Monday, December 19, 2016

खास दोस्त

           वीकेण्डला मित्राकडे गेलो होतो. नोकरीच्या पहिल्या दोन तीन वर्षातले मित्र मैत्रिणी म्हणजे आपल्या कॉलेजच्या मैत्रीसारखेच जवळचे, त्यातलाच हा एक. गेले १०-१२ वर्षं तरी एकमेकांना ओळखत आहोत. शाळा-कॉलेज आणि हे थोडे असे नोकरीत जोडलेले मित्र-मैत्रिणी वेगळेच. त्या त्या काळातले प्रत्येकाचे नाद वेगळे, स्वभाव आणि हट्ट वेगळे. पण सर्व कसं जुळवून घेतलं जातं. कधी एखाद्याची मस्करीही केली जाते. आणि मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यात मोठ्या उलाढाली होत असतानाचा तो काळ असतो, ज्यात आपला चांगल्या आणि वाईट दोन्हीही काळ त्यांनी पाहिलेला असतो. तर अशाच एका मित्राकडे गेलो होतो. एक दिवस राहिलोही. नुसती 'मजा आली' म्हणण्यापेक्षा अजूनही काहीतरी जाणवलं. त्यावरच ही पोस्ट. 
        एखादी शाळेतली किंवा कॉलेजमधली बिनधास्त मैत्रीण, तिच्या घरी जावं आणि तिला आपल्या छोट्या बाळासाठी जीवापाड काळजी करताना बघावं. कॉलेजात चार वर्षं निर्धास्त वागलेली एखादी, 'चार वाजले गं, निघते मी' म्हणत घाईघाईने वेळेत मुलाला आणायला जाणारी एखादी मैत्रीण.  कधी एखादा मित्र, एकदम प्रेमळ काळजी घेणारा आणि तसेच तितक्याच काळजीने बायकोला आणि मुलाला सांभाळणारा, तर एखादा एकदम धाडशी, मॅनेजर म्हणून रुबाब दाखवणारा आणि घरी येऊन आपल्या इवल्याशा पोराच्या हट्टासाठी 'घोडा घोडा' खेळणारा. किती वेगळी रूपं असतात, आपल्याच मित्र मैत्रिणींची, कधी असे दिसतील अशी अपॆक्षाही नसलेली. 
       तेच उलटही असतं. त्यांच्या छोट्या मुलीत किंवा मुलातही आपल्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं रूप बघतो. लहानपणापासून नीटनेटक्या असलेल्या मैत्रिणीचा मुलगा तितकंच सुंदर अक्षर काढतो, तर कुणाची कलाकुसर तिच्या मुलीत दिसते. एखाद्याचं खेळाचं वेड दिसतं. एखादा आपल्या मुलाच्या वागण्यावर चिडलेला असताना,  'त्याला काय बोलणार? तुझ्यावरच गेलाय' असं म्हणायलाही किती छान वाटतं. अशावेळी जाणवतं की किती काळ लोटलाय मध्ये आणि सगळंच किती वेगानं बदलत आहे आणि तरीही आपण त्या छोट्या मुलांमध्ये आपल्या अजूनही लहान वाटणाऱ्या मित्राला किंवा मैत्रिणीला शोधत असतो. त्यांची अजूनही तशीच मस्करी करत असतो. असे खास मित्र-मैत्रिणी थोडेच असतात पण ते 'खास' असतात. :) 

विद्या भुतकर.  
 https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
       
       

No comments: