Thursday, November 22, 2012

भाग पाचवा: निले निले अंबर पर..

           सातारा -पुणे रस्त्यावर पावसाळ्यात पहाटे जाताना, गाडी चालवताना कधी तरी इतकं धुकं असतं की डोळे ताणून बघितलं तरी १०-१५ फुटाच्या पलीकडे काही दिसू नये. ती धुक्याची दुलई जितकी दिसायला सुंदर तितकीच भीतीदायक. कुठल्या क्षणाला समोरून गाडी येईल आणि त्या सुंदर धुक्याला चिरून अंगावर येईल सांगता येणार नाही. त्या धुक्यातून जाणं  म्हणजे दर थोड्या वेळाने कुणीतरी आपल्यासाठी एक दार अलगद उघडत आहे आणि पुढचा कप्पा दाखवत आहे असं वाटायचं राहुलला. आणि मागे वळून पाहीपर्यंत मागचा कप्पा बंद झालेला असायचा. आज बसमधून जाताना ते धुकं अनुभवत राहुल नेहाबद्दल विचार करत होंता. तिच्यासोबत असतानाही त्याला या धुक्यात असल्यासारखं वाटायचं त्याला. ज्या क्षणात आहोत तोच खरा, जरा पुढे जाऊन पहावं तर तिच्या मनाचा एखादा कप्पा उलगडलेला दिसायचा, आणि मागे वळून पाहावं तर आधीचा  बंद. आजपर्यंत  त्याची मुलींशी फारशी मैत्री अशी झालीच नव्हती. वेळ कुठे होता त्याला म्हणा. आपले ध्येय समोर ठेवूनच प्रत्येक काम करायचं तो.
             नोकरी लागल्यापासून मात्र त्याच्या भवतीचं ते 'अभ्यासू' पणाचं कवच गळून पडलं होतं. त्यात नेहाचा मोठा हात होता. त्यामुळे हळूहळू त्याला आजपर्यंत न केलेल्या गोष्टी बिनधास्तपणे अनुभवायला मिळत होत्या. आजही घरून आणलेला लाडवाचा डबा त्याने उघडायलाच की आत नेहाने तिथे येऊन खायला सुरुवातही केली होती. आणि म्हणाली,'आपलं दोघांचं नाव मी आपल्या ब्रांचच्या कार्यक्रमासाठी नोंदवून आलेय बरं का. अँकरिंग केलंयस का कधी?'
राहुलला एकदम ठसकाच लागला. 'काय? अँकरिंग ?? मी भाषणं केली आहेत शाळेत. पण अँकरिंग? अगं मला विचारायचं तरी होतंस. '
नेहा,'तुला काय विचारायचं त्यात? इतकं चांगलं, स्पष्ट तर बोलतोस. बाकी स्क्रिप्ट वगैरे आपण करूच सोबत.'
राहुल अजूनही धक्क्यातून सावरला नव्हता तेव्हढ्यात नेहा म्हणाली,'बरं ते जाऊ दे रे. तुला गंमत सांगायची आहे. गेस, गणपतीला आमच्याकडे कोण आलं असेल?'
राहुल तिच्या मोठाल्या डोळ्यांमधील हावभाव टिपत म्हणाला,' गणपती?'
तिचे डोळे मग अजूनच मोठे झाले,'राहुल, फालतू जोक मारू नकोस. सिद्धार्थ सर आले होते.'
'सिद्धार्थ सर?' राहुलला जरा आश्चर्य वाटलेच.
'अरे हो ना, आदल्या दिवशी मी जरा लेट काम करत बसले होते. जाताना सर पण भेटले. मग त्यांनीच सोडलं मला. तेव्हा म्हटलं मी आपलं त्यांना की या घरी. तर खरंच आले अरे. मला काय माहित येतील म्हणून. ठीकच आहे म्हणा. त्यांचं इथे कुणी नाहीये पण म्हणे. राजस्थानात आहे कुठेतरी त्यांचं घर. सणाला आले, छान वाटलं म्हणाले. '
राहुलला एकावर एका धक्के बसत होते. पाच दिवस घरी जाऊन आला तेव्हढ्यात काय काय होत होते. पण तो परत मूळ मुद्द्यावर आला.'ते जाऊ दे गं. मला सांग स्क्रिप्ट काय बनवायचे. दोन तासांचा तरी इव्हेंट आहे ना? इथे दोन मिनिटं स्टेज वर बोलायची पंचाईत येते, दोन तास स्टेजवर काय करणार आहे? '
'अरे, आपण थोडीच २ तास बोलणार आहे? लोकांचा परफोर्मंस असेल त्याच्या मध्ये मध्ये फक्त दोन शब्द बोलायचे. जोक सांगायचे. तू रील्याक्स हो जरा, दुपारी बोलू.' असं बोलून नेहा जागेवर गेली.
राहुल मनातल्या मनात हसला. असले उद्योग नेहाच करू शकते. नाहीतर मी कधी अँकरिंग करणार?
         त्यांची तयारी जोरदार सुरु झाली.  राहुलला नेहाचा सहवास आता अजूनच हवाहवासा वाटू लागला होता. रोहन आणि अजित सोबत असले कधी तर, ते गेल्यावर दोन मिनिट का होईना तिच्याशी एकट्याने बोलावंस वाटू लागलं होतं. एक दिवस दुपारी जेवताना कॅन्टीन मध्ये त्यांना सिद्धार्थ एकटाच बसलेला दिसला. नेहा म्हणाली,' चल त्यांच्यासोबत बसू.' राहुलला मात्र तिच्यासोबत एकट्याला बसायचं होतं. पण सिद्धार्थला एकट्याला बघून त्याला नाही म्हणताही येईना. तिघे मग शनिवारच्या प्रोग्रॅम बद्दल बोलू लागले.
सिद्धार्थने त्यांना विचारले,'झाली की नाही तयारी?'
'चालू आहे सर.' नेहा.
'आपल्या टीमचं नाव खराब करू नका बरं का?', सिद्धार्थ चेष्टेने म्हणाला. तो पटापट आपलं जेवण करून मिटिंग साठी निघून गेला. तो गेल्यावर नेहा राहुलला म्हणाली, 'सही आहेत न सिद्धार्थ सर. त्यांची स्टाईल पण मस्त आहे एकदम. त्यांना अजून कुणी मुलगी कशी नाही मिळाली याचं आश्चर्यच आहे. मी तर एका पायावर तयार झाले असते.' इतका वेळ गप्प बसलेल्या राहुलने एकदम चमकून  तिच्याकडे पहिले. ती सिद्धार्थच्या पाठमोऱ्या  आकृतीकडे बघत बोलत होती. राहुलला अजिबात आवडले नव्हते ती असं बोललेली.
        शेवटी कार्यक्रमाचा शनिवार उजाडला. नेहा आणि राहुलने आदल्या दिवशीही तयारी केली होती जोरदार. संध्याकाळी पार्टीला तो लवकर येऊन सर्व सेट अप ठीक आहे की नाही चेक करत होता. तेव्हा त्याला काळी साडी नेसून आलेली नेहा दिसली. मुलांना ना, मुली साडी नेसल्यावर इतक्या सुंदर का वाटतात काय माहित. तिची ती साडी सांभाळण्याची धडपड पाहून त्याला हसू येत होतं. तिच्या काळ्या साडीवरची चंदेरी नक्षी कशी खुलून दिसत होती. तिचे सिल्व्हर कानातले तिच्या मोकळ्या केसांमधून मध्येच चमकत होते.
प्रत्येकाचा न एक 'वास' असतो म्हणजे ती व्यक्ती जवळ आली किंवा दूर गेल्यावरही जवळपास रेंगाळणारा. राहुल नेहाचा तो 'वास'ही  परिचयाचा झाला होता. तिच्या टाल्कम पावडरचा तो जास्मिनचा सुगंध आला की त्याला अस्वस्थ व्हायचं. आता तसं पहिलं तर हजारो मुली तीच पावडर वापरतात, पण त्याच्या जाणीवा जागी करणारी फक्त नेहाच. आणि आज तर दोघे स्टेजवर एकत्र होते म्हटल्यावर त्याला अजूनच आनंद झाला होता. तोही आपल्या सफेद कुर्त्यामध्ये उठून दिसत होता. सावळा रंग म्हणून तो पूर्वी टाळायचा पांढरे कपडे घालायला, पण त्यादिवशी नेहाच त्याला घेऊन गेली होती तो कुर्ता घ्यायला. अर्थात आज कुर्त्याचा परिणाम होता की नेहाच्या सहवासाचा, पण त्याच्या चेहरा खुललेला होता.
         सुरवात तर चांगली झाली होती कार्यक्रमाला. तासभर झाला असेल आणि एकाचं गाणं चालू असताना सिद्धार्थ तिथे आला. नेहा आणि राहुल गाण्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते. सिद्धार्थ नेहाच्या जवळ येऊन तिच्या कानात बोलला, 'मी जातोय याच्यानंतर.' नेहाला एक मिनिट समजलं नाही काय म्हणायचं आहे त्याला ते. त्याने मग हातात मागे धरलेली गिटार दाखवली. तिने मग हातवारे करून विचारलं,'कुठलं गाणं?'. त्याला गाणं हातवारे करून सांगता येणार नव्हतं. तो तिच्या कानाजवळ जाऊन बोलला,'निले निले अंबर पर..'. तिच्या इतक्या जवळ जाण्याची त्याची पहिलीच वेळ होती. तीही त्याच्या जवळीकीने अस्वस्थ झाली. पण आतून काहीतरी होत होतं. ती मानेनेच 'हो' म्हणाली. आधीचं गाणं संपल्यावर तिने त्याचं नाव जाहीर केलं. ग्रे टी-शर्ट , निळी जीन्स आणि हातातील गिटार.त्याच्याकडे मोहिनी घातल्यासारखी नेहा बघत राहिली होती. अजूनही त्याचे ओठ तिच्या कानाजवळ आहेत असा भास होत होता तिला. 'ऐसा कोई साथी हो..ऐसा कोई प्रेमी हो..' कार्यक्रम संपला तरी ती बराच वेळ गाणं गुणगुणत राहिली होती ती.
         सर्वांनी राहुल आणि नेहाचे कौतुक केले होते. त्यामुळे खूष होते दोघेही. सिद्धार्थने तिला स्वत: येऊन सांगितलं की,'चांगलं बोलता की तुम्ही. मिटिंग मध्ये असं बोललात तर क्लाएंट सुद्धा खूष होऊन जाईल.' नेहा लाजली होती. जेवण झाल्यावर राहुल, अजित रोहन आणि नेहा नाचण्यात गुंतले होते. आणि सिद्धार्थ तिला पाहण्यात. राहुल आज एकदम सातव्या आसमानात होता. त्याने पहिल्यांदाच थोडीशी दारूही घेतली होती. तिच्यासोबत नाचताना तो गुंगला होता. आज रात्री तिला सोडायला जाताना निवांत गप्पा मारायला अजून एकांत मिळणार याचा आनंद होताच.
अकरा वाजले आणि नेहा म्हणाली,'चला मी निघते आता. '
'निघते?',राहुलला कळले नाही काही.
'अरे, मघाशी सिद्धार्थ सरांनी मला विचारले की मी सोडतो तुला म्हणून', आणि माझी साडीही आहे ना आज, मग बाईक वरून कशाला? म्हणून मग मी 'हो' म्हणाले.'
राहुलचा पडलेला चेहरा बघून  ती म्हणाली,'अरे असा नाराज काय होतोस? तू नेहमीच सोडतोस की मला. एक दिवस जातेय त्यांच्यासोबत'.
राहुलच्या आनंदावर विरजण पडले होते.
          खरंतर गाडीतून जातानाही नेहा राहुलचा विचार करत होती बराच वेळ. तिला असं शांत बसलेलं बघून सिद्धार्थ थोडा अस्वस्थ झाला होता. 'काय झालं? गाणं चांगलं झालं नाही का माझं?' ती मग एकदम गांगरून बोलली,'नाही नाही. गाणं एकदम मस्त झालं. मला माहित नव्हतं तुम्ही इतकं चांगलं गाता आणि गिटार वाजवता.'
'मला तरी कुठे माहित होतं तुम्ही साडीमध्ये इतक्या सुंदर दिसत असाल म्हणून. बरेच आहे ऑफिसमध्ये रोज साडी नेसून येत नाही. '
नेहा लाजून हसली. तिचं घर आल्यावर, त्याने गाडीतून उतरून तिचं दार उघडलं. तिचा हात धरून उतरवलं. 'चला भेटू उद्या. चांगला झाला कार्यक्रम. गुड. ' असं म्हणून सिद्धार्थने तिला घराजवळ सोडलं. त्याला एक अवघडला 'बाय' करून नेहाने दार उघडलं. घरात पोचली तरी तिच्या तोंडात तेच गाणं होतं, ' 'ऐसा कोई साथी हो..ऐसा कोई प्रेमी हो..'

-क्रमश:
विद्या.

1 comment:

Anonymous said...

आवडलं! आय.टी. कंपनीतलं कल्चर अचूक टिपलेलं आहे..अजून भाग येऊदेत!