Friday, December 30, 2016

शेवटची पोस्ट

         या वर्षीची शेवटची पोस्ट. गेले काही दिवस सुट्टी चालू होती, सगळ्याच गोष्टींना. जवळच्या लोकांसोबत राहायचे, खायचे आणि आराम करायचा. ज्यांच्याकडे राहात होतो त्या आम्हाला काडीचेही काम करून देत नव्हत्या. आणि त्यांचे साऊथ इंडियन जेवण तर काय बोलायलाच नको. इडली, डोसा, टॅमरिंड राईस, बिर्याणी, लेमन राईस आणि जे काही त्या बनवतील ते सर्व माझे आणि संदीपचे आवडते पदार्थ आहेत. एरवी ऑफिसच्या कामासाठी होणारी दगदग नाही, पोरांची शाळेची गडबड नाही. एकूण मजा चालू होती. तरीही सारखे काही ना काही काम करायची इच्छा व्हायची. मग कधी पाणीपुरी केली, छोले बनवले, कधी पोळ्या केल्या. त्यात माझे पोट बिघडले. संदीपला म्हटले," बघ कुणी आयते खायला करून घालत आहे तर खाणे माझ्या नशिबात नाही. " :) मला वाटते रोज इतके धावपळ करायची सवय झाली आहे की कुणी जबरदस्ती आराम करायला लावला तरी जमणार नाही अशी परिस्थिती आहे. काही ना काही चाळा लागतोच.
         तेच झाले माझ्या ब्लॉग बद्दलही. मी अगदी ठरवून ब्रेक घेतला होता. बाकी सर्व कामांना सुट्टी आहे तर लिहायलाही सुट्टी म्हणून. पण रोज लिहायची इतकी सवय झाली आहे की सारखे वाटायचे थोडावेळ बसून एखादी पोस्ट लिहावी. लिहिले नाही तरीही पेजवर कुणाचे मेसेज, लाईक्स इ. बघत होतेच. शेवटी काय करायचे म्हणून पेन आणि पेपर घेऊन काहीतरी रेखाटत बसले. तेव्हा माझ्या लक्षात आले की या वर्षात हा ब्लॉग माझ्या रोजच्या आयुष्याचा किती मोठा भाग झाले आहे. त्यात ब्रेक घेणे म्हणजे स्वतःला त्रास देणेच आहे. 
         नेहमीप्रमाणे सर्वच जण या सरत्या वर्षाचा आढावा घेत असतीलच. तसाच माझाही म्हटलं तरी चालेल. :) माझे पोस्ट किती लोक वाचतात माहित नाही. पण पेजवरचे लाईक्स मोजायचे तर निदान १८०० च्या वर लोकांनी एकदा तरी चक्कर मारली आहे. कुणाचे मेसेज किंवा कमेंट आले की छान वाटते, काहीतरी चांगले करत आहे असे वाटते. अनेक पोस्टवर नियमित काही लोकांचे लाईक्स दिसतात त्यावरून ते नियमित माझे पोस्ट वाचतात हेही लक्षात येते. आपण कधीतरी कुणाच्या आयुष्याचा असेही एक भाग होऊ शकतो ही कल्पनाच किती छान वाटते. उत्साहात अनेक गोष्टी मी सुरु करते पण त्यांना नेटाने पुढे नेणे आणि नियमित करत राहणे प्रत्येकवेळी होतेच असे नाही. पण या बाबतीत मात्र ते झाले. अनेकवेळा आग्रहाने छोटी का होईना पोस्ट लिहिली. कधी एखादी कथा लिहिताना रात्री जागलेही, पण नियमित लिहीत राहिले. आणि यासर्वात महत्वाचा भाग होता सर्व वाचकांचा. त्याशिवाय लिहिण्यात मजा नाही. :) 
        पुढच्या वर्षातही सर्वांचे प्रेम, वाचन आणि प्रोत्साहन असेच मिळावे ही अपेक्षा. आणि असेच नियमित लेखन मला करता यावे हा अजून एक संकल्प नवीन वर्षाच्या यादीत मांडला गेला आहे. तुमचेही असेच काही संकल्प असतीलच, त्याबद्दल जरूर सांगा. ते संकल्प पूर्ण करण्यासाठी काय काय करणार आहे हेही सांगा. ते सर्व संकल्प नवीन वर्षात नेटाने पूर्ण होवोत त्यासाठी सर्वांना शुभेच्छा.

Wish you all a very happy new year !! 
         
विद्या भुतकर.

No comments: