एका संध्याकाळी मोकळ्या मनाने केलेल्या मदतीमुळे नेहा आणि राहुल आता चांगले मित्र झाले होते. निखळ मैत्रीची मजा ना प्रेमात पण येत नाही. मग प्रेमात पडलेले लोकही सुरुवातीचे मैत्रीचे दिवस विसरू शकत नाहीत. बरं, मैत्री म्हणजे तरी काय? प्रेमात होते तशी, ती व्यक्ती समोर नसली की असणारी हुरहूर नसते. बरं काहीतरी सांगायचं आहे, बोलायचं आहे असंही असंतच असं नाही. पण भेटल्यावर, बोलल्यावर, जोर-जोरात हसल्यावर मन मोकळं होतं न, तेव्हाच कळतं अरे हेच ते, जे हरवलं होतं. तर संध्याकाळच्या गप्पा आता जास्तच रंगू लागल्या. काम करतानाही एक आनंदा मिळत होता. पैजा लावून चुका शोधून काढणे, आपण मांडलेला टेक्निकल मुद्दा कसा बरोबर आहे हे दाखवण्यासाठी उशिरापर्यंत रिसर्च करणे आणि ऑफिसमध्ये लोकांना टोपण नावं ठेवून त्यांच्या चेष्टा करणं हे सर्व क्रमप्राप्त होतं. मग हळूहळू विकेंडला सिनेमा, तर कधी टीम औटींग हेही सुरु झालं. असं असलं की काम मग काम राहात नाही. मित्रांना घरीही घेऊन गेली होती नेहा २-३ वेळा. त्यामुळे मग घरी त्यांचे रेफरंसहि लागत होते आता. घरचेही मग थोडे निवांत झाले होते की मुलीला उशीर झाला तरी काळजीने घरी सोडायला कुणीतरी असायचंच.
बघता बघता त्यांना कंपनीत एक वर्षं होऊन गेलं होतं. राहुलही आपल्या सुरुवातीच्या नाराजी बद्दल विसरून गेला होता. काम मन लावून केलं की फळ मिळणारच या विश्वासावर तो आपल्या सवयीप्रमाणे उत्तम रीतीने काम करतच होता. पण रोहन आणि अजितचे काम वाढले होते. त्यांना दुपारची आणि रात्रीची शिफ्ट आलटून पालटून करायला लागायची. त्यामुळे दिवसा काम करणाऱ्या नेहा आणि राहुलशी त्यांचं नेहमीसारखं बोलणं होईनासं झालं. त्यामुळे कधीतरी वेळ मिळेल तसा ते जेवायला, वीकेंडला भेटायचा प्रयत्न करायचे. पण मग वेळी-अवेळी असणाऱ्या शिफ्टमुले सर्व नैसर्गिक चक्र कसं बिघडून गेलं होतं. त्यामुळे लोक दुपारी जेवत असले की यांची सकाळ व्हायची, मग दुपारी नाश्ता सुरु असायचा तर रात्री ऑफिसच्या रिकाम्या फ्लोअरवर डेस्ककडे बघत जेवण. सगळंच विचित्र. या सगळ्याने व्हायचं काय की चिडचिड, मग ती कधी चुकून एक-मेकांवरही निघायची. बर सुटका हवी आहे म्हणावं तरी एकच तर वर्षं झालं होतं नोकरी लागून.
अशातच त्यांचे एक वर्षाचे अप्रेझल सुरु झाले. एकाच टीम मध्ये मित्र-मैत्रिणी म्हणजे कुणाला कमी रेटिंग आणि कुणाला जास्त, तर आनंद कशाचा आणि दु:ख कशाचं करणार. सिद्धार्थने सर्वांना एकेक करून बोलावून त्यांचे रेटिंग सांगितले होते. पहिलीच वेळ असल्याने सर्वांना कळत नव्हतं की काय रियाक्ट करायचं. रोहन आणि अजित खूपच वैतागले होते. एक तर शिफ्ट मध्ये काम करायचं आणि सपोर्ट मध्ये काही खास स्कील दाखवता येत नाही म्हणून कमी रेटिंग. राहुलला अपेक्षेप्रमाणे चांगले रेटिंग मिळाले होते. आणि नेहाला मध्यम. त्यामुळे ती खुश नसली तरी नाराजही नव्हती. एकूणच या रेटिंग प्रकरणामुळे ग्रुप मध्ये नाराजीचं वातावरण होतं. रोहनने सांगितलं मी तर दुसरीकडे नोकरी शोधणार आहे. त्यावर त्याला सर्वांनी समजावलं,' अरे, आताशी तर एक वर्षं झालंय. कुठे सोडून जातोस. आणि आपल्या क्लाएंटकडे दोनेक वर्षात अमेरिकेत जायचा योगही येईलच की. धीर धर थोडा. 'ऑन साईट' हे मोठं आकर्षण होतं या सर्व पोरांसाठी.
सिद्धार्थला असं पोरांचं मन मोडायला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. पण त्याचं रेटिंग त्याच्या याच स्कीलवर होतं ना की कमी दुखावून एखाद्याला वाईट बातमी कशी सांगायची. एखाद्याबद्दल मुद्दाम चांगले आणि वाईट गुण शोधून काढायचे, मांडायचे तेही तटस्थपणे, अवघड कामच होतं ते. ते करत असताना पहिल्यांदाच सिद्धार्थची नेहाबद्दल छोट्या छोट्या गोष्टींची नोंद करायला सुरुवात झाली होती, तेही त्याच्या नकळत. ज्या दिवशी मिटिंग घेतली तिच्यासोबत तेव्हाही त्याच्या केबिनमध्ये हसतमुख चेहेर्याने येणारी नेहा त्याला दिसली आणि पहिल्यांदाच जाणवलं की अरे खरंच आपल्या टीमची रंगत हिच्या हसमुख व्यक्तिमत्वामुळेच होती. माणूस हसतमुख असला की ते रोज सर्वांना जाणवेलच असं नाही, पण त्याच्या एखाद्या दिवशी उदास चेहेऱ्याकडे बघून कळतं की नक्की काय हरवल आहे ते.
तर त्याने तिला तिचे रेटिंग सांगितले आणि थोड्या नाराज चेहेऱ्याकडे पाहून तो म्हणाला,"हसा हो, तुम्हाला असं उदास होणं शोभत नाही."
नेहा कसनुसं हसली. ती निघून गेल्यावर आपण असे कसे बोललो याबद्दल क्षणभर तो स्वत:वरच आश्चर्य करत होता. सुरुवातीची नाराजी कमी झाल्यावर सर्व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले होते.
असेच एक दिवशी, नेहा उशिरा काम करत बसली होती. आज राहुलही गणपतीसाठी सुट्टी घेऊन घरी गेला होता.
रात्री लिफ्टमध्ये तिला एकटीला पाहून सिद्धार्थला जरा आश्चर्यच वाटले होते,"अरे, मिस नेहा तुम्ही, इतक्या उशिरा? काही महत्वाचं काम होतं का?"
"नाही सर, गणपती आहेत न पुढे दोन दिवस उशिरा थांबायला जमणार नाही, म्हणून आजच करून घेत होते.", नेहा.
तो बोलला,"जेवण झालं की नाही तुमचं? उगाच उपाशी राहून आजारी पडू नका हं."
त्याला असं मजेने बोलताना दिसणं क्वचितच. ती थोडं हसली.
"चला मी सोडतो तुम्हाला.", सिध्दार्थ म्हणाला.
ती, "नको सर मी जाते गाडीवरून माझ्या."
तो,"असू दे हो, मी काही खाणार नाही तुम्हाला. बसा. इतक्या उशिरा नका जाऊ गाडीवरून. उद्या न्या गाडी परत."
आज काय एकावर एक धक्के बसत होते तिला. पण असं तिला 'अहो-जाहो' म्हणलेलं ऐकून फार सही वाटायचं तिला. मग त्याच्या गाडीतून जाताना ती त्याला उत्साहाने सांगत होती, घरी कसा गणपती साजरा करतात, किती उत्साह असतो सर्वांना. बोलता बोलता तिने त्याला गणपतीला घरी यायचं निमंत्रण ही देऊन टाकलं होतं. तो फक्त गाल्यातल्या गालात हसत तिचं ऐकून घेत होता.
"तुमचं जेवण झालं?", मध्येच तिनं विचारलं.
तो काहींच बोलला नाही. तीच मग बोलली,'इथे कोपऱ्यावर मस्त मॅगी मिळते. खाणार?".
तिच्या निरागस उत्साहाला तो नाही म्हणू शकला नाही. त्या दोघांनी मग गरम गरम मॅगी खाल्ली आणि तो तिला सोडून घरी निघून गेला. रोजच्या त्याच्या उदास रात्रीला आज एक चंदेरी झालर होती.
नेहाही आपला टीम लीड इतका मस्त गप्पा मारून गेला म्हणून खूष होऊन घरी गेली होती.
क्रमश:
-विद्या भुतकर.
2 comments:
Hi Vidya,
Chan lihite aahes ... keep going...
I am regular reader of ur post ...but sorry for not commenting .. thanks for good writing
अशीच लिहित राहा ,आम्ही वाचत राहू
Post a Comment