Wednesday, November 14, 2012

भाग दुसरा: नेहा

        गाडीवर बसून नेहा निघाली त्यादिवशी सकाळी तेव्हा एकदम हवेतच होती. डिग्री झाली, नोकरी मिळाली, पण ट्रेनिंगमधे असताना तिला चेन्नईला पोस्टिंग मिळत होते. तिला घराबाहेर राहण्याची इच्छा होती आधीपासून, पण चेन्नई? आणि मग आई-बाबा पण म्हणाले,' राहू दे नोकरी मग. इथेच बघू दुसरी'. शेवटी ट्रेनिंग सुपरवायझरला कसेतरी पटवून पुणे मिळालंच तिला. आज प्रोजेक्टचा पहिला दिवस. ताईला असं सकाळी आवरून जाताना पाहिलं की नेहमी वाटायचं नेहाला की मी कधी जाणार अशी आवरून नोकरीला? आज सकाळी जरा लवकर उठून, छान आवरून निघाली मग ती. मस्त हलका गुलाबी रंगाचा कुर्ता, पायाभर घोलणारी पतियाला सलवार आणि गळ्यात गणपतीचं लॉकेट. खांद्यावर लांब रंगीबेरंगी झोळी. केस, डोक्यावर एक क्लिप लावून खांद्यावर मोकळे सोडलेले. अर्थात गाडीवर हे सर्व सांभाळायची कसरत होतीच, पण ती आता रोजच करावी लागणार. सिक्युरिटीमधून सर्व चेक करून ती आत आली. 'वॉव काय कॅंपस आहे. आज ताईला सांगायला खूप काही आहे माझ्याकडे पण' असा विचार करत नेहा एका बिल्डिंगमध्ये शिरली.
           'मनोज शर्मा, अमुक अमुक प्रोजेक्टवर काम करतात ते.' तिने सांगितले. तिच्या पोस्टिंग नंतर कळले की पुण्यात तिच्या बाबांच्या ओळखीचे एक प्रोजेक्ट मेनेजर आहेत इथे, 'मनोज शर्मा' म्हणून. त्यांच्याशी एकदा भेट पण झाली तिची. तर तेच मनोज शर्मा खाली येऊन नेहाला घेऊन आताव्या मजल्यावर गेले. तिथल्या कॉन्फरन्स रुममध्ये ती एकटीच काय ते खुलून दिसतेय असं वाटलं तिला. तिचा हसतमुख चेहरा अजूनच खुलला जेव्हा तिला प्रोजेक्ट मध्ये डेव्हलपर म्हणून घेतलं गेलं. काय सही व्ह्यू होता तिच्या खिडकीतून. आठव्या मजल्यावर तेही. सहीच सर्व. आज आईने सांगूनही ती दाबा घेऊन आली नव्हती. 'शी, मी काही शाळेत आहे का डबा न्यायला? मस्त कंपनीच्या कॅंटीनमध्ये खाईन मी. ' नेहा आनंदाने म्हणाली.
           दुपारी सर्व सोपस्कार पार पडल्यावर तिने सर्वांसोबत जेवण केले. मस्त पनीर ची भाजी घेतली होती तिने. संध्याकाळी सही नाश्ता पण मिळतो म्हणे इथे. यायलाच पाहिजे चार वाजता खाली. राहुलने आणलेले फॉर्म भरून तिचे दिवसभराचे काम झालेले होते. टीम मधल्या एका सिनियर मुलीशी ओळख करून घेतली तिने. गेले तीन वर्षं ती टीममध्ये होती या. नेहाला सही वाटलं तिला भेटल्यावर एकदम ताईसारखीच. कोणीतरी बोलायला पण भेटलं ते बरं, त्यांचे अनुभव आपल्या कामी येतील. संध्याकाळपर्यंत बाकी विशेष असं काही झालं नाही. त्या सिनियर सोबत नाश्ता तेव्हढा करून झाला. कंपनीतच महिला गृहउद्योगच्या बायका निवडलेल्या भाज्या घेऊन यायच्या. आईसाठी इथून भाज्या न्यायचं नेहाने नक्की केलं होतं.
           गाडीवरून परत जाताना तिला कधी एकदा घरी पोहोचते असं झालं होतं. तसा उशीर झाला पोहचायला पण घरी जाऊन प्रत्येक गोष्टं आईला आणि ताईला सांगताना जेवण कसं झालं नेहाला कळलच नाही. रात्री झोपेतही तिला ऑफिसची इमारत दिसत होती.

क्रमश:
-विद्या.

No comments: