Monday, December 09, 2019

.....तो जिन्दा हो तुम

     दोन आठवड्यांपूर्वी एका ट्रिपला जाऊन आलो. ५-६ दिवसांची ट्रिप होती. खरंतर मी आणि नवऱ्याने ठरवूनच कधी नव्हे ते आधी बुकिंग करुन वगैरे सर्व नीट केलं होतं, तेही दोनेक महिने आधी. ट्रीपला जायचे दिवस जवळ आले तसे उत्साहाने खरेदीही केली. ती जागाच तशी होती, कॅंकून, मेक्सिको. इथल्या थंडीतून मस्त गरम वातावरणात ५-६ दिवस मिळणार होते. स्विमिंग पूल, तिथलं जेवण, ऊन आणि बाकीही पोरांच्या साठी ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या. आणि इतकं सगळं असूनही मला मनात एकच भीती होती. दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात अशाच उत्साहाने डिस्नीला ट्रिपला गेलो होतो. आणि परत येताना पाठदुखीचा जो त्रास सुरु झाला तो सर्जरीवरच थांबला. आजवर कधी कुठे जाताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायची सवय नव्हती. मनात आलं की निघालं. कितीही लांबचा प्रवास, ड्राइव्ह असू दे. पण दोन वर्षांनी बाहेर पडताना मला भीती वाटत होती. 
       जातानाही सर्व गोळ्या, औषधं सोबत घेऊनच निघाले. तिथे पोचण्याचा प्रवास तरी नीट पार पडला होता.पहिला दिवसही वॉटर पार्क मध्ये छान गेला. पण दुसऱ्या दिवसाची मात्र मला जास्तच  काळजी होती. त्यादिवशी आम्ही झिप-लायनिंग, ऍडव्हेंचर कोर्स, स्पीड बोटिंग आणि स्नॉर्कलिंग हे सर्व करणार होतो. तिथे वेळेत पोहोचून झिपलायनिंगसाठी अंगावर साहित्य चढवलं आणि मला जबरदस्त भीती वाटू लागली. पोरं उत्साही असल्याने त्यांनाच पुढं केलं. मग हिंमत करुन दोर पकडला आणि तिथल्या लोकांनी ढकलल्यावर जे सुटले दोरावरून....... फक्त एक क्षणभर काय ती भीती वाटली पण पाण्यावर उंचावरुन जाताना एकदम भारी वाटत होतं. पहिल्या झिपलाईन वरुन नीट पोचल्यावर जरा बरं वाटलं. 
       पुढे ऍडव्हेंचर कोर्स होता. दोऱ्यांच्या जाळीला पकडून खालच्या लाकडी किंवा दोरीच्या गाठींवरुन पाय ठेवत पुढे जायचं होतं. ५ अडथळे पार करायचे होते. पोरं पटापट सरकुन पुढे जात होती आणि मी मात्र जपून पाय टाकत चालत होते. हो कुठे काय पाय मुरगळला वगैरे तर? गंमत म्हणजे माझ्या मागे दोन इथल्याच बायका ग्रुपमध्ये होत्या. त्यांचं वय निदान ५५ च्या पुढचं तरी होतं. आणि त्या निवांतपणे हे सर्व  सर्व अडथळे पार करुन जात होत्या. त्यांना पाहून मलाच थोडीशी लाज वाटली. आम्ही शेवटचा अडथळा पार करुन स्पीड बोटच्या टप्प्यावर आलो. तिथे चार ग्रुप होते. आम्ही चौघे एका बोटमध्ये. तिथल्या माणसाने त्याच्या मेक्सिकन इंग्लिशमध्ये आम्हाला सर्व सूचना सांगितल्या. तो पुढे जाणार, आम्ही चार ग्रुप त्याच्या मागेआपापल्या बोटीत. बोटीचा वेग कमी जास्त करणे, ती चालवणे या सूचना मी जमेल तशा ऐकल्या. कारण चालवणार संदीप होता. त्या गाईडच्या मागे बोट घेऊन आम्हाला समुद्रात जायचं होतं. 
        संदीप आणि सानू बोटीत पुढे बसले आणि मी, स्वनिक मागे. आणि ज्या वेगाने बोट सुसाट निघाली, मला वाटलं संपलं !  पाठीला प्रचंड दणके बसत बोट वेगाने गाईडच्या मागे जात होती. मला त्रास होतोय म्हणून संदीपने थोडा वेग कमी करायचा प्रयत्न केला. पण आम्ही ग्रुपच्या मागे पडत होतो. म्हणून नाईलाजाने परत वेगानं जावं लागलं. लाटांवरुन, लाटांचा बोटीला बसणारा धक्का चुकवत आम्ही २५ मिनिटं बोट चालवून पाण्यात पोहोचलो जिथे स्नॉर्कलिंग करायचं होतं. मी तर पोहचेपर्यंत इतकी घाबरुन गेलेले की घरी तरी नीट पोहोचू दे असं वाटून गेलं. 
         पाण्यात एका जागी बोटी लावून गाईडने आम्हांला तोंडाला लावायचे मास्क दिले. त्याने तोंडाने श्वास कसा घ्यायचा हेही सांगितलं. पायांत बदकासारखे चप्पल घातले. सानूला नेहमीप्रमाणे घाई. ती पाण्यात उतरली, पण श्वास घ्यायचं नीट जमेना म्हणून परत वर आली. म्हटलं आपण बघावं जमतंय का म्हणून मी पाण्यात उतरले आणि एकदम समुद्रांत उतरलोय हे जाणवलं. आजवर फक्त पूलमध्ये उतरलेली मी. दोन सेकंदांतच परत बोटीवर आले. पण त्या बोटीला धरुन वर चढताही येईना. त्या दुसऱ्या ग्रुपमधल्या वयस्कर बाईंनीच मला हातांना धरुन वर ओढलं. समोर दिसणारा किनारा, डोक्यावरचं ऊन आणि इतक्या जवळ येऊनही कोरल्स बघायला पाण्यांत उतरता येत नाही याची खंत जाणवत होती. 
        पुढच्या पाच मिनिटांत आमचा गाईड तिथे आला आणि म्हणाला, Do you need help?. म्हटलं हो हो. त्याने पाण्यात खाली घेतलं मला तरीही काही नीट जमेना. शेवटी उजव्या हाताला त्याने धरलं आणि कुठल्यातरी एका क्षणी मला ते तोंडाने श्वास घेणं जमायला लागलं. पण हात काही सोडायला जमेना. शेवटी त्या गाईडनेच मला हात धरुन पुढे नेलं, पाण्यांत. श्वास घेता येऊ लागला तशी मी पाण्याखाली डोळे घातले. दोनेक मिनिटांतच आम्ही कोरल्स बघू लागलो. आजूबाजूचे सर्व आवाज बंद झाले. फक्त माझा श्वास आणि पाण्याखाली दिसणारे कोरल्स आणि त्या गाईडचा हातातला हात. इतकंच जाणवत होतं. पुढे जाऊ तसे त्यानं मला बोट दाखवून माशांचा एक जत्था दाखवला. अगदी हात लागेल इतक्या जवळून कोरल्स पाहिले. ती शांतता, ते दृश्य अनुभवतांना मला एकदम जिंदगी ना मिलेगी दोबारा मधले ह्रितिक आणि कतरीना आठवले. घाबरलेल्या त्याला हात धरुन नेणारी ती आणि पुढे गेल्यावर अवाक नजरेने ते सुंदर दृश्य बघणारा तो. आपण हे अनुभवतोय यावर माझा विश्वास बसत नव्हता. लवकरच मी बोटीवर परत आले. संदीप आणि पोरांचं बघून होईपर्यंत थांबलो आणि परत धक्के खात बोटीने मूळच्या जागेवर आलो. 
      पण खरं सांगू का? परत येणं ही केवळ फॉर्मॅलिटी होती. त्या अख्ख्या दिवसांत अनेक वेळा मला वाटलं होतं की 'आपण हे केलं नाहीतरी चालेल ना. काय बिघडतंय?'.  पण भीती वाटत का होईना मी त्यादिवशी तिथल्या सर्व ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्या शेवटच्या टप्प्याला हवं ते अनुभवता आलं याचं समाधान आयुष्यभर राहील. अर्थात हॉटेलवर येऊन खाऊन, पिऊन मस्त झोप काढली ही गोष्ट निराळी. पण एका दिवसाकरता का होईना मी माझा 'जिंदगी ना मिलेगी ना दोबारा' चा  क्षण जागून घेतला होता. दोन वर्षं मनात असलेली भीती थोडी का होईना कमी झाली होती. 

"दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम

हवा के झोकों के जैसे आजाद रहना सीखो 
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो 
हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें 
हर एक पल एक नया समां देखे ये निगाहें 

जो अपनी आँखोमें हैरानियाँ लेके चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम 
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम. "

विद्या भुतकर. 

Tuesday, December 03, 2019

दों प्रकार के लोग

       इस दुनियामें दों प्रकार के लोग होते हैं ! असं म्हणून लोकांचे कितीतरी प्रकार आजवर ऐकलेत. तसे मला विचाराल तर माझ्याकडेच हजारेक प्रकार सांगता येतील. म्हणजे, परीक्षेच्या वेळी रात्री जागून अभ्यास करणारे, तर काही पहाटे उठणारे. खरेदीला गेल्यावर पटकन दोन चार वस्तू घेऊन टाकणारे तर तासंतास घेऊन एकही कपडा न निवडणारे. कसंही जेवायला दिलं तरी आनंदाने खाणारे(नवऱ्यासारखे), तर माझ्यासारखे चार वेळा गरम करावं लागलं तरी मनाला हवं तसंच खाणारे. असो तर एकूण काय की असे अनेक प्रकार. या दिवाळीत फराळ करताना लक्षांत आलं या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक शब्दश: रेसिपी आहे तशीच अंमलात आणून पदार्थ बनवणारे आणि दुसरे माझ्यासारखे नको तिथं स्वतःचं डोकं लावणारे. 
           दर दिवाळीत फराळ बनवायला सुरुवात केली की मी सर्व रेसिपीज बघून घेते. नव्याने ठरवते की यावेळी जसं लिहिलंय तसंच डिट्टो करायचं. पण होतं काय रव्याच्या लाडूंचं अगदी एक दोन वाट्यांचंच माप दिलेलं असतं. मला वाटतं अरे इतके कमी कसे करणार. मग तेच माप मी चारपट वाढवते. प्रमाण वाढवलं की त्यात साखरही एकदम ८ कप वगैरे होते. आता एकदम आठ कप साखर टाकायला नको वाटतं. त्यामुळे जे काही प्रमाण दिलंय त्याच्यात मी थोडी काटछाट करते. त्यामुळे मग पाक पातळ होणार किंवा कमी तरी होणार. असं करुन त्या लाडवांचं बिनसतंच. मग वैतागून मी आईला फोन करते. आईच्या हातचे रव्याचे लाडू म्हणजे एक नंबर. आई मात्र तिच्या ठरलेल्या वाट्यांचं प्रमाण मला सांगते. आणि माझी अजूनच चिडचिड होते. ते मापाने केलं असतं तर कशाला ना? रव्याचे लाडूच कशाला? बाकीच्या फराळाची पण तीच गत असते. चकली, चिवडा, शंकरपाळ्या. माझ्या दोनेक वर्षांपूर्वीच्या माझ्या चुकलेल्या शंकरपाळ्यांवर मला अनेक सूचना आल्या होत्या कमेंटमध्ये. पण मी ऐकेल तर ना? अनेक मैत्रिणी इतका छान फराळ बनवतात. कसं बनवतेस म्हटलं की डायरेक्त प्रमाणच सांगायला लागतात. आता त्यांना काय बोलणार? 
          फराळाचं जाऊ दे, माझ्या आईची ३० वर्षांपूर्वीची केकची रेसिपीही अजून तीच आहे. त्याच मापाने, त्याच भांड्यात, त्याच चवीचा भारी केक बनतो, अगदी जसा आमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी बनायचा तसाच. हे माप प्रकरण बेकिंगच्या बाबतीत अजून जास्त त्रासाचं. मला अनेकदा ते पावभाजीचे पाव बनवून बघायचे होते. दरवेळी मी उत्साहाने सुरु करणार, मग त्यात बटर/यीस्ट काहीतरी कमी जास्त होणार. किंवा ते किती वेळ ठेवायचं वगैरे चुकणार. असं करुन मी तीन चार वेळा ते कणकेचे गोळे फेकून दिले. पण हे असं इतक्या वेळा चुकल्यावर एकदम रागाने मी अगदी दिलीय तशीच रेसिपी बघून केले आणि चक्क झाले ना राव, पाव ! लई भारी वाटलं. पण त्याचवेळी दोन डॉलरच्या पावसाठी मी इतका वेळ आणि कष्ट घालवू शकत नाही असंही वाटलं. चांगले पाव बनवल्याची ती पहिली आणि शेवटची वेळ. तर मुद्दा काय की हे बेकिंग वगैरे मधे खासकरुन दिलेलं प्रमाण आणि कृती जास्तच मन लावून पाळावी लागते. 
         लहानपणी आईला विचारलं मिठाचं प्रमाण सांग वगैरे तर म्हणायची मला नाही सांगता येत, अंदाजाने घालायचं. हे अंदाजपंचे धागोदर्शे कसं करायचं हे अनेक वर्षं कळलं नाही. पण आता सान्वी तेच प्रश्न विचारते आणि कळतं की एखादी रेसिपी बरोबर लिहिणं, सांगणं किती अवघड असतं. समोरच्या माणसाला काहीही येत नाही असं समजून प्रत्येक घटक, प्रत्येक कृती लिहून द्यायची. आणि ते सर्व जसंच्या तसं करुन समोरचाही एकदम बरोबर तसाच पदार्थ बनवणं. हे किती अवघड आहे आणि त्यांत margin of error किती आहे याची कल्पना आहे का? हे म्हणजे मी एखाद्या प्रोजेक्टसाठी स्पेसिफिकेशन लिहिणे आणि डेव्हलपरने ते तसंच्या तसं कोड करुन तो एकदम हवा होता "तसाच" सॉफ्टवेअर प्रॉडक्ट बनवणे याच्याइतकं अवघड आहे. बरोबर ना? मला असा एकदम शोध लागला की खूप आनंद होतो. तर एकूण काय की रेसिपी लिहिणे आणि त्या पाळणे हे कठीणच काम. पण हे पाळणाऱ्या माणसांचं किती बरं असतं. चुका कमी आणि चव एकसारखी प्रत्येकवेळी. 
         तर लेकीला अनेकदा पाहताना वाटतं ही का नियम पाळत नसेल? मी एखादी गोष्ट सांगतेय म्हणजे अनुभवातूनच सांगतेय ना? बाकी सगळे एखादी गोष्ट जशी सांगितलीय तशीच करत असताना, का तिला स्वतःलाच हवंय तसं करायचं असतं? सर्व माहिती दिलेली असतांना फक्त झापडं लावून, लिहून दिलेली गणितं करणं का हीला अवघड वाटतं? अशावेळी कधीकधी मला अशी नियम न पाळता स्वतःच्या मनाला योग्य वाटेल तशीच रेसिपी वापरुन पदार्थ बनवणारी मी आठवते. मग त्यात चुका होणारंच हे ठरलेलंच. नाही का? कधीतरी त्या चुकांतून धडे घेऊन तीही मान्य करेल की नियम पाळलेच पाहिजेत. किंवा तिला एखादी नवीन स्वतःची रेसिपी मिळेल. नाही का? असो. 
बाय द वे, तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता? 

विद्या भुतकर. 

Sunday, November 24, 2019

Win-Win

मागच्या आठवड्यात काही कपडे खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. थंडी वाढेल तसं बाहेर पडण्याचा आळस टाळून काही ना काही घेणं गरजेचं होतं.  लेकाला प्लेडेट (play date , इथे तो डोळे फिरवणारा स्माईली पाहिजे) ला सोडून दोन तासांत यायचं ठरवून बाहेर पडलो. एकतर खूप दिवसांनी असे फक्त खरेदीला बाहेर पडलो होतो त्यात लेकीला कधी नव्हे ते एकटीला घेऊन. सुरुवातीला दुकानांत गेल्यावर तिच्यासाठी न घेता माझी खरेदी सुरु केली. तरीही तिने कुरकुर न करता स्वतः मला काय चांगलं दिसेल ते सुचवायला सुरुवात केली. दोन चार झगमगीत कपडे मी पाहिले तर म्हणे,"आई तू हे असलं घालशील?". म्हटलं, का नाही? तिने तसा बराच वेळ संयम ठेवला. पुढे लेकाला घ्यायची वेळ झाल्याने मी आणि दोघीच उरलो. 

       म्हटलं चल आता तुझी खरेदी करु. मी सुचवेन त्यातलं बरंचसं ती नाहीच म्हणत होती. मग एकदा बोललीही," मला तुला प्रत्येकवेळी नाही म्हणताना वाईट वाटतंय, पण मला खरंच ते आवडत नाहीयेत." म्हटलं, असू दे चल अजून बघून पुढे.". मग एखादा कपडा कसा दिसतोय यावर हसत, 'हे काये?' वगैरे कमेंट करत आम्ही पुढे चालत राहिलो. मोजून दोन कपडे घेतले. दुसऱ्या दुकानात फिर फिर फिरुन तिने एक शर्ट उचलला. विकत घ्यायला जावं म्हटलं तर तिथे भली मोठी रांग होती. ती म्हणे,"आई मला या टॉपसाठी इतका वेळ उभं राहायची गरज नाहीये." असं म्हणून तो तिथेच ठेवून पुढे निघालो. तिला आता दोन तास फिरुन भूक लागली होती. तिचे आवडते 'प्रेत्झल (pretzels) घ्यायची माझी इच्छा नव्हती. म्हटलं,"तुला खरंच सांगते तो नुसता मैद्याचा गोळा असतो. त्यापेक्षा काहीतरी चांगलं खाऊ." ती नाईलाजाने हो म्हणाली. मग आम्ही माझा आवडता 'समोसा चाट' घेतला. तिने आधी समोसा खाल्लेला पण समोसा चाट खाल्लेलं नव्हतं. सोबत मँगो लस्सीही. 

        दोघी मग एका ठिकाणी निवांत बसून एकाच प्लेटमधून समोसा चाट खाऊ लागलो. भुकेला काय? पण 'खूप भारी लागतंय' म्हणाली. ती ते मन लावून खात असताना मी तिला सांगायला लागले. म्हटलं,"प्रत्येकवेळी खूप किंमत असलेली वस्तूच चांगली असते असं नाही. उलट तू आज्जीला सांग एखादी साडी छान आहे म्हणून ती तुला सांगेल तिने कशी कमी दरात चांगली साडी घेतली ते. आपल्याला आवडली वस्तू तर त्याची किंमत बघायची नाही. उलट कमी असेल तर 'इट्स गुड डील' म्हणून आनंद मानायचा. प्रत्येकवेळी ब्रँड बघायला तू अजून लहान आहेस. blah blah ..... " मी बोलत राहिले ती खात ऐकत राहिली. परत येताना म्हणालीही,"खूप मजा आली आज आपणच खरेदीला जायला." 

       बरं गोष्ट इथेच संपत नाही..... :) लेकाची बाजू आहेच ना? हिला जितका खरेदीमध्ये उत्साह आणि संयम तितका हा उतावीळ आणि कंटाळलेला. दोन दिवसांनी सान्वी क्लासला गेलेली असताना त्याला घेऊन खरेदीला गेलो. तर याचं गाडीतच सुरु झालं,"मला कशाला घेऊन जाताय, मी शाळेत असताना का जात नाही? तुम्ही खूप वेळ लावता. बाबांचे कपडे घ्यायला माझं काय काम?...." तोंड वाकडं करुनच मॉलमध्ये आला. थोडा वेळ झाल्यावर निवळला तेव्हा मी बोलायला सुरुवात केली. 
म्हटलं, "चल बाबा कपडे ट्राय करताहेत त्यांना अजून काही चांगलं दिसतं का बघू. " त्याला विचारुन दोन टी शर्ट उचलले. त्यानेही कुठला रंग चांगला वगैरे सांगितलं, बाबाला एक शर्ट 'टाईट आहे, पुढचा साईज घे' म्हणून सांगितलं. 
बाबा ट्रायल रुममधे असताना मी लेकाला म्हटलं, "बाबू तुला सांगू का काय होतं? तू आता कंटाळा करशील हे कपडे घ्यायला. पण उद्या तू मोठा झाल्यावर तुझ्या गर्लफ्रेंड सोबत गेलास शॉपिंगला तर काय करशील?".
हे ऐकल्यावर त्याने कान टवकारले. "
म्हटलं," तुला कपड्यातलं काही माहीतच नसेल. तू बाहेर आपला फोन घेऊन बसशील. आणि ती म्हणेल हा किती बोअरिंग माणूस आहे." 
यावर हसला आणि पुढची खरेदी एकदम सुरळीत झाली. :) अगदी दीदीसाठी लिपग्लॉस घ्यायचा का यावर चर्चाही झाली आमची. निघताना स्टारबक्स दिसलं आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचा आवडता केकपॉप तिथे होता ना? नवराही खुश होऊन एक केकपॉप त्याच्यासाठी घेऊन आला. 
म्हटलं,"हे बघ याला म्हणतात win-win. तुला खाऊ मिळाला आणि आम्हांला चांगले कपडे. " म्हणे,"हो ५०-५० ना?". म्हटलं,"५०-५० मधेही, you lose 50%. Win-Win मध्ये दोघांचाही फायदा असतो, नुकसान नसतं." अशा गप्पा करत घरी परतलो. 

          यावर विचार करताना वाटलं, दोन्ही पोरं आपलीच. पण ते आपल्यासोबत एकटेच असताना जे बोलणं होतं ते किती वेगळं आणि खास असतं. ती जवळीक वेगळीच. आणि याहीपेक्षा, रोज अभ्यास, शाळा, क्लासेस आणि चांगलं वागायचं वळण लावणं या सगळ्या नियमांच्या गराड्यात आपण त्यांचे लाड करायचं विसरुनच जातो. ते हे असे एकटे सोबत असतांना जास्त जाणवतं. नाही का? 

अरे हो, सांगायचंच राहिलं, परत येताना स्वनिक म्हणे,"आई खरंच असे लोक असतात? जे आपल्या बायको-गर्लफ्रेंड सोबत खरेदीला जात नाहीत?". म्हटलं, किती भोळं ते पोरगं माझं. आता त्याला काय सांगणार? :)


विद्या भुतकर. 

Sunday, November 10, 2019

आमच्या काकू

        एका खांद्यावरुन दुसऱ्या बाजूला कमरेवर लटकणारी छोटी पर्स घेऊन, साडीचा पदर खोचूनच किंवा पिनेने नीट लावून, पायांत काळ्या थोडीशी उंची असलेल्या चपला घालून, डोळ्यांवर गोल आकाराच्या भिंगाचा आणि सोनेरी काड्यांचा चष्मा लावून काकू नेहमी कुठे ना कुठेतरी जाण्याच्या घाईत असतात. वेळ, काळ यांचा त्यांच्या गतीशी काहीही संबंध नसतो. त्यांचा जोश तितकाच. संध्याकाळी बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये टाकलेल्या बेंचवर शक्यतो बाकी काकूंसोबत बसलेल्या दिसतील. आता 'काकू' सारखा बहुप्रचारी शब्द सापडणार नाही. का तर लग्नं झालं की पुतण्यांकडून आपोआप मिळणाऱ्या 'काकू' पदापासून माझ्यासारख्या दोन मुलांची आई असलेल्या काकू पर्यंत आणि तिथून पुढे 'आजी'च्या आधीच्या वयाच्या सर्व बायका म्हणजे काकू ! आता एखादी, दुचाकी चालवत रिक्षाला आडवी जाणारी 'ओ काकू !' वेगळी. पण आमच्या या 'काकू' म्हणजे दोन मोठ्या मुलांची आजी असूनही पोरांच्या वयाचा उत्साह असणाऱ्या काकू. काय नाव देऊया त्यांना? नको राहू दे.

         तर काकू देशस्थ. रंग सावळा, उंची ५.३ असावी. केस करडे- सफेद. कपाळावर ७ सेंटीमीटर व्यासाची गोल टिकली आणि एक बारीकशी रेघ. हातात २-४ काचेच्या बांगड्या. डोळ्यावरचा चष्मा वर सरकवण्यासाठी नाकाचा शेंडा अधूनमधून आपोआप वर जातो. काकूंना खळखळून हसताना पाहिल्याचं मला आठवत नाहीये. आवाज भारदस्त पण थोडा किनरा. त्यामुळे त्या प्रेमाने बोलत असल्या तरीही चिडल्यात की काय असं वाटावं. बिल्डिंगच्या आवारात त्यांचा वावर नेहमी जाणवत राहतो त्या समोर असल्या किंवा नसल्या तरीही. प्रत्येकवेळी भारतात गेल्यावर, दिसल्या दिसल्या की , 'काय गं? कधी आलीस?' आणि पुढे 'आमचा मुलगा काय म्हणतो?" हे ठरलेलं. काकूंसाठी बिल्डिंगमधल्या सर्व माझ्यासारख्या मुली (बरं बायका म्हणू) म्हणजे त्यांच्या सुना आणि त्यांचे नवरे हे काकूंची मुलं. मागच्यावेळी घरात दुपारी मी सोफ्यावर पडलेली असताना काकू घरी आल्या आणि 'माझा लेक किती काम करतो बघा !' हे ऐकून घ्यायला लागलं. खरं सांगू का? काकूंच्या या बोलण्याचा राग येत नाही. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, तो ओळखला की मग त्याच्या वागण्याचं वाईट वाटत नाही. तसंच काहीसं काकूंबद्दल झालं.

         बिल्डिंगमध्ये राहायला आल्यावरच अशा कुणी काकू आहेत हे कानावर पडलं होतं. त्यांच्या गोष्टीही ऐकलेल्या. म्हणे सकाळच्या वेळी रोज एक माणूस एक लिफ्ट अडवून ठेवायचा. लिफ्टच्या दारात सामान ठेवून हा प्रत्येक फ्लोअरवर फिरणार. एकतर सकाळी पोरांची शाळांची घाई, दूध वगैरे आणायची लोकांची घाई. मग एक दिवस काकू थांबून राहिल्या कोण हा माणूस आहेबघायला आणि मग त्याला रागावल्याही. कधी पोरं दुपारी जास्त आरडाओरडा करायला लागली की काकू रागावणार हे नक्की. एक दोनदा पोरांना म्हटलंही बाकी 'जाऊ दे निदान २-४ या वेळात तरी गाड्या खेळू नका. म्हणजे मला थोडं तरी बोलता येईल.'. प्रत्येक गोष्टीत 'काकू काय म्हणतील?' याच्यावर बोलणं व्हायचंच. हळूहळू या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन काकूंना आणि काकूंचं कामही पाहायची संधी मिळाली आणि त्यांचं कौतुक वाटू लागलं.

        बिल्डिंगच्या प्रत्येक सणात त्यांचा उत्साह आणि सहभाग ठरलेला. गणपतीच्या साधारण ३-४ आठवडे  आधीच 'कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या मुलांची नावं द्या' असा मेसेज व्हाट्सअपवर आला की आपापल्या मुलाचं नाव मुकाट्याने लगेच सांगून टाकावं. 'नंतर नावं घेतली जाणार नाहीत' अशीही सूचना त्यात असतेच. अगदी मीही इथून पोरांची नावं आधीच देऊन टाकायचे. एकदा काकू अशाच बिल्डिंगखाली भेटलेल्या. म्हणाल्या,'अरे इतक्यांदा सांगूनही लोक का देत नाहीत आधी नाव? रात्री १०च्या आत सर्व कार्यक्रम संपवावा लागतो. मग एखाद्याला मिळालं नाही परफॉर्म करायला तर वाईट नाही का वाटणार त्या पोराला?'. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. पोरांचं जाऊ दे, एकदा आमचंच ठरलं की सगळ्या जणींनी डान्स करायचा. मी तर म्हटलं, 'लंडन ठुमकदा' वरच करु. तिथंच नाचायलाही सुरुवात केली होती मी. मग कळलं की त्यातले शब्द, अर्थ वगैरे बघून ते कॅन्सल केलंय. असंही होऊ शकतं हे मला माहीतच नव्हतं. खरंतर, बाहेर, 'टिव्हीवर इतक्या गोष्टीं मुलं बघत असतात तर या गाण्यांनी काय होतंय असं मला वाटलं होतं'. तसा काकूंशी वादही घालण्याचा प्रयत्न केला होता मी. पण इतक्या वर्षात ती बिल्डिंगची पॉलिसी बदललेली नाहीये आणि आता मला त्याचं कौतुकही वाटतं. आजही लंडन ठुमकदा ऐकलं की गाण्यापेक्षा काकूंची आठवण जास्त येते.

          दवाखान्यात सिनियर सिटीझन रुग्णांची सेवा करायला जाणे, जवळच्या आश्रमासाठी मदत करणे किंवा कुणाला करायची असेल तर ती सुचवणे, मुलांसाठी संध्याकाळी खालीच पार्किंगमध्ये संस्कारवर्ग घेणे हे सर्व काकू नियमित करतात. मुलांसाठी पुस्तकपेटीही सुरु केली होती काकूंनी. पण प्रत्येकवेळी पुस्तकं देणं-घेणं त्यांचा हिशोब ठेवणं अवघड होऊ लागलं म्हणून त्यांनी ती बंद केली. मुलींसाठी स्वरक्षणासाठी काही क्लासेसही घेत होत्या. म्हणजे त्या स्वतः नाही पण त्यासाठी लागणारी सर्व अरेंजमेंट करणे त्यांच्याकडेच. गणपतीतलं लेझीम आणि मुलांचं नाटक बसवणं हेही त्यांच्याकडेच. ८-९वी च्या मुलांना एकत्र आणून एखादं काम करवून घेणं ही सोपी गोष्ट नाही.यावर्षी वृक्षारोपणही केलं मुलांसोबत. नंतर स्वनिक घरी येऊन सांगत होता 'झाड कसं लावतात याची प्रोसेस'. दिवाळीसाठी मुलांचं पणत्या रंगवण्याचं वर्कशॉप घेणं, गोपाळकाल्यासाठी मेसेज करणं, प्रत्येक कामाला स्वतः हजर राहणं, होळीच्या वेळी सर्व पोळ्या होळीत न घालता त्यांचं वाटप करणं, अशी अनेक कामं काकू सतत करत राहतात. त्यांना 'कंटाळा येत नाही का?' असं विचारायची माझी हिंमत नाही. ते तसं त्यांच्याकडे पाहून वाटतही नाही. बरं नुसतं मुलांसाठी नाही तर त्यांच्या सिनियर ग्रुपसोबतही बऱ्याच कार्यक्रम करत राहतात.

       होतं काय, जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या ठामपणे एखाद्या मोठ्या सोसायटीत, ५०० च्यावर लोकांच्या घोळक्यात एखादं काम आग्रहाने करते तेंव्हा त्याला बोलणारे, त्या नावडणारेही असतातच. काकू मात्र हे सर्व माहित असूनही, शक्य होईल तितक्या लोकांचा विचार करुन काम करत राहतात. ते करण्यासाठीही एक खमक लागते अंगात, ती त्यांच्याकडे आहे. आणि त्याचंच मला जास्त कौतुक वाटतं. मी त्यांना एकदा विचारलं, "काकू तुम्ही कुठे होतात इथे यायच्या आधी?". बहुतेक त्यांनी ठाणे किंवा वाशी वगैरे काहीतरी सांगितलं. नक्की आठवत नाही. म्हणजे त्यांचं ५०-५५ वर्षाच्या आधीचं आयुष्य पुण्याच्या बाहेरच गेलं. इथे त्या मुलगा, सून, नातींसोबत राहतात. नातीच्या अभ्यासाचं, क्लासेसचं वगैरे आवर्जून बघतात. मी काकांना कधी पाहिलं नाही. किंवा कुणी सांगितलं असेल तरी ते कसे दिसतात हे आता आठवत नाही. काकूंच्या समोर मला कदाचित बाकी कुणी दिसलंच नसेल.

            दोन वर्षांपूर्वी मी इथेच असतांना फोनवरुनच मला बातमी कळली की 'काका गेले'. नेमका तेंव्हाच सून आणि नाती उन्हाळ्याच्या सुट्टीला परदेशी आलेल्या. काकूंनी तिकडे बिल्डिंगमध्ये ओळखीच्या दोन-तीन जण आणि मुलासोबत जाऊन सर्व कार्य उरकलं, कशाचाही जास्त बाऊ न करता. 'आपण रोज काही परदेशात असे जात नाही आणि ती इकडे येऊन काय होणार होतं?' असं म्हणून सुनेला सुट्टी सोडून यायचा हट्टही केला नाही. मला या गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटत राहिलं. पण हिंमत होत नव्हती विचारायची. मग मागच्या वेळी म्हटलंच काकूंना, की 'काकू असं कसं तुम्ही सर्व मॅनेज केलं?'. त्या म्हणे, "जे व्हायचं ते झालं होतं. मग इतका खर्च करुन ती बहिणीकडे गेलेली, कशाला परत बोलवायचं? आणि बाकी लोक असतील बोलणारे, अगदी मी रडले की नाही रडले हेही म्हणणारे. मला नाही जमत ते लोक आले सांत्वनाला की उगाच रडायचं. आमचा ३८ वर्षांचा संसार. ते गेल्यावर मला वाईट वाटणारच ना? ते मी बाकी लोकांना कशाला दाखवू? माझं मन मी बाकी गोष्टीत रमवते." त्यावर पुढे बोलायचं काही राहिलं नव्हतं. अशा महत्वाच्या, भावनिक वेळी संयम दाखवून योग्य तो निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि तितकाच नंतर माझ्याशी झालेला भावनिक संवाद. त्यांच्याशी झालेल्या त्या पाच मिनिटांच्या बोलण्यानंतर काकूंबद्दल वाटलेला आदर अजूनच वाढला होता.

         १५ ऑगस्टला बिल्डिंगमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तिथल्याच एखाद्या काका-काकूंना बोलावलं जातं. दोनेक वर्षांपूर्वी काकू प्रमुख पाहुणे होत्या. त्यांच्याबद्दल जी माहिती सांगितली होती तोच कागद मी जपून इकडे घेऊन आले होते. तो कुठंतरी हरवला. मग लिहायचं राहिलंच. अनेकदा त्यांचा विचार आला की चिडचिड व्हायची लिहिता येत नाही म्हणून. मग म्हटलं, असंही त्यांचा जन्म कुठला, शिक्षण आणि बाकी सर्व माहितीपेक्षा त्यांचं व्यक्तिमत्वच त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी पुरेसं आहे, नाही का? तर अशा आमच्या काकू. रागावून का होईना काम करवून घेणाऱ्या, पोरांवर गोंधळ करतात म्हणून रागावल्या तरी तितक्याच प्रेमाने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या.  काकू जेव्हा त्यांचे फोटो काढल्यावर 'माझे फोटो कधी पाठवशील?' असं म्हणतात तेव्हा त्यांच्यातही एक लहान मूल दिसतं आणि मला हसू येतं. मी तिथे नसले तरीही बिल्डिंगच्या व्हाटसऍप ग्रुपवर काकूंचं वास्तव्य जाणवत राहतं. त्यांच्या सूचना, सुचनापत्रकं, नवीन उपक्रम, त्यांचे, त्यांच्या कामाचे फोटो हे नियमित येत राहतं. आजही तिथे गेले की समोर गेटमधून ती पर्स लटकवून चालत येणाऱ्या काकू दिसल्या की आपण पुण्यात आलोय, आपल्या बिल्डिंगमध्ये आलोय हे जाणवतं. त्या आमच्या तिथल्या घराची एक ओळख आहेत. 


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, November 04, 2019

मित्रं ! (कथा)

"येल्लो रिच ! कैसी है रे तू? ", रिचाने फोन उचलताच तिला बोलायची संधीही न देता भाविन ओरडला.
"क्या रे गुज्जू कैसा है?", तीही त्याच आवेशात बोलली.
        बरेच महिने झाले होते त्यांना बोलून, मेबी वर्षही. नवीन नंबर पाहून ती जरा साशंक होती पण त्याचा आवाज ओळखायला वेळ लागला नव्हता. एके काळी एकाच ऑफिस, एकाच टीममध्ये काम करायचे ते. दोन-अडीच वर्ष एकत्र काम केलं होतं त्यांनी. कितीतरी दिवस त्यांच्या दोघांच्या अफेयरच्या गप्पा व्हायच्या ऑफिसमध्ये. हे सगळं माहित असूनही त्यांचं पुढे काही झालं नव्हतं. तो ऑनसाईट गेल्यावर बोलणं कमी होत होत बंदच झालं होतं. पण जुन्या मित्रांशी पहिल्या वाक्यातच गप्पा सुरु होतात आणि मधली सर्व वर्ष जणू गायब होतात. आजही तसंच झालं होतं.    
"कहां है आज कल?आज मेरी याद कैसे? ", तिने विचारलं.
"बस चल रहा हैं.  Got back from onsite finally !", त्याने जराशा निराश आवाजात सांगितलं.
"का रे? तुझं ते एक्सटेन्शनचं नाही झालं का?", तिला जास्त वेळ हिंदीत बोलायला जमायचं नाही, तेही त्याला मराठी येतं हे माहित असताना.
"Yeah, they didn't want to file my extension. खूप फाईट मारली. नहीं माना मॅनेजर. It was tough yaar, coming back after 6 years. पूरा गाड़ी, सामान सब बेचके आना पड़ा. ", भाविन.
त्याच्या अक्सेन्टमधे फरक जाणवला होता तिला.
"हां रे. पण इथेही चांगलं आहेच की काम.", तिने त्याला समजावलं. त्याला कधी असं निराश झालेलं पाहिलं की ती आपोआप तिच्या समजण्याच्या रोलमध्ये जायची, तिच्याही नकळत.
"हां, मैने अप्लाय करना चालू कर दिया है. अभी मैं यहाँ नहीं रह सकता ज्यादा दिन.", भाविन बोलला.
"इतक्यात सुरु पण केलंस? तू पण ना? तुला आयुष्यात चैन पडायची नाही कुठे. जरा घरी रहा की. तिकडेही दोन चार प्रोजेक्टवर फिरत राहिलास.", ती जोरात बोलली.
"तेरेको को तो पता हैं ना. मुझे बोअर होता हैं एक जगह रुकना. अभी हैद्राबाद में हैं नेक्स्ट वीक interview. ", तो बोलला.
"अच्छा? कुठेंय?", ती.
"अमेझॉन मध्ये. ", तो.
" वाऊ ! भारीच रे. तू इतक्या पुढे  मारामाऱ्या करतोस म्हणूनच इतक्या opportunities मिळतात  तुला. अरे, अमेझॉन मध्ये अमोघ पण आहे.", ती म्हणाली.
"अमोघ कौन?", त्याने विचारलं.
"तू ऑनसाईट गेल्यावर टीममध्ये आला होता ना? थोडेच दिवस होता तो. वर्षभर वगैरे असेल. पण तोही हुशार आहे एकदम. मागच्या वर्षी त्याला अमेझॉन मध्ये जॉब लागलाय. तुला रेफरल साठी विचारु का?", तिने सिरियसली विचारलं.
"नै रे, छोड लोंग ऐसें भाव नहीं देते. तू इतनी भोली है, तेरेको कुछ समझ नहीं आता. ", त्याचा कुणावरही विश्वास नव्हता, कधीच.
"अरे खरंच. चांगला आहे तो खूप. मलाही इथे असतांना खूप मदत केली होती त्याने. ", ती म्हणाली.
"हां क्योंकी तू लड़की हैं.", तो मजेत बोलला.
"चूप ! कुछ भी ! सुन सच मैं. मैं उससें बात करती हूँ. तुझं रहायचं वगैरे काय तिथे?", तिने विचारलं.
"नहीं पता. देखता हूँ. बाकी एक दो जगह भी हैं कॉल्स.", तो बोलला.
"बरं, मी सांगते तुला अमोघशी बोलून त्याला माहित असेल तुझ्या पोस्टबद्दल. ", ती तरीही बोललीच.
त्यालाही माहित होतं ही ऐकणार नाहीये. मग त्यानंही 'हो' म्हणून सोडून दिलं.
बराच वेळ गप्पा मारुन झाल्यावर तिने फोन ठेवला. इतक्या दिवसांनी त्याच्याशी बोलून छान वाटत होतं तिला. जुने दिवस आठवत कितीतरी वेळ तिचं मन तिथेच रेंगाळलं.

---------------

अमोघ अगदीच वर्षभर सोबत होता. पण त्या दिवसांत बरीच मदत झाली होती त्याची. घरचे प्रॉब्लेम्स, रुममेटची भांडणं, तिचं शिफ्टींग या सगळ्यांत त्याने तिला मनापासून साथ दिली होती. तो हैद्राबादला शिफ्ट झाल्यावर थोडे दिवस तिला खूप एकटं वाटलं होतं. दोनेक दिवसांनी तिने त्याला फोन लावला होता. 
"हां अमोघ, रिचा बोलतेय. बिझी आहेस का?", तिने अमोघला विचारलं.
"अरे काय नशीबच उजाडलं आमचं आज. बिझी तुमच्यासाठी? मॅडम तुमच्यासाठी आपण नेहमीच रिकामे असतो. बोला काय म्हणताय?", अमोघ चेष्टेनं बोलला.
"गप रे. काय म्हणतोस? कसा आहेस? तुला तर काय माझी आठवण येत नाही. म्हटलं आपणच फोन करावा. ", ती बोलली. 
"तसं काही नाही. इथे जरा जास्तच बिझी आहे पण. कधी कधी वाटतं मुंबईला परत यावं. ", तो बोलला. 
"का रे? मला तर असंही दुसरीकडे कुठे करमणार नाही. पण तुला काय झालं?", तिने विचारलं. 
"विशेष काही नाही. तुला माहितेय मला असं पटकन लोकांशी बोलायला, मिक्स व्हायला जमत नाही. त्यात इथलं कल्चर वेगळं, जेवण, काम सगळंच. एनीवे, तू सांग. किती दिवस तिथे राहणार आहेस? रुममेट बदलली असेलच. ", त्याने विचारलं. 
ती हसून 'हो'  म्हणाली. आणि मग बराच वेळ तीच बोलत राहिली. अमोघ कमी बोलायचा आणि जास्त ऐकायचा. तीही मग आपोआप तिच्या मनातलं सगळं सांगत राहायची. मधेच तिने भाविनचा विषय काढला. खरंतर या आधीही त्याने त्याच्याबद्दल इतकं ऐकलं होतं. तरीही तो नेहमीप्रमाणे ऐकत राहिला. 

"बघशील का रे रेफरलंच?", तिने विचारलं. 
तो 'हो' म्हणाला. "त्याला हवं असेल तर त्याने चार दिवस इथे रहायलाही माझी हरकत नाही. Give him my number and let him know.", अमोघ पुढे बोलला. त्याचा स्वभाव कसा आहे हे तिला माहितंच होतं. 
"Thanks Amogh. सांगते त्याला.", ती फॉर्मल बोलली. 
"थँक्स काय? मॅडम तुमच्यासाठी काय पण !", या त्याच्या वाक्यावर ती हसली. बराच वेळ बोलून तिने फोन ठेवून दिला. अमोघशी बोलल्यावर नेहमीच हलकं वाटायचं तिला. 

---------------------------

दोनेक आठवडयांनी रिचाला भाविनचा फोन आला. 
"रिच ! पैले Congrats बोल ! ", त्याचा आवाज ऐकून तिला कळलं होतं नोकरी लागली असणार. 
"क्यों रे? शादी फिक्स कर दी क्या तेरी? तेरे पिछे पडे है घरवाले. ", तिने विचारलं. 
"चूप बे ! नौकरी लग गयी आपुन की. ", तो एकदम खूष होता. 
"अमेझॉन?", तिने विचारलं. 
"नहीं रे. वो तो नहीं हुवा लेकिन अच्छी हैं ये भी.", त्याने सांगितलं. 
मग बराच वेळ त्याचा रोल, पगार, ऑफिस सगळं सगळं त्याचं बोलून झालं. ती ऐकत राहिली. 
शेवटी शेवटी मात्र जरा सिरीयस होत तो बोलला. 
"अरे वो तेरे अमोघ से मिला था मैं. उसने बोला रेहने के लिये. लेकिन मैं रुका नै.", भाविन. 
"का रे काय झालं?", रिचा. 
"पता नहीं यार. अजीब था बंदा. एकदम सिरीयस था. मुझे हमेशा लगता था तेरेको वो अच्छा लगता हैं. इसलिये मुझे देखना भी था उसको. पर जब वो तेरे बारे में बोलने लगा ना, बिलकुल अच्छा नहीं लगा.", भाविन बोलला. 
"म्हणजे ? अच्छा मतलब?", तिचा चेहरा पडला होता. 
"मतलब तेरे बारे में रिस्पेक्ट से बात नहीं कर रहा था. तेरा आज तक कोई बॉयफ्रेंड फिक्स क्यों नहीं हुआ. तेरा वो रुममेट का पंगा चलता रहता है. सब बोल रहा था. ", तो बोलत राहिला. 
"हां त्याला माहितेय माझं  राहण्याचं नाटक झालेलं. पण तरी असं बोलणार नाही रे तो. त्यानेच तर मदत केली होती मला. " ती बोलली. 
"वो नहीं पता मुझे. लेकीन यार पता चल जाता हैं बंदा कैसा है. मुझे तो वो बिलकुल अच्छा नहीं लगा. इसलिये फिर रुका नहीं वहा.", त्याने तिला सांगितलं. तिचं खरंतर मन उडून गेलं त्या बोलण्यातलं. वाटलं, त्याला मत्सर वाटला असणार नक्कीच अमोघ बद्दल. तसाही भाविन एखाद्या लहान मुलांसारखाच वागतो. एकदा अमोघला विचारायची इच्छा झाली होती. पण हिंमत नाही झाली जाब विचारायची. इतका चांगला मित्र आपला. असं कशाला वागेल. जाऊ दे ना, त्याला विचारण्यात अर्थ नाही म्हणून दिवसभर मनात राहिलेले ते विचार तिने सोडून दिले. 

---------------------

दोनेक दिवसांत रिचाला अमोघचा फोन आला होता. तिने 'घ्यावा की नाही' विचार करत फोन उचलला. तिच्या आवाजात नेहमीसारखा उत्साह नव्हता. आज कधी नव्हे ते अमोघ बोलत होता आणि ती ऐकत होती. 
"अगं तुझा तो मित्र भाविन आला होता. ", तो म्हणाला. 
"हां, हो का? काय म्हणाला मग?", तिने विचारलं. 
"काय म्हणणार? जरा क्रॅक आहे का तो? त्याला मी सांगितलं दोन चार वेळा 'राहायला चल' म्हणून तर आला नाही. मग आम्ही बारमध्ये भेटलो एका. मीही म्हटलं बघावं कोण आहे हा भाविन. तू तर इतकं कौतुक करत असतेस त्याचं. दारुचे दोन राऊंड झाल्यावर बोलायला लागला तुझ्याबद्दल. पण खरं सांगू तू जितकं त्याच्याबद्दल प्रेमानं बोलतेस ना त्यातलं थोडंही त्याच्यामध्ये दिसत नव्हतं. मला नेहमी वाटायचं तुमचं प्रेम आहे म्हणून. पण तुझ्याबद्दल बोलताना एक प्रकारचा तुच्छपणाच दिसत होता त्याच्या बोलण्यांत. तू काय करत असतेस, कशी वागतेस, कशी राहतेस, अजूनही त्याच नोकरीत आहेस.....  प्रेम जाऊ दे, तुझ्याबद्दल आदर वगैरेही नाहीच....... ". 

अमोघ बोलत राहिला पण तिला यापुढचं काहीच ऐकू आलं नाही. 

समाप्त.

विद्या भुतकर. 

Sunday, November 03, 2019

हा नियमच आहे

सान्वीला तिच्या होमवर्कवरुन रागावताना, मधेच स्वनिक रिकामा फिरताना दिसला तर त्यालाही ओरडले,"काय रे, झाला का अभ्यास?". 
त्यावर त्याने,"हो केव्हांच झालाय."म्हणून तितक्याच आवेशात सांगितलं. 
त्यामुळे मला जरा राग आवरता घ्यायला लागला. 
तर तो पुढे म्हणे,"दर वेळी तू एका मुलाला ओरडताना दुसऱ्यालाही रागवलंच पाहिजे असं काही नाहीये. "
म्हटलं,"बाबू, तुला माहित नाहीये का? हा नियमच आहे."
तो म्हणे,"काय रूल?"  
मी म्हटलं,"एका मुलाला आईवडील रागवत असतील तर दुसऱ्यानं मुकाट्यानं अभ्यासाला लागावं. आम्ही तरी असंच करत होतो. आजी आबा एकाला ओरडत असले की बाकी सगळे अभ्यासाला लागत होतो. त्यामुळं तू ही मला उलटं उत्तर न देता मुकाट्यानं कामाला लाग. पाहिजे तर बाबांना विचार. कळलं ना? " 

त्यानंही ऐकून घेतलं. ('असा अन्याय सहन कसा करुन घ्यायचा तुम्ही' वगैरे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतेच.) 

आजचा दिवस निपटला होता पण यापुढे मलाच जपून राहायला लागणार हे नक्की. 
:) 


विद्या भुतकर. 

Monday, October 28, 2019

दिवाळी !

        लेक मोठी व्हायला लागली. सणासुदीला तिला तयार होताना निरखून पहायला लागली होती. कधी कपडे निवडतांना सुचवू लागली.  हे चप्पल नको, तुझ्या ड्रेससोबत हे बूट्स घाल असं हक्कानं सांगायला लागली. तर कधी 'कुठल्या काळातले कपडे घालतेस गं आई?' असे टोमणेही मारायला लागली होती. तिच्या वळवून नीट केलेल्या केसांना हात लावून पाहू लागली होती. 'माझेही असेच सेट कर' म्हणून हट्ट करू लागली. कधी तिच्या ओठांना लावलेली लिपस्टिक पाहून, 'मलाही मेकअप करायचा' म्हणून रुसू लागली. आणि हे सगळं ती जवळून पाहतांना तिला मात्र एकच भीती होती.... 

          शाळेत, कॉलेजमध्ये असताना आईनं अनेकदा हे करू नको, असे कपडे नको, असं वागणं नको, बोलणं नको ऐकवलेलं, अडवलेलं. पण हेही आठवायचं की सणासुदीला आवर्जून आई तिला आवरून द्यायची. लांब केसांची छान वेणी घालून द्यायची. गौरी गणपती, सत्यनारायण पूजेला आपल्या आधी तयार करून, कधी आपलीच साडीही नेसवून द्यायची. हळदी कुंकवाला आलेल्या बायकाही, "कसं तुम्ही पोरींचं इतकं छान आवरता' म्हणून कौतुक करायच्या. दिवाळीला फराळाची धावपळ करून ड्रेस शिवायची. आणि हे सगळं असूनही तिला अनेकदा आईशी वाद घालतांना, तिने कशाला नकार दिल्यावर वाटलेलं, "तू मुद्दाम माझं आवरत नाहीस. तुला माझ्यापेक्षा जास्त छान दिसायचं असतं ना?". 

         वाढत्या वयात कधीतरी आपल्याच आईबद्दल वाटलेली असूया आणि राग अनेकदा मनात घोळलेला. तो प्रसंग खरंच घडला की आपण हे केवळ मनातल्या मनातच बोललो हेही आठवत नव्हतं. इतक्यांदा विचार केलेले ते क्षण घडले की तिच्याच मनाचे खेळ होते हेही तिला आठवत नव्हतं. आणि प्रत्यक्षात तोंडातून बाहेर पडले नसले तरीही मनात आतवर रुतलेले. आणि यातून मनात आलेली एकच भीती..... माझ्या लेकीलाही असंच वाटेल का माझ्याबद्दल.               

         हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली हे कळल्यावर गुंगीत तिने एकच वाक्य बोललेलं,"आता आपल्याला तिच्यासाठी ते क्यूट ड्रेस विकत घेता येतील." एक तो दिवस आणि आता? परवा दिवाळीला ती साडी नेसताना, दागिने घालतांना लेक पहात होतीच. म्हणाली, "मलाही लिपस्टिक लावून दे. हे गळ्यातलं घालून दे." "लिपस्टिक वगैरे लावायचं तुझं वय नाहीये अजून" या वाक्यावर लेकीनं तोंड मुरडलं. 'गळ्यात नको घालूस हे. तिथे १५ मिनिटांत माझ्याच हातांत आणून देशील." ती साडीच्या निऱ्या करत बोलली. आणि या वाक्यावर पुट्पुट कानी आली,"मला माहितेय तुला माझ्यापेक्षा छान दिसायचंय." 

         आपण अनेकदा ठरवतो 'हे असं झालं तर मी अशी वागणार. असं बोलणार. अजिबात रडणार नाही. वगैरे वगैरे' . आणि तरीही लेकीचे शब्द ऐकून ती निऱ्या सोडून थबकली. आजवर त्या आईला बोललेल्या/न बोललेल्या वाक्यांचं ओझं डोक्यावर जड झालं. गळा दाटून आला आणि ती बोलली," तुला माहितेय मीही अशीच माझ्या आईला बोलले होते. खूप वाईट वाटलं होतं तिला. आणि मला आजवर वाईट वाटतं की तुझ्या आजीला मी असं बोलले. कारण ती नेहमीच मी छान दिसावं, राहावं म्हणून प्रयत्न करायची. तुझ्यासाठी मीही अनेक गोष्टी करते. तू माझी लेक आहेस. तुला खरंच वाटतं का मला असं वाटत असेल? ". लेक थांबली, मग थोडी शरमली, नरमली आणि हसली. राहील का तिच्या लक्षांत माझ्यासारखंच अनेक वर्ष? काय माहित. पण तिला ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. आईला सांगायची हिम्मत झाली नाही निदान लेकीला तरी सांगू शकली म्हणून. 

विद्या भुतकर. 


Wednesday, September 25, 2019

What made you smile today?

       आज दुपारी फोनमधले फोटो चाळत बसले होते. (हो, मी असलेही उद्योग करत बसते, रिकाम्या वेळात.) यावेळी भारतात असताना काढलेल्या अनेक फोटोंमधला एक फोटो पाहिला आणि छान वाटलं. तो फोटो पोस्ट करावा म्हटलं आणि त्याचं टायटल सुचलं, "This made me smile today." 
         मागच्या वर्षीपर्यंत रोज ट्रेनने प्रवास करत होते तेव्हा अनेक छोट्या गोष्टी पाहून असं वाटायचं. कधी ट्रेनमधलं एखादं पोस्टर, एखादं प्रेमात चाळे करणारं तरुण जोडपं तर कधी बाबासोबत डाउनटाउनला जाऊन परत घरी निघालेलं, दमलेलं छोटं मूल. आणि या अशा अनेक गोष्टी पाहून वाटायचं, "This made me smile today." आज फोटोला टायटल देताना हे आठवलं. होतं काय की दिवसभरात एखाद्या गोष्टीवरुन वैताग आला, चिडचिड झाली, दिवस अख्खा खराब गेला याची अनेक कारणं असू शकतात, असतात. पण हे असं हसवणारं, हसू खुलवणारं एखादंच. पण ते जाणवून घेतलं पाहिजे. नाही का? नाहीतर, असे अनेक क्षण येऊन निघूनही जातात आणि आपण त्या एका खराब गेलेल्या मीटिंगचाच विचार करत बसतो. 

खरंतर, उगाच 'ग्यान' देत बसत नाही, मला काय म्हणायचंय ते कळलं असेलच. 

तर आज इतरांनाही विचारावंसं वाटलं, "What made you smile today?"

विद्या भुतकर. 

Wednesday, September 18, 2019

गिलहरियाँ

       या महिन्यांत पोरांची शाळा सुरु झाली. सुरु झाली एकदाची !  तीनेक महिन्यांच्या सुट्टीनंतर आम्ही सुटलो. खरंतर इथे नवीन वह्या-पुस्तकं, युनिफॉर्म या कशाचंच कुणालाच सोयरं सुतक नसतं. तरी मी आणि नवरा आपलीच शाळा सुरु झाल्याच्या उत्साहात असतो. तीनेक आठवड्यांपूर्वी, 'युनिफॉर्म नाहीत तर निदान नवीन चार कपडे तरी घ्यावे' म्हणून रविवारी दुपारी बाहेर पडलो. त्याच दिवशी स्वनिकने नवीन टुमणं सुरु केलेलं. या पोरांना रोज मागे लागायला काहीतरी कारण कसं मिळतं? त्याला कुठलातरी व्हिडीओ गेम हवा होता. आम्ही घेणार नाही ही खात्रीच त्यामुळे 'दोन महिन्यांनी वाढदिवसाला तरी घ्या असं' आतापासूनच सुरु केलं होतं. नेहमीप्रमाणे या सगळ्याकडे 'वेळ येईल तेव्हा बघू' म्हणून मी दुर्लक्ष करतच होते. 
      तर मी काय सांगत होते? हां, आम्ही कपडे घ्यायला बाहेर पडलो आणि स्वनिकने बोलायला सुरुवात केली,"आपण असं करू शकतो का? आपण घरातले काही विकू शकतो." 
घरातल्या वस्तू विकायच्या म्हटल्यावर मात्र मी कान टवकारले, "म्हटलं काय विकणार? "
स्वनिक,"आमचे जुने toys विकू शकतो."
आणि इथेच माझी वाद घालायची खुमखुमी जागी झाली. 
मी,"म्हणजे एकतर मी तुमच्यासाठी खेळणी घ्यायची. ती तुम्ही खेळणार नाहीच. शिवाय आपण १० डॉलरला घेतलेलं खेळणं तू  समजा  ५ ला विकलंस, तरी ५० टक्के नुकसानच ना?". 
हे त्याला पटलं. 
त्याने दुसरा पर्याय सांगितला," मग आम्ही तुमच्यासाठी काहीतरी काम करतो. Like getting plates for dinner, clean-up, अशी. आणि तुम्ही आम्हाला पैसे द्या."
मला मजा यायला लागली होती. 
म्हटलं,"बाबू ही कामं तर तुम्ही घरी राहता म्हणजे केलीच पाहिजेत. तुम्ही मदत केली तर त्यासाठी पैसे का द्यायचे?". 
माझ्या या युक्तिवादावर तो वैतागला. चिडून म्हणाला,"मग आम्हाला कसे पैसे मिळणार? मी काय तुमच्यासारखा जॉब पण करू शकत नाही. "
मला जरासं वाईट वाटलं. त्याचं म्हणणं बरोबर होतंच. I could understand his frustration. इतक्यात कपडे घ्यायला जाणार ते दुकान आलं. पण विषय सोडून जाता येणार नव्हतं. इतक्या वेळ गप्प असलेल्या नवऱ्याने  यावर थोडी फिलॉसॉफी सांगण्याचा प्रयत्न केला. 
तो म्हणाला,"हे बघ, तुम्ही काही चांगलं काम करता ना तेंव्हा ते आमच्या हार्टच्या गुड अकाउंट मध्ये जातं. तुला त्यासाठी पैसे मिळवायची गरज नाही. फक्त चांगलं काम करा." 
आता यातलं आमच्या पोरानं फक्त कामाचं ऐकलं. तो म्हणे,"हां आपल्याकडे मनी बँक आहे. त्यात पैसे जमवू." 
पैसे हातात द्यायची इच्छा नसल्याने मग आम्ही फक्त चांगल्या कामाच्या चिठ्ठ्या त्यांच्या बरणीत टाकायचं ठरवलं. आता हा संवाद दुकानात पोचला होता. कुठल्या रंगाची आणि आकाराची पँट त्याला बसते हे बघत असताना, मधेच याचं सुरु होतं. 
"माझे आणि दीदीचे पॉईंट एकत्र करायचे. गेमसाठी ५८ लागतील, मग फक्त २९-२९ मिळायला हवेत.  "
मी, "का पण? दीदीला व्हिडीओ गेम नको असेल तर? तिला दुसरं काही हवं असेल तर? "
तो,"ओके आपण दीदीचं अकाउंट वेगळं करू पण आम्ही आम्हाला पाहिजे तर एकत्र करू शकतो. "
मी,"बरं."
तो,"पण ५८ पॉईंट झाले की लगेच गिफ्ट घ्यायचं. बर्थडे ची वाट बघायची नाही." असं आमचं negotiation चालूच होतं. 
मधेच नवरा,"बस की, बच्चे की जान लोगी क्या?" वगैरे कमेंट टाकत होता. चार कपडे घेऊन घरी परत आलो. आता इतकं ठरलं होतं की 'चांगलं काम केलं की पॉईंट मिळणार'. मग चांगलं काम म्हणजे काय? घरी आल्यावर दप्तर जागेवर ठेवलं, डबा धुवायला टाकला, १ पॉईंट. होमवर्क न सांगता केलं, १ पॉईंट, पियानो प्रॅक्टिस, कराटे प्रॅक्टिस एकेक पॉईंट. गणिताचे दोन पॉईंट... असं करत गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरात पॉईंट्सनी धुमाकूळ घातलाय. पोरांनी एक चार्ट बनवला आणि त्यावर आम्हाला विचारुनच पॉईंट्स लिहिले. 

      दीदी मोठी असल्याने आणि तिचा या सिस्टीम (आणि आईबाबांवर) अजिबात विश्वास नसल्याने ती फारसा उत्साह दाखवत नव्हती. स्वनिकने मात्र स्वतःच काम शोधून 'मी सर्वांचे शूज आत ठेवले तर पॉईन्ट मिळेल का? ' वगैरे कामही करून टाकली. आता उद्यापर्यंत त्याचा हा तक्ता पूर्ण होईल. तर त्यांचं असं ठरलंय की या दोन तक्त्यांचे पॉईंट घेऊन व्हिडीओ गेम आणू आणि पुढचा तक्ता पुस्तकांसाठी ठेवू. 'खरंच हे पूर्ण केलं तर आपली आवडती पुस्तकंही विकत घेता येतील' या कल्पनेनं दीदीही एकदम आनंदात आहे. त्यांचा ठरवलेलं काम पूर्ण  करत असल्याचा आनंद,  आईबाबांच्या मागे लागण्याची चिकाटी, पुढेही काय काय करु शकतो याचा विचार आणि उत्साह पाहून मलाही आता ही अशीच सिस्टीम माझ्यासाठी बनवायची इच्छा होतेय. समोर एक ध्येय ठेवायचं, ते पूर्ण करायला कष्ट करायचे. ते पूर्ण झालं की नवीन ध्येय ..... 

विद्या भुतकर. 

Monday, July 29, 2019

रिज्युम

      माणसाला कधी आपण किती क्षुद्र आहोत हे जाणवून घ्यायचं असेल ना तर त्याने रिज्युम लिहिला पाहिजे. मग तुम्ही नवीन कॉलेजमधून बाहेर पडलेले तरुण असा किंवा कितीही वर्षांचा अनुभव असलेले. एक कागद आपल्याला किती पटकन वास्तवात आणू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपला रिज्युम. आजवर मी  इतके प्रकारे आणि इतक्या तऱ्हेने, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर रिज्युम लिहिलेले आहेत की फक्त रिज्युमच्या फॉरमॅटचंच एक पुस्तक छापून झालं असतं. (ही जरा अतिशयोक्ती झाली म्हणा, तरीही.) प्रत्येकवेळी मला वाटायचं की, 'अरे आपण नवीनच आहोत अजून. काहीतरी चुकतंय, काहीतरी कमी पडतंय.' पण परवा '१७ वर्षं' लिहितानाही तसंच वाटलं आणि म्हटलं हे दुखणं काही जाणार नाही, ते आता कायमचंच.
      खरंच, इथे ब्लॉग, गोष्टी वगैरे लिहिण्यापेक्षा रिज्युम कसा लिहायचा हे शिकले असते तर पोटापाण्याचा प्रश्न मिटला असता. सिरियसली, आपलं आख्ख आयुष्य दोन-चार पानांतच कसं काय लिहिणार? बरं तेही असं की समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे की 'अरे काय भारी आहे रे हा माणूस! आपल्याला अशाच माणसाची गरज आहे कंपनीत.' दुसऱ्या माणसाच्या हातातले ते पहिले पाच सेकंद ठरवणार आपलं आख्ख दोन चार पानांवर लिहिलेलं आयुष्य चांगलं कि वाईट?  
       बरं प्रयत्न करायला हरकत नाही, काहीतरी भारी लिहिण्याचा स्वतःबद्दल. इकडून, तिकडून ढापून लिहा हवं तर. पण या दुखण्याचं मुख्य लक्षण हे की तुम्ही दुसऱ्या कुणाचा रिज्युम पाहिलात की तो एकदम भारी वाटेल. आणि तोच, तसाच आपला लिहिला तर एकदम फालतू. खरं सांगायचं तर कॉलेज मध्ये , किंवा त्यानंतर पहिले काही वर्षं रिज्युम लिहिला तेंव्हा कदाचित इतका विचार करायचे नाही मी. कदाचित आपण आपल्याबद्दलचे गैरसमज वागवत फिरत असतो ते सर्व आपोआप त्या कागदावर उतरत जातात. पण जसं वय वाढेल तसं 'आपल्यापेक्षा जगात कितीतरी भारी लोक आहेत.' हे कळलं की संपलं ! कितीही चांगली technology, certifications, college, नोकऱ्या सगळं एका कागदावर मांडलं तरीही जे त्यांत नाहीये याची जाणीव वयासोबत आलेली असते. मग ती कॉलेजमधली आक्रमकता आपोआप कमी होते आणि अजूनच क्षुद्र वाटायला लागतं. 
       कधी वाटतं की नुसत्या कागदावर कसं कळणार तो माणूस कसा आहे ते? आपण किती बदलत गेलेले असतो, कॉलेजपासून वय वाढेल तसे. मग मी काय करते एकदम कोरी पाटी करते. ब्रँड न्यू डॉक्युमेंट ओपन करायचं आणि मोठ्या जोमाने सुरुवात करायची. आणि तिथंच सगळं चुकतं. स्वतःबद्दल पहिल्या दोन ओळी लिहितानाच हात थांबून जातो. 'मी काय आहे?', 'मी कोण आहे?', 'माझं आयुष्यात ध्येय काय आहे?' असे गहन प्रश्न पडायला लागतात. म्हणजे एखाद्याला ध्यानधारणा करुनही असले प्रश्न पडणार नाहीत जे त्या पहिल्या दोन ओळी लिहिताना पडतात. मग पुढे येते 'स्किल्स समरी'. शाळेपासून आजवर इतकं शिकलो, इतका अभ्यास केला, निरनिराळे उद्योग केले. पण 'स्किल' म्हटलं की वाट लागते. वाटतं आपल्यापेक्षा कितीतरी हुशार लोक आहेत या क्षेत्रात, मग आपलं स्किल ते काय? 
      जसं जसं प्रोजेक्टबद्दल लिहायला लागू तसं एकदम स्मृतीभंश झाल्यासारखं होतं. कितीतरी वेळा उशिरापर्यंत थांबून, शनिवार-रविवारी, कधी रात्री सपोर्टचे कॉलही घेतले असते. पण हे सगळं 'चांगल्या' शब्दांत कसं लिहिणार? उशिरापर्यंत थांबलात म्हणजे कोडिंग येत नव्हतं की प्लॅनिंग चुकलं होतं? की स्कोप बरोबर नव्हता?आयला हजार भानगडी. मुख्य म्हणजे जसं वय वाढेल तसं पानांची संख्या वाढायला लागते. तेही चालत नाही. सगळं दाटीवाटीने दोनेक पानांत बसलं पाहिजे. मग शब्द शोधा, त्यांचे अर्थ शोधा, ते योग्य जागी वापरा. आणि हे सगळं करुन समोरच्या माणसाला ते कळायलाही हवं आणि तरी भारी वाटायला हवं. इतक्या त्या अटी. गंमत म्हणजे, शाळा, कॉलेज आणि ज्यात ऍडमिशन मिळवण्यासाठी, पास होण्यासाठी मारामारी केलेली असते ते सगळे दिवस फक्त एका ओळीत संपून जातात. पहिली नोकरी, त्यातले मित्र-मैत्रिणी, अनुभव, प्रत्येक ठिकाणचा पहिला दिवस, शेवटचा उदास दिवस, या सगळ्या फक्त तारखा बनून जातात आणि नावांच्या पाट्या. 
       तर असा हा रिज्युम. बरं हा फक्त नोकरीसाठीचा झाला. लग्नाच्या कागदावर यातले संदर्भ अजूनच फिके होत जातात. तिकडे दुसऱ्याच गोष्टींना महत्व दिलं जातं. तिथे नोकरी म्हणजे फक्त एक आकडा असतो आणि फारतर लोकेशन. एकूण काय सर्व हिशोब हे असे कागदावर मांडायचे म्हणजे घोळच नुसता. ते सिमेटरी मध्ये लिहितात ना प्रत्येकाच्या नावासमोर, 'Daughter of, Wife of , Mother of' ती शेवटची समरी आयुष्याची आणि जन्म व मृत्यूची तारीख. या दोन तारखांच्या मधलं आयुष्य कुठे लिहिणार? 

विद्या भुतकर. 

Sunday, July 28, 2019

As good as it gets

        कधी कधी वाटतं मी किती फुटकळ विचार करते. किंवा फुटकळ गोष्टींचा विचार करते. अर्थात आयुष्यात अनेक मोठे प्रश्न सोडवायची संधी आणि वेळ असताना, तो मी असा वाया घालवते हे काही बरं नाही, तरीही करते. हे सगळे विचार मी या शनिवारी दोन तास चालताना केले. हे सांगायचं कारण की ते विचारही चालण्याशी संबंधित होते. तर होतं असं की ट्रेलवरुन चालायला सुरुवात केली की किती वेळात, किती वेगात किती अंतर संपेल, आज काही जास्त वेळ जमणार नाही, वगैरे वगैरे मनात बोलून झालं की जरा आजूबाजूला लक्ष जायला लागतं. रस्त्यावर वरून पडलेल्या झाडांची कसलीशी बोण्ड असतात. त्यातलं प्रत्येक आपल्या पायाखाली आलंच पाहिजे अशा आवेगात मीउड्या मारत चालायला लागते. दोन चार पायाने उडवते सुध्दा. ते नसेल तर झाडांची गळलेली पानंअसतात. त्या सुकलेल्या पानांवर पाय ठेवून त्यांचा 'चर्रर्र' असा आवाज होतोय ना हेही बघते. काहीच नाही मिळालं तर बारीक दगड पायाने उडवत चालत राहते. एखादा समोरून येणाऱ्या माणसाला लागेल का असाही प्रश्न अधून मधून पडतो. 
        बरं नुसतं ते नाही. एका ठिकाणी जिथे मी परत वळते, तिथे एक ऑरेंज कोन ठेवलेला असतो. त्याला मंदिराला घालतात तशी प्रदक्षिणा घालूनच परतते. नुसता हात लावला तरी चाललं असतंच की. पण गोल फेरीच मारायची. तसंच परत घर जवळ आल्यावर कधी ५.८७ किमी वगैरे झाले असतील तर पूर्ण ६ होण्यासाठी घराजवळच दोन चार घिरट्या घालायच्या. पण पूर्णांक झाला पाहिजे. बघितलं ना किती फालतू प्रकार चालू असतात चालताना?
       आमच्या ऑफिसच्या पार्किंग लॉट मध्ये दुपारी चालते, तिथे काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्यात. मोस्टली जिथे दोन गाड्यांच्या मध्ये रेष असते तिथेच. मग होतं काय की लेफ्ट-राईट, लेफ्ट-राईट करत त्या भेगेजवळ आले की नेमका उजवा पायच पुढे येतो. आता पुढच्या भेगेजवळ मला डावा पाय हवा असतो. पण तसं होत नाहीच. बहुतेक माझ्या पायातलं अंतर बरोबर उजवा पाय पुढे येईल इतकंच असतं. मग माझी चिडचिड होते. मी ठरवते की कुठला पाय कुठे पडतोय हे लक्ष द्यायचंच नाही. तरीही ते जातंच आणि मला त्या पार्किंग लॉट मधून पळून जायची इच्छा होते. 
     लहानपणी शाळेच्या मोठ्या हॉलमध्ये मी दादांची शाळा सुटायची वाट बघत थांबलेली असायचे. त्या हॉलमध्ये मोठं मोठ्या फोटोफ्रेम लावलेल्या होत्या. खाली काळी फरशी. तीही एकसारखी नाही पण. त्या फरशांवर ठराविक पॅटर्न मध्ये पाय ठेवत एका फ्रेमसमोर यायचे. त्यात एक देवी एका राक्षसाला मारत असायची. आणि प्रत्येकवेळी ठरवूनही मला तिथे आलं की भीती वाटायचीच. त्या फोटोपासुन कितीतरी वेळा पळत परत फिरलेय मी. घरातल्या, अंगणातल्या फरशाही तशाच ठराविक ठिकाणी पाय देत चाललेल्या. हे सगळं फक्त माझ्याच मनात, आजवर इतके वर्ष. अगदी आता रोज त्या पार्किंग लॉट मध्ये चालतानाही. 
        'As good as it gets' मधला जॅक निकलसन पायाखालच्या फरशा आणि रस्ता ठराविक प्रकारे चालताना पाहिलं वाटलं, अरे माझ्यासारखंही कोणी आहे. मग म्हटलं चला लिहूनही टाकावं. कोण जाणे माझ्यासारखे असले विचार करत, दगड उडवत जाणारे अजूनही असतील? 

-विद्या भुतकर. 

Tuesday, May 21, 2019

बहर

प्रिय तुला,
       बहराच्या याच काळात तर गावातून बसने, ट्रेन मधून फिरताना या फुलांकडे पाहात भरभरुन पत्रं लिहिली होती. दिवस सरतील तसा संवादही कमी होत जातो. आणि त्यातला उत्साहही. पण ही फुलं मात्रं नव्यानं गळून तितक्याच उत्साहानं दरवर्षी भरभरुन येतात. अख्खा गाव सजवतात.
आपण मात्रं त्याच त्या जुन्या खपल्या आयुष्यभर वागवत राहतो. माणसालाही हे असं, जुन्या खपल्या गळून नव्यानं बहरता यायला हवं, नाही का? पुन्हा हा बहरही ओसरेल हे माहित असूनही....

विद्या भुतकर.

Wednesday, May 01, 2019

एच एम टी

      आज दुपारी भारतातल्या मैत्रिणीशी व्हाट्सऍप्प वर बोलत होते. 
ती मधेच बोलली, "आज काय ड्रेस कोड? ". 
अशा मैत्रिणी आयुष्यात असणं फारच गरजेचं आहे असं मला वाटतं. नाहीतरी दिवसभर नवीन कपडे घालून फिरलं तरी नवऱ्याच्या लक्षात येणार नाही असं होऊ शकतं. असो. 
तर तिला म्हटलं, "कपडे जाऊ दे, हे बघ. "
       म्हणून मी हातात घातलेल्या नवीन 'केट स्पेड' घड्याळाचा फोटो काढून लगेच तिला पाठवला. त्यावर तिचा खूप W आणि O असलेला wow आला. मोजून २-४ मिनिटं बोललो असू पण एकदम फ्रेश झाले. अशा चौकशा करणे आणि घाईघाईत का होईना गप्पा मारणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे असं मला वाटतं. असो. तर दुपारीची धावपळीची वेळ असल्याने त्या नवीन घड्याळाचीतिला पूर्ण गोष्ट सांगता आला नव्हती. (तशी तर माझ्याकडे प्रत्येक गोष्टीची गोष्ट असते.) संध्याकाळी त्यावर विचार करताना वाटलं लिहूनच टाकावं ना? 
       तर झालं असं की बरेच दिवस न वापरल्याने काही घड्याळं बंद पडली होती. एक दिवस आठवणीने ती घड्याळं घेऊन नवरा, मुलांसहित मॉलमध्ये गेले. आता दुकानांत चार सेल बदलेपर्यंत वेळ होताच तर एक नवीन घेऊनच टाकलं. महत्वाचं काम झाल्यावर अजून दोन चार दुकानं फिरलो आणि घरी परत आलो. घरात येत असतानाच लक्षात आलं की ती सेल बदललेली घड्याळं आणि हे नवीन ठेवलेली पिशवी सापडत नाहीये. नवऱ्याने पुढच्या दोन चार क्षणांत लगेच फायदा घेऊन मला बोलूनही टाकलं, 'असं कसं तू करू शकतेस' वगैरे, वगैरे. अशा वेळी गप्प बसण्यात आपलं भलं असतं हे मला केव्हांच कळलं आहे. 
        पुढच्या २-४ मिनिटांत सर्व दुकानांमध्ये फोन करून पिशवीचा पत्ता लागला. त्यांनी अगदी नीट ठेऊ म्हणून सांगितलं. मग एका मित्राला दुसऱ्या दिवशी ती त्या दुकानातून आणायला सांगितली. तो 'हो' म्हणूनही दुसऱ्या दिवशी गेला नाही. दोन दिवसांनी त्याच्या बायकोने ती आठवणीने आणली. आणि त्यांच्याकडून ती माझ्या घरी यायला एक महिना गेला. तर अशा प्रकारे मार्च मध्ये विकत घेतलेलं घड्याळ मे मध्ये घातलं गेलं. त्यामुळे आनंद तसा दुणावलेलाच होता. त्यात मैत्रिण बोलायला. एकूण आजचा दिवस खासच.  
       हे सर्व रामायण सांगायचं कारण म्हणजे, गेल्या १०-१५ वर्षात अनेक घड्याळं घेतली गेली आणि प्रत्येकाचं एक स्थान आणि आठवण आहे जशी आजची होती. पण आज ते नवीन घड्याळ पाहताना, मला माझ्या पहिल्या घड्याळाची आठवण झाली आणि ती मांडून ठेवावीशी वाटली. तर मी पाचवीत असतांना कधीतरी आजोबांकडून एकदा त्यांचं घड्याळ घेतलं होतं हातात घालायला. आबांचं गोल मोठी डायल असलेलं पट्ट्याचं घड्याळ होतं. हळूहळू मी रोजच त्यांच्याकडून मागून ते घालू लागले होते. मला आठवतं की एकदा शाळेच्या पर्यवेक्षिका म्हणाल्याही होत्या की, "इतक्या लहान वयात कशाला हवंय घड्याळ?". तेव्हा ते माझ्या मनगटाला मोठंही व्हायचं. तरी हातात घालायला आहे ना, याचं कौतुक वाटायचं. आता विचार केला तर त्यांनी स्वतःचं घड्याळ मला कसं दिलं असेल असा प्रश्न पडतो. मला माझं एखादं मुलीला द्यायची हिम्मत होणार नाही. तिने ते हरवलं तर? असो. 
      पुढे सातवीत असताना मला एकदा सायकलची हुक्की आली. सर्व मैत्रिणींच्या सायकली आहेत तर मलाही हवी असा हट्ट धरुन बसले. दिवसभर खोलीचं दार बंद करुन, काहीही न खाता बसले होते. रात्र होत आली तरी माझं कुणी ऐकणार नव्हतंच. मग शेवटी वाट बघून, भूक लागल्यावर मीच बाहेर आले. त्या दिवसानंतर, हट्ट म्हणून उपाशी राहायचं नाही, अगदी भांडण झालं तरी जेवून घ्यायचं हा धडाही शिकले. :) असो. तर रात्री माझा उतरलेला चेहरा पाहून आबांनी मला बोलावलं आणि हळूच कानांत बोलले की, "सायकल नाही घेता येणार पण आपण तुला घड्याळ घेऊ". मग काय? एकदम खूष मी. पुढच्या काही दिवसात मग आबा मला एका घड्याळ दुरुस्त करणाऱ्या माणसाकडे घेऊन गेले. त्याने आम्हाला दोन चार घड्याळं दाखवली. ही सगळी घड्याळं वापरलेली होती. अर्थात हे आता कळतंय. पण तेव्हा मला कोण आनंद झाला होता. मग जे काही आम्ही निवडलेलं होतं ते नवीन सेल वगैरे घालून सुरु करून देतो असं तो माणूस म्हणाला. मग पुन्हा एकदा शाळेतून परत आल्यावर आम्ही त्या दुकानात गेलो आणि ते घड्याळ आणलं. 
        आज आठवायचा प्रयत्न केला तरी त्या घड्याळाचं पुढं काय झालं हे आठवत नाहीये. पण ते गोल्ड प्लेटेड एच एम टी(HMT) कंपनीचं घड्याळं होतं, तसाच गोल्ड बेल्ट असलेलं. डायल बहुतेक चौकोनी होती. पुढे किती वर्ष ते वापरलं हेही आठवत नाहीये. मला वाटतं प्रश्न घड्याळाचा नव्हताच. त्यादिवशी मी दिवसभर सायकलचा हट्ट करत होते आणि तो पुरवता आला नाही तरी मला खूष करण्याचा आबांचा प्रयत्न आणि त्यातून त्यांनी त्यांना जमेल तसं घेतलेलं ते घड्याळ हे अविस्मरणीय आहे. नोकरी लागल्यानंतर मी घेतलेली, नवऱ्याने भेट दिलेली घड्याळं हे सर्व पुढे येत गेलं. आता नवीन घड्याळाचं कौतुक असलं तरी, आबांचं ते गोल डायलचं मी दोन वर्ष वापरलेलं घड्याळ आणि माझं पहिलं यांच्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली. 

अर्थात प्रत्येकासाठी त्यांचं पहिलं घड्याळ तसं खास असतंच. नाही का? तुमचंही आहे का?

(फोटो गुगलवरुन साभार.)

विद्या भुतकर. 

Monday, March 11, 2019

तर?

     एकेरी वळणदार रस्ता, गाडीत चालू असलेली गाणी आणि एकांत. आजूबाजूने उंच झाडं पण थंडीने त्यांची पालवी हरवलेली. तो वळणदार रस्ता एका मोठ्या तळ्याला वेढा घालून जातो. तळ्याचं रूप रोज बदलतं. त्या तळ्याला वेढा घालून जात असताना, रोज मनात विचार येतो, आता गाडीचा तोल गेला आणि गाडी तळ्यात पडली तर? मग तळ्यात असताना गाडीची दारं बंद होणार. मग मी बाहेर कशी पडणार? एका सिरीयल मध्येदाखवलं होतं एकदा अशीच एकजण त्या पाण्यात बुडून गेलेली मुलगी. मग गाडी आतच तळाला अडकून राहिली तर कुणाला कळणार कसं  मी आत आहे ते? 
       त्या विचारांना मागं टाकत पुढं गेलं की एका छोट्याशाच डोंगरावर जाणारा चढणीचा रस्ता. त्याच्या कपारी बघून सह्याद्रीची आठवण होते. पुणे मुंबई रस्त्याच्या अशा उंच कपारींना दरड कोसळू नये म्हणून जाळी लावलेली असते. मग मला त्या भुईसपाट झालेल्या गावाची आठवण येणे. माळीण की काय नाव त्याचं? हे विचार करत असतांना समोरुन एखादी गाडी आली आणि माझ्या गाडीच्या कोपराला ठोकून गेली तर?  
       एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये सुंदर एकदम फिकट पिवळ्या रंगाचा टॉप घातलेला. एका हातांत लॅपटॉप, पाण्याची बाटली, फोन, वही आणि दुसऱ्या हातात कॉफीचा कप, वाफाळता. मीटिंगला उशीर होतोय. जरासं घाईत चालताना कोपऱ्यावर वळले आणि समोरुन येणाऱ्या माणसाने धडक दिली तर? कॅंटीनमध्ये ट्रे मधलं खरकटं कचरा पेटीत टाकताना सोबत वालेट किंवा आय-डीही चुकून टाकलं गेलं तर? 
      मुलगा डायनिंग टेबलच्या खाली पडलेली वस्तू उचलण्यासाठी खाली वाकला आणि वर उठतांना त्याच्या डोक्याला लागलं तर? मुलं घरात खेळतांना, मस्ती करताना, दार आपटलं आणि एखाद्याचं त्या दारात बोट चिमटलं तर? एखाद्या मैत्रिणीच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला हातात घेतांना ते एकदम सटकलं तर? मुलीला सायकल शिकवताना हात सोडून दिला आणि ती पडून तिचं हाड मोडलं तर? कपडा इस्त्री करुन झाल्यावर गरम इस्त्री तशीच गादीवर राहिली तर? 
       काय चुकीचं घडू शकतं याचे दिवसभरात असे लाखो विचार येतात किंवा येत नसले तरी त्यांची शक्यता कुठे ना कुठे असतेच ना ? या अशा शक्यतांचा विचार केला तर, आपण एक आख्खा दिवस जगतो हे आश्चर्यच की. नाही का? हा इतका मोठा 'तर' असूनही आपण जगतच राहतो अगदी काहीच घडत नसल्यासारखे. 

विद्या भुतकर. 

Monday, March 04, 2019

मेक युवर बेड

मागच्या वर्षाच्या शेवटी जराशी नाऊमेद होते. दोन महिन्यांत काडीचंही लिखाण केलं नाही, ना काही नियमित व्यायाम किंवा अजून काही. रोजचा येणारा दिवस एकदम कंटाळवाणा वाटत होता. मग एक दिवस माझ्या मैत्रिणीच्या दीदीने फेसबुकवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ आठवला. एका ऍडमिरलने युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास च्या २०१४ मधील ग्रॅज्युएशनच्या  वेळी दिलेल्या भाषणाचा. 
       तर त्या भाषणाची सुरुवात त्याने अशी केली होती. सहा महिन्यांच्या त्याच्या SEAL ट्रेनिंगमध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट शिकवली जाते ती म्हणजे रोज सकाळी उठून आपला बेड व्यवस्थित लावायचा. प्रत्येकवेळी तो बेड ठराविक पद्धतीनेच लागलेला असला पाहिजे, त्याचे कोपरे काटकोनात दुमडलेले असले पाहिजेत, उशी मध्यभागी ठेवलेली असलीच पाहिजे असं बरंच काही. आता तसं पाहिलं तर बाकीच्या ट्रेनिंगच्या मानाने हे सर्वात छोटं आणि साधं काम. पण त्याचं महत्व काय हे ऍडमिरलनी सांगितलं होतं. आणि मला ते इतकं पटलं होतं की ते कायमस्वरूपी लक्षात राहिलं. मग काही दिवसांपूर्वी मी शोधून त्यांचं पुस्तक घेऊन आले वाचायला. 
इथे त्यातला तो परिच्छेद तसाच्या तसा देत आहे. 

"It was a simple task, mundane at best. But every morning we were required to make our bed to perfection. It seemed a little ridiculous at the time, particularly in light of the fact that we were aspiring to be real warriors, tough battle-hardened SEALs, but the wisdom of this simple act has been proven to me many times over. 
     If you make your bed every morning, you will have accomplished the first task of the day. It will give you a sense of pride and it will encourage you to do another task and another and another. By the end of the day, that one task completed will have turned into many tasks completed. Making your bed  will also reinforce the fact that little things in life matter. And by any chance, if you have a miserable day, you will come home to a bed that is made-that you made- and a made bed gives you encouragement that tomorrow will be better. 
If you want to change the World, start off by making your bed." 

खरंतर हे लिहिल्यानंतर मी अजून काही लिहायची गरजच नाही. पण माझा अनुभव सांगावा वाटला. त्या दोन महिन्यांत, जेंव्हा मला काही करावंसं वाटत नव्हतं किंवा काही काम होत नाहीये असं वाटत होतं, दिवसाच्या शेवटी निदान माझ्याकडे छान आवरलेला बेड तरी होताच. 
        तशीच अनेक छोटी कामं असतात जी पाहिली की वाटतं त्यात काय एव्हढं? अगदी ठरविक वेळेत उठणं, झोपणं, रोज सकाळी १५ मिनिटं कुणाला व्यायाम करणं किंवा अजून काही. कुणाला घरी आई-वडिलांना एखादा मेसेज किंवा फोन करायचा असेल. किंवा अगदी माझी मैत्रीण करते तसं. ती रोज आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर 'गुड मॉर्निंग' चा एक मेसेज टाकते. कधी वाटतं ती इतक्या नियमाने कसं करू शकत असेल? पण दिवसाच्या शेवटी, काहीही ठीक नसलं तरी वाटतं, अरे निदान आपल्याला एक मैत्रीण आहे जी रोज नियमितपणे आपल्याला एक मेसेज का होईना करतेच. :) 

असो. पुस्तक आणि व्हिडीओ दोन्हीही खूप प्रेरणादायी आहेत. त्यातले काही अनुभव छान मांडले आहेत. एकदम छोटं आणि वाचायला सुटसुटीत पुस्तक आहे. 
मला अजून काही आवडलेली वाक्यं,
"If you want to change the world, dont back down from the sharks."
"If you want to change the world, you must be your very best in the darkest moment."
"If you want to change the world, start singing when you're upto your neck in mud." 

नक्की वाचावं. 


विद्या भुतकर. 

Tuesday, February 26, 2019

चकोल्या

शनिवारी दुपारी चकोल्या केल्या. चकोल्या/वरणफळं किंवा दालढोकळी जे काय म्हणायचं ते म्हणा. दुपारी सर्व बनवून जेवायला दीडेक वाजला. मग मस्तपैकी ताणून दिली दोन तास. खरंतर त्या दिवशी दुपारी झोपले नसते तर ही पोस्ट तेंव्हाच लिहिली असती. पण शनिवार दुपारची झोप नाही म्हणजे काय? असो. 
       तर चकोल्या. कोरेगावात आमची रोजची शाळा ११-५ ते असायची. शनिवारी फक्त सकाळी ८-१२.३० पर्यंत.  असंही ११ वाजता शाळेत वेळेत जायची बोंब. मग शनिवारी तर काय बोलूच नका. त्यामुळे सकाळी काही खाऊन जाणे किंवा डबा  नेणे वगैरे नाहीच. शाळेतून परत येताना जोरदार भूक लागलेली असायची. घरी आलं की पहिला प्रश्न, जेवायला काय आहे? आणि आईचं ठरलेलं उत्तर, चकुल्या. आता शनिवारी चकुल्याच करायच्या हे आई-दादांचं कधी कसं ठरलं वगैरे काय माहित नाही. पण मला आठवतं तसं शनिवारचा मेन्यू फिक्स होता.
     त्याचंही नाटक कमी नाही. त्यासाठी लागणारी कणिक घट्टच मळलेली हवी. नाहीतर मग त्या वरणात घट्ट गोळा होतात. कणकेत मीठ नसेल तर खाताना ते जाणवत राहतं. मग त्या लाट्या लाटून कागदावर पसरून एकेक करून शंकरपाळीच्या आकारात कापायच्या. मला त्या कापण्यासाठी मी केलेला हट्टही आठवतो. आईच्या कशा सरसर कापल्या जातात, माझ्या नाहीत अशी माझी तक्रार असायची. पण एकदा लाट्या झाल्या की बाकी काम पटकन व्हायचं. आईची लसणाची फोडणी मस्त बसते त्यांना. चकुल्यासोबत अनेकदा आई पापड वगैरे तळायची आणि कधीतरी भरलेली मिरचीही. दादाही शाळेतून यायचे साधारण त्याच वेळेत. गरम चकुल्या, भात वरून लिंबू हे सर्व वरपून खाऊन मस्त झोप आलेली असायची. साधारण चारपर्यंत झोप काढायची. मला तर वाटतं मला दुपारी झोपायची सवय तेंव्हाच लागली असावी. :) 
      झोपेतून उठलं की संध्याकाळचा दूरदर्शनवर हिंदी सिनेमा असायचा. तो बघत घरच्या भुईमुगाच्या शेंगा फोडून त्यातून दाणे काढायचे. दादांचा शनिवारी उपवास, त्यामुळे सकाळी चकोल्या तसं रात्री खिचडी ठरलेली. ते सोललेले शेंगदाणे रात्रीच्या खिचडीसाठी वापरायचे. सिनेमा संपला की हिंदी बातम्या, एखादी ९ वाजताची सिरीयल आणि पुन्हा झोप. याच्या अधेमधे आजोबांची एखादी शिकवणी असायची. ते हमखास स्पेलिंग टेस्ट घ्यायचे शनिवारी. रात्री जमलं तर थोडासा अभ्यास. शनिवार संपला. 
       परवा शनिवारी चकोल्या केल्यावर पुन्हा हे सर्व आठवलं. अगदी जसंच्या तसं. तेंव्हा अनेकदा आईचं उत्तर ऐकून चिडचिड व्हायची की नेहमीच तेच काय खायचं. पण आता वाटतं म्हणूनच तर ती गोष्ट इतकी आठवणीत राहिली. तसंच आपणही पोरांना एखादी ठराविक वस्तू, ठराविक पदार्थ नियमित एकाच दिवशी करून द्यावा असा विचार करतेय. पोरांनाही माझा असा एखादा पदार्थ असावा ज्यावरून त्यांच्याही अशाच एखाद्या दिवसाच्या सगळ्या आठवणी जाग्या होतील. त्याचे सारे संदर्भ, वास त्यांच्या कायम मनात राहतील. मी तर म्हणतेय, चकुल्याच कराव्यात. :) तेही 'इंडियन पास्ता इन लेंटिल सूप' म्हणून खातील. 


-विद्या भुतकर. 

Friday, February 08, 2019

निःश्वास

        शुक्रवारची रात्र, पोरं दमून लवकर झोपून गेली, नवरा गुंगीत. आणि मी मिणमिणत्या (म्हणजे साईड लॅम्प च्या) उजेडात बसलेय एकटीच. निरव शांतता कि काय म्हणतात ना ती हीच असावी. असं एकटं बसलं की वाटतं लिहावं. लिहावं म्हणून ब्लॉगवर आलं की आपणच आधी लिहिलेलं वाचण्यात वेळ जातो. मग ते वाचताना, त्या वेळी काय घडलं होतं, वगैरे आठवण्यात अजून वेळ. मग इकडे तिकडे उड्या मारून तासाभराने शेवटी लिहायला लागेलच. मी किती बोअर करतेय, लिहिण्याबद्दल लिहून. मला वाटतं एखाद्या दिवशी असं मुद्दाम लोकांना छळण्यासाठी बोअर लिहावं. मग त्यात काही लोक म्हणतील की त्यासाठी वेगळे प्रयत्न करू नकोस, आहे ते इनफ बोअरिंग आहे. बरोबर ना? शुक्रवार रात्र मस्त वाईनचा ग्लास तरी हातात हवा होता. काही नाही तर निदान नवऱ्याची एखादी नॉरकाटीक तरी घ्यायला हवी होती. पण आज शुद्धीत राहण्याचा माझा नंबर आहे. (मला एकदम आठवलं की आमच्याकडे, म्हणजे कोरेगावकडे काही लोक 'नंबर' ला 'लंबर' म्हणतात. ) 
        तर आज माझा नंबर असल्याने मी जागता पहारा ठेवला आहे. मागच्या वर्षी साधारण याच वेळी मी हॉस्पिटलमध्ये होते आणि नवरा बाहेर. आज बाहेर थांबण्याचाही माझाच नंबर होता, तोही पहिल्यांदा. याआधी निदान तीनवेळा तरी त्याने हे काम माझ्यासाठी केलंय. आणि प्रत्येकवेळी त्याची जबाबदारी वाढलेली होती. दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळी आणि मागच्या वर्षी दोन्ही पोरांचं करुन माझं बघायचं होतं तेंव्हा. बिचारा. त्यापेक्षा मला काय वाटतं, हे आपण बेशुद्ध किंवा गुंगीत असणं जास्त सोपं आहे. नाही का? सही झोप येते. बाहेरच्या जगात काय चाललंय याचं आपल्याला टेन्शन नाही. जे काय असेल ते बाहेरचे लोक बघून घेतील. आपण बेशुद्ध. एकदम भारी सिनॅरियो आहे तो. 
        होतं काय की डॉक्टरच्या ऑफिसमध्ये गेलं की मला झोप यायला लागते. जगात अशा दोनच जागा आहेत जिथे मला हमखास झोप येतेच. अर्थात माझं झोपेचं रुटीन बघता, "दोनच?" असं घरचे विचारतील. तर, एक म्हणजे डॉक्टरचं ऑफिस आणि दुसरं म्हणजे 'बेस्ट बाय' नावाचं इलेकट्रोनिकसचं दुकान. तिथं जायचं म्हटलं की मला आपोआप जांभया येऊ लागतात. म्हणजे मुलं पोटात असताना मला फार गिल्टी वाटायचं की चेकअपला गेल्यावर प्रश्न विचारायचं सोडून मला झोप का येतेय? असो. तर या असल्या गिल्टी वाटण्यापेक्षा तुम्हांला ऑफिशियली भूल दिलेली असेल तर बरंच आहे ना? 
         त्यातही मला प्रश्न पडला होता. टेन्शन असं होतं की भूल दिल्यावर मला जाग आली तर? आजूबाजूला नर्स डॉक्टर काय बोलत आहेत, काय करत आहे हे सगळं कळायला लागलं तर? त्याच्यावरही सर्च केलं होतं गुगलवर. तर असं शक्य आहे. भूल दिलेली असतानाही तुम्हांला जाग येणं वगैरे, खूप विरळ का होईना पण शक्यता आहे ना? अर्थात सर्जरीनंतर काय झालं हे आज आठवायचा प्रयत्न करुनही आठवत नव्हतं. जाग येणं तर राहूच दे. मुळात नवरा तर म्हणेल तुला साध्या झोपेतून जाग येत नाही. भूल दिल्यावर काये? त्यावरुन आठवलं, मागच्या वर्षी माझी भूल उतरायच्या आधीच नर्स म्हणाली, चला आता. म्हटलं, बाई मला जरा बसू दे? पण कुठलं काय? असं कावळ्यासारखे घिरट्या घालून शेवटी त्यांनी मला घरी पाठवलंच. सुखानं झोपूनही देत नाहीत. 
      हां तर, अशा निदान तीन वेळा तरी मी ऑपरेशन रुममधे गेलेय. अगदी निवांत. मला ते इंजेक्शन दिल्यावर किंवा देताना वगैरे उगाचच घाबरण्याची एक्टिंग करणारे लोक अजिबात आवडत नाहीत. काही होत नाही जरासं टोचलं तर. च्या मारी. तर एकूण काय की मी आत जाताना वगैरे निवांत होते. आज सकाळी नवऱ्याचा नंबर होता. म्हणजे तसं घाबरण्यासारखं काही नव्हतं. सर्जरी ठरलेलीच होती, काय करायचं वगैरे माहित होतंच. आणि आता आम्ही एकदम अनुभवी असल्यासारखं पोरांना तयार करुन मैत्रिणीकडे सोडून गेलो. जाताना मला काही खायला वेळ झाला नाहीच. हॉस्पिटलमध्ये पोहोचताना एकदम नवऱ्याने गाडीत असलेलं खायचं एक पाकीट आठवणीनं मला घ्यायला लावलं. 
        त्याची सर्व चेकिंग करुन त्याला आत घेऊन गेले आणि बाहेर एकटं बसल्यावर मला एकदम जाणवलं, ही असं बसण्याची माझी पहिलीच वेळ होती. पुढचे ३-४ तास. सर्व लोकांना मेसेज पाठवणे, अपडेट देणे ही कामं करुन झाली. भूक लागली होती. पर्समध्ये त्यानेच ठेवलेलं खायचं पाकीट बघून मग भरुन आलं. किती वेळ फोनकडे बघणार आणि वाट बघणार? शेवटी हातात पुस्तक घेतलं वाचायला. वाट बघणं किती अवघड असतं नाही? आणि हे असं? त्या क्षणातलं ते एकटेपण. जणू आपला सगळा इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोरुन जातो. कदाचित तसं नसेलही होत. पण सर्जरी झाल्यावर डॉक्टर, नर्स सर्व भेटून फायनली नवऱ्याचा चेहरा पाहिला तेव्हा जाणवलं की 'निःश्वास' म्हणजे काय. दिवसभरात बाकी अनेक घडामोडी झाल्या पण आता लिहायची इच्छा झाली ती त्याचसाठी, त्या एका क्षणासाठी. 

विद्या भुतकर.