राहुल आईशेजारी सोफ्यावर बसून म्हणाला,"बोल काय झालं? आज एकदम अशी वैतागली का आहेस?".
त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं,"काही नाही रे, एकतर दिवसभर ती पोरगी घरात असते. संध्याकाळ पर्यंत कंटाळून जाते. आणि आम्हाला काय नातवंड आहे त्यामुळे त्याचं करायला काही वाटत नाही. पण शेवटी आई ती आईच ना? आणि तू सांग किती दिवस असं चालणार हे? तिकडे तुझे बाबा, भाऊही बाहेर खाऊन कंटाळले आहेत. मलाही घरी गेलंच पाहिजे ना?".
राहुलने एकेक मुद्दा समजून घेतला,"चल आधी आपण तुझ्याबद्दल बोलू. तू सांग तुला काय करायचं आहे? तिकडे बाबांसाठी जायचं आहे का इथे राधासाठी राहायचं आहे हा विचार करूच नकोस. तुला काय हवं आहे ते सांग. हे बघ तू आमच्यासाठी इतकं केलं आहेस आजतागायत. तू आम्हाला इतकं चांगलं वळण लावलंस, शिकवलंस. पण तुला काय हवं म्हणून कधी विचारलंच नाही. आता आम्ही मार्गी लागल्यावर तुझा छान ग्रुप जमला. कधी बाहेर फिरायला जाणं झालं हे सर्वही उत्तमच. तुला इथे कंटाळा येणंही हि साहजिकच आहे. त्यामुळे तू सांग तुला काय करायचं आहे?".
आई,"मला राधाबरोबर रहायला आवडतं रे. पण तिकडची खूप आठवण येते. इथे जास्त नाही राहू शकत. पण मग राधाचं काय?".
राहुल,"हे बघ, बाकी कुणाचाही विचार करू नकोस. तुला जायचं आहे ना? मग ते तरी नक्की करू. कारण केवळ स्त्री म्हणून बाळाची जबाबदारी आईची,सासूची, असं मानूनच आम्ही तुला, तिच्या आईला इथे राहायला बोलावलं. पण तुमचंही तिकडे जग आहे हे विसरलो. तर पुढच्या आठवड्यात तुझं तिकीट काढू. चालेल?".
आई,"अरे पण? राधा?"
राहुल,"अगं, बोलू ना पुढे."
त्यांनी मानेनंच होकार दिला.
राहुल पुढे बोलू लागला,"नेहाबद्दल म्हणशील तर, तिने कधी नोकरी सोडावी हा विचार माझ्या मनातच आला नाही. कारण ती इतकी हुशार आहे. तिने घरी राहणे म्हणजे तिच्या कौशल्याचा अपमान करण्यासारखे आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही मुली बघत होतात तेव्हा शिकलेली, नोकरी करणारी, अगदी माझ्या बरोबरीची, अनुरूप मुलगीच तुम्ही बघत होता ना? तेव्हा आपण विचार केला का? की या शिकलेल्या मुलीने बाळ झालं की मात्र घरी राहून आई होण्याचं कर्तव्य पार पाडायचं ? नाही ना? आपण सगळेच अपेक्षा करतो की कमावणारी मुलगी पाहिजे. मग वेळ आल्यावर तिनेच त्या नोकरीवर पाणी सोडावं अशी अपेक्षा का ठेवायची? मी काही स्त्रियांच्या हक्कासाठी लढणे किंवा त्यांना बरोबरीचा दर्जा द्यावा म्हणून लढाई पुकारत नाहीये. पण नेहा जशी आहे तशीच मला आवडते आणि म्हणून तिने बदलावं अशी मी अजिबात अपेक्षा करत नाही.आणि एव्हढच वाटतं तर मी नोकरी सोडतो,चालेल?".
त्याच्या आईने चमकून वर बघितलं.
"आता राहिला प्रश्न राधाचा. तिच्यावर आपण सर्वच किती प्रेम करतो हे वेगळं सांगायची गरज नाही. पण म्हणून तुम्हा लोकांना वेठीस नाही धरले पाहिजे. तुम्ही हौसेने करता, खेळता ते वेगळं. राधा ही जशी नेहाची जबाबदारी आहे, तशीच माझीही. आईचं प्रेम म्हणजे तरी काय गं? तुझ्याइतके बाबा आमच्या सोबत राहू शकले असते तर त्यांच्याही तितकेच जवळ राहिलो असतो जितके तुझ्या आहोत. मी राधाला काही कमी प्रेम देणार आहे का नेहापेक्षा? त्यामुळे फक्त तिनेच एकटीने घरी राहण्याचा निर्णय घेणं हे चुकीचं. हां, तिला आपल्या मुलीसोबतच राहायचं आहे, बाकी काहीच करायचं नाहीये असं म्हटलं तर तो तिचा निर्णय. पण म्हणून तिच्यावर तो निर्णय घेण्याचा भार सोडून, तिने आपल्याला हवा तसा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा मी करणार नाही. राधाला दिवसभर कसे सांभाळायचे याचा विचार केलाच पाहिजे आणि त्यासाठी अनेक पर्यायही आहेत. त्यातला एक कुठलातरी एकदम योग्य आहे असे मी अजिबात म्हणणार नाही. प्रत्येकाला चांगली-वाईट बाजू आहेच. पण त्यातला कुठला ऑप्शन ठरवायचा हे आम्हाला दोघांना बसून नक्की केलं पाहिजे. आणि आम्ही ते करूच. त्यामुळे तू तिची अजिबात चिंता नको करूस. सगळं ठीक होईल." राहुलच्या त्या समंजस बोलण्याने त्याच्या आईला गहिवरून आलं.
तो पुढे म्हणाला,"चल झोप बरं आता. राधा रात्री उठली की मलाच बघायला लागतं. तुम्ही दोघी बायका घोरत असता नुसत्या."
त्याच्या आईने खोट्या रागाने त्याला एक फटका मारला आणि झोपायला निघून गेली.
नेहा मात्र त्यांचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होती. राहुल रुममध्ये येत आहे म्हटल्यावर तिने तोंडावर पांघरून ओढून घेतलं. सगळेच प्रश्न असे पांघरून घेऊन सुटले असते तर किती बरं झालं असतं. राहुलही लगेच झोपून गेला.
पण नेहाला झोप लागत नव्हती. त्याच्या चेहेऱ्याकडे बघत नेहा कितीतरी वेळ तशीच पडून राहिली. त्याच्या पहिल्या भेटीपासून ते पुनर्भेट, त्यांचं लग्न, सगळं आठवत होतं तिला. पण त्याला बघून आज जितकं भरून आलं तितकं कधीच वाटलं नव्हतं. आपल्या 'अहं' ला सांभाळूनच ती त्याच्यावर प्रेम करत होती जणू. आज मात्र त्याच्याकडे बघताना तिला इतकं प्रेम उफाळून आलं होतं की त्याच्यासाठी, तो म्हणेल ते करायला तयार झाली होती ती. बाईचं नेहमी हे असंच होतं. किती स्वत:ला सांभाळून द्यायचं ठरवा, वेळ आली की स्वत:ला विसरायला होतंच. त्याच्या आनंदासाठी, त्यांच्या मुलीसाठी वाट्टेल ते करायला ती आज तयार झाली होती. होताच तो तसा, तिचा साथीदार, तिचा प्रियकर. हो, आजपर्यंत फक्त तिचा मित्र असणारा तो आज तिचा प्रियकर झाला होता. आज जणू पहिल्यांदाच बघत होती ती त्याच्याकडे, नव्या अर्थाने. किती पाहिलं तरी मन भारत नाहीये असं वाटत होतं. शेवटी त्याचा हात अंगावर ओढून ती बघत राहिली. तो उठला की त्याला सांगायचंच की, "मला नाही करायची नोकरी. घरी राहीन मी थोडे दिवस राधासोबत". एकदा ठाम निश्चय झाल्यावर तिला कधीतरी झोप लागून गेली.
प्रत्येक सकाळ नवीन काहीतरी घेऊन येत असते. एक नवा हेतू जगण्याचा, एक नवी आशा, एक नवा दृष्टीकोण बघण्याचा. राहुलची आईही आज शांत होती मनातून. तिला काय करायचं आहे हे तिला कळल होतं. तसंच नेहालाही. नेहाने उठल्यावर सांगितलच राहुलला, "अरे मी विचार करतेय, मी सांगते आज ऑफिसमध्ये नाही जमणार यायला अजून १-२ वर्षं तरी. दोन महिने नोटीस पिरीयड आहे म्हणा. पण आई थांबत असतील तर मी तेव्हढे दिवस जाऊन येईन. मग आहेच मी घरी. मलाही जरा ब्रेक तेव्हढाच. आणि माझी काळजी करू नकोस. मला काहीही होणार नाही घरी राहिल्यावर. राधा तर आहेच. पण तू माझ्या बरोबर असशील तर मला कधीच कशाचा त्रास होणार नाही याची खात्री आहे मला. "
तिने असं प्रेमाने छातीवर डोकं ठेवल्यावर छान वाटलं राहुलला. आणि तिचा त्याच्यावरचा विश्वास बघून तर अजूनच. पण तरीही नेहाने घरी राहायला 'हो' म्हटलं तरी तो तयार नव्हता त्यासाठी.
"नेहा, मी काय इतका वाईट सांभाळतो का गं राधाला? मला वाटलं नव्हतं तू माझ्या स्कीलवर अशी शंका घेशील म्हणून. उलट मीच तुझ्यापेक्षा लवकर झोपवतो तिला. ", तो चेष्टेने म्हणाला.
पण नेहा त्या मूड मध्ये नव्हती. तिचा चेहेरा बघून राहुल पुढे बोलला,"हे बघ, उगाच काहीतरी घाईत निर्णय घ्यायचा नाहीये. आपण आहोत ना दोघेही सोबत? मग सगळा भार तूच का घ्यायचा? मलाही जरा करू दे की माझ्या लेकीचं. आपणच 'आई' आणि 'बाप' म्हणून दोन वेगळे लोक, वेगळे रूप बनवतो. हे इंग्रजीत म्हणतात तसं दोघेही 'पेरेंट' म्हणून राहू. हो की नाही? यापुढेही कितीतरी प्रसंग येतील. प्रत्येकवेळी सोडणार आहेस का नोकरी? माझ्यासाठी? राधासाठी? नोकरी करणे न करणे हा ऑप्शन का असतो दर वेळी? ती आपल्या आयुष्याचा एक भागच आहे हे नक्की करायचं आणि बाकीचे निर्णय त्या दृष्टीने घ्यायचे. हो की नाही?
आणि राधाला कुठे ठेवायचं हा विचार का करायचा? थोडे दिवस आपणच करू काहीतरी. मी सकाळी जात जाईन आणि तू दुपारी जा ऑफिसला. मधले दोनेक तास ठेवता येईल तिला डे-केयरला. तिलाही तेव्हढाच बदल. आपलीच थोडी चुकामूक होईल, पण कुणीतरी एकाने घरी राहण्यापेक्षा हे बरं ना? असेही तुला रात्रीच कॉल असतात. जमले तर थोडे दिवस घरून काम करता येतं का ते बघू. हे बघ, उपाय शोधायचे म्हणले की मिळतातच. ते दोघांनी मिळून अमलात आणले तरच त्यात मजा ना."
नेहाला आज असंही त्याच्यासमोर काही दुसरं दिसत नव्हतं. आणि हे असं तिला इतकं सांभाळून घेऊन बोलल्यावर तिला एक शब्दही पुढे बोलायला झालं नाही. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून राधाकडे समाधानाने बघत राहिली फक्त. आता यापुढे कुठल्याही वळणावर ती एकटी नसणार याची खात्री तिला झाली होती.
समाप्त.
विद्या भुतकर.