Thursday, June 08, 2017

कळलेच नाही.... तुझ्या प्रेमात.... -भाग ५(अंतिम )

मनात एकदा शंका आली की मग त्या शंकेच्या दिशेनेच ते जायला लागतं.  लग्न जवळ येत होतं तशी ती अजूनच अस्वस्थ होऊ लागली. त्याचं वागणं, बोलणं यातून आधी न दिसलेल्या अनेक गोष्टी तिला दिसू लागल्या. छोट्या कारणांवरून वाद झाला तरी ते मोठं वाटू लागलं. कितीतरी वेळा तिने स्वतःला समजावलं होतं,"फक्त लग्नापर्यंत धीर धर. मग आहोतच आपणच दोघे."

अशातच एक दिवस चिरागच्या वडिलांचा फोन आला. फोन ठेवल्यावर ते काळजीने बसले. चारदा विचारल्यावर शेवटी बोलायला लागले.

"ते याद्यांमध्ये आपलं ठरलं होतं ना, आपापले पाहुणे आपण सांभाळायचे म्हणून?" त्यांनी खात्रीसाठी आईला विचारलं.

"हो, का हो?", आई.

"ते पाहुणे म्हणत होते की आपण हॉल बुक केलाय ना लग्नाचा, मग तिथेच रात्री त्यांना पण झोपू देत ना.", बाबांनी सांगितलं.

"मग?",आई.

"अगं पण आपल्याला कसं शक्य आहे? आपण फक्त आपल्याच लोकांसाठी तयारी, गाद्या, जेवण हे सगळं सांगितलं आहे. तिथे झोपण्याची व्यवस्था होण्याइतका मोठा नाही हॉल.",बाबा काळजीने म्हणाले.

"आता काय करायचं?",आईलाही काळजी पडली.

"काय म्हणजे? नुसतं झोपायचं नाहीये ना? त्यांची राहायची व्यवस्था, गाद्या, सकाळचा चहा नास्ता, सगळाच खर्च येतो. त्यांचे शंभर लोक आहेत म्हणे. इतक्या लोकांचा रात्रीचा जेवणाचा, सकाळचा, राहायचा खर्च हे सगळं म्हंटलं तर चांगले ५०-६० हजार जास्त जातील. शिवाय दोन्हीकडच्या पाहुण्याना तिथली सोय पुरणार नाही.",बाबांच्या डोक्यात गणित चाललं होतं.

"पण या लोकांनी आपला आपला बुक केलाच असेल ना?", आईने विचारलं.

"म्हणाले मिळत नाहीये. काय माहित?", बाबा.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी खर्चाचा हिशोब काढला, हॉलला चौकशी केली. सगळं करून हे प्रकरण जमणार नाही त्यांना समजलं. त्यांनी तसं मध्यस्त काकांना सांगितलंही. काकांनी तसं तिकडे कळवलं. बऱ्याच चर्चा झाल्यावर 'तुमचं तुम्ही बघून घ्या' असं त्यांना सांगायला लागलं.
दीपूला यातलं काहीच माहीत नव्हतं. चिरागला भेटायला ती गेली तेंव्हा तो जरा चिडलेलाच दिसला.

तिने त्याला विचारलं तसं म्हणालाही तो,"थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं ना गं काकांनी पण. आता बाबांनी पण शोधले हॉल नाही मिळतंय तर काय करणार?"

"अरे पण हे असं अचानक सांगितल्यावर आम्ही तरी काय करणार?", दीपू.

"मला तर वाटतंय त्यांना हे करायचंच नाहीये, आधीही त्यांनी पाहुण्यांच्या खर्चाला नकारच दिला होता.",चिराग.

"मग बरोबर आहे ना. त्यांना जमत नाहीये म्हणून त्यांनी आधीच सांगितलं आहे. तुम्ही परत कशाला त्यांना विचारून त्रास देताय?",दीपू चिडली होती.

"आता आम्ही त्रास देतोय ?"चिरागने उपहासाने विचारलं.

"मग काय, त्यांना जे जमतंय त्यापेक्षा जास्तच करत आहेत ते.",दीपू.

"किती टेन्शन आलंय माहितेय घरी?",चिराग.

"मग आधीपासून करायचं ना?तुम्ही कशाला इतकी वाट बघत बसला होता? आम्ही केलंच ना? आणि काय रे, इतके दिवस बाकी गोष्टीत तू अजिबात बोलत नव्हतास आणि आता मला का हे सांगत आहेस?",दोघांच्या आवाजात चढाओढ लागली होती.

"हे बघ हेच ते. असं वागणं. तू आजकाल जरा चिडूनच वागतेयस. ",चिराग.

"मग काय चुकीचं बोलले सांग ना, जिथे गरज होती तिथे तू सोयीने गप्प बसलास. त्यांना बघू दे ना मग आता? नको पडायला आपण मध्ये.", दीपू म्हणाली.
पुढे भेटून बोलण्यासारखं काही नव्हतंच त्यामुळे ती भेट संपलीच.

------------------------------------------
चिराग घरी आला तर घरातही तंग वातावरण होतं.

"बघा आला भेटून तिला. तिनेच जादू केलीय याच्यावर. त्यांचं ऐकतो आपलं सगळं."त्याची आईनं तावातावाने म्हणाली.

"मी काय केलं आता?",चिरागने विचारलं.

"काही नाही ना? म्हणूनच तर ते लोक असं उर्मटपणे वागत आहेत. इतकं जमत नाही त्यांना? एकुलती एक मुलगी आहे म्हणे ना? मग काय फरक पडतो त्यांना?", आईने विचारलं.

"अगं पण आपणच बघायला पाहिजे होता हॉल. कशाला त्यांचे उपकार घ्यायचे?" चिरागने विचारलं.

"आहाहा उपकार म्हणे? कर्तव्यच आहे ते त्यांचं. इतकं जमत नाहीत तर कशाला हवा असा मुलगा तरी?", आई अतिशय रागाने बोलली.

"अगं पण बाकी सर्व करतायत ना ते? बघू आपण काहीतरी", बाबांनी तिला समजावलं.

"अहो, १०० लोक आपले, कुठे डोक्यावर बसवणार का? मी तर म्हणते नकोच आम्हाला अशा घरात सोयरीक.", आईच्या या वाक्यावर मात्र चिराग घाबरला होता. असंही होऊ शकतं याचा त्याने विचारच केला नव्हता.

"आई तू उगाच टोकाची भूमिका घेऊ नकोस हा. उगाच आपलं काहीतरी काढू नकोस.",चिराग पटकन बोलला.

"का रे? काय झालं?",आईने खोचून विचारलं.

"काय म्हणजे इतकं ठरवून मोडणार आहेस का?", चिराग.

"का? न मोडायला काय झालं? नंतर होण्यापेक्षा आधीच झालेलं बरं  ना? अशा लोकांशी आयुष्यभराची सोयरीक करायची? किती ताप होईल विचार कर.", आईने सांगितलं.

"बाबा तुम्ही सांगा की आईला. काय बरळतेय.", चिरागने विनवणी केली.

"मी काय बोलणार? ती बरोबरच सांगतेय. या लोकांशी जुळवून नंतर त्रास झाला तर? त्यात मुलीनं आताच तुला फूस लावलीय. उद्या तर आम्हाला सोडूनच जाशील.",आई.

"हे बघ मी काही तुम्हाला हे असं करू देणार नाहीये.",चिरागने मोठ्या आवाजात सांगितलं.

"का रे? काही झालं-बिलंय का काय तुमचं? बघा म्हणजे पोरगी किती पुढची आहे ते." आई.

"आई ...काय बोलतेयस काही कळतंय का?",चिरागला ओरडला.
 त्याला आता पुढे काय या काळजीने घेरलं होतं. तिकडे रागाने दीपूही फोन उचलत नव्हती.
------------------------------------------
तो पुन्हा रात्री तिच्या घरीच गेला.

"दीपू अगं ते असं तोडायचं बोलणी करत आहेत. मी पैसे देतो लागतील ते, तेव्हढं जमवून घ्या हॉलचं . " चिराग काळजीने म्हणाला.

"ठीकाय पैसे देशील आज, उद्या अजून काय काय असं लपवणार? सरळ सांग ना त्यांना काहीच नकोय यातलं म्हणून. करून येऊ रजिस्टर लग्न. चालेल का?",तिने त्याला विचारलं.

"आता इतकं सगळं झाल्यावर ते काय पुन्हा?" त्यानं विचारलं.

"मला ना चिराग आता बाकी कशाचीही काळजी नाहीये. भीती आहे. फक्त तुझी. उद्या ज्याच्या प्रेमासाठी मी तिथे येणार तोच इतका पळपुटा असेल तर माझं काय आहे त्या घरात?",दीपूने विचारलं.

"तुला हवी आहे ना मी? मग चल करू आपण रजिस्टर लग्न आणि मग काहीच प्रश्न नाहीये." तिने विचारलं.

"हे बघ, हे काही जमणार नाही. मी अजूनही सांगतोय मी जे काही पैसे लागतील ते देतो, आपण हे इथेच मिटवू.",चिरागने फायनल सांगितलं.

"मिटवायचं? हा काय व्यवहार आहे का? किती वेळा सांगतेय विचार कर काय हवं आहे नक्की. इतकं सगळं होऊनही या छोट्या कारणावरून तुझे आई-वडील लग्न मोडायला तयार आहेत. उद्या अजून काय झालं तर डिवोर्स घ्या म्हणतील. तू नको विरोध करायला?", तिने त्याला विचारलं.

त्याच्याकडे यावर उत्तर नव्हतं. बराच वेळ न बोलता ते बसून राहिले. थोड्या वेळाने तिचे वडील तिकडे आले आणि म्हणाले,"चिराग, तुझ्या घरच्यांनी फोन केला होता, आमच्या मुलाला पाठवून द्या म्हणून. उगाच आम्ही तुला फूस लावतोय हा आरोप आमच्यावर नको. जे काही होईल ते तुम्हाला कळवूच. या आता."

चिराग नाईलाजाने निघून गेला.
--------------------------------------------

पुढच्या दोन दिवसांत अनेक फोन झाले. रडारड-चिडचिड, मध्यस्त, सगळ्या वादानंतर लग्न मोडलं होतं.
त्या दोघांनीही एकमेकांशी बोलायचा प्रयत्न केला नव्हता. एखादं नातं इतकं बदलू शकतं? केवळ दोन-चार महिन्यांत? त्यात प्रेम राहातच नाही मग. त्यांनाही आता ती ओढ, इच्छा राहिली नव्हती. होतं ते राग, द्वेष, दुःख आणि 'तो/ती असं कसं करू शकते?'  हा अविश्वास.

महिन्याभरानंतर तिने त्याला एक मेसेज केला,"तुझ्या प्रेमात कळलंच नाही  कधी वाहवत गेले. तू म्हणालास म्हणून 'बघून घ्यायचा' कार्यक्रम केला, मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अगदी तुझ्या नातेवाईकांना समजून-जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. पण जितकी पुढे जात होते, स्वतःला मारत होते. माझ्यातल्या प्रेयसीलाही. तुझ्याकडून जो आधार मिळावा अशी अपेक्षा होती तो मिळत नव्हता. कदाचित तुलाही माझ्याकडून मिळाला नसेल. एक चूक झाली, प्रेम दोघांत होतं. ते तसंच ठेवायला हवं होतं. त्यात व्यवहार मध्ये आला आणि शेवटी प्रेम संपून केवळ व्यवहारच उरला. कितीतरी वेळा विचार करते झालं ते योग्य की अयोग्य. फक्त एक सांगू शकते फक्त थोडी हिम्मत दाखवायला हवी होती त्या वेळी. पण आता खूप पुढे गेलोय आपण. पुन्हा तसे प्रेमाने जवळ येणं शक्य होईल असं वाटत नाही. मी जे काही बोलले रागाने, द्वेषाने त्याबद्दल माफ कर. प्रेम नसलं तरी मनात एकमेकांबद्दल राग तरी राहायला नको असं मला वाटतं. तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. टेक केअर. दीपा."

त्या दोघांमधला तो शेवटचा संवाद होता.

-------------------------------------------------

माणूस कितीही दुःख असलं तरी विसरून जातोच.कदाचित तो तसाच राहत नाही पण जगायला शिकतोच. दीपू शिकली...चिरागही शिकला. वर्ष उलटून गेलं होतं. कधीतरी विचार मनात यायचा, खरंच चूक नक्की कुणाची होती? पण नुसता विचार करण्यापलीकडे कुणीच काही करत नव्हतं. दोघं अधून मधून त्या मॅट्रिमोनी वेबसाईट वर एकमेकांचा प्रोफाईल बघत होते. बाकी लोकांमध्ये असंही स्वारस्य उरलं नव्हतं. त्या साईटवर स्टेट्स बदलत तर नाहीये हे बघून घेत होते. 
एक दिवस चेक केलं तरीही त्याला तिचा प्रोफाईल काही दिसला नव्हता. त्याला खूप अस्वस्थ झालं. दिवसभरात अनेक वेळा त्याने ते चेक करून पाहिलं. कॉमन मित्राला फोन करून आडूनही विचारलं. पण कुठूनच काहीच उत्तर मिळालं नाही. तो दिवस कसाबसा काढला त्याने. पुन्हा सकाळी तिच्या नावाने पेजवर सर्च केलं, काहीच नाही. 
मनात एकच विचार येत राहिला,"तिचं लग्न ठरलं असेल का?'. 'असणारच ना? इतकी तर छान आहे ती', 'माझ्यासारख्या मुलाला तिने होकार दिला हे नशीबच होतं माझं', 'मी किती मूर्ख आहे?', 'मला इतक्या सहज विसरू शकली ती?', 'असणारच ना? मी वागलोच तसा होतो?', 'तिच्या मेसेजला उत्तर देण्याचं धाडसही नव्हतं माझ्यात', 'खूप उशीर झालाय का?', एक ना अनेक विचार ते. 
खूप हिम्मत करून त्याने तिला मेसेज केला,"कॅफे प्लीज?". 
खूप वेळाने उत्तर आलं होतं,"ओके". 

त्याचा चेहरा अपेक्षेने खुलला पण मनात एक शंकाही आली,"लग्न ठरलं असणार, म्हणून तर शेवटचं भेटायला हो म्हणाली असेल.". 

संध्याकाळी तो कॅफे मध्ये गेला तर ती आधीच आलेली होती. किती वर्षांनी पहात होता तो तिला. ती कशी दिसते याची त्याने मनात हजार वेळा उजळणी केली होती तरीही तिला पाहिल्यावर चुकून डोळे भरून येतील की काय,अशी भीती त्याला वाटली. 
ती हसली, छान, कितीतरी वर्षांनी. तोही मग बसला, अवघडलं हसून. 

"बारीक झालीस.", त्याने विचारलं. 
"हां डाएट करत होते गेले काही दिवस.", तिच्या आवाजात मोकळेपणा होता. 
कितीतरी दिवसांनी मग ते मोकळेपणाने बोलले. 
त्याने विचारू की नको म्हणत विचारलंच,"लग्न ठरलं असेल ना?"
"कशावरून?",ती. 
"नाही ते डाएटचं म्हणालीस म्हणून म्हटलं.", चिराग. 
"लग्नासाठी डाएट? बाकी सर्व करून झालं, तेव्हढंच राहिलं होतं बघ. नाही का?", तिने चिडवण्याच्या स्वरात विचारलं. 
"तुझा प्रोफाईल दिसला नाही, मग मला वाटलं...ठरलं असेल." त्याने विचारलं. 
"नाही, असंच काढून टाकला. काय करणार ठेवून तरी? उगाच नजर नको तिकडेच जाते. जे बघायचं, करायचं ते सर्व पाहून झालं. शेवटी काढून टाकला.", तिने खरं सांगितलं. 
तिचं उत्तर ऐकून वाईट वाटलं खरं, पण अजून लग्न ठरलं नाही याचा आनंदही. 
"सॉरी दीपू.", चिराग. 
"कशाबद्दल?", ती. 
"सर्वच गोष्टींबद्दल. तुला इतका त्रास झाला, दिला त्याबद्दल. त्यावेळी आपण कसे वागतोय याची शुद्धही नव्हती त्याबद्दल. आपलं लग्न मोडलं, तेंव्हा काहीच न केल्याबद्दल. अगदी तुझा लास्ट मेसेज आला त्याला उत्तरही न दिल्याबद्दल. खूप वेळ लागला जे झालं ते नक्की काय होतं हे समजायला. तू म्हणत होतीस ना, नक्की काय हवंय याचा विचार कर. ते कळायलाही इतका उशीर झाला.", चिरागने सांगितलं.
"आज तुझ्याशी बोलताना कळतंय जवळच्या मैत्रिणीशी बोलताना काय वाटत असतं. तू गेलीस आणि प्रेमासोबत मैत्रीणही गेली. मग समजवणार कोण आणि आधार तरी कोण देणार? सगळं आपणच केलं. काल तू तो प्रोफाईल काढून टाकलास आणि लक्षात आलं की खरंच असं झालं असेल तर काय....? इतके दिवस नव्हती ती हिम्मत आली, तुला मेसेज केला. खरंच प्रेम गमावण्याची भीती मनात आली तर हिम्मत येतेच बहुतेक. तेंव्हा तू माझीच होणार हे गृहीतच धरलं होतं. त्यामुळे काही करायचे प्रयत्नही केले नाहीत. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल सॉरी.", तो पुढे बोलला.

"किती वेळ गेला रे हे सगळं कळायला? तुलाच नाही मलाही. प्रेम होतं म्हणे आपलं. एका वादळात कोलमडून पडलो आपण. इतके की गोळा करायला तुकडेही शिल्लक राहिले नाहीत. म्हणे खरं प्रेम आपलं. आपल्या माणसासाठी म्हणून दोघेही कणभर बदलू शकलो नाही. काय याचा फायदा? ", तिने विचारलं. 

"खरंय, आता वाटतंय, बाकी काहीही महत्वाचं नाहीये तू सोडून. इतके दिवस सर्व सोबत असूनही एकटाच पडलो होतो. आता आज तू आहेस तर काहीच महत्वाचं वाटत नाहीये, तू सोडून. कसं सांगू तुला दीपू? मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. " तो जोशात बोलला.
"चिराग, या एका वाक्यासाठी आसुसलेले मी. गेलं वर्षभर वाट पाहिली त्याची. पण ना तू आलास ना तुझं हे बोलणं. एकमेकांची गरज असताना, एकेकटे जगलो आपण. आणि मुख्य म्हणजे तुझ्या प्रेमात कळलंच नाही मला, मी स्वतःचं 'मी' पण कधी हरवत गेले. तुझ्यासोबत राहायचं म्हणून स्वतःत छोटे छोटे बदल करत गेले, स्वतःला समजावत राहिले. पण ते पटलं नाही त्या क्षणी हे सगळं तुटलं. मला नाही वाटत रे आता परत ते सगळं जुळेल. तो प्रोफाईल काढून टाकला कारण पुन्हा तिथंपर्यंत पोहोचण्याइतकी शक्ती आता तरी नाहीये. तू विचारलंस म्हणून भेटले. पण ते इतकंच.", दीपू बोलली. तिला बोलतानाही वाईट वाटलं होतं. पण स्पष्ट बोलणं गरजेचं होतं.

"दीपू, माझ्याशी लग्न करशील?", चिरागने जमेल तितक्या गंभीरपणे विचारलं.

"नाही चिराग. नाही जमणार मला ते. आपलं मैत्रीचं नातंही हरवलं या सगळ्यात. आपली व्यक्तिमत्व, विचार, सगळंच. तेही इतक्या झटक्यात. आयुष्यात अनेक वादळं येतील. ती कशी पार पाडणार आपण? पुढे मला काय हवंय हे मला माहित नाही, पण प्रेमात व्यवहार नको हे नक्की कळलं. ती चूक आपण केली आता परत फिरणं नाही जमणार. त्या सगळ्यात आपल्या नात्यात एक कडवटपणा आला. तो असा अचानक नाहीसा होईल असं वाटत नाही. आपलं लग्न होऊ शकत नाही. I am sorry dear. ", ती बोलली. दीपूने आपली बॅग घेतली आणि ती निघून गेली, चिरागला बोलण्याची संधीही न देता. 


समाप्त. 

विद्या भुतकर.

1 comment:

dipali said...

so nice story...beautiful...truth love...