Thursday, March 31, 2016

तुरुंग

          आपण नेहमी म्हणतो की एखाद्या गुन्ह्याला तुरुंगात इतके वर्षं शिक्षा किंवा कधीतरी अगदी फाशीही. पण अशी शिक्षा देणं म्हणजे काय याचा कधी विचार केलाय? समाजात आपण कसं वागायचं याचे कुणीतरी ठरवलेले नियम, अगदी बारीक सारीक. त्या प्रत्येक वागण्याला एक व्याख्याही दिलेली आणि पिनल कोडचा नंबरही. आणि ते पाळले नाहीत किंवा न पळताना पकडले गेले, तर त्याच लोकांनी ठरवलेल्या ठिकाणी, तिसराच कुणीतरी ठरवणार, आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण कसा घालवायचा ते.
           आता बाहेर राहूनही वेगळे  काय करत आहे मग?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

ठेचा

          मागच्या आठवड्यात ठेचा केला. आता कुणाला वाटेल त्यात विशेष काय? खरंतर हा असा पदार्थ आहे की त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू घरात नेहमीच असतात पण कधी तो करायचं लक्षात येत नाही. आमच्या घरी ठेचा असं म्हणतच नाहीत, 'खरडा' म्हणतात याला. शिळी भाकरी आणि ठेचा खाण्याची मजा औरच. असे काही पदार्थ केले ना म्हणजे ठेचा, कोथिंबीर वडी, चकुल्या, भरलं वांगं, पुरणपोळी, इ. की मला मराठी असल्याचा फार अभिमान वाटतो. म्हणजे अगदी शिवजयंतीला काही लोकांना वाटतो न तसाच. इथे मी काही ठेच्याची हिस्टरी वगैरे देणार नाहीये, कारण मला माहीतही नाहीये. पण गेल्या वर्षभरात इकडे आल्यापासून एकदाही केला नव्हता. परवा ताज्या मिरच्या घेतल्यावर मात्र मोह आवरला नाही. करताना चार स्टेप मध्ये त्याची रेसिपीही फोटो मध्ये काढून घेतली. 
               इथे रेसिपी शेअर करायचे म्हणून पोस्ट सुरु तर केली पण लक्षात आले की मला त्याचा जो लिहिण्याचा ठराविक साचा असतो ना, तो नीटसा लिहिता येणार नाही. आता कृती लिहायची जाऊ दे, अगदी प्रमाणही ठराविकच असंही काही सांगता येणार नाही. आणि हे आजच नाही नेहमीचं आहे. कितीतरी वेळा एखादी रेसिपी नक्की आहे तशीच फॉलो करायची असं ठरवते पण एक कप पीठ, अर्धा कप पाणी असं मोजून माप घ्यायचं माझ्याकडून होत नाही. मग नेहमीच घोळ होतात. अगदी मध्ये मी पाव भाजी चे पाव बनवायची रेसिपी बघितली कमीत कमी ५-६ वेळा चुकले, पाव टाकूनही द्यावे लागले. शेवटी स्वत:ला ताकीद दिली की त्यांनी जसं लिहिलंय तसंच सर्व करायचं.  मग काय, झाले मस्त पाव. तेव्हापासून ठरवलं पाव करताना माप घेऊनच करायचे.
            पण मुळात मला वाटतं लहानपणापासूनच आई म्हणायची अंदाजे पाणी घेतले,  अंदाजे मीठ घातले, इ. त्यामुळे एखाद्या पदार्थासाठी माप घ्यायची सवयच लागली नाही. अर्थात ते कारण सोडलं तर एखाद्याच्या स्वभावाचा पण त्यात हिस्सा असतो असं मला वाटतं. काही लोक असतातच मुळात अगदी व्यवस्थित, नीटनेटके की ज्यांना प्रत्यके गोष्ट नियमानुसार करायची सवय असते. शिवाय बनवताना किती लोकांसाठी बनवायचे तेव्हढेच मोजून घ्यायचे हेही ठरलेले. आणि सर्व साहित्य हाताशी असल्याशिवाय ते पदार्थ बनवायला घेतही नाहीत. तर काही आयांसारखे अनुभवी.  आणि काही माझ्यासारखे अतिआत्मविश्वास असलेले, ज्यांना किती लोकांसाठी किती सामान घेतले पाहिजे याचा विचार मनात येतच नाही. एखादे साहित्य नसेल तर एकदम शेवटी लक्षात येते आणि मग त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरेच काहीतरी घालतात.
            मला खरंतर वेगवेगळे पदार्थ करून बघायला आवडतं. मनासारखे काहीतरी बनवले आणि उत्साहाने सर्वांनी खाल्ले की मोठ्ठं समाधान मिळतं. प्रयत्न सार्थकी लागले असं वाटतं. पण माझा हा स्वभाव मध्ये आडवा येतो. जर मी मन लावून सर्व रेसिपी आहे तशीच बनवून घेतली तर माझे जेवण अजून सुधारेल. (इथेही माझा ओवर कॉनफ़िडन्स आड येतोच.). असो. ठेच्याची जमेल तशी रेसिपी देत आहे. माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी, जे अंदाजे मिरच्या, कोथिंबीर, मीठ सर्व घालून चांगला ठेचा बनवतील असा विश्वास आहे. :)
           तेलात, जिरे हिंग आणि लसूण छान खरपूस भाजून घेतला. त्यात देठ काढलेल्या, धुवून पुसून घेतलेल्या मिरच्या टाकल्या आणि त्यातले पाणी सुकेपर्यंत भाजून घेतल्या. मध्ये मध्ये झाकण ठेवून बाजूलाही उभी राहिले, डोळ्यांना मिरचीपासून वाचवण्यासाठी. मिरच्या भाजल्यावर त्यात खूप सारी कोथिंबीर घातली. तीही धुवून आणि पुसून घेतली होती, पाणी उडू नये म्हणून. त्यात पुढे भाजलेले मुठभर दाणे टाकले. मीठ आणि एका लिंबाचा रस. हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. झाला ठेचा तयार. दुसऱ्या दिवशी दही भातात ठेचा घालून डब्यात घेऊन गेले. काय भारी लागत होता. :)



विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, March 30, 2016

हरवलेली मी !

         रोज सकाळी मुलांना घाईने उठवते. कधी ऎकतात,  कधी चिडचिड,  रडारड.  सूचनांचा भडीमार  सुरु होतो. ब्रश कर, कपडे घाल,  दुध पी, शूज घाल, ज्याकेट घाल, डबा घेतला का,  बाहेर पड, चढ पटकन, उतर, आवर, बाय बाय.
         घरी आल्यावरही, टीव्ही बंद कर, अभ्यास कर, जेवण नीट कर, पसारा आवर. बाहेर खेळायला गेल्यावर, हे करू नको, इथे जाऊ नको, थंडी आहे, पाऊस आहे, ऊन आहे. हॉटेल मध्ये जेवायला नको, घरी चल, झोपेची वेळ झाली, किती त्या सुचना.
          विचार करतेय, त्यानाही कधी कळेल का? आपली आईही, हसणारी, फिरायला, बाहेर खायला, नियम तोडायला, अभ्यास बुडवायला, उशिरा पोचायला, झोपायला, टीव्ही बघायला आणि सर्व काही करायला  आवडणारी व्यक्ती होती?

-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, March 25, 2016

भांडण

             ती उठली कधीतरी सकाळी. तो शेजारी नव्हता त्यामुळे किती वाजलेत बघण्याचं काही विशेष कारण नव्हतं. तरीही तिने पाहिलं शेजारच्या फोनमध्ये आणि परत पडून राहिली तशीच, लोळत. हे काही आज पहिल्यांदा नव्हतं. त्यांचं भांडण झालं की मग तिच्या सोबतीला यायचा, 'तो', तो म्हणजे आळस हो ! काल रात्री घातलेले वाद आठवायलाही नकोत, इतकी आळशी व्हायची ती. तशीच झाली आजही. अर्धा तास झाला, या कुशीवरून, त्या कुशीवरून, तोंड उशीत खुपसून, फोनमध्ये जरा मेसेज वगैरे पाहून झाले, सर्व करून झालं. शेवटी उठली, डोळ्यांनी धुसर दिसेल इतकेच उघडत बाथरूम मध्ये गेली. तॉईलेट वर बसून राहिली सुन्न. यंत्रवत हात फ्लशकडे गेला. उठून ब्रश केला, यंत्रवतच. बरंच काम केलं त्यामानाने. 
             काहीतरी केलं पाहिजे, असा विचार करून किचनमध्ये आली. भांडी सिंकमध्ये तशीच पडलेली. कालचा भातही न झाकलेला तसाच. 'शेजारची ताटली झाकायला हवी', तिने विचार केला. त्याने तिचा चहा करून ठेवला होता. साय आलेला तो चहा भांड्यात तसाच गरम केला, गाळून घेतला, आधी वापरलेल्या गाळण्यानेच. कप हातात घेऊन बाहेर हॉलमध्ये आली. पडद्याना ढकलून आत येणारा उजेड तेव्हढाच काय तो तिथे होता. बाहेर पाऊस आहे की ऊन हेही बघायची इच्छा नव्हती. सोफ्यावर बसून राहिली, शून्यात बघत.  चहा संपला. कप शेजारच्या टेबलावर ठेवला. काल खाल्लेली प्लेट तिथेच होती, तिला ढकलून जमेल तितका आत सरकवला. 
         हॉलमध्ये पडलेल्या पसाऱ्यावर फिरता फिरता तिची नजर आपल्याच पायाकडे गेली. 'नखं वाढलीत' तिने विचार केला. 'ऑफिसला जाताना त्या एका शूज मध्ये अंगठा दुखतो तेंव्हाच लक्षात येतं, पायाची नखं कापली पाहिजेत. आता कापावी का?'.  त्यात तिला पळताना ठेच लागून काळं-निळ झालेलं नख दिसलं. पळायला जावं का? किती पोट वाढलय, आज काल डाएट कडे अजिबात लक्ष देत नाही. तिने बसल्यामुळे सुटलेल्या पोटाच्या टायरकडे पाहीलं. मग बसल्या बसल्या सोफ्यावर आडवी झाली आणि पाय पोटात घेऊन तशीच पडून राहिली. किती वेळ लोटला माहीत नाही. मधेच फोन थरथरला. टेबलावरून उचलून आलेला मेसेज पाहिला. पाचेक मिनिट पहात राहिली काहीतरी विचार करत. 
            एकदम अंगात आल्यासारखे उठली, खिडक्यांवरून पडदे बाजूला सारले. ऊन झरर्कन आत आलं. भरभर हॉलमधले सामान आवरलं. खरकटे कप, प्लेट आत नेली आणि सर्व कट्टा चकाचक होईपर्यंत थांबली नाही. घरातली प्रत्येक खोली तिच्यासोबत रूप पालटत होती. गाणी लावण्यासाठी तिने फोन उत्साहाने हातात घेतला. मघाचा तो त्याचा मेसेज वर तसाच दिसत होता, "Sorry". तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू पसरलं. भांडण मिटलं होतं. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, March 24, 2016

घर !!

तू 'पाहुण्या'सारखी आलीस 
तसं घर साफ झालं बघ.
नाहीतर,
इतके दिवस उगाच,
धूळ खात पडलं होतं,
मालकीण येण्याची वाट बघत.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/ 


चिरतरुण

            वाटलं नव्हतं रे तरुण राहणं इतकं अवघड असेल. म्हणजे बघ ना, रोज सकाळी उठून तितक्याच उत्साहाने तुला भेटायचं यात काही कष्ट असतात का? मी तुला विचारलं पण होतं, "अजून १५-२० वर्षांनी कसे असू रे आपण?" तर तू म्हणालास, "तेव्हाचं कुणी पाहिलंय?". मला राग आला होता. हो ना, एकतर तुझं माझ्यावर प्रेम राहणार याची तुला खात्री नव्हती किंवा माझ्या प्रेमावर तुझा विश्वास नव्हता.  
            तुझ्यासाठी छान आवरून तुला भेटणं यात काय अवघड होतं सांग बरं? बिनधास्त गाडीवरून फिरायचं, अख्खा दिवस-दिवस तुझ्या विचारात घालवायचा किंवा अख्खा पगार तुला वाढदिवसाला भेट घेण्यासाठी उडवायचा, यात न जमण्यासारखं काय असणार? तुझ्यासाठी एखादी प्रेमात चिंब कविता लिहायची किंवा एकच सिनेमा २-३ पाहायचा फक्त त्या एका गाण्यासाठी, यात सुख नाही तर अजून कशात? तुझ्यासोबत पावसात भिजायचं, टपरीवर स्वीट कॉर्न खायचं आणि तुझ्याकडे बघत बसायचं, किती छान? 
         अशा अनेक गोष्टी फक्त आपल्या दोघांसाठी. त्या विश्वात बाकी कुणीच नाही मग. अगदी,'करावं लागतं' म्हणत कराव्या लागणाऱ्या कुठल्याही गोष्टींना त्या विश्वात वाव नाही. तुझ्याइतकं, बाकी जीव ओवाळून प्रेम करण्यासाठी, दुसरं कुणीही नाही. किती अवघड असणार हे सर्व? आणि हे सर्व नाही, तर तारुण्य ते कशात? बेभान, जगाची पर्वा न करता जगायचं नाही तर मग आयुष्य ते काय? 
          असा सगळा विचार करतच बसले होते बघ, तेव्हढ्यात धाकटा पायाशी येऊन बोलला,"आई भूक लागली आहे." मग काय, सगळे विचार सोडून कामाला लागले ना. अरे हो, बाय द वे,  Happy Anniversary !!

 विद्या भुतकर.

Wednesday, March 23, 2016

प्रेम म्हणालं पावसाला


प्रेम म्हणालं पावसाला,
गम्मत आहे, नाही ?
तुझा माझा तसा,
संबंध आहे का काही?


तू गरज, मी श्वास
तू दृश्य, मी भास
मी अचल तर तू प्रवाही
सांग बरं, साम्य आहे का काही?

प्रेमात पडल्यावर
तुझ्यात भिजल्यावर,
तुझ्या माझ्यावर,
लोकांनी, लिहिल्या कविता तरीही.

कधी असतोस मनात,
कधी असतोस डोळ्यांत,
कधी दाटून येतोस
तिची आठवण काढण्यात.

पाऊस म्हणाला, काय करणार?
आहेच मी पाण्यासारखा,
ज्या रंगात टाकशील
त्यात मिसळून जाणारा .

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Tuesday, March 22, 2016

रंग खेळू कागदावर नाही अंगावर !!

सण म्हणजे तरी काय? सण म्हणजे तरी काय हो? हौस पुरवायचे दिवस , मुलांचे आणि आपलेही. हौस तरी कशाची? गाण्याची , नाचण्याची , खाण्याची, आपली कला लोकांसमोर  करण्याची आणि हे सर्व करताना हसत खेळत आनंदाचे चार क्षण गोळा करण्याची. गेल्या काही वर्षांपासून शहरांमधून 'सोसायटी संस्कृती' तयार होत आहे. प्रत्यके सोसायटीच्या स्वत:च्या कल्पना, त्यांना साथ देणारे लोक आणि विविध कार्यक्रम पार पाडण्याची हौस यातून अनेक चांगल्या गोष्टी होत आहेत. सण-समारंभ पार पाडण्याचा उत्साह तर प्रचंड. आमची सोसायटीही अशीच अत्यंत हौशी आहेच पण त्यासोबत सामाजिक जाणीवही वेगवेगळ्या प्रसंगातून, कार्यक्रमातून सर्वांनी दाखवलेली आहे. अनेक  प्रकारचे उपक्रम जेंव्हा समोर येतात तेव्हा आपण या सोसायटीचा एक हिस्सा आहे याचा अभिमान वाटतो. :)

यावर्षीच्या दुष्काळामुळे सोशल मिडीयावर अनेक लोक पाण्याशिवाय होळी कशी साजरी करावी याबद्दल मेसेज फोरवर्ड करताना दिसतात. पण तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करावे हे सर्वांच्या लक्षात येतेच असे नाही. अगदी सुक्या रंगानी होळी खेळले तरी, आंघोळीसाठी, सार्वजनिक जागा स्वच्छ करण्यासाठी पाणी लागेलच ना? तर काल आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर हा मेसेज आला सर्वांना. तो मुद्दाम इथे देत आहे कारण मला वाटतं हे वाचून एका व्यक्तीने किंवा सोसायटी मधल्या काही लोकांनी जरी हे अमलात आणले तर एक सण चांगल्या प्रकारे साजरा झाला असे म्हणता येईल. तुमच्या सोसायटी मधेही असाच एखादा उपक्रम नक्की आयोजित करा.

उपक्रम

।।प्रत्येक सण आनंदच घेउन येत असतो घरी।।
होलिकादहनामधे सर्व वाईट गोष्टी व दुष्ट विचार नष्ट करुन होळीची पुजा होते आणि त्यानंतर धुलीवंदन आणी रंगपंचमी (आजकाल दोन्हीचा अर्थ एकच) ची तर मजा काही औरच. आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करुन देणारा सण. पण ह्या वर्षी दुष्काळाच्या झळा सर्वांपर्यंत पोचल्या आहेत. पाण्याचा उपव्यय टाळणे हे सुजाण नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे आपल्या सोसायटीतील बच्चे मंडळी सुद्धा पाण्याचे महत्व जाणून ह्यावर्षी रंग न खेळण्याचे ठरवताना दिसत आहेत.
पण सर्व सणांचे एक वेगळे महत्व असते आणि ते जपण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. या उद्देशातून ह्यावर्षी आपण अंगावर रंग न उडवीत जर ते कागदावर उतरविले तर ?? काय मज्जा येईल ना आणि ते सुद्धा जर मुला-मुलीं बरोबर मोठी मंडळी पण सामील झाली तर…धमाल मजा येईल. मग आपण या वर्षी २४-मार्चला सकाळी ८ ते १० या वेळेत आपल्या लॉन वर हिरवळीत सर्वजण कागदावर रंगाच्या छटा उमटवू. तर मग लागा तयारीला आणखी एका मजेदार उपक्रमाकरिता. सोबत येताना रंगाचा बॉक्स घेवून या, कागद आम्ही देवू.
कार्यक्रमाचे यश घरातील सर्वांच्या सहभागावर अवलंबून आहे. म्हणून सर्वजण नक्की या.

दि. २४-मार्च-२०१६
स्थळ : राहुल पार्क सी विंग लॉन, वारजे, पुणे.
वेळ : सकाळी ८ ते १०
उपक्रम : "रंग खेळू कागदावर नाही अंगावर"
सहभाग : लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

शाळेला निघाली

खूप वर्षांची इच्छा आहे , एखादं बडबडगीत लिहावं, अगदी सान्वी झाली तेव्हापासून. पण ते जितकं वाटतं तितकं सोप्पं नव्हतं माझ्यासाठी. आज पहिला प्रयत्न.

पाखरांची किलबिल,
पापण्यांची किलकिल,
डोळ्यावरची झोप
भुर्रर्र उडाली.

सकाळची गडबड,
डब्यांची खडखड,
सोमवार सकाळ
सुरु झाली.

आईची धुसपूस,
बाबांची खुसपूस,
तयारी माझी
काहीच नाही.

पाठीवर दप्तर,
दप्तरात बस्कर,
ड्रेसला इस्त्री
मुळीच नाही.

हातात दूध,
पायात बूट,
करतात सगळे
तैनात माझी.

तयारी झाली,
गोड हसली
छकुली आमची
शाळेला निघाली.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, March 16, 2016

सिक्युरिटी ब्लॅन्केट

लेक वर्षाचा असताना 
कधीतरी लक्षात आलं, 
त्याला ठराविक ब्लॅन्केट दिलं 
की शांत राहतो. 
मग काय? मज्जाच …!
रडायला लागला, दिलं ब्लॅन्केट
झोप आली, दिलं ब्लॅन्केट
नवीन शाळेत गेला, दिलं ब्लॅन्केट
नवीन घरात गेला, दिलं ब्लॅन्केट. 
चार वर्षं झाली असंच चालू आहे. 
विचार करतेय, किती दिवस ते त्याला पुरणार. 
आणि हो, 
माझ्यासाठी असं…. सिक्युरिटी ब्लॅन्केट कुठे शोधणार?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, March 13, 2016

मेहेंदी

          मला मेहेंदी आवडते. अर्थात सध्या केसांना प्रत्येकवेळी लावताना, 'आपण ही वय न दाखवण्याची लढाई किती दिवस लढणार आहे' हा विचार मनात येतोच. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. मेहेंदी हातावर लावली की फार भारी वाटतं. अगदी कितीही सावळा हात असो किंवा छोटा. डिझाईन आली की आपोआप सुंदर दिसायला लागतो. अनेक वेळा लोक मेहेंदीचे डिझाईन टाकतात, मला फार इच्छा होते तसे काढायची. पण जमत नाही. बऱ्याच न जमणाऱ्या तरीही यावी अशी इच्छा असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी ती एक. मेहेंदी धुवून झाल्यावर दिवसभर मी हाताचा वास घेत बसते, तरीही मनाचं समाधान होत नाही. असो.
          मेहेंदी कधी नीट निरखून पाहिलीय का? काय दिसतं त्यात. ठराविक पॅटर्न परत परत काढला गेलेला असतो. प्रत्येक सुंदर मेहेंदी मध्ये एक पाच सात प्रकारचे वळणदार डिझाईन पुन्हा पुन्हा काढलेले असते.  तरीही पूर्ण झालेली डिझाईन किती सुंदर वाटते.  तशाच त्यात काही वेगळे जाड रेषांनी काढलेले एखादे फुल असते तर कधी कुणाचे नाव कोरलेले. जवळून पाहिले तर त्यात कधी एखादी चूक दिसतेही पण एकूण परिणाम जो असतो तो खासच.
          तसंच काहीसं आपल्या रोजच्या आयुष्यात चाललेलं असतं, नाही का ? विचार करा, कुठलीही छान आठवण कशामुळे तयार होते? शिकागोमध्ये असताना एका मैत्रिणीला रोज सकाळी न चुकता फोन करायचे. तेव्हा काही विशेष वाटायचं नाही पण आज त्याची एक छान आठवण झाली आहे.  परवा स्वनिक म्हणाला तू आम्हाला पुण्यात पनीरची भाजी बनवताना कसे वेगळे पनीर भाजून द्यायची, तसे देशील का? आता तेव्हा तो मोजून तीन-साडेतीन वर्षाचा होता तरीही त्याच्या आठवणीत ती गोष्टं राहिली. कशामुळे तर पॅटर्न. आमच्या घरी दर शनिवारी आई चकोल्या (वरणफळ किंवा चकुल्या) बनवते. गेले ३० वर्षं तरी झाली असतील. आजही मला चकुल्या केल्या की शनिवार असल्यासारखं वाटतं. कशामुळे तर पॅटर्न.
          एखादं शहर किंवा घर आवडणं म्हणजेही केवळ पॅटर्न. रोज सकाळी स्वयंपाकघरात मस्त ऊन येते. उन्हाने असं घर भरलं की सकाळ अजूनच उत्साही वाटू लागते. त्यात नियमितपणे कानावर पडणारा पक्षांचा आवाज किंवा रेडिओचा. दिवाळीला किंवा पाडव्याला सजवलं, सणावाराला मुलंबाळं, पाहुणे आले की ते घर अजून प्रिय वाटू लागतं. कशामुळे तर पॅटर्न. जसं चांगल्या आठवणी बनतात तसंच वाईटही. आजही मुंबईच्या घामजलेल्या ट्रेन ची आठवण झाली की नको वाटते. तो दुपारी ३ ते ११ चा ऑफिसला जाण्याचा काळ किंवा कॉलेजच्या मेस मध्ये मिळणारी कोबीची भाजी किंवा उसळ आजही आठवली की खायची इच्छा होत नाही. कधी बर्फ पाहून टोरांटो मधले तळघरातले थंडीचे दिवस आठवतात. तर एकूण काय चांगल्या किंवा वाईट आठवणी बनतात त्या केवळ आपल्याच एखाद्या पॅटर्नमुळे. 
          सध्या इथे थंडीमुळे बाहेर जास्त पडता येत नाही त्यामुळे शुक्रवारी घरी आले की मुलांना एखादा मुव्ही लावून देतो आणि अगदी मस्त लाईट बंद करून, पॉपकॉर्न हातात घेऊन मुव्हीचा आनंद घेतात. गेले दोन महिने असे दर शुक्रवारी केल्यामुळे आता पॅटर्न झाला आहे, दर शुक्रवार 'मुव्ही डे' बनला आहे. मुलांना एकदम उत्साह येतो शुक्रवार म्हणलं की. नवीन घरात येऊन दोन ३ महिने झालेत. विचार करतेय, इथल्याही अशा अनेक गोष्टीतून घडणारं आयुष्य मेहेंदीच्या डिझाईन सारखे एकत्र पाहिले की सुंदरच दिसेल का? 

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, March 10, 2016

त्या मित्रांसाठी

         आज विचार करत होते, आपल्याकडे ही सगळी मुलं अशी का वागतात? गेल्या दोन वर्षात मी पुण्यात असताना अनेक वेळा टपरीवर चहा घेतला टीममधल्या अनेक लोकांसोबत.पण एकदाही प्रत्यक्षात टपरीवर जाउन '४ चहा' असे सांगायची वेळ आली नाही. प्रत्येकवेळी एखादा मुलगा जाउन ऑर्डर देई आणि चहा घेऊन येई. बरं ही काही पहिली वेळ नव्हती हे बघायची माझी. आज पर्यंत डोसा, पोहे, चहा, वडापाव कुठलीही टपरी असो, कॉलेजपासून नोकरीपर्यंत एकदाही मला जाऊन 'चार चहा' म्हणायची वेळ आली नाहीये. कुणी सर्व मुलांना कुठले तरी नियमांचे पुस्तक देते का की ज्यात असा नियम लिहिलेला आहे की तो अलिखित नियम आहे? असो पण आजची पोस्ट त्या टपरीबद्दल नाही. ती आहे आजपर्यंत भेटलेल्या सर्व मित्रांसाठी आहे. 
           तर आता स्वत;ला मुलांपेक्षा अजिबात कमी न समजणाऱ्या आणि मिळेल तिथे वाद घालणाऱ्या मला किंवा माझ्यासारख्या अनेक मुलींना टपरीवर ऑर्डर द्यायला जाणाऱ्या मित्रावर कधीच आक्षेप नसतो. कारण मला वाटतं त्यात एक प्रकारचा आदर दाखवतात हे आपले मित्र. आता टपरीवर चहा घेण्यात किंवा खाण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही. आणि स्वत: घेऊन येण्यातही. पण हे मित्र जी तत्परता दाखवतात स्वत: पुढे जाण्याची, ती भारी आवडते मला. अर्थात हे फक्त उदाहरण झाले. तिथेच टपरीवर कुणी सिगारेट ओढणारा असेल तर तिथून आपल्याला दूर घेऊन जाणारे किंवा त्या माणसाला दूर जा म्हणणारेही पहिले आहेत. असे अनेक किस्से. 
          आजची पोस्ट त्या मित्रासाठी जो रात्री चालत परत जायला लागले तरी होस्टेलपर्यंत चालत येतो. कधी बाईकवरून आपल्या गाडीच्या शेजारून चालतो घरी जाईपर्यंत. कधी घरी पोचले की नाही हे आठवणीने फोन करून विचारतो. बस मध्ये, ऑटोमध्ये चढताना आपल्याला पुढे चढायला लावून आत गेल्यावर एकच सीट असेल तर बसायला जागा देतो आणि स्वत: उभा राहतो. कधी गर्दी असेल तर आपल्या आजूबाजूने स्वत:च्या हाताचा किंवा खांद्याचा आडोसा देतो, बाकी लोकांचे धक्के लागू नये म्हणून. त्या मित्रासाठी, जो माझे सर्व सामान बघून 'ही एकटी बसने कशी जाईल' म्हणून मिल्वोकी ते शिकागो गाडीने आला फक्त सोडण्यासाठी. त्या मित्रासाठी, जो टोरांटोच्या बर्फात मला घरापर्यंत पोचवून मग बसने जायचा. अशा मित्रासोबत असताना अजिबात असुरक्षित वाटत नाही.
          त्या मित्रासाठी जो कितीही कठोर वाटला तरी एखाद्या मुलगी आवडते म्हणून लाजत सांगेल. आणि ती मुलगी जवळची झाल्यावरही मैत्री मात्र विसरत नाही. एखादा जो आपल्याला नोकरी लागली नाही अजून म्हणून न रडता तिला मदतीला बसेल. त्या मित्रांसाठी ज्यांनी मुलगी म्हणून मदत केली तरी आदरही केला आणि सोबतही. त्या मित्रांसाठी जे आपली मैत्रीण चुकतेय माहित असूनही केवळ तिच्यासाठी, तिला सपोर्ट देतात. किंवा असेही जे पटत नाही म्हणून आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून असहमत दाखवतात पण तिला एकटीला सोडून देत नाहीत. त्या मित्रासाठी, जे प्रेम असले तरी मैत्रीला महत्व देतात आणि तिला त्याचा मागमूसही लागू देत नाहीत. किंवा तिच्यासाठी जो लग्नात आला तरी नंतर तिच्या सासरचे काय म्हणतील हा विचार करून, इच्छा असली तरी फोन करायचं टाळतात. खडसावून विचारले तर, मीच कामात होतो म्हणून उडवून लावतात. त्या मित्रासाठी जे बायकोला पटत नाही तरी मैत्रिणीला मदत नक्की करतात. 
             कधीकधी वाटतं की मित्र म्हणून जी काही व्यक्ती असते तिची जागा दुसरे कुणीही घेऊ शकत नाही. कितीही भाऊ, बहिण, नवरा आणि बाकी मैत्रिणी असल्या तरी मित्र खास असतातच. जे मदत नाही करता आली तरी सोबत राहतात. अनेकदा असे ज्यांनी आयुष्यात अनेक वाईट परिस्थितीत पूर्णपणे साथ दिलेली असते आणि कधी फोन केला तर आजही मदत करतील अशी खात्री असते. आणि सर्वात शेवटी अशा मित्रासाठी, जो आता नवरा असला तरी आधी जवळचा मित्र होता आणि राहीलही आयुष्यभरासाठी. तर आजची ही पोस्ट फक्त त्या सर्व मित्रांसाठी. Thank you for "Being There".

विद्या भुतकर.

Wednesday, March 09, 2016

मैत्र

          मला वाटतं पूर्वी मी फार पटकन मैत्री करायचे. निदान पुढे त्याचा त्रास होईल किंवा नाही असा तरी विचार करायचे नाही. शाळेतल्या आणि कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी कसे झाले आठवत नाही. इतके वर्षं झाले तरी सुटले कसे नाहीत हे ही कळत नाही. अधे मध्ये काही जोडले गेलेही तरी आता तसं पटकन जमत नाही. कुणाशी नवीन मैत्री करायची गरज वाटत नाही. जे आहे ते छान चालू आहे असे वाटते. इथे येउन एक वर्षं होत आलं तरी मला लोकांशी ओळख करून घ्यायची काही घाई नव्हती. त्यामुळे मीही खूप प्रयत्न केले नव्हते कुणाशी वेळ काढून बोलायचे.
        पण ती झाली ओळखीची, नेहमी हसतमुख आणि उत्साही. बायका म्हणले की गप्पा, गॉसिप, स्वत:च्या मुलांबद्दल चर्चा आणि नवरयाबद्दल तक्रारी या पलीकडे काय असणार? खरेतर तशीच सुरुवात झाली बोलायला.  मग एक दिवस कॉफीसाठी थांबले होते तेव्हा गप्पा मारल्या. म्हणले, 'अगं तुमची ती फिल्टर कॉफी खूप आवडते मला'. म्हणाली, 'घेऊन येईन'. एकदा तिला विचारले, 'मला ऑन द वे पिक करशील का?', तर आलीच आग्रहाने. जाताना मग बोलत होतो ऑफिसमध्ये साधे 'हाय' सुद्धा न करणाऱ्या लोकांबद्दल. म्हणाली,' नाही बोलत याचे वाईट वाटत नाही, पण त्यांनी तसे केलेलं आपण चालवून घेतोय, यात आपल्यातला एक चांगला हिस्सा हळूहळू नष्ट होतो असं वाटतं.' ती असं म्हणाली आणि वाटलं, 'अरे ही आपल्यासारखेच बोलते की.' मग काय गट्टी जमलीच. 
             पुढे मग पुस्तकांबद्दल गप्पा झाल्या कधीतरी. तिला आवडलेलं तर कुठलं मला आवडलेलं. आमच्या भाषा वेगळ्या त्यामुळे पुस्तकं वेगळीच असणार. इंग्रजीतूनच बोलणं व्हायचं. एका तमिळ पुस्तकाबद्दल बोलली. कसं चेन्नईला जाऊन आणलं याची गंमतही सागितली. ऐकून वाचावसं वाटलं. या सोमवारी घेऊन आली तेही. आणि रविवारी बनवलेले गुलाबजामही. सकाळी जागेवर पोचले तर गुलाबजामचा डब्बा आणि पुस्तक डेस्कवर होतं. खूप दिवसांनी भारी वाटलं कुणीतरी असं छान काहीतरी आपल्यासाठी केलं याचं.
               एकदा दुपारी जेवताना, मी तिला काही खास जेवण बनवले ते फोटो दाखवले.  म्हणाली अग मलाही आवडते असे जेवण बनवायला आणि फोटो काढायला. :) अजून एक दोन रेसिपीही शेअर केल्या जेवताना अगदी तोंडाला पाणी सुटेपर्यंत. घरी परत निघताना तिला सांगत होते, आजकाल एक गाणं सारखं ऐकतेय 'एअरलिफ़्ट' सिनेमामधलं. म्हणाली,'कुठलं गं?' ट्रेनमध्ये चढता चढता तिने विचारून ते शोधून घेतलं. म्हणाली वाटेत ऐकते. आज घरी गेल्यावर मेसेज आला होता,'थांक्यू फॉर द सॉंग डिअर'. गाणं ऐकताना माझा स्टोप चुकला असता ना? असा खोटा रागही. :) माझंही असंच होत कधीकधी म्हणून हसले.
विचार करतेय बहुदा अशीच छोट्या गोष्टीतून सुरुवात होत असेल चांगल्या मैत्रीची. हळूहळू आम्ही मैत्री स्वीकारत आहे असं वाटतंय. :)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Tuesday, March 08, 2016

सुंदर सकाळ

        रोज सकाळी सानूला सोडायला जाते तेव्हा शाळेजवळ एक पोलीस उभा असतो. त्याचं काम काय तर सकाळ- संध्याकाळी मुलांना सोडायला आणि घ्यायला येणाऱ्या गाड्यांना मार्गी लावणे. रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांना लोकांना नीट रस्ता क्रॉस करायला मदत करणे. तिथे पोचले की तो कधी कधी थांबायला लावतो लोकांना किंवा गोल फिरून यायला लावतो आधीची गर्दी कमी करायला. कधी कधी वैताग येतो गोल फिरून यायचा. मधेच एखादा मुलगा रस्ता क्रॉस करताना दिसला की सगळ्या गाड्या एकदम थांबवतो दोन्ही हात जमतील तितके बाहेर काढून. तो मुलगा पलीकडे पोचला की मग एकेका गाडीला जायला सांगतो. मी जशी त्याच्या शेजारी येते, गाडीतूनच मान हलवून थोडसं हसते, तोही मस्त हसतो. मागून मुलांनी हात हलवला की जोरात हात हलवतो. सानूला सोडून मी माझ्या ऑफिसच्या रस्त्याला लागते. 
       रोजचा हा छोटासा किस्सा पण तरीही  मनात राहतो. का? कारण म्हणजे सध्या इथे शुन्याहून कमी तापमान असते. कधी बर्फ तर कधी जोरात वारा तर कधी पाऊस पडत असतो. आम्हाला जिथे पाच मिनिटही बाहेर उभे राहता येणार नाही तिथे हा माणूस एका तासाहून जास्त वेळ काढतो. आणि कधीही हात हलवणाऱ्या मुलाला त्याने उत्तर दिले नाही असे होत नाही. त्याचा तो उत्साह अशा वातावरणात रोज टिकून राहतो हेही विशेषच. प्रत्येकालाच हे जमते असे नाही. नाही का? मला शिकले पाहिजे त्याच्याकडून. एक दिवस उतरून त्याला सांगायचे आहे, पण त्यासाठी त्याने मला उतरू दिले तर ना? 
:)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Monday, March 07, 2016

जोक कसा मारायचा?

जोक कसा मारायचा? घाबरू नका डिस्क्लेमर टाकत आहे. 
 डिस्क्लेमर: ही पोस्ट जोक कसे लिहावे, बनवावे किंवा सांगावे यावर नाहीये. तर ही पोस्ट 'हाऊ टू किल अ जोक?' यावर आहे. मराठीमध्ये शब्दश: भाषांतर केल्यामुळे असा घोळ होणे साहजिक आहे. मी अजिबातच 'जोकाळू' (हा ही नवऱ्याचा शब्द वापरत आहे) वृत्तीची नाहीये. उलट जरा 'खडूस' च म्हणाल तर खोटे नाही. माझे सर्व मित्र मैत्रिणी केवळ त्यांच्या चांगलेपणामुळे माझे मित्र आहेत, माझ्या नाही. माझे सर्व मित्र -मैत्रिणी माझी ही पोस्ट वाचून जोक सांगायचे किंवा पाठवायचे बंद करतील याची मला खात्री आहे. असो घडाभर तेल पाजळून झालेलं आहे तर मुद्द्याचं बोलते. 
जोक सांगणे ही एक कला आहे तसेच जोक "मारणे" ही सुद्धा असावी असं मला वाटतं. आता मी माझे खडूस वागण्याचे असे रहस्य सांगितले नसते पण माझ्याच मित्र-मैत्रीणीना का त्रास? बाकी लोकांना पण होऊ द्या की. म्हणून हा उपद्व्याप. 
१. आज काल व्हॉटस एप वर खूप जोक येत राहतात. त्यातले बरेचसे चांगले पण असतात. नवीन जोक आला की तो इतका फॉरवर्ड होत जातो की कमीत कमी चार पाच ग्रुपवर एकच जोक येतो. त्याच्यावर मग स्मितहास्य, तोंड उघडून हसू, डोळे बंद करून जोरजोरात हसणे तर डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसणे असे अनेक प्रकारचे स्माईली चे उत्तर येते. पण असा फॉरवर्ड केलेला जोक मारायचा असेल तर पाठवणाऱ्याला स्पष्ट सांगायचे, "अरे, किती जुना जोक पाठवतोस? जरा नवीन कायतर पाठव की." बिचारा. 
२. पी. जे. - हा प्रकार म्हणजे एखाद्याने कानात मारली तरी चालेल पण जोक नको असा वाटणारा पांचट किंवा फालतू जोक.
उदा: हनी सिंगच्या मोठ्या भावाला काय म्हणाल? 
.
ज्येष्ठमध. 
घ्या मारून  !! 
अशा जोकला योग्य उत्तर देणे म्हणजे स्वत:ला त्रास करून घेणे आहे. त्यामुळे अशा जोकला मारण्यासाठी फक्त एकाच उपाय, दुर्लक्ष करणे. कुणी पाठवला असेल तर त्याला 'जेवलास ना?' वगैरे संबंध नसलेले प्रश्न विचारावा. 
किंवा समोर असेल तर कुणीच काहीही बोलले नाहीये असे तोंड करून समोरचे काम करत राहावे. 
३. स्मार्ट जोक: आजकाल केवळ ठराविक ग्रुपच्या लोकांना कळतील असेच जोक पण येतात किंवा सांगतात. म्हणजे केवळ केमिकल इंजिनियर साठी किंवा 'जावा डेव्हलपर साठी' इत्यादी. असा जोक सांगितलाच कुणी तर गोंधळलेला चेहरा करावा. त्यामुळे समोरच्या जावा डेव्हलपरला पूर्ण जोक समजावून सांगायला लागला पाहिजे. त्याने समजावले तरी समजले नसतेच किंवा न समजल्याचा आव आणावा. बस म्हणायचं समजावत  ! जोक्स ऑन यू !! :) 
४. डिस्कशन जोक: असा जोक म्हणजे ज्यात कुणाची किंवा कुठल्या वस्तूची चेष्टा केली आहे आणि तोच मुद्दा घेऊन एकदम महत्वाचे  डिस्कशन सुरु करावे. 
उदा: कुणी सांगितले की माझे आय-फोनचे हेडफोन फारच भारी आहेत कारण ते दोन चार वेळा मी खिशात तसेच ठेवले गेले आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकलेत. हसायचे सोडून मग मी म्हणायचे, "अरे हो खरंच ते हेडफोन भारी आहेत. आणि बाकीचे कसे खराब आहेत". बाकी लोक पण मूळ मुद्दा विसरून डिस्कशन मध्ये भाग घेतील. :) यामध्ये तुम्हाला जोक कळलाच नाहीये असे वाटण्याची दाट शक्यता आहे, मग त्यात तीन नंबरचा मुद्दा परत कामात येतो. समजावायला सांगा. :) 
 ५. भांडण जोक : आज काल बायकांवर, नवरा-बायकोवर इ बरेच जोक येत असतात. मध्ये एकाने, 'अरेंज मेरेज' आणि 'लव मेरेज' केलेल्या बायकोची रोटी कशी असते याचे चित्र पाठवले होते. आता जोक म्हणून नुसते सोडून द्यायचे नाही. स्त्री हक्कावर भांडायचे.  केवळ चपाती बनवण्यासाठीच लग्न केले आहे का असे विचारायचे? असे अनेक प्रकारचे विषय मिळू शकतात भांडायला. जोक सांगणारा नक्की पळून जाईल. :) 

एव्हढेच लिहिल्यानंतर कळले आहे की माझे नाव सर्व मुद्दे खोडून काढण्यासाठी माझ्याशीही कुणीतरी भांडायला येतील. मी जोक वरून भांडू शकते तर अशा पोस्टवरून का भांडणार नाहीत? हसवण्यासारखे चांगले काम नाही. कुणाला हसवले तर वाईट काय आहे त्यात इ. 
त्यामुळे अजून एक डिस्क्लेमर टाकून इथेच थांबते. :)
अजून एक डिस्क्लेमर: वरील पोस्ट केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे. कुणाचे मनोरंजन हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण त्यात कुणाचे मन दुखावण्याचा हेतू नाही. (मित्रांना त्रास देण्याचा असू शकतो. ) 
त्यामुळे कृपया चू.भू.द्या. घ्या. 
पोष्ट टाकल्यावर लक्षात आले की आज महिला दिन आहे. यासारखा चांगला मुहूर्त मिळणार नाही हे प्रयोग करून बघायला. ;) आज महिला दिन तर 'बेंदूर' हा पुरुषदिन असा जोक नक्की येईल, तयार राहा. :)
 
विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, March 01, 2016

माझी पर्स

       आज ऑफिसला पोचले आणि लिफ्टजवळ सिक्युरिटीला आय-कार्ड दाखवायचे होते. पर्स उघडली तर वरच सापडले कार्ड पण, पर्सच्या आत वर एक छोटासा कप्पा असतो आज काल तिथे. एका मिनिटांत कार्ड दाखवून आत जाण्याची पहिलीच वेळ असेल.  नाहीतर बऱ्याच वेळा आख्खी पर्स पालथी घातली आणि सगळ्या जगाला आपल्या पर्समध्ये काय सामान आहे हे कळले तरी आय-डी सापडत नाही. त्यामुळे जरा आनंद झाला. माझ्या शेजारीच अजून एक बाई होतीच पर्स, Bagpack धुंडाळत. काही वेळा असंही झालंय की तो आय-डी ला लावलेला मोठा दोर असतो ना, त्यात सर्व वस्तू अडकल्या आहेत आणि त्या बाहेर येउन पडल्यात पण जिथे कार्ड अडकवले असते तिथे मात्र काही नाहीये. असो.
          मी कॉलेजमध्ये असताना एक सिनियर होती. तिच्याकडे मी एकदा एक डेनिम चे वालेट पाहिले. जीन्सच्या मागच्या खिशात तिने ते स्टाईल मध्ये ठेवलं. मग काय आपण पण लगेच कॉपी केलं ना भौ. :) तर कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासून हातातल्या त्या पर्सला कलटी दिली आणि फक्त डेनिम वोलेट मागच्या खिशात. नोकरी मिळाल्यावर तसं काही करता येणार नव्हतं त्यामुळे छोटीशी पर्स बाळगायला सुरुवात केली. पण तिचंही ओझं व्हायचं. आता ट्रेकसाठी पावसाळ्यात भटकताना ती पर्स कुठे ठेवणार बरं? पण नाईलाज होता. थोडंफार सामान तर लागायचंच, गाडीची, रूमची किल्ली, एक छोटी डायरी असायची तेव्हा नंबर लिहून ठेवायची, एक पेन आणि पैसे. साधारण हा असा साचा बरेच दिवस राहिला पर्सचा. पण ही पोरं झाली आणि सगळं बदललं.
           सुरुवातीला मी माझं मी-पण टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. एक वेगळी डायपर ब्याग केली होती सर्व सामान ठेवायला. पण मग नंतर बाळाला, पर्स आणि ती वेगळी ब्याग म्हणजे नको नको झालं. त्यामुळे लकवरच एक मोठ्ठी पिशवीच घेतली, अर्थात तोवर पर्ससाठी खूप पैसे भरायचं नाटक पण सुरु झालं होतं. त्यामुळे खूप पैसे घालून  भारीतली मोठ्ठी पिशवी घेतली. त्यात मग पेन सापडला नसता पण एक डायपर नक्की मिळाला असता. पुढे स्वनिक मोठा होईपर्यन्त हे असंच चालू राहिलं. त्यात खायची एखादी तरी गोष्ट, पोरांचे सॉक्स, एखादा रुमाल तर कधी टिशू पेपर सर्व काही कोंबल जाऊ लागलं. प्रवासात कधी तापाची गोळी तर कधी चोखायची ठेवली जाऊ लागली. आणि हळूहळू पर्स म्हणजे सर्व वस्तू ठेवायचं पण कधीही न मिळण्याचं ठिकाण झालं.
           गेल्या थोड्या दिवसांपासून जरा मार्गाला लावायचा प्रयत्न चालू आहे. कचरा बाहेर काढून, नियमितपणे सर्व लावून ठेवायला लागते. पण अजूनही एखाद्या ठिकाणी गेल्यावर, मुलं कंटाळली की संदीप अपेक्षेने बघतो की पर्समध्ये कुठे काही सापडतं का त्यांना खायला द्यायला. तर कधी हातातल्या वस्तू ठेवायला सांगतो. मीही मग कधीकधी वैतागून पर्स घरीच ठेवून त्याच्या भरवशावर जाते बाहेर. पण खरं सांगू का, बायकांच्या पर्सला कितीही नावं ठेवली तरी एखादी लागणारी गोष्टं त्या पर्समध्येच मिळते. कधी किल्ली विसरली तर तिच्या पर्समध्ये ज्यादा किल्ली असतेच. बाबांच्याकडे न मागता येणारे पैसे आईकडूनच मिळतात. कधी आईबाबांना,'तुम्ही थांबा' म्हणत अभिमानाने हॉटेलचे बिल भरता येते आणि कधी पडून लागल्यावर एखादी band-aid पण असतेच नक्की.
          आपल्यासाठी पर्स हि केवळ पर्स नसते कधीच. कधी ती त्याने, भावाने कधी आईने दिलेले गिफ्ट असते. कधी पहिल्या पगाराची साठवण असते. कधी, 'मला स्वत: घेतलेली पर्स टिकत नाही' किंवा 'माझ्या पर्समध्ये पैसे कधी टिकत नाहीत' अशी मनाची ठाम समजूत असते. कधी फाटली असले तर चांगल्या दिवसांची ओढ असते. आत एखादी फाटकी नोट तर कधी जुन्या फोटोची जपणूक असते. कधी हरवून सापडलेल्या पर्सची मजेशीर गोष्ट असते. घरातून बाहेर पडताना हातात घ्यायची मनात नोंद असते तर 'फोन, किल्ल्या, पैसे' या यादीमध्ये भर असते.  ही आणि अशीच अजून काही कारणं असतील प्रत्येकाची. त्यामुळे कधीही ती सोडून लोकांच्या भरवशावर राहू नका. आपली पर्स नक्की जवळ बाळगा. आणि हो कधी त्यात हवी ती वस्तू शोधूनही दाखवा. :)

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/