Friday, November 23, 2012

भाग आठवा: पुन्हा एकदा

          अभ्यासात, परीक्षेत, पुन्हा एकदा कॉलेज लाईफ अनुभवण्यात राहुलची २ वर्षं कशी संपली कळलंही नाही त्याला. नवीन जागी गेलं की आपणही नवीन होऊन जातो. आपल्यातले जुने आपण थोडे मागे सोडून नवीन 'स्वत:ला' शोधायला. इथे आलेले लोक वेगवेगळ्या प्रांतातून, देशातून आलेले. कुणी नोकरी सोडून शिकायला आलेले तर कुणी कॉलेज नंतर लगेच. पुण्यातला राहुल केव्हाच मागे राहिला होता. नव्या जोमाने नवीन रस्ता निवडला होता त्याने. यावेळीही त्याला चांगल्या कंपनीतून ऑफर मिळाल्या होत्या. आता तर त्याच्याकडे ४ वर्षाचा अनुभव होता, एक नवीन डिग्री होती. पण त्याने यावेळी ठरवलं होतं की केवळ ट्रेंड बघायचा नाही, आपल्याला कुठे काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, आपली आवड काय हे सर्व बघून कंपनी निवडली होती. एका मोठ्या कार कंपनीच्या इंजिनीयरिंग सेक्शन मध्ये रिसर्च प्रोजेक्ट मॅनेजरची नोकरी मिळाली होती त्याला. पगार, गाडी इ सर्व तर मिळणारच होते. पण त्याहीपेक्षा आवडतं काम करायला मिळणार याचा आनंद त्याला जास्त होता.
           लवकरच तो बेंगलोरला शिफ्ट झाला. तिथल्या मेट्रो पब्लिकमध्ये मिसळून घ्यायला त्याला जरा वेळ लागला पण आता तो मोठा माणूस झाला होता. हे सर्व त्याला शिकायलाच लागणार होतं. नवीन प्रोजेक्टमध्ये ट्रेनी म्हणून आलेल्या मुलांना बघून त्याला आपले पुण्यातले दिवस आठवायचे. नेहाचीही आठवण यायची. गेल्या दोन-तीन वर्षांत तिचा काहीच पत्ता नव्हता. रोहन, अजित ला विचारले तर त्यांच्याशीही बोलणं नाही झालं तिचं म्हणे.आधी तिचा फोन यायचा अधून मधून. पण राहुल अभ्यासात इतका बिझी होऊन गेला होता की स्वत: त्याने तिला कधी फोन केला नव्हता. नोकरी सुरु झाल्यापासून मात्र त्याला तिची आठवण नियमित यायची. त्याने तिचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही.कसं असतं ना जवळच्या मित्रांचं. आधी इतके फोन केलेले असतात की नंबर लिहून घ्यायची वेळच येत नाही. आणि वेळ येते तेव्हा ते आठवत नाहीत.
           एका शनिवारी रात्री एक पिक्चर बघून मेट्रो मधून परत येताना एक जीन्स घातलेली, छोटे केस असलेली मुलगी त्याला दिसली. आधी नेहा वाटली, पण त्याने ती शक्यता धुडकावून लावली. 'छे छे, ती तर असेल अमेरिकेत तिच्या नवऱ्यासोबत'. बरं, जास्त वेळ मुलीकडे पाहिलेलं तरी चांगलं वाटतं का?  पण तिच्यावरून त्याची नजर हटेना. शेवटी जरा जवळ जाऊन त्याने पहिलेच. नेहाच होती ती !!! तो उडालाच. इतकी बदललेली होती ती. तिच्यातलं पुणेरीपण गेलं होतं.
 'नेहा?????' त्याने तिला आश्चर्याने विचारले.
नेहालाही मग इतका आनंद झाला त्याला पाहून. दोघांनी एकमेकांना आधी मिठी मारून घेतली. अगदी शेजारच्या लोकांना धक्का मारून, त्यांच्या वाकड्या तोंडाकडे दुर्लक्ष करून. राहुलने नकळत तिच्या गळ्याकडे पहिले. लोकांना ना, गळ्यात मंगळसूत्र बघायची फार घाई असते. आजकाल तर मुली घालतही नाहीत तरी लक्ष जातंच. त्याने सिद्धार्थ बद्दल विचारले, पण नेहाने त्यावर 'नन्तर बोलू' म्हणून टाळून दिलं.
त्याने तिला विचारलं, "कुठे चालली आहेस? चल मेट्रोतून उतर माझ्यासोबत. स्टेशनवर गाडी आहे माझी, मी सोडतो तुला." 
तिलाही इच्छा नव्हती त्याला 'नाही' म्हणायची. मग दोघे बराच वेळ बोलत राहिले. मेट्रोतून उतरले, गाडीत बसल्यावर नेहा बोलली, "सहीये रे, मोठ्ठा माणूस झालास तू !".
राहुल तिला म्हणाला,"मी कुठला मोठा माणूस. तुम्ही तिकडे अमेरिकेत याहूनही मोठ्या आणि भारी गाड्या पहिल्या असतील."
नेहाला ते काही आवडलं नाही. 
तो पुढे म्हणाला,"बरं इकडे कशी काय?"
तिने सांगितले, "आपल्या जुन्या कंपनीतच आहे. आता सिनियर डेव्हलपर झाले आहे."
राहुलला जरा आश्चर्य वाटले. 
तरी तो म्हणाला,"चांगले आहे की? तू अजून टिकून आहेस. मला वाटले तिकडे जाऊन बदलली असशील कंपनी."
      नेहाने मग आपल्या घराजवळ त्याला सोडायला सांगितले. त्याने तिला एका बिल्डींगच्या खाली सोडले. अर्थात ती त्याला 'ये' म्हणाली नाही आणि त्यानेही तिला 'येऊ का?' म्हणून विचारले नाही. दोघांनी आपले फोन नंबर एकमेकांना दिले आणि 'बाय' म्हणून राहुल परत घरी यायला निघाला. बेंगलोरच्या रिकाम्या रस्त्यांवर थंडीतून रात्री गाडी चालवत राहुल घरी पोचला तेव्हा खूपच खुशीत होता. जुन्या मित्रांना भेटून त्याच्यासोबतच्या 'आपली' ही आठवण ताजी होते. आपण किती बावळट होतो ना? किंवा किती कामसू होतो ना? किंवा किती निरागस होतो? अशा आठवणी येत राहतात. राहुलला तेव्हाची त्याची साधी रूम आठवली. नुसत्या दोन गादया आणि बॅगा इतकेच काय ते सामान असायचे. ना कधी फर्निचर घेतले, ना टी व्ही, ना कुणा मुलीला रूमवर बोलावले. आज आपल्या फर्निश्ड घराकडे बघून राहुलला ते दिवस आठवले. त्याची ती रात्र मग आठवणीतच गेली.
         त्यानंतर राहुलला दोन-तीन वेळा इच्छा झाली नेहाला फोन करायची. पण ती उचलेल की नाही, काय बोलेल, सिद्धार्थ काय म्हणेल, हे सर्व विचार करून त्याने फोन केलाच नाही. 
शुक्रवारी रात्री नेहाचाच फोन आला त्याला. "काय रे, मला वाटले ५-६ वर्षांनी भेटलास म्हणजे निदान फोन तरी करशील. तेही नाही?"
राहुलला काय उत्तर द्यावे कळेना. नेहा पुढे बोलली,"बर ते जाऊ दे, तू मुव्हीला येणार आहेस का सांग?"
राहुल,'हो' म्हणाला. मग तिनेच त्याला कुठे भेटायचं, किती वाजता हे सर्व सांगितलं. 'टिपिकल नेहा', राहुल मनात बोलला. पण त्याला खूप बरं वाटत होतं मनातून की तिला परत भेटणार. अर्थात सिद्धार्थ तिथे असेल तर काय बोलायचं हे सर्व प्रश्न होतेच. पण ते सर्व दुय्यम होतं. कितीतरी दिवसांनी आपल्या माणसासोबत जाणार होता तो.
          किती बदलली होती नेहा. तिच्या बोलण्यात बदल होता थोडा. केस, कपडे तर बदललेच होते. सुंदर तर ती आधीपासूनच वाटायची पण आता त्यातही एक परफेक्शन दिसलं त्याला. बाकी घाई घाईने बोलण्यात, आवडीने खाण्यात, त्याने जोक केला की रुसण्यात काहीच बदल झाला नव्हता. 
ती त्याला म्हणाली,"तू मात्र काहीच बदलला नाहीस हं." तो थोडा बुजला. आपल्याला पक्कं ओळखणाऱ्या माणसासोबत असलं ना की किती बरं असतं. मनात येईल ते बोलता येतं, वाटेल तसं वागता येतं आणि समोरचा काय विचार करेल मी काही केल्यावर याचा अजिबात विचार करावा लागत नाही. तो कम्फर्ट त्याला आज जाणवत होता तिच्यासोबत. खूप वेळ गप्पा मारल्या दोघांनी. जेवण झाल्यावर आईसक्रीम खाऊन आता निघायला लागणार होतं. मध्ये मध्ये राहुल घड्याळ्या कडे बघत होता. 'नेहाने इतका वेळ बाहेर थांबलेलं चालणार आहे का?' हा प्रश्न त्याला पडला होता.        
शेवटी नेहा त्याला बोललीच,"चल आपण तुझ्या रूमवर जाऊन बोलू. तू असा स्वस्थ राहणार नाहीस."
            ते दोघे मग राहुलच्या घरी गेले. त्याचं घर पाहून नेहाही इम्प्रेस झाली. तो पहिल्यापासून नीट नेटका राहायचाच. पण हे घर खूपच सुंदर होतं. किती टापटीप, किती स्वच्छ, जिथल्या तिथे. तिने घराचं कौतुक केलं त्याच्या. मग तिने त्याला विचारलं तुझ्याकडे, "आपले जुने फोटो आहेत का रे?" 
        राहुलने त्यांच्या एका ट्रीप चा अल्बम आणला. तो बघून दोघेही हसत बसले बराच वेळ. दोघांनाही माहित होतं की प्रश्न तर आहेतच, पण सुरुवात कुणी करायची आणि कशी? 
शेवटी राहुल बोलला,"काय बोलायचं आहे म्हणत होतीस? माझ्यापासून काहीही लपवायची तुला गरज नाहीये. आणि हे तुलाही माहित आहे. त्यामुळे निष्काळजी होऊन बोल."
नेहाही मग जरा सिरीयस झाली,"मला माहित आहे रे तू कसा आहेस ते. म्हणून तर तुला परत फोन केला मी. नाहीतर आपल्या जुन्या कुठल्याच लोकांशी बोलले नाहीये मी. कुणाशीच संपर्क नाही ठेवलाय मी. राहुल, दोन वर्षापूर्वी माझा डिव्होर्स झाला आहे."
राहुल सुन्न होऊन तिच्यासमोर बसला होता.

-क्रमश:
विद्या भुतकर.

No comments: