडंसं प्यालं तरी पोट खूप भरतं.

साहित्य:
         २-३ कप पातळ काप केलेले छोट्या आकाराचे मश्रूम. (इथे खूप मोठेही मिळतात, मला ते आवडले नाहीत. )
         १ बटाटा
         १ गोल्डन रंगाचा कांदा
         ४ मोठ्या पाकळ्या लसूण
          १ टे.स्पू. बटर
          ऑलिव्ह ऑइल
           थाईम (या herb मुळे सूपला खास चव येते. त्यामुळे जवळपास मिळत असल्यास नक्की वापरा. नाहीतर इटालियन सिझनिंग चालेल.)
           मीठ, मिरेपूड
           १ चमचा मैदा किंवा गव्हाचे पीठ
           
कृती:
मश्रूम पुसून, कापून घ्यावेत. मी जास्त जाड काप करत नाही. बटाटा आणि कांद्याचे अर्धा इंच आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. लसणाचेही बारीक काप करून घ्यावे. 

कापलेल्या कांदा, बटाटा, लसूण आणि मश्रूम एका भांड्या मध्ये घालून त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल, थाईम (हे नसेल तर इटालियन सिझनिंग), मिरेपूड आणि मीठ घालून घ्यावे.

सर्व मिश्रणाला तेल, मीठ नीट लागल्या नंतर ते एका ट्रे मध्ये घालून ओव्हनमध्ये १८०-२०० डि. सें. तापमानाला अर्धा तास ठेवावे. (ओव्हन नसेल तर हेच मिश्रण थोडे बटर घालून भांड्यात शिजेपर्यंत परतता येते. ) पण ओव्हनमध्ये लसूण खरपूस होतो आणि मश्रूमही. कांद्याचेही पापुद्रे मस्त ब्राऊन होतात.

अर्धा तास ओव्हनमध्ये राहिल्यानंतर हा ट्रे बाहेर काढून घ्यावा. मश्रूम एकदम आकसून आलेले असतील. बटाटे शिजले आहेत की नाही हे तपासून पाहावे.
मिश्रण मिक्क्सरमध्ये प्युरी करून घ्यावे.

एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल आणि थोडे बटर घालून त्यात चमचाभर मैदा किंवा गव्हाचे पीठ घालावे.
पीठ थोडे भाजून त्यात हवे असल्यास दूध किंवा क्रीम घालू शकतो. मी अर्धा कप दूध घालते. दूध एकसारखे पिठात मिक्स होऊन थोडे घट्ट होते.

या मिश्रणात आता केलेली प्युरी घालावी.

साधारण एक उभा पेला तरी पाणी लागते. तरीही सूप किती घट्ट किंवा पातळ हवे आहे यावर ठरवून पाणी घालावे.
सूप उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

थोडी मिरेपूड आणि मीठ घालून ब्रेकक्रम सोबत सूप सर्व्ह करावे. आम्ही यात वरून भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया टाकतो. छान कुरकुरीत लागतात.



विद्या भुतकर.

No comments: