Tuesday, April 14, 2020

भाजी घ्या भाजी SSS

दोन आठवड्यांपूर्वी, एका शनिवारी सकाळी नवऱ्याने अगदीच मनावर घेतलं.
म्हणाला, "कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत.  मी दुकानात जाऊन सामान घेऊनच येतो. "
मी आपलं हिंदी पिक्चरमधल्या सोशिक बहुप्रमाणे म्हटलं, " तू नको जाऊस बाहेर. आपण भागवून घेऊ आहे त्याच्यावरच."
अजून १० दिवस आरामात गेले असते, दूध, अंडी, ब्रेड होतं थोडंफार. पण त्याचंही म्हणणं बरोबर होतं, अजून पुढे काय परिस्थिती असेल माहित नाही. शेवटी मनावर दगड ठेवून मी 'हो' म्हणाले. बाहेर पडणं म्हणजे मोठया युद्धावर जाण्यासारखंच होतं. 
म्हटलं, 'ग्लोव्हज घालून जा'. 
तर म्हणाला, 'हो गाडीत आहेत'.   
आता गाडीत कुठले ग्लोव्हज तर ते जिममध्ये घालतात ना ज्यांची पुढची टोकं उघडी असतात ना? तसले  ! म्हटलं डोंबल ! असल्या ग्लोव्हजनी काय होणारे? म्हणून चांगले जाडजूड ग्लोव्हज दिले त्याला आणि म्हटलं, "उगाच इथे तिथे हात लावत बसू नकोस, लोकांपासून चार हात लांबच राहा, दोन चारच वस्तू घे आणि लगेच घरी ये.". हो ना, काय काय सूचना द्याव्या लागतात. एकवेळ चार वर्षाचं पोरगंही ऐकेल, पण नवरा ऐकेल तर शपथ. मी तर "डोक्यावर हेल्मेट घालूनच जा" म्हटलं असतं पण कारमध्ये असं हेल्मेट घातलेलं बरं दिसणार नाही म्हणून गप बसले.  शेवटी माझ्या सूचनांना कंटाळून निघून गेला बिचारा.
          खरं सांगायचं तर हा दुकानात गेला सामान आणायला की हजार फोन होतात आमचे. हे चालेल का, ते आणू का, हे विसरलेच होते ते पण आण वगैरे. पण उगाच सारखा बाहेरच्या वस्तूंचा हात फोनला लागायला नको म्हणून मी मूग गिळून गप्प बसून राहिले घरी. दोन तासांनी नवरा घरी आला तेव्हा एकदम धावपळ झाली माझी. म्हणजे हॉस्पिटलमधून बाळाला पहिल्यांदा घरी आणल्यावर होते ना तशी. त्याला कुठे ठेवायचं हे ठरलेलं असतं तरीही घरात आणलं की धावपळ होतेच. नवरा घरी आल्यावर तो कुठे कुठे हात लावतोय यावर बारीक नजर ठेवून होते मी. त्याने बऱ्याच पिशव्या एकेक करुन आणल्या. सॉलिड चिडचिड झालेली माझी. दोन चार गोष्टी आणायचं सोडून त्याने उगाच इतका पसारा आणला म्हणून. पोरांना इथे कुठेही हात लावायचा नाही म्हणून पिटाळलं होतं. त्यांनाही कळलं आईचा मूड काय आहे ते. 
         घरात एखादा फ्रिज डिलिव्हरी घेऊन आल्यावर कसं आपण त्याच्या मागे मागे करत, त्याला जागा दाखवत लगबगीनं जात असतो, तसं हातातलं सगळं सामान थेट एका कोपऱ्यात जाऊ दिलं. तिथेच ओळीने कागदाच्या पिशव्या टाकून त्यावर पसरायला लावलं. मग बराच वेळ आम्ही त्या सामानाकडे एकटक बघत बसलो, काय करायचं याचं म्हणून. सिमला मिरची सारख्या भाज्या तीन दिवस बाहेर राहतील का वगैरे चर्चा झाली. ब्रेड घरातल्या डब्यांत काढून ठेवून आवरण फेकून द्यायचं की वरचं कव्हर अल्कोहोल ने पुसून घ्यायचं यावर बराच विचार केला गेला. तीन दिवस हात लावता कुठलं सामान तसंच पडून द्यायचं ठरलं. उदा: पास्ता,सफरचंद, केळी, बटाटे, कांदे, वगैरे. किचन ओटा अल्कोहोल(Isopropyl Alcohol) टाकून पाण्याने पुसून घेतला आणि आता हळूहळू थोडं सामानं किचन ओट्यावर आणायला लागलो. प्रत्येक गोष्ट आणताना जणू नवऱ्याच्या हातात बॉम्बचं आहे असं त्याच्या मागे मागे फिरत होते. 
         ओट्यावर आणलेल्या वस्तू ज्या बॉक्समध्ये होत्या त्यांची कव्हर पुसून घेतली. त्यात ब्रेड, दुधाचे कॅन, चिकन, मश्रूमचे पॅक होते. ते पुसून एकेक करुन फ्रिजमध्ये ठेवलं. आता टोमॅटो, छोट्या रंगीत मिरच्या, वगैरे सरळ साबणाच्या पाण्यात घातलं आणि थोडा वेळ तसंच पडून दिलं. नंतर ते खळखळून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. कोथिंबीर उघडून, मोकळी करुन सुकू दिली दिवसभर. नवऱ्याचे, माझे दिवसभरात इतक्यांदा हात धुवून झाले. पोरांना नवीन सामानाकडे तीन दिवस अजिबात फिरकायचं नाही म्हणून सांगितलं. तीन दिवसांनी त्यातली फळं पुन्हा साबणाच्या पाण्याने धुवून काढली. अनेक जणांनी बेकिंग सोडा आणि गरम पाणी किंवा व्हिनेगर आणि मीठ कि काय असं सगळं दिलं होतं. पण मला काही ते जमलं नाही. परत नवऱ्याचं जॅकेट, ग्लोव्हज चार दिवस बाजूला ठेवले. त्याचा फोन वगैरे पुसून घ्यायला सांगितला. दिवस संपला तेव्हा पार दमून गेलेलो. त्यानंतर नवऱ्यावर चार दिवस नजर ठेवून होते हे सांगायला नकोच. :) (अगदी मी फोडणी टाकल्यावर तो शिंकला तरी.) 
       परवाही कारली, वांगी, दोडका वगैरे मागवलं होतं घरीच. शक्यतो आता पालेभाजी किंवा न धुता येणाऱ्या वस्तू आणतच नाहीये. तर पुन्हा सगळी प्रोसेस परत रिपीट. सगळं मार्गाला लागेपर्यंत नुसता घरात गोंधळ. कधी कधी वाटतं किती ते व्याप. हे सगळं किती सोपं होतं. ते तसं होतं तेव्हा कधी वाटलं नाही. कदाचित हे अती वाटू शकतं एखाद्याला. पण सध्या हे गरजेचं आहे. मी राहते ते राज्य देशात ३ नम्बरला आहे या केसेस मध्ये. म्हणजे पसरण्याची शक्यता अजूनच जास्त. असो. तुम्हीही जमेल तसं हे सर्व करत असाल ही अपेक्षा. जेव्हा सर्व सुरळीत होईल तेव्हा हेच सर्व करताना किती बरं वाटेल या विचारानं मी आताच सुखावलेय.  असो. बाकी घरात सामान असताना आणि नसताना फसलेल्या स्वयंपाकाच्या गोष्टी पुन्हा कधीतरी. :) 

विद्या भुतकर. 

No comments: