साखरपुडा झाला, सर्व पाहुणे आपापल्या घरी गेले. बाकी सगळ्यांच्या गप्पा झाल्या पण दोघेही आपापल्या घरी गप्प होते. त्या रात्री कुणीच कुणाला फोन केला नाही. ज्या रात्री त्यांना गप्पा मारायला कुणाच्या परवानगीची आवश्यकता नव्हती, ज्या रात्री पुढच्या आयुष्याची स्वप्नं पाहायची त्या रात्री दीपू रागाने फणफणत होती आणि तिकडे चिराग तिला काय उत्तर द्यायचं या काळजीने.
रात्री तिने आईला विचारलंही होतं,"काय गरज होती सगळं करायला हो म्हणायची?".
"अगं एकुलती एक मुलगी तू आमची. घरातलं सगळं तुझंच तर आहे. मग ते दिलं तुलाच तर काय बिघडलं?", बाबांनी विचारलं.
"करावं लागतं बाळ, तुला वेळ आहे कळायला. तू नको विचार करुस, आम्ही आहे ना?", आईने समजावलं.
"मला काही हे पटत नाहीये. कुठल्या जगात वावरतो आपण? मी पण करते ना नोकरी?", दीपू ऐकत नव्हती.
"अगं तसं नसतं ते. ही लग्नपध्द्ती म्हणजे एक व्यवहारच असतो म्हण ना. आता पूर्वीसारखं सगळंच पाळत नाही पण काही गोष्टी नाही टाळता येत. शिवाय आपली मुलगी त्या घरात द्यायची असते. या सगळ्या व्यवहाराचा तिला त्रास नको म्हणून जितका संघर्ष टाळू तितकं चांगलंच." बाबा तिला समजावत होते.
आणि त्यांच्या या सगळ्या बोलण्याने तिला चिरागवर अजूनच जास्त चीड येत होती. माणसानं किती नेभळट असावं? स्वतःच्या आई-वडिलांना सांगता येत नाही का? मुळात त्याला या सगळ्या प्रकाराला मी 'र्हा म्हणायलाच नको होतं.
चिरागही घरी गप्पच होता. रात्रभर विचार करून दुसऱ्या दिवशी त्याने तिला मेसेज पाठवला, 'कॅफे ७ वाजता?".
सकाळी पाठवलेल्या मेसेजला दुपारी चारला उत्तर आलं,"ओके".
--------------------------------------------------------------
नेहमीच्या जागी ती आली तर तो होताच तिथे आधी. कितीतरी वेळ नको इतकी शांतता होती.
"सॉरी दीपू. काय बोलू खरंच कळत नाहीये. मला वाटलंच नव्हतं हे प्रकरण इतकं पुढे जाईल. आई-बाबा मामांशी काय बोलले काहीच माहीत नव्हतं. प्लीज चिडू नकोस ना.", चिराग.
"मग काय करू? तुला आधी माहीत नव्हतं, तेंव्हा तरी कळालं ना? मग का नाही बोललास? सांग ना?", तिने रागाने विचारलं.
"मी काय वस्तू आहे? आणि मी काय ओझं म्हणून येतेय तुझ्या घरी? सोबत इतकं सोनं द्यायला? काय कमी आहे म्हणून त्यांनी हे सर्व मागितलं? सांग ना?", ती जवळजवळ ओरडतच होती.
तिला शांत करण्याचा प्रयत्न सफल होत नव्हता.
"अगं पण आमच्याकडेही आहेच खर्च, रिसेप्शनचं. त्यालाही हॉल, हे सर्व खर्च आहेतच की? आणि ते सोनं काय मला थोडीच वापरायचं आहे?", त्याने युक्तिवाद लढवला.
"मग?का विचारलंत? मी बघेन ना घालायचं की नाही? तू उगाच फालतू कारणं देऊ नकोस", दीपू.
"खरं सांगू? मला सगळ्यात जास्त भीती वाटत होती की उगाच तिथे वाद घालून सगळंच रद्द झालं तर? इतक्या जवळ आलेल्या आपल्या भेटीला असं वेडेपणा करून दूर करायचं नव्हतं. इतक्या नातेवाइकांसमोर वाद घालून अगदी तुझ्या बाबांचे सर्व खर्चाचे पैसे मी परत फेडू शकतो पण बस आधी तू माझी हो." चिराग बोलला.
या बोलण्यावर मात्र ती थोडी शांत झाली. तिला निवळलेलं पाहून तोही थोडं हसला.
"दीपू प्लीज तू चिडू नकोस. हे सगळं करण्यात मलाही त्रास होतंच आहे. कधी काय टुम निघेल याची भीती वाटत राहते. बाबांनी ३ तारखा निवडल्या होत्या मुहूर्ताच्या, सगळ्यात पहिली घ्यायला सांगितली आहे. तरी म्हणे, गुढघ्याला बाशिंग बांधलंय साहेबानी. आता काय बोलणार?", चिराग बोलला.
दीपू थोडी शांत झाली. तिलाही पटलं की सर्वजण समोर असताना वाद घालून प्रकरण चिघळलं असतं. आपले आई-वडीलही त्याचंच समर्थन करत आहेत तर उगाच आपण त्रास नको घ्यायला असं तिला वाटलं. कालपासून पहिल्यांदा तिला थोडं बरं वाटलं होतं. त्याने तिच्या बोटाकडे पाहिलं, अंगठी नव्हतीच. तिने मग हळूच पर्समधून काढली. ती बोटांत घालणार तर त्याने अंगठी हातात घेतली, तिचा हात हातात घेऊन ती तिच्या बोटात घातली. तिने पुन्हा एकदा अंगठीकडे पाहिलं.
"ठीक आहे तशी", ती म्हणाली.
"ठीक? प्लॅटिनम आहे, फॉर लाईफ.", चिराग.
"फॉर लाईफ म्हणे, आधी लग्न कर मग लाईफचं बघू", तिने त्याला चिडवलं.
त्याच्यासोबत बसल्यावर तिला बरं वाटू लागलं.
जाताना ती म्हणालीही,"इतक्या लोकांच्या मध्ये हरवलेला तू आणि फक्त माझाच तू, किती वेगळे वाटतात. वाटतं, त्यांच्यात हरवून जाशील तू. आणि उद्या मी एकटीच राहिले तर?".
"वेडाबाई, लग्न झाल्यावर संसार फक्त आपलाच आहे ना? तेंव्हा कुठे कोण येणार आहेत हे नातेवाईक? घरच्यांचे हे हट्ट करू दे त्यांना पूर्ण. मग आहोतच की आपण.", त्याने तिला समजावलं.
------------------------------
आता लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली होती. लग्नाचा बस्ता, लग्नाच्या साड्या, कपडे, खरेदी सुरु झाली. रोज नवीन वस्तूंचे फोटो व्हाट्सअँप शेअर होऊ लागले. एक दिवस महत्वाच्या खरेदीसाठी चिराग, दीपू आणि त्याचे आई-बाबा बाहेर पडले होते. सोनाराकडे जाऊन तिचं मंगळसूत्र निवडायचं होतं. त्यांच्या पूर्वापार सोनाराकडेच ते घ्यायचं होतं. दुकानात गेले आणि मालकांनी त्यांचं स्वागत केलं.
"ही दीपा, आमची होणारी सून बरं का काका?", त्याच्या आईने ओळख करून दिली. तिने 'नमस्कार' म्हणून हात जोडले. अजूनही कुणासमोर असं पटकन पाया पडायला वाकायची सवय होत नव्हती तिला.
"नवीन डिझाईन दाखवा हां. आता यांचा जमाना आला.", आई पुढे बोलली.
"हो, हो आहेत ना आज-काल त्या नवीन पिक्चरच्या सारखे डिझाईन आलेत. ते अँटिक मंगळसूत्र सेट काढ रे", मालकांनी एका पोराला पिटाळलं. तो एका कप्प्यातून एकेक काढेपर्यंत मालकांनी विचारलं,"काय मग कितीपर्यंतचे दाखवू?".
हा मुद्दा मात्र एकदम महत्वाचा होता. तिकडे नेकलेसचे समोर ठेवलेले सेट बघता बघता दीपूनेही कान टवकारले होते.
"तीनेक तोळ्यांचं दाखवा.",आई म्हणाली.
"बरं, अरे तो दुसरा मंगळसूत्र सेट काढ त्याच्या शेजारचा", काकांनी ऑर्डर बदलली होती.
दोन्ही प्रकारची पाकिटं समोर ठेवली गेली. आता प्रत्येक डिझाईन बघताना आधी त्याचे दर बघूनच आई घेत होती तर दीपूला एखादा आवडला असूनही तो 'घ्या' असं सांगता येत नव्हतं. शेवटी दर आणि त्यातल्या त्यात ठीकठाक वाटणारं मंगळसूत्र घेऊन ते बाहेर पडले.
तिने रात्री चिरागला फोनवर झापलंही.
"काय रे? इकडे आम्ही इतका खर्च करतोय, तुला कळत नव्हतं का मला कुठलं आवडतंय ते?".
"अगं मला कुठे त्यातलं काय कळतंय इतकं? ", चिराग.
"हो का? इतका बावळट आहेस का तू?", यावर मात्र चिराग चिडला.
"काय फरक पडणार आहे? हजारो डिझाईन मिळतील नंतर.", असं बोलला.
"म्हणजे लग्नात घायच्या मंगळसूत्राला काहीच किंमत नाही का? असंच बदलून टाकायचं?", तीही चिडली.
"जाऊ दे ना आता यावरही वाद घालायचा आहे का?", चिरागने विचारलं.
तिने 'बाय' म्हणून फोन ठेवून टाकला.
आता असंही लग्न होणारच असल्याने कुणीही एकमेकांचा रुसवा-फुगवा काढत नव्हतं. फक्त लग्न उरकून टाकायचं इतकंच ध्येय होतं.
---------------------------------
आता दिवस सरतील तसं त्याच्या घरीही तिचं येणं जाणं वाढलं होतं. त्याची आईही हक्काने 'चहा बघू गं तुझ्या हातचा कसा होतो?' वगैरे बघत होती. एकदा चिरागच्या घरी त्याचे मावशी-काका घरी आले असताना दीपूने कौतुकाने चायनीज जेवण बनवले.
बोलताना तिने चिरागला हाक मारली तशी मावशी म्हणाली,"काय गं नावाने हाक मारतेस का?".
ती नुसतीच हसली. कुणीच काहीच बोललं नाही. तो एक अवघडलेला क्षण तिने पार पाडला होता.
मनात आलं होतं अगदी बोलावं,"तुमच्या समोर चिराग तरी म्हणतेय. इतके वर्षं ओळखतीय त्याला. चिऱ्या म्हणत नाही नशीब." पण ती गप्प बसली आणि चिरागही.
सर्व जेवण झाल्यावर अगदी साफ-सफाई करून दीपू रात्री उशिरा घरी आली.
घरी आई म्हणालीही,"असं लग्न ठरलेल्या मुलीनं इतक्या उशिरा फिरणं बरं नव्हे."
"तुझं काही पण असतं आई. चिराग आला होता मला सोडायला. मस्त झालं होतं जेवण सर्वांना इतकं आवडलं. मावशी-काकांना पण. आपण करू विकेंडला." दीपू बोलली.
इतक्यात फोन वाजला. आईने फोन घेतला. बराच वेळ ती ऐकत होती. दीपूला कळत नव्हतं इतका वेळ काय चालू आहे. तिने फोन ठेवल्यावर विचारलं.
"तुझ्या सासूबाईंचा फोन होता. खास काही नाही म्हणाल्या. निघताना तू काका-काकूंना नमस्कार केला नाहीस का?" आईने विचारलं.
"त्यांना काय नमस्कार करायचा? येत-जाता उगाचच? आता कधीतरी आल्या तर ठीक आहे. नेहमीच असतात ते तिथे ना?" तिने विचारलं.
"असं नाही गं. पण लोकांना फार हौस असते नवीन सुनेकडून मान-पान करून घ्यायची.",आई.
"ते म्हणाले का तसं त्याच्या आईला?", दीपूने विचारलं.
"नाही तसं काही बोलले नाही ते म्हणाल्या. पण त्यांना म्हणे वाईट वाटलं इतका पण मान दिला नाही म्हणून.
करत जा ना. जरा नवीन आहे तोवर. नंतर काय आहेच मग रुटीन.", आईनं समजावलं.
"तुझं ना उगाचच आई. मी काय सारखी हाता-पाया पडायला जाणार नाहीये हम्म." दीपूने बजावलं.
तिला आता फारच राग येत होता. त्या सगळ्याच लोकांचा.
"आणि ते तुला का सांगत होते हे? तू काय करणार होतीस? इतकं वाटतं तर मला बोलायचं ना समोर?",दीपू.
"म्हणत होत्या 'सॉरी' म्हणून एक फोन कर मावशीला.",आई.
"काय? सॉरी? मी कशाला फोन करू? मी काही फोन नाही करणार.",तिने सरळ सांगितलं.
"जाऊ दे ना. आता हे असंच असतं बघ. म्हणतात ना, मुलीला वळण लावायचं, हेच ते बघ. काही झालं तरी ते आमच्याकडे येतंच." आईने सांगितलं.
यावर मात्र तिने चिरागलाच फोन लावला.
"हॅलो चिराग? काय प्रॉब्लेम झाला नक्की?", ती बोलत असतानाच आईने फोन हातातून घेऊन कट करून टाकला.
आता आईसमोर बोलून काही फायदा नाही हे तिला कळलं होतं.
रात्री त्याच्याशी बोलताना तिने विचारलं,"इतकं काय रे त्यांना झालं माझ्या घरी फोन करायला? बाकी जेवण बनवून खायला घातलं, आवरलं ते नाही दिसलं त्यांना? ती काय माझीच कामं आहेत का? का सून म्हणून मी ती करायची हे आतापासूनच तुम्ही गृहीत धरलंय?".
"अगं आईची एकुलती एक बहीण आहे. दोघी एकदमच जवळच्या आहेत. त्यामुळे तुही तिला सुनेसारखीच आहेस. वाटलं तिला. मलाही सासूसारखं मान द्यावा म्हणून." चिराग बोलला.
"मग तू पण आमच्या घरी उठ-सूट सर्वांच्या पाया पडशील का? का तू मात्र जावई आणि मी सून म्हणून हे असे वेगळे नियम?",तिच्या रागाला पारावार नव्हता आता. डोकं रागाने दुखायला लागलं होतं.
"चिराग, मी आता काहीच बोलू शकत नाहीये. बाकी त्या सर्वांपेक्षा तुझा जास्त राग येत आहे मला.",तिने स्पष्ट सांगितलं.
"माझ्यावर का? मी काय केलंय?" त्याने विचारलं.
"त्या घरात मी येतेय ती तुझ्यासाठी म्हणून. नाहीतर त्या घरात मला काहीच स्वारस्य नसतं. आई-वडील ठीक एकवेळ, हे असले नातेवाईक तर मुळीच नाही. आता आईनी फोन केला त्याआधी तू का नाही बोललास त्यांना? तुला माहीत आहे ना मी कशी आहे? नमस्कार केल्यानेच मान मिळतो असं नाही ना?", दीपू.
चिराग फक्त ऐकत होता.
"तू ठरव तुला नक्की काय हवंय? केवळ मी का हे बाकी सर्व लटाम्बर?", तिने विचारलं.
"तू मला धमकी देतीयस का?" त्याने रागाने विचारलं.
"धमकी नाही विचार करायला सांगतेय. आपण कुठे होतो आणि कसे झालो आहे याचा विचार कर. आणि खरंच हे तुला हवंय का तेही.",इतकं बोलून तिने फोन कट करून टाकला.
दीपूच्या मनात आजतागायत कधीच न आलेला विचार येत होता,"खरंच मला चिरागशी लग्न करायचं आहे का?".....
क्रमश:
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
1 comment:
khup chan ahe... mast...ni pudhe kay zal m
Post a Comment