Tuesday, November 20, 2012

भाग तिसरा:सिद्धार्थ

       सहा महिनेच झाले होते सिद्धार्थला भारतात परत येऊन. गेले दोन वर्षे तो अमेरिकेत एका छोट्या गावात सध्याच्या क्लाएंटसाठी काम करत होता. त्याची तर इच्छा नव्हतीच परत जायची. पण २५-२६ वर्षाचा झाला तरी अजून लग्नाचा पत्ता नाही आणि त्याच्या गावी तर मुलांची लग्नं २५ पर्यंत उरकून टाकत. शेवटी आईच्या रोजच्या रडण्याला आणि वडिलांच्या रागाला कंटाळून तो परत आला. दिल्ली, मुंबई वगैरे ठिकाणी असता तरी बरं झालं असतं पण प्रोजेक्ट पुण्यात असल्याने तो इथे पोचला होता. सुरुवातीला जरा नाखूष होता. पण आता सवय होत होती इथली. रिक्षावाले, तोंडाला रुमाल बांधून मोकाट गाड्यांवर फिरणाऱ्या मुली, मराठी हिंदीत बोलणाऱ्या शेजारच्या आंटी सर्वांची सवय करून घेत होता तो. परत येऊन वरची पोस्ट  पाहिजे म्हणून टीम लीडची जागा मिळाली होती त्याला. अमेरिकेतून आणलेल्या त्याच्या भारी कपड्यांमध्ये भारी दिसायचा तो पण एकदम. त्याच्या अदबशीर बोलण्यात अमेरिकेतल्या प्रोफेशनल वागण्याची भर पडली होती. प्रत्येकाशी अहो-जाओ मध्येच बोलायचा तो. त्यामुळे पुण्यातल्या लोकांची मराठी-हिंदी त्याला फार उद्धट वाटायची.
         तो आल्यापासून टीममध्ये अजून चार लोकांची भर पडली होती, राहुल,नेहा, अजित आणि रोहन. त्यांच्यासाठी काम काय काय द्यायचे, कुठले ट्रेनिंग दिले पाहिजे, कुठल्या स्किल्स चा उपयोग करून घेतला पाहिजे, हे सर्व ठरवत होता तो. नवीन पोरं असली की बरं असतं, त्यांना हवं तसं आपल्या साच्यात बसवता येतं. नाहीतर प्रत्येकाची मग वेगळी मागणी पुरवेस्तोवर टीम लीड म्हणून डोक्याला त्रासच होतो. अर्थात नवीन असली की पहिल्यापासून शिकवायला लागतं हे मात्र आहेच. असो. तर नवीन आलेल्या पोरांना ट्रेनिंग द्यायला लागूनही ४ महिने उलटून गेले. हुशार होती सगळीच. असणारच ना, कंपनीचं नावच तसं होतं. त्यांना पाहताना त्याला त्याचे सुरुवातीचे दिवस आठवले. दोन-चार तासांचे ट्रेनिंग सोडले तर निवांत राहायचं. दुपारी दीड दोन तास जेवण, संध्यकाळी नाश्ता, मोकळं हसणं, निरागस प्रश्न, महत्वकांक्षा. आपल्या त्यावेळच्या मित्र-मैत्रिणींची आठवण यायची त्याला. पण तेही असेच देशात, परदेशात विखुरलेले. आणि असले इथे तरी आता पहिल्यासारखी मजा नव्हती त्यात. प्रत्येकाला वाढलेली जबाबदारी, कुणाची लग्नं झालेली, कुणाची मुलं इ. त्यामुळे नियमित भेटणंही जमत नसे. ऑफिसमध्येच दुसऱ्या टीम लीड सोबत जेवायला बसायचा तेव्हाच थोडफार वैयक्तिक बोलणं व्हायचं, बाकी मग काम झालं की घरी परत येऊन घरच्यांसोबत होणार वाद, आपली मतं ऐकवायला, मन मोकळं करायला त्याचं असं कुणी नव्हतंच इथे.
        नवीन पोरं सिद्धार्थला पाहिले की मोठा कामाचा आव आणल्यासारख करायची आणि तो नसताना परत दंगा चालूच. जगाचं चक्र असंच चालतं बहुतेक. तुम्ही कुणातरी सिरीयस वाटणाऱ्या मोठ्या हुद्द्याची जागा घेता, मग तुमच्या जागेवर कुणीतरी तुम्ही करायच्या तशा टवाळक्या करणारा येतो. आणि त्या नवीन माणसाच्या दृष्टीने तुम्ही 'मोठे' झालेले असता अगोदरच. मग त्यांना कितीही गोष्टी सांगितल्या आपल्या वेळच्या तरी त्यात मजा नसते. हे ओळखून सिद्धार्थ पण त्यांना जास्त बोलत नसे. मात्र हळूहळू कामाला सुरुवात झालेली होती. छोट्या छोट्या गोष्टींची तो नोंद करून घेत होताच. कोण कसं काम करतंय, किती बारकाईने ट्रेनिंगचा उपयोग करून घेत आहे, कोण नीट नेटकं काम करत आहे, कोण शॉर्ट कट मारत आहे. संध्याकाळच्या क्लाएंट सोबतच्या मिटिंग मध्ये त्यांना सहभागी करून घ्यायला लागला होता तो. साधारण सात वाजता सुरु होणारा कॉल आठ वाजेपर्यंत चालायचा.
        राहुल, अजित आणि रोहन  याचं ठीक होतं, रात्र झाली तरी ते निवांत एकत्र जेवण करून, गप्पा मारून साडेनौ दहा ला घरी जायचे. असेही रूमवर जाऊन काम तरी काय करणार? त्यापेक्षा कॅन्टीन मध्ये जेवणही होऊन जायचं. नेहाची मात्र कोंडी होत होती. रात्री इतक्या उशिरा घरी जायची सवय नाही, त्यात इतक्या लांब उशिरा जायचं गाडीवरून म्हणजे जरा भीतीच वाटायची. कॉलला जरा उशीर झाला की ती अस्वस्थ होऊन जायची. शिवाय आज-काल आपण बाकी लोकांसोबत रात्री नसतो त्यामुळे नंतर काही बोलणं झालं, काही प्लान ठरला, इ तर त्यातून ती वगळली जायची याचं तिला वाईटही वाटायचं. पण पर्याय नव्हता. एकदा-दोनदा तिला हेही खटकलं की आपण जास्त वेळ नसल्याने सिद्धार्थशी जास्त बोलणं व्हायचं नाही. आता टीम लीडला आपलं चांगलं काम दिसणार तरी कसं? पण नाईलाज होता, रात्री उशिरा निघायला तिला भीती वाटायचीच. 
         त्यात आजकाल नवीन एका गोष्टीची भर पडली होती. तिचे आणि राहुलचे होणारे वाद. अर्थात त्याला वाद म्हणायचं का मतभेद हे माहित नाही. दोन लोक काम करताना होणारे मतभेद किती मनावर घ्यायचे आणि किती सोडून द्यायचे हे शिकायला तिला थोडा वेळ लागणारच होता. नेहा आणि राहुल यांचं नातं म्हणजे डेव्हलपर आणि टेस्टरच. एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्यातल्या चुका काढाव्यात. आणि राहुल आपल्या कामाचा पक्का, त्यामुळे जरा कुठे काही चूक दिसली की ती लगेच नोट करून ठेवायचा. नेहाला वाटायचं 'किती कुचकट आहे हा? मला सांगायचं ना? मी केली असती दुरुस्त'. पण राहुल ती नोट करून ठेवायचा, मग ती दुरुस्त झाली की किती वेळ लागला, काय काय परत करावं लागलं हे सर्व मांडून ठेवायचा. आता त्यात तो तरी काय करणार त्याच्या मेंदूचं प्रोग्रमिम्गच तसं होतं. दिलेलं काम मनापासून करायचं. त्यामुळे नेहाला मात्र कितीही नाही म्हटले तरी त्याचा राग यायचाच. अर्थात त्यामुळे तिचंही काम सुधारलं होतं बरंच. पुढच्या २-३ महिन्यात हा तणाव त्यांच्यात अजूनच वाढला.
         आपण केलेलं एखादं काम कुठल्या हेतूने केलं हे समजून द्यायलाही प्रत्यक्षात समोर नसू तर कितीतरी गोंधळ होतात. एखाद्याला अनेक वर्षं ओळखत असू दे नाहीतर ६ महिने. तर अशाच एका दिवशी नेहाने एका प्रोग्राम मध्ये केलेले बदल नेहमीप्रमाणे नीट लिहून ठेवले होते. पण त्यावर अजून सिद्धार्थची अनुमती मिळाली नव्हती. घरी लवकर जायला लागणार म्हणून नेहाने मेल सुद्धा करून ठेवली. पण त्यादिवशी बाकी कामात गुंतलेल्या सिद्धार्थने त्याला पाठवलेली मेल त्याने पहिली नव्हती. नेहमीच्या कॉल मध्ये जेव्हा हवे असलेले बदल अजून मिळाले नाहीत म्हणून क्लाएंटने विचारल्यावर सिद्धार्थची चिडचिड झाली होती. मुली म्हणून किती सुट द्यायची? लवकर जायचे आहे ठीक, कॉलसाठी थांबायला जमत नाही, ठीक, पण निदान महत्वाचं काम तरी करावं ना? त्याचा संताप झाला होता. उद्या आल्यावर बोलायचंच असं ठरवून तो घरी निघून गेला.
         दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाला सिद्धार्थने केबिनमध्ये बोलावून ऐकवलं,"मिस नेहा, एखादं काम अवघड वाटत असेल तर तुम्ही मला स्पष्टं सांगा. मला दिसतंय की कामात चुका निघाल्या आहेत  तुमच्या. तुमच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला क्लाएंटकडून ऐकूनही घ्यावं लागलं आहे. ही पहिलीच वेळ आहे म्हणून मी सोडून देतोय पण आपल्याबद्दल आलेली प्रत्येक तक्रार नोंद केली जाते. आणि मला आपल्याकडून कुठलीही चूक नकोय.".
"पण सर, मी तर मेल केली होती तुम्हांला?", नेहा.
'मेल' म्हटल्यावर सिद्धार्थ थोडा दचकला. पण तरीही त्याला राग आलाच होता. 
तो पुढे बोलत राहिला," मला दिवसाला कमीत कमी २००-३०० मेल येतात. आजही माझ्याकडे ६००० न वाचलेल्या मेल आहेत आणि मी कितीही जास्त काम केलं तरी त्या पूर्ण होणार नाहीत. एखादं काम महत्वाचं असेल तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन बोललं पाहिजे.". 
 असं कुणीतरी कडक शब्दात बोलायची नेहाला सवय नव्हती. मुलींना न खरंतर रडायचं नसतं अशा वेळी. आणि तसा प्रयत्नही करत्तात त्या, पण तसा प्रयत्न करणं आणि सफल होणं या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. आपण टिपिकल मुलगी आहे हे समोरच्याला दाखवण्याची कुणालाच इच्छा नसते. अशावेळी स्वत:चाच खूप राग येतो पण तो राग बाहेर येऊन पाणी पळून जायच्या आतच, ते डोळ्यांच्या कडांवर जमा होऊन जातं.  आपल्या डोळ्यात येणारं पाणी दिसू नये म्हणून नेहा दुसरीकडेच बघत राहिली. पुढे सिद्धार्थ काय बोलतो आहे हे तिला ऐकूच येत नव्हतं.
           "अशी चूक परत होणार नाही याची खबरदारी घेईन", असं बोलून नेहा बाहेर येऊन गेली. आणि 'खरंच हा सिद्धार्थ काय आणि तो राहुल काय कुणालाच बोलायची एकही संधी आता द्यायची नाही' असं मनाशी पक्कं केलं होतं नेहाने. कधी कधी वाटतं की मुलगी म्हणून प्रत्यके ठिकाणी आपण मुलांपेक्षा कमी नाही हे दाखवायची उगाचच ओढाताण करत राहतात मुली. मुलांना का बरं येत नाही असं डोळ्यात पाणी? ते नाही असं काही मनात ठाम करत, चुका करतातच की? मग का मुलगी म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रुव्ह करायची धडपड करायची? आणि त्यासाठी मानसिक त्रास करून घ्यायचा? जणू आपल्या नको तेंव्हा आलेल्या आसवांची किंमत नंतर ठाम निर्णय घेऊन करत राहतो.पण तो क्षण गेलेलाच असतो ना? असो.
         त्यादिवशी नेहा मग नवीन आलेलं काम उशिरापर्यंत करत बसली. रात्री नऊ वाजले तरी ती निघाली नव्हती. जेवायला जाताना पोरांनी तिला बोलावलं. इतर वेळी कॅन्टीन मध्ये जायला तयार असणारी नेहा आज 'नाही' म्हणाली. त्यांनाही माहीतच होतं की तिचं काय बिनसलं आहे ते. मग तिघे खाली गेल्यावर दोघांनी राहुलला झापलं,
"तुला पण काय रे अगदी सगळे 'बग' लॉग करून ठेवायचे असतात. अगदी मोठ्ठं बक्षीस मिळणार आहे का दोन जास्त 'बग' काढलेस तर? की कुणी फासावर चढवणार आहे कमी काढलेस म्हणून? बरं, ते सगळे जगाला कशाला सांगायला हवेत, आधी नेहाशी बोल ना, मग ठरव काय करायचं ते."
राहुल,"अरे पण प्रोसेस डॉक्यूमेंट प्रमाणेच करतो आहे सर्व." आपल्या सरळसोट स्वभावाला धरून राहुल बोलला. लोकांची मनं सांभाळण्याशी कामाचा काय संबंध ते त्याला कळत नव्हतं.
          जेवण करून सामान घ्यायला वर गेलेला राहुल, नेहाला 'बाय' करायला थांबला. आज तिच्या चेहऱ्यावर ते रोजचं हसू नव्हतं. सकाळपासून एसी मध्ये असलं की चेहेरा तसा फ्रेशच असतो, पण थकलेल्या डोळ्यांना लपवता येत नाही. तिच्याकडे पाहून राहुलला वाटलं' रोहन म्हणतोय ते बरोबर आहे. माझी टीम-मेटच आहे ती. एकमेकांना सांभळून,शिकवून पुढे गेलं पाहिजे आपण'. 
तो नेहाला म्हणाला,"कुठल्या बग वर काम करते आहेस? चल बघू". तोही तिच्यासोबत बसून बघू लागला मग. नेहा आधी थोडी तटस्थच होती. थोड्या वेळाने त्याची मदत करायची इच्छा पाहून तीही थोडी निवळली. साडे-दहापर्यंत बसून दोघांनी ते काम पूर्णं केलं. राहुल तिच्यासोबत गाडीवरून तिच्या घरापर्यंत गेला आणि मग तिथून रिक्षा पकडून आपल्या रूमवर. नेहाला सकाळपासून असलेला सर्व ताण निघून गेला होता. आणि राहुलला सुद्धा तिला मदत केल्याबद्दल समाधान वाटत होतं.

क्रमश:
-विद्या भुतकर. 

No comments: