Wednesday, April 29, 2020

डिप्लोमे From युट्यूब युनिव्हर्सिटी

      मागच्याच आठवड्यात आमचं पावपुराण ऐकवलं. पण निरनिराळे पदार्थ बनवण्यात फेल होणे सोडून बाकीचीही कामं होतीच की. त्यात सुडोकु शिकणे आणि ते सोडवताना झोप लागल्यावर दोन तासापेक्षा जास्त न झोपणे, कॅरम खेळताना पोरांसमोर शायनींग मारणे, टिव्हीवर एकेका सिरियलीचा फडशा पाडणे अशी महत्वाची कामेही होतीच. पण या सगळ्या गोष्टीही किती करणार ना? त्यातल्या त्यात शनिवार, रविवारी अजूनच बोअर व्हायला होतं. 
थोड्या दिवसांपूर्वी एक दिवस स्वनिक म्हणाला,"मला सारखं काहीतरी कानात आहे असं वाटतंय. आणि प्रत्येक वेळी हात लावला की कळतं की माझे केसच आहेत ते." 
त्याचे कल्ले ८० च्या दशकातल्या हिरोसारखे झाले होते. मग म्हटलं, चला कात्रीने तेव्हढेच कापून टाकू. मागे एकदा बाबाने घरी केस कापण्याचा प्रकार केला होता, त्याचा त्याने धसका घेतला होता. त्यामुळे मीच ते काम पार पाडलं. 
         पण इतक्यातच थांबलो तर कसं चालेल ना? युट्यूब युनिव्हर्सिटीतून एकेक डिप्लोमे मिळवायचं ठरवलं. रोज नवीन काहीतरी शिकायला हवंच ना? पूर्वी कधीतरी नवऱ्याने घरी आणलेलं केस कापायचं किट होतंच.
स्वनिकला म्हटलं, "चल की तुझे केस कापू घरी. तितकेच दोन तास टाईमपास होईल." नवरा तर काय तयारच होता.
आम्ही दोघेही मागे लागलोय म्हटल्यावर तो बिचारा पळून बेडखाली लपून बसला. 
मी जरा प्रेमाने त्याला म्हटलं, "हे बघ किती दिवस दुकानं बंद असतील माहित नाही. परत अजून वाढले तर नीट कापताही येणार नाहीत. त्यापेक्षा आताच करु." शेवटी तो कसाबसा तयार झाला.
        मी आणि नवरा लगेच टीव्ही वरच युट्यूब लावून नीट सर्व व्हिडीओ बघायला लागलो. एका क्षणाला नवऱ्याचा जोश इतका अनावर झाला की त्याने व्हिडीओ पूर्ण व्हायच्या आतच बाथरुममध्ये सेटअप लावायला सुरुवात केली. मी मात्र तग धरुन पूर्ण व्हिडीओ पाहिला. आपलं असंच असतं. तोवर नवऱ्याने बाथरुममध्ये पूर्ण सेटअप  करुन ठेवला. पोरगं बिचारं घाबरुन स्टुलावर बसलं. 
        (तर प्रोसेस अशी की प्रत्येक कटरला वेगवेगळे नंबर. जितका छोटा नंबर तितके बारीक केस कापले जाणार. अर्थात हे कदाचित सर्वांना माहित असेल. मला पहिल्यांदाच कळलं.) यामध्ये दोन अप्रोच होते. एक बॉटम -अप म्हणजे, मागचे केस मशीनच्या नंबर १,२,५ ने कापत जायचं, बाजूचे ही त्या त्या लेव्हलच्या नुसार कापायचे आणि वरचे कात्रीने थोडे मोठे ठेवून कापायचे. कानाच्या बाजूचे वगैरे वेगळ्या नंबरच्या मशीनने. दुसरा अप्रोच म्हणजे टॉप-डाऊन. वरुन मोठ्या नंबरचे मशीन फिरवून खाली बारीक करत आणायचं. आणि मग खालचे बारीक करायचे. आम्ही पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये मुळातच अप्रोच वेगवेगळे होते. त्यामुळे बराच वेळ कुठून सुरुवात करायची यावरच वाद झाला. 
आता याच्यामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदाच असं मशीन हातात धरत होते त्यामुळे पोराच्या जीवाची काळजी होतीच. म्हणून मी जरा नमतं घेतलं. (नवऱ्याने हे आधी केलेलं पण त्या भयानक कट बद्दल न बोललेलं बरं.) तर शेवटी आम्ही दोघांनी एकेक बाजू निवडली. नवरा मागचे छोटे छोटे करत वरपर्यंत सरकत होता. दुसऱ्या बाजूने मी. पहिल्या पाच मिनिटांतच स्वनिकने विचारलं,"झालं का?". त्याला दटावून गप्प बसवलं.
           जिथे दोन नंबरचे केस एकत्र येतात तिथले नीट कसे मिक्स करायचे यावर आमचे थोडे वाद झाले. पण अजून वाद झाले तर अंगावरचे केस घेऊन स्वनिक बाहेर पळून गेला असता. म्हणून जसे जमतील तसे कापले. वरचे केस नीट भांग पाडता येतील असे हवे होते. पण नवरा म्हणाला," हे बघ १६ नंबरने कापून घेऊ आणि मग बघू. ". आता मला काय माहित १६ नंबर काय ते? मी आपला फिरवला. तर हे... भराभर सगळे केस छोटे झाले. आता ते पाहून कळलं की यात कात्रीने कापायला काही राहिलं नाहीये. केस कापले गेल्यावर काय बोलणार? दोन तास मारामाऱ्या करुन शेवटी ठीकठाक केस कापले होते. बाथरुमभर बारीक बारीक पडलेले केस. ते गोळा करुन, सर्व साफ होईपर्यंत पुरे झालं. पोराची अंघोळ झाल्यावर चिडचिड करुन झाली की किती बारीक कापलेत वगैरे. टाईमपास झाला आणि शिवाय अजून दोनेक महिने तरी परत केस वाढणार नव्हते. 
         पोरावर प्रयोग झाल्यावर मी जरा कॉन्फिडन्ट झाले होते. त्यामुळे पुढच्याच आठवड्यात परत बोअर झालं.  आणि नवऱ्याचे केस कापू असं ठरवलं. म्हणून परत व्हिडीओ पाहिले. एक दोनदा मी मशीन सुरु केल्यावर नवरा घाबरत होता. 
म्हटलं, नक्की काय प्रॉब्लेम आहे?'. 
तर म्हणे, ' तू चुकून माझ्या भुवया उडवल्यास तर?'. 
मी म्हटलं, 'अरे डोकं कुठे, कपाळ कुठे आणि भुवया कुठे?'. 
        पण तरी त्याला टेन्शन होतंच. माझ्या ओव्हर कॉन्फिडन्सची त्याला जास्त भीती वाटते. मी उत्साहाच्या भरात पाच नंबरने एका बाजूला खालून केस कापायला सुरुवात करुन  कानाच्या वरपर्यंत कापून टाकले आणि एकदम टेन्शन आलं. वर तो पाच नंबर खूपच बारीक वाटत होता. मग परत वादावादी. शेवटी नऊ नंबरने कानापासून वरचे केस कापले. त्यामुळे एका बाजूचे थोडे पाच, बाकी नऊ, मग खाली सात असे करत कापत राहिले. पण तो तेव्हढाच एक बारीक केसांचा पॅच राहिला होता ना? वरचे केस भांग पडल्यावर तो लपतोय ना याची खात्री करुन घेतली आणि मग जरा जिवात जीव आला. पुढच्या महिन्यात त्याचा वाढदिवस आहे. उगाच नेमका तेव्हा असे भयानक कापलेले केस बरे दिसले नसते ना? म्हणून इतकी चिंता. पण सुटलो. बऱ्यापैकी चांगला कट झाला होता. तेही रक्त न सांडता वगैरे. 
          तर असं हे आमचं केशपुराण. माझं एक बरं होतं. भारतातून येतानाच पतंजलीची मेहंदी वगैरे आणलेली असल्याने तशी मी निवांतच होते. काय एकेक गोष्टीचा विचार करायला लागतोय सध्या. नाही का? पण पहिल्या थोड्या दिवसांतच मला कळलं की बाकी काही झालं नाही तरी माझ्या भुवया मात्र लवकरच करिष्मा कपूर आणि मग क्रूरसिंग सारख्या होणार होत्या. मग फोटोंचं काय ना? वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस... आता काय करायचं म्हणून मी घरात सर्वात पहिला तो केस उपटायचा चिमटा शोधून काढला. म्हटलं, फक्त नवीन आलेलेच उपटून काढायचे आहेत ना? सोप्पंय ! 
         मी एक दिवस आरशासमोर उभी राहून एकेक केस उपटायला लागले सुरुवात केली. च्यायला ! पहिल्याच केसाला डोळ्यांत टचकन पाणी आलं. शिवाय कुठला डोळा बंद करुन कुठला उघडायचा हेही पटकन कळत नव्हतं. म्हटलं हे काय खरं नाय. पण हिंमत करुन चार पाच केस काढले. मग ठरवलं रोज इतकंच करायचं. फक्त ४-५ केस. असंही काम काय होतं? एकदा तर एकेक करुन केस काढून माझ्या भुवयांना मधेच टक्कल पडल्याचं स्वप्नही पडलं होतं. तेव्हापासून जरा हाताला आवर घातलाय. बाकी डाव्या डोळ्याला जरा अवघड जातं डाव्या हाताने चिमटा धरुन ओढणे वगैरे. पण जमतंय. सर्वात गंमत म्हणजे, ते उभे राहिलेले, वाढलेले केस कात्रीने कापतात ना, ते आरशात बघून कसं करायचं हे कळत नाही. त्यात डाव्या हाताने कात्री चालतही नाही. आता कधीतरी डाव्या हाताची कात्रीही आणावी म्हणतेय. रोज मी आरशासमोर उभी राहिले की नवरा विचारतो, "झालं का कोरीवकाम?".  त्याला काय माहित, आमच्या शाळेच्या मैत्रिणींच्या ग्रुपचॅट वर किती कौतुक झालं माझ्या भुवयांचं? या सगळ्या आयडिया मी त्या मैत्रिणींनाही दिल्या पण त्या काय ऐकत नाय. म्हटलं तुम्हांला तरी सांगाव्यात. 
         तर हे असं ! पुढच्या दोन महिन्यांत अजून कुठकुठले डिप्लोमे मिळतील सांगेनच तुम्हांला. तुमचेही चालूच असतील की !

विद्या भुतकर. 

Monday, April 27, 2020

गव्हाचा शिरा

आज संध्याकाळी ८ वाजताच स्वयंपाक, जेवण, भांडी, सगळं उरकून झालं होतं. आता इथे काही लोकांसाठी ते फारच उशिरा असेल पण आमच्यासाठी लवकरच. थोडा वेळ पोरांसोबत एक कॅरमचा गेम खेळायचा होता, पण त्यालाही वेळ होता. काय करायचं म्हणून म्हटलं चला आज गव्हाचा शिरा/सांजा बनवू. मग पुढचा अर्धा पाऊण तास ते सगळं करण्यात गेला. आता रात्री उशिरा इतका गोड शिरा खायचा की नाही याबद्दल दुमत आहे. पण निदान तयार तरी आहे. त्यासाठी माझं म्हणणं असतं इतकं लवकर उरकायलाच नको. नाहीतर हे असले उद्योग सुचतात. असो. 
        तर हे नेहमीचंच. आईकडे बरोबर ९ वाजता जेवायला बसायचो. दूरदर्शनवर बातम्या संपून ९ वाजताचा कार्यक्रम पाहण्यासाठीची ती वेळ. अर्ध्या पाऊण तासात जेवण उरकून व्हायचं. पुढे दीडेक तासांत अभ्यास, सोबत विविधभारतीची गाणी आणि झोप. आयुष्याची इतकी वर्षं हे रुटीन पाळलेलं. कॉलेजला आले तेव्हा अनेकजणी ७ वाजताच जेवायला जायच्या. तर काही पावणेआठ-आठला. मला मात्र कितीही ठरवलं तरी लवकर जमायचं नाही. आणि कधी गेलेच मैत्रिणींसोबत तर रात्री हमखास भूक लागायची. मेसच्या काकू कितीदा तरी ओरडायच्या. मी एकटीच सर्वात शेवटीराहिलेली असायची. पण उशिरा जाण्यात मजाही असायची. बरेचदा सगळ्यांसाठी केलेली भाजी संपून जायची त्यामुळे काकू काहीतरी नवीन बनवत असायच्या. त्यांच्या हातची तव्यावरची भरलेली वांगी आजही आठवतात. आणि तशीच परत कधी मिळालीही नाहीत आणि जमलीही. कधी त्यांच्याशी गप्पाही व्हायच्या निवांत. त्यांची एक छोटीशी ती खोली, एरवी पोरींनी भरलेली असायची. ती एकदम शांत व्हायची. इतक्या उशिरा म्हणजे पावणेनऊ, नऊला जेवूनही रात्री गप्पा मारत बसलं की भूक लागायचीच. मग घरुन आणलेला चिवडा वगैरे खात अनेकदा मैत्रिणींशी गप्पा व्हायच्या. कॉलेजला असताना एका मैत्रिणीच्या घरी जायचे. त्यांच्याकडे संध्याकाळचं जेवण लवकर व्हायचं. अनेकदा मला रात्री परत भूक लागायची तिच्याकडे. 
        पुढे मुंबईत असताना रात्री उशिरापर्यंत शिफ्ट असायची त्यामुळे अनेकदा रात्री बारा वाजताही जेवलेय. पण ते संध्याकाळी ७ पेक्षा बरंच वाटायचं. पुढे अमेरीकेत आल्यावर कळलं की इथले लोक किती लवकर जेवतात, संध्याकाळी ६-६.३० वाजताच. त्यांची मुलंही ८-८.३० झोपून जातात. मीही अनेकदा प्रयत्न केला हे असं करायचा. पोरांनाही लवकर जेवायला देऊन ८-८.३० ला झोपवायचा. पण ते काही जमत नाही. अनेकदा पोरंही संध्याकाळी ७ वाजता जेवण झाल्यावर रात्री ९-९.३० वाजता,'आई भूक लागली' म्हणून मागे लागलीयत. तेच कशाला, मीही लवकर जेवण झालं तर परत रात्री त्याची भरपाई म्हणून उलट अजून जास्तच खाल्लं जातं. हे असं असलं तरी एक मात्र खरं. रात्री ९ वाजता जेवण म्हणजे खूपच उशीर होतो. विशेषतः तुम्ही तास दोन तासांत झोपत असाल तर अजूनच. निदान तीनेक तास तर पाहिजेत जेवण पचायला. तेव्हापासून एक सुवर्णमध्य साधलाय. पावणेआठला जेवण सुरु करुन नऊपर्यंत भांडी वगैरे सर्वच उरकायचं. म्हणजे मग रात्रीची भूकही लागत नाही आणि खूप उशिराही खाल्लं जात नाही. 
         आज तो शिरा केला त्यावरुन हे सगळं लिहिण्याचं निमित्त. असो. शिरा खायचा की नाही हे अजूनही ठरवलं नाहीयेच. :) 

विद्या भुतकर. 

Thursday, April 23, 2020

फसलेल्या पावाची कहाणी

गेल्या काही दिवसांत निरनिराळ्या फूड ग्रुप्स वर लोकांच्या पाककलेचं दर्शन चालू आहे. त्यात ब्रेड, पाव वगैरे घरी बनवून ते किती छान बनलेत असे एकेक फोटो पोस्ट करायचं पेवच फुटलेलं आहे. पूर्वी मी अनेकदा घरी पाव (वडापावचे पाव) बनवण्याचे प्रयत्न केले आहेत. या जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक रेसिपी तंतोतंत कृतीत उतरवणारे आणि दुसरे माझ्यासारखे स्वतःच्या आयडिया त्यात घुसवणारे. तर पूर्वी जेव्हा मी पाव बनवण्याचे प्रयत्न केले त्यात बटर कमी टाकणे, मैद्याच्या ऐवजी थोडी कणिक वापरणे, पाण्याचे माप खूप जास्त आहे असं वाटून कमीच पाणी घालणे असे अनेक प्रकार केले आहेत. अनेक बॅचेस पिठाचे गोळे वाया घालवल्यानंतर एक दिवस मी जिद्दीने नवीन यीस्ट चे पाकीट घरी आणले आणि तंतोतंत कृती पाळून एकदम भारी पाव बनवले होते. आता एकदा पाव नीट बनल्यानंतर माझा जीव शांत झाला आणि उरलेली यीस्टची पाकिटं तशीच पडून राहिली होती. आणि इथेच आजची पोस्ट सुरु होते. 
            सध्या लॉकडाऊनमध्ये घरातील ब्रेड संपल्यावर आणि विशेषतः ते नवनवीन ब्रेडचे फोटो पाहून माझ्यात एकदम पुन्हा पाव बनवण्याची खुमखुमी आली. म्हटलं तीन पाकिटं आहेत जुनी, प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे? म्हणून मी एक दिवस बसून दोन-चार रेसिपी पाहिल्या आणि मनात मला योग्य वाटेल ते प्रमाण ठरवून घेतलं(हे असंच असतं आपलं) आणि सुरुवात केली. आता पूर्वीचा अनुभव असल्याने मी लगेच पाणी कोमट करुन त्यात यीस्ट घालून ठेवलं. सानुला 'त्याला हात लावू नकोस' म्हटलं तरी तिने ते पाणी मिसळलंच. आता ते मिश्रण काही बरे वाटेना. पण प्रयत्न करायलाच हवेत. म्हणून मी दिलेल्या मापाच्या दुप्पट मैदा घेतला आणि मळले. ते आपटून, खूप मळून त्या कणकेतले ग्लुटेन वाढवणे वगैरे सर्व प्रकार झाले. दोन तास ठेवले तरी काही पीठ फुगले नाही. म्हटलं इतक्या मैद्याच्या गोळ्यांचं काय करायचं? 
           त्या कणकेचे मोठे गोळे करुन ६ गोळे लाटले आणि पिझ्झा बेस बनवून ओव्हन मध्ये टाकून भाजले. तरीही खूप कणिक शिल्लक होती. त्यांच्याही लाट्या लाटून घेतल्या. पण थोड्या पातळ केल्या आणि ओव्हनमध्ये भाजायला ठेवल्या. आता त्यांचे फुगून मस्त 'नान' होतील अशी माझी अपेक्षा होती. पण बाहेर आले तोवर चांगलेच कडक झाले होते. मग आम्ही ते तुकडे करुन दुसऱ्या दिवशी पोरांना चिप्स म्हणून खायला दिले. त्या पिझ्झाच्या बेसवर भाज्या घालून पिझ्झा बनवले. बिचारी पोरं ! त्यांना काय माहित पिझ्झा इतका चिवट का लागतोय ते? पण दोघांनीही आवडीने पिझ्झा आणि दुसऱ्या दिवशी चिप्सही खाल्ले. इतकं झालं तरी माझी खाज अजून गेली नव्हती. पाव कुठे बनले होते? 
            म्हणून दुसऱ्या दिवशी परत निम्म्या मापाने परत यीस्ट ऍक्टिव्हेट करुन पीठ मळून घेतलं. नवरा म्हणे मग काल पण कमी घ्यायचीस ना? म्हटलं असं कसं? यालाच म्हणतात कॉन्फिडंस ! तर मी मळलेलं पीठ पुन्हा दोन तास ठेवलं. ते काही फुगलं नाही. म्हटलं आजच्या मैद्याच्या गोळ्यांचं काय करायचं? शेवटी डोकं लावून छोले बनवले आणि त्या कणकेचे मस्त भटुरे तळले. आयुष्यात कधी मी अशा पुऱ्या केल्या नव्हत्या त्यामुळे जरा धावपळ झाली. पण ते पार पडलं. तळायला तेल काढलंच आहे तर म्हटलं हातासरशी भजीही करुच ना. म्हणून मग कांदा भजी, मिरची भजीही झालीच. पोरांना जाम आवडले छोले-भटुरे आणि सोबत आमरस( मँगो पल्प). अगदी दोघांनी येऊन मिठी मारली मला. म्हटलं चला अजून एक दिवस निघाला. 
          पुढचे ४-५ दिवस मी कसेबसे काढले पण इच्छा काही जाईना . त्यात अजून लोकांचे नवीन वडापावचे फोटो येत होतेच. अनेकदा वाटलं आपलं यीस्ट जुनं आहे म्हणून होत नसेल. पण ऑनलाईन ऑर्डर दिली तरी ती मे मध्ये मिळणार होती. तोवर मला कुठे धीर? शेवटी मी म्हटलं, बहुतेक मी पाणी गरम करुन घेते ते खूप गरम होत असेल त्यामुळे यीस्ट मरत असेल. म्हणून थर्मामीटर घेऊनच बसले. पाण्याचं तापमान योग्य इतकं झाल्यावर यीस्ट घालून ऍक्टिव्हेट केलं. आता नेहमीपेक्षा जास्त बरं दिसत होतं ते. हे सर्व चालू असताना आमच्या ब्रेड बनवता येणाऱ्या एका मित्राला फोनही केला. त्यांनी यीस्ट नसेल तर बेकिंग सोडा घालून ब्रेड कसा बनवायचा याची रेसिपीही दिली. म्हटलं या कणकेच्या गोळ्यांचं काही झालं नाही तर त्यातच बेकिंग सोडा घालून बेक करु. काय बिघडतंय? नेहमीप्रमाणे कणिक आहे तशीच राहिली. मग मी ठरवलं होतं तसं त्यात बेकिंग सोडा टाकला आणि ओव्हनला लावलं. पण त्यातून कसलातरी भयानक वास येऊ लागला. (कदाचित सोड्याचा). मग जीवावर दगड ठेवून तो दगडासारखा झालेला गोळा फेकून दिला. 
          आता माझी हिंमत पूर्णपणे खचली होती. पण पुढच्या आठवड्यात आमच्या ब्रेड बनवणाऱ्या मित्रांनी घरी ब्रेड बनवला होता त्याचे फोटो पाहिले आणि पुन्हा माझे हात खाजवायला लागले. मग त्यांनी ज्या यीस्टने तो सुंदर ब्रेड बनवला होता, त्यातलंच थोडं मला बरणीत आणून दिलं. म्हटलं आता हे ऍक्टिव्ह यीस्ट आहे. याने आधीच ब्रेड नीट बनलेला आहे म्हणजे माझाही होईलच. म्हणून पुन्हा मी हिम्मत केली. यावेळी मैद्याचं नवीन पाकीट फोडलं. पण तरी नुसताच मैद्याचा ब्रेड कसा करायचा म्हणून एक कप गव्हाचं पीठ घातलं. त्यांनी दिलेल्या प्रोसेसप्रमाणे मळलेली कणिक रात्रभर ठेवायची होती. मी आपली मळून ठेवून टाकली. रात्री १ वाजता मला खाली जाऊन बघायची इच्छा होत होती. नवरा म्हणे गप झोप. शेवटी सकाळी उठून लहान पोराच्या उत्सुकतेने मी तो कणकेचा गोळा पाहिला. पण त्यात ढिम्म फरक पडलेला नव्हता. इतकी चिडचिड झाली. मी तर दुपारच्या जेवणाला सँडविच करणार होते, स्वतः बनवलेल्या ब्रेडचं. शेवटी तो गोळा आहे तसाच ओव्हनमध्ये टाकला. म्हटलं जे होईल ते होईल.  
           आता ते ब्रेड फुगणार तर नव्हता. तरीही wishful thinking ! पोरंही बिचारी दोन चार वेळा डोकावून गेली. तासाभराने बाहेर काढलेला ब्रेड म्हणजे विटेचा तुकडाच झाला होता. मारला तर जोरात खोक पडली असती डोक्याला. पण म्हटलं जाऊ दे ना. घट्ट तर घट्ट ब्रेड. वाया का घालवायचा? नवऱ्याला म्हटलं जरा स्लाईस करुन ठेव. आता सँडविच तर बनणार नव्हतं म्हणून जेवणासाठी दुसरं काहीतरी करावं लागलं याचा वैताग होताच. त्यात ब्रेड कापायला घेतलेल्या नवर्याने दमून विचारलं, निम्मा झालाय, उरलेला दुपारी करु का? त्याला म्हटलं मार खाशील. तर आता तो तुकडे केलेला ब्रेड कालपासून डब्यात पडलेला आहे. मी विचार करतेय टोमॅटो सूप बनवावं का? म्हणजे त्यात बुडवून थोडा मऊ पडेल, चावायला तितकाच बरा. Meanwhile  नवऱ्याने ऑनलाईन ऑर्डर मध्ये ६ ब्रेड मागवले आहेत. ते आलेत. त्यामुळे त्याला बहुतेक 'सुटलो !' असं वाटत आहे. पण घरात अजून एक जुनं यीस्टचं पाकीट आहे ते त्याला कुठे माहितेय? आणि माझ्यातली खाजही ! 
        तर हे असं आहे. माझासारख्या सुग्रणीला काय काय ऐकून घ्यावं लागतंय पोरांकडून, नवऱ्याकडून या ब्रेड आणि पावाच्या नादात. असो. आताच मी कुणीतरी टाकलेली काजुकतलीची पोस्ट पाहिली. अगदी १५ मिनिटांत झाली म्हणे. उद्या काजूकतलीचा प्रयोग नक्की ! :) तुमच्या कुठल्या रेसिपी फसल्या की नाही? की मी एकटीच त्यातली? 

-विद्या भुतकर. 

Monday, April 20, 2020

मिसळ

आज मिसळ केली होती, निवांतपणे एकेक काम उरकत. अशीही काही घाई नव्हती. जेवण मस्त झालं. पण चौघेच फक्त ना जेवायला. मागच्या वेळी केलेली तेव्हा दोन जवळच्या फॅमिली घरी होत्या जेवायला. दिवसभर पाणीपुरी, भेळ, मिसळ असं चालूच होतं. ते आठवलं. खरंतर असं काही करायचं असेल तर अगदी बनवतानाच कुणालाही फोन करुन, 'कुठे आहे? येताय का जेवायला?' असं फोन करुन विचारलं जातं. पाणीपुरी असेल तर नक्कीच. वांगी बनवली की शेजारी दिली नाहीत असं होतंच नाही. 
     दर एक-दोन आठवडयांनी वगैरे जवळची एक फॅमिली आणि आम्ही वीकेंडला भेटतो. काही खास नाही बनवलं तरी पिठलं-भात, साधं वरण वगैरे केलं तरी चालतं. आता पिठलं बनवत असतांना ते सोबत जेवायला नाहीत याची खूप आठवण होते. अनेकदा ऑफिसच्या दिवशी भेटणं जमत नाही, तेव्हा 'मी हे बनवलंय, देऊन जाते पटकन' असं म्हणून एका डब्यांत पाठवून दिलं. यालाही कित्येक दिवस लोटले. हे म्हणजे, साग्रसंगीत काही बनवलं नसतांनाही केवळ नुसत्या गप्पांसाठी केवळ जेवणाचं निमित्तमात्र. दिवस सरताहेत तसं हे सगळं जाणवत आहे. असो.
        ही आजची मिसळ, तुमच्यासोबत शेअर करते. :) 

विद्या भुतकर. 

Tuesday, April 14, 2020

भाजी घ्या भाजी SSS

दोन आठवड्यांपूर्वी, एका शनिवारी सकाळी नवऱ्याने अगदीच मनावर घेतलं.
म्हणाला, "कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत.  मी दुकानात जाऊन सामान घेऊनच येतो. "
मी आपलं हिंदी पिक्चरमधल्या सोशिक बहुप्रमाणे म्हटलं, " तू नको जाऊस बाहेर. आपण भागवून घेऊ आहे त्याच्यावरच."
अजून १० दिवस आरामात गेले असते, दूध, अंडी, ब्रेड होतं थोडंफार. पण त्याचंही म्हणणं बरोबर होतं, अजून पुढे काय परिस्थिती असेल माहित नाही. शेवटी मनावर दगड ठेवून मी 'हो' म्हणाले. बाहेर पडणं म्हणजे मोठया युद्धावर जाण्यासारखंच होतं. 
म्हटलं, 'ग्लोव्हज घालून जा'. 
तर म्हणाला, 'हो गाडीत आहेत'.   
आता गाडीत कुठले ग्लोव्हज तर ते जिममध्ये घालतात ना ज्यांची पुढची टोकं उघडी असतात ना? तसले  ! म्हटलं डोंबल ! असल्या ग्लोव्हजनी काय होणारे? म्हणून चांगले जाडजूड ग्लोव्हज दिले त्याला आणि म्हटलं, "उगाच इथे तिथे हात लावत बसू नकोस, लोकांपासून चार हात लांबच राहा, दोन चारच वस्तू घे आणि लगेच घरी ये.". हो ना, काय काय सूचना द्याव्या लागतात. एकवेळ चार वर्षाचं पोरगंही ऐकेल, पण नवरा ऐकेल तर शपथ. मी तर "डोक्यावर हेल्मेट घालूनच जा" म्हटलं असतं पण कारमध्ये असं हेल्मेट घातलेलं बरं दिसणार नाही म्हणून गप बसले.  शेवटी माझ्या सूचनांना कंटाळून निघून गेला बिचारा.
          खरं सांगायचं तर हा दुकानात गेला सामान आणायला की हजार फोन होतात आमचे. हे चालेल का, ते आणू का, हे विसरलेच होते ते पण आण वगैरे. पण उगाच सारखा बाहेरच्या वस्तूंचा हात फोनला लागायला नको म्हणून मी मूग गिळून गप्प बसून राहिले घरी. दोन तासांनी नवरा घरी आला तेव्हा एकदम धावपळ झाली माझी. म्हणजे हॉस्पिटलमधून बाळाला पहिल्यांदा घरी आणल्यावर होते ना तशी. त्याला कुठे ठेवायचं हे ठरलेलं असतं तरीही घरात आणलं की धावपळ होतेच. नवरा घरी आल्यावर तो कुठे कुठे हात लावतोय यावर बारीक नजर ठेवून होते मी. त्याने बऱ्याच पिशव्या एकेक करुन आणल्या. सॉलिड चिडचिड झालेली माझी. दोन चार गोष्टी आणायचं सोडून त्याने उगाच इतका पसारा आणला म्हणून. पोरांना इथे कुठेही हात लावायचा नाही म्हणून पिटाळलं होतं. त्यांनाही कळलं आईचा मूड काय आहे ते. 
         घरात एखादा फ्रिज डिलिव्हरी घेऊन आल्यावर कसं आपण त्याच्या मागे मागे करत, त्याला जागा दाखवत लगबगीनं जात असतो, तसं हातातलं सगळं सामान थेट एका कोपऱ्यात जाऊ दिलं. तिथेच ओळीने कागदाच्या पिशव्या टाकून त्यावर पसरायला लावलं. मग बराच वेळ आम्ही त्या सामानाकडे एकटक बघत बसलो, काय करायचं याचं म्हणून. सिमला मिरची सारख्या भाज्या तीन दिवस बाहेर राहतील का वगैरे चर्चा झाली. ब्रेड घरातल्या डब्यांत काढून ठेवून आवरण फेकून द्यायचं की वरचं कव्हर अल्कोहोल ने पुसून घ्यायचं यावर बराच विचार केला गेला. तीन दिवस हात लावता कुठलं सामान तसंच पडून द्यायचं ठरलं. उदा: पास्ता,सफरचंद, केळी, बटाटे, कांदे, वगैरे. किचन ओटा अल्कोहोल(Isopropyl Alcohol) टाकून पाण्याने पुसून घेतला आणि आता हळूहळू थोडं सामानं किचन ओट्यावर आणायला लागलो. प्रत्येक गोष्ट आणताना जणू नवऱ्याच्या हातात बॉम्बचं आहे असं त्याच्या मागे मागे फिरत होते. 
         ओट्यावर आणलेल्या वस्तू ज्या बॉक्समध्ये होत्या त्यांची कव्हर पुसून घेतली. त्यात ब्रेड, दुधाचे कॅन, चिकन, मश्रूमचे पॅक होते. ते पुसून एकेक करुन फ्रिजमध्ये ठेवलं. आता टोमॅटो, छोट्या रंगीत मिरच्या, वगैरे सरळ साबणाच्या पाण्यात घातलं आणि थोडा वेळ तसंच पडून दिलं. नंतर ते खळखळून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. कोथिंबीर उघडून, मोकळी करुन सुकू दिली दिवसभर. नवऱ्याचे, माझे दिवसभरात इतक्यांदा हात धुवून झाले. पोरांना नवीन सामानाकडे तीन दिवस अजिबात फिरकायचं नाही म्हणून सांगितलं. तीन दिवसांनी त्यातली फळं पुन्हा साबणाच्या पाण्याने धुवून काढली. अनेक जणांनी बेकिंग सोडा आणि गरम पाणी किंवा व्हिनेगर आणि मीठ कि काय असं सगळं दिलं होतं. पण मला काही ते जमलं नाही. परत नवऱ्याचं जॅकेट, ग्लोव्हज चार दिवस बाजूला ठेवले. त्याचा फोन वगैरे पुसून घ्यायला सांगितला. दिवस संपला तेव्हा पार दमून गेलेलो. त्यानंतर नवऱ्यावर चार दिवस नजर ठेवून होते हे सांगायला नकोच. :) (अगदी मी फोडणी टाकल्यावर तो शिंकला तरी.) 
       परवाही कारली, वांगी, दोडका वगैरे मागवलं होतं घरीच. शक्यतो आता पालेभाजी किंवा न धुता येणाऱ्या वस्तू आणतच नाहीये. तर पुन्हा सगळी प्रोसेस परत रिपीट. सगळं मार्गाला लागेपर्यंत नुसता घरात गोंधळ. कधी कधी वाटतं किती ते व्याप. हे सगळं किती सोपं होतं. ते तसं होतं तेव्हा कधी वाटलं नाही. कदाचित हे अती वाटू शकतं एखाद्याला. पण सध्या हे गरजेचं आहे. मी राहते ते राज्य देशात ३ नम्बरला आहे या केसेस मध्ये. म्हणजे पसरण्याची शक्यता अजूनच जास्त. असो. तुम्हीही जमेल तसं हे सर्व करत असाल ही अपेक्षा. जेव्हा सर्व सुरळीत होईल तेव्हा हेच सर्व करताना किती बरं वाटेल या विचारानं मी आताच सुखावलेय.  असो. बाकी घरात सामान असताना आणि नसताना फसलेल्या स्वयंपाकाच्या गोष्टी पुन्हा कधीतरी. :) 

विद्या भुतकर. 

Monday, April 13, 2020

साठा

     परवा थालीपीठ केली, भाजणीची. थालीपीठ भाजणीचंच करतात हे मलाही माहित आहे. पण इथे भाजणी बनवून किंवा विकत मिळत  त्यामुळे अनेकवेळा मी गव्हाचं, डाळीचं, तांदळाचं पीठ एकत्र करुन थालीपिठासारखं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या चवीनं अजूनच चिडचिड झाली. तेव्हापासून दरवर्षी भारतातून येताना जमेल तितकं भाजणीचं पीठ घेऊन येते. त्यातच थोडी कणिक, डाळीचं पीठ घालून वाढवते आणि थालिपीठं करते. निरनिराळ्या डाळी, तांदूळ भाजून बनवलेल्या त्या पिठाचा जो सुंदर वास असतो तो आणि चव याचा आनंद वेगळाच. खरंतर आई पूर्वी तळूनच करायची थालीपीठ, सोबत घरचं सायीचं दही किंवा लोणी आणि ठेचा ! बस ! :) आता ती खाल्याला बरीच वर्षं झाली. असो. 
        तर काय सांगत होते? थालीपीठ बनवतांना वाटलं करोना असो किंवा नसो, हे पुरवून वस्तू वापरायची सवय जुनीच. मी शिकागोहून भारतात शिफ्ट होणार होते तेंव्हा आईने दोन महिने आधीच विचारायला सुरुवात केली होती कुठल्या डाळी, किती तांदूळ, गहू भरुन ठेवायचंय. बाकीच्या हजार गोष्टी असताना मला कळत नव्हतं की हे वर्षाचं सामान आता भरायची काय गरज आहे? पण आम्ही गेलो तोवर आईने सर्व घेऊन, ८ मोठाले डबेही घेऊन ठेवले होते. आजही ते भारतात पडून आहेत. डाळी, तांदूळ वगैरे वर्षभराचं भरुन ठेवायची इथे कधी सवय नाही. तरी घरात कुठलीही बारीक सारीक गोष्ट कधीही लागू शकते हे अनुभवानं कळलेलं होतं. विशेषतः मीठ, पीठ, मसाले, डाळीचं पीठ, उसळी वगैरे भरुन ठेवायची सवय लागली हळूहळू. शिवाय अनेक ठिकाणी भारतीय भाज्या, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे आणायला लांब जावं लागायचं. त्यामुळे तेही ३-४ आठवड्याचं आणून ठेवायची सवय झालीय. पण या सगळ्यांपेक्षा जास्त मोठा साठा म्हणजे भारतातून आणलेल्या वस्तूंचा.
       दरवेळी भारतातून परततांना मोठं कामच ते. आवडीच्या वस्तूंची यादी बनवायची आणि त्या जमेल तितक्या घेऊन यायच्या इकडे आणि वर्षभर त्याच पुरवून वापरायच्या. त्यात हे भाजणीचं पीठही. दोंघाच्या आया फोनवर विचारुन ठरवणार की काय काय कोण कोण करतंय. भाजणी आईकडंची. ज्वारीचं पीठ कुणाला जमेल तसं. हळद, लाल तिखट हेही घरुनच आणलेलं. सासूबाईंच्या हातचं आंब्याचं, लिंबाचं गोड  लोणचं. सासरे समोरच्या डेअरीमध्ये जाऊन त्यांच्या दुधाच्या पिशव्या घेऊन लोणच्याच्या पाकिटांना हवाबंद पॅक करुन आणून देणार. ती पाकिटं अजून दोनचार टेप लावून आवरणं घालून बॅगेत ठेवायची. सासरचे नाचणीचे पापड. आईने एकांकडून मशीनवर बनवून घेतलेल्या शेवया, बिया काढून मीठ लावून ठेवलेल्या घरच्या चिंचां आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरचा काळा मसाला. आता या सगळ्यात कधी कधी विकत आणलेल्या चटण्या, मेतकूट वगैरेही असतंच. 
         हे सगळं करताना तिथे घरच्या सर्वांची तारांबळ चालू असते अगदी आम्ही इकडे येईपर्यंत. इथे आलं की ते सर्व सामान नीट आलंय ना बघून, काढून नीट डब्यांमध्ये कधी फ्रिजमध्ये ठेवलेलं असतं. गेल्या काही दिवसांत जेव्हा घरात काय काय सामान आहे बघायला लागलो तेव्हा या सगळ्या सामानाची परत हलवाहलव झाली. त्यात लोणच्याची दोन पाकिटं एका डब्यात मिळाली. दोन वर्षं पुरेल इतकं तिखट आणि हळद आहे. भाकरीचं पीठ, भाजणीचं पीठ, चटण्या, लोणची, पापड, शेवया, सगळंच गरज लागली तर वापरता येईल याचं एक मानसिक समाधान आहे. हा आमचा साठा आहे आणि सगळ्यांचं प्रेमही. आज पुन्हा एकदा सर्वांच्या त्या धावपळीची , प्रेमाची आठवण झाली. 

       काल चवीत बदल म्हणून ही थालिपीठं झाली आणि सोबत नव्याने सापडलेलं लोणचंही. आता फक्त हे सर्व लवकर निपटलं म्हणजे परत पुढच्या वर्षीसाठी सामान आणायला जाता यावं म्हणजे झालं. 

विद्या भुतकर. 

Thursday, April 02, 2020

गृहीत

        काल दुपारी स्वनिकला फोन देणार नाही म्हणून जोरात रागवून सांगितल्यावर तो निघून गेला. वाटलं नेहमीप्रमाणे रागाने दुसरं काहीतरी करत असेल. तर बेडवर पडून रडत होता. हे गेल्या तीन आठवड्यात दोनदा झालं. एरव्ही रडणं वेगळं पण हे हताश झाल्यासारखं होतं. घरी राहून कंटाळा आलाय, मित्र नाहीत खेळायला, रोजची शाळा, क्लास, काहीच नाही. अर्थात थोड्या वेळानं शांत झाला. पण त्याला पाहून वाईट वाटलं की या लहान पोरांनाही या सर्व गोष्टींचा त्रास होतोय आणि नक्की काय होतंय हे सांगताही येत नाही.
         थोड्या वेळानं मी चालायला बाहेर पडले. आणि विचार करुन अजूनच त्रास होऊ लागला. माझ्या लक्षांत आलं तोच कशाला मीही सगळं मिस करतेय. रोज सकाळची धावपळ, मिटींगच्या वेळा पाळणं, ट्राफिक, रोजचा ड्राईव्ह, गाडीत रेडिओवर चावून चोथा होणाऱ्या गोष्टी आणि त्यांना वैतागून लावलेली गाणी. एखादं आवडतं गाणं आणि त्यात हरवून जाणं. अगदी पोरांच्या डब्यासाठी काय करायचं पासून ऑफिसला जाताना काय कपडे घालायचे इथपर्यंत अनेक प्रश्न. हे सगळं आठवत चालत असतानाच फोनवर गाणी लावायला लागले आणि ऑफिसच्या शेवटच्या दिवशी ऐकत होते ते गाणं लागलं. त्यादिवशी दुपारी चालताना हे ऐकलेलं. त्याने अजूनच कसंतरी वाटलं.
          किती काय काय गृहीत धरतो ना आपण? रोज कंटाळवाण्या वाटणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींची, 'कधी एकदा सुट्टी मिळतेय' असं वाटणाऱ्या अनेक दिवसांची आज आठवण येतेय. मी हे सगळं लिहीत असताना स्वनिक जवळ आला 'काय करतेयस?' विचारत. त्याला जवळ घेऊन म्हटलं, "बाबू, it'll be all over soon. We'll be fine. ". हे मी त्याला सांगत होते की स्वतःला काय माहित?

विद्या भुतकर.