या वर्षीच्या ठरवलेल्या ३ रेसपैकी दुसरी रेस रविवारी झाली. १० किलोमीटरची रेस होती. बऱ्यापैकी सराव झाल्यामुळे तसे रेसचे टेन्शन नव्हते. मुलांचीही सोय घरीच झाल्याने सकाळी जास्त लवकरही उठायचे नव्हते. एकूण नेहमीपेक्षा थोडे निवांतच होतो. मला वाटते एखाद्या गोष्टीचा नीट सराव झाला किंवा ती अंगवळणी पडली की त्यांचं विशेष काही वाटत नाही. तसंच काहीसं झालं होतं. अशावेळी त्यात एकसुरेपणा येऊ शकतो. किंवा कधी कंटाळाही येऊ शकतो.
तर यावेळी रेसमध्ये मला माझ्या आधीच्या वेळेपेक्षा कमी वेळात ही रेस पूर्ण करायची होती. अगदी सराव करतानाही मी अनेकवेळा आधीच्या वेळेपेक्षा कमी वेळात ती पूर्ण केली होती. पण माझे १ तास १५ मिनिटांचे एक जुने पर्सनल रेकॉर्ड होते जे काही पार होते नव्हते. तर या रेसला जिद्दीने ते पूर्ण करायचं ठरवलं आणि झालंही. १० किमीची रेस १ तास ११ मिनिटांत पूर्ण केली. अर्थात ती १ तास १० मिनिटांत व्हायला हवी होती. :) पण सांगण्याचा मुद्दा असा की एखादे टार्गेट पूर्ण केले तरी त्याच कामात आपण नवीन ध्येय ठेवून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यानेच ते काम अजून जास्त आवडीचे होऊ शकते.
अनेकवेळा अनेक मैत्रिणींना मी आग्रह करत असते काहीतरी व्यायाम सुरु करण्याचा. पण काही ना काही कारण ऐकायला मिळतेच. 'तुझ्याइतके आम्हाला जमणार नाही' वगैरेही सांगितलं जातं. तर माझं म्हणणं असतं की प्रत्येक गोष्टीची सुरुवात कुठून तरी होते. जोवर आपण करत आहोत त्या कामात प्रगती आहे तोवर बाकी लोकांचा किंवा मोठ्या टार्गेटचा विचार करायची गरजच नाही. एखादं जवळचं टार्गेट ठेवायचं. म्हणजे उदा: दिवसातून फक्त १५ मिनिटंच काहीतरी व्यायाम करायचा. किंवा आठवड्यातून तीनच दिवस १५-२० मिनिट चालायचं. याने काय होतं की कारण सांगण्यापेक्षा कुठून तरी सुरुवात होते. सुरुवात झाली की मग टारगेट बदलायचं. माझीही सुरुवात अशीच छोट्या टारगेटने झाली होती जिथून आता बरेच पुढे आले आहे.
आज सकाळी ऑफिसमध्येअजून एका पळणाऱ्या मैत्रिणीशी बोलत होते. तर ती म्हणाली,"मला यावेळी अजून फास्ट पळायचे होते." म्हटले किती? तर म्हणाली,"४५ मिनिटांत पूर्ण केली मी रेस ! मला केव्हापासून करायची होती इतकया फास्ट, शेवटी झाली एकदाची. ". तेव्हा माझ्या लक्षात आले की हे एक न संपणारं काम आहे. माझ्यापेक्षा, संदीपपेक्षाही जोरात पळणाऱ्या तिलाही काहीतरी अजून जास्त करायचं होतंच. मी माझी तुलना तिच्याशी करू शकत नाही. पण स्वतःची स्वतःशी तरी करू शकते? तेच प्रत्येकाने करावं असं वाटतं. आज आपण शून्य मिनिट व्यायाम करत असू तर ५ मिनिटानी सुरुवात करावी आणि पुढे ते वाढवत न्यावं. पण 'मला तिच्यासारखं ४५ मिनिटांत जमणारच नाही' म्हणून सोडून देण्यात काही अर्थ नाही. तर तुम्हीही जरुर करून पहा हा प्रयोग.
विद्या भुतकर.
1 comment:
Very true
Post a Comment