आज संध्याकाळी ८ वाजताच स्वयंपाक, जेवण, भांडी, सगळं उरकून झालं होतं. आता इथे काही लोकांसाठी ते फारच उशिरा असेल पण आमच्यासाठी लवकरच. थोडा वेळ पोरांसोबत एक कॅरमचा गेम खेळायचा होता, पण त्यालाही वेळ होता. काय करायचं म्हणून म्हटलं चला आज गव्हाचा शिरा/सांजा बनवू. मग पुढचा अर्धा पाऊण तास ते सगळं करण्यात गेला. आता रात्री उशिरा इतका गोड शिरा खायचा की नाही याबद्दल दुमत आहे. पण निदान तयार तरी आहे. त्यासाठी माझं म्हणणं असतं इतकं लवकर उरकायलाच नको. नाहीतर हे असले उद्योग सुचतात. असो.
तर हे नेहमीचंच. आईकडे बरोबर ९ वाजता जेवायला बसायचो. दूरदर्शनवर बातम्या संपून ९ वाजताचा कार्यक्रम पाहण्यासाठीची ती वेळ. अर्ध्या पाऊण तासात जेवण उरकून व्हायचं. पुढे दीडेक तासांत अभ्यास, सोबत विविधभारतीची गाणी आणि झोप. आयुष्याची इतकी वर्षं हे रुटीन पाळलेलं. कॉलेजला आले तेव्हा अनेकजणी ७ वाजताच जेवायला जायच्या. तर काही पावणेआठ-आठला. मला मात्र कितीही ठरवलं तरी लवकर जमायचं नाही. आणि कधी गेलेच मैत्रिणींसोबत तर रात्री हमखास भूक लागायची. मेसच्या काकू कितीदा तरी ओरडायच्या. मी एकटीच सर्वात शेवटीराहिलेली असायची. पण उशिरा जाण्यात मजाही असायची. बरेचदा सगळ्यांसाठी केलेली भाजी संपून जायची त्यामुळे काकू काहीतरी नवीन बनवत असायच्या. त्यांच्या हातची तव्यावरची भरलेली वांगी आजही आठवतात. आणि तशीच परत कधी मिळालीही नाहीत आणि जमलीही. कधी त्यांच्याशी गप्पाही व्हायच्या निवांत. त्यांची एक छोटीशी ती खोली, एरवी पोरींनी भरलेली असायची. ती एकदम शांत व्हायची. इतक्या उशिरा म्हणजे पावणेनऊ, नऊला जेवूनही रात्री गप्पा मारत बसलं की भूक लागायचीच. मग घरुन आणलेला चिवडा वगैरे खात अनेकदा मैत्रिणींशी गप्पा व्हायच्या. कॉलेजला असताना एका मैत्रिणीच्या घरी जायचे. त्यांच्याकडे संध्याकाळचं जेवण लवकर व्हायचं. अनेकदा मला रात्री परत भूक लागायची तिच्याकडे.
पुढे मुंबईत असताना रात्री उशिरापर्यंत शिफ्ट असायची त्यामुळे अनेकदा रात्री बारा वाजताही जेवलेय. पण ते संध्याकाळी ७ पेक्षा बरंच वाटायचं. पुढे अमेरीकेत आल्यावर कळलं की इथले लोक किती लवकर जेवतात, संध्याकाळी ६-६.३० वाजताच. त्यांची मुलंही ८-८.३० झोपून जातात. मीही अनेकदा प्रयत्न केला हे असं करायचा. पोरांनाही लवकर जेवायला देऊन ८-८.३० ला झोपवायचा. पण ते काही जमत नाही. अनेकदा पोरंही संध्याकाळी ७ वाजता जेवण झाल्यावर रात्री ९-९.३० वाजता,'आई भूक लागली' म्हणून मागे लागलीयत. तेच कशाला, मीही लवकर जेवण झालं तर परत रात्री त्याची भरपाई म्हणून उलट अजून जास्तच खाल्लं जातं. हे असं असलं तरी एक मात्र खरं. रात्री ९ वाजता जेवण म्हणजे खूपच उशीर होतो. विशेषतः तुम्ही तास दोन तासांत झोपत असाल तर अजूनच. निदान तीनेक तास तर पाहिजेत जेवण पचायला. तेव्हापासून एक सुवर्णमध्य साधलाय. पावणेआठला जेवण सुरु करुन नऊपर्यंत भांडी वगैरे सर्वच उरकायचं. म्हणजे मग रात्रीची भूकही लागत नाही आणि खूप उशिराही खाल्लं जात नाही.
आज तो शिरा केला त्यावरुन हे सगळं लिहिण्याचं निमित्त. असो. शिरा खायचा की नाही हे अजूनही ठरवलं नाहीयेच. :)
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment