Sunday, March 13, 2016

मेहेंदी

          मला मेहेंदी आवडते. अर्थात सध्या केसांना प्रत्येकवेळी लावताना, 'आपण ही वय न दाखवण्याची लढाई किती दिवस लढणार आहे' हा विचार मनात येतोच. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. मेहेंदी हातावर लावली की फार भारी वाटतं. अगदी कितीही सावळा हात असो किंवा छोटा. डिझाईन आली की आपोआप सुंदर दिसायला लागतो. अनेक वेळा लोक मेहेंदीचे डिझाईन टाकतात, मला फार इच्छा होते तसे काढायची. पण जमत नाही. बऱ्याच न जमणाऱ्या तरीही यावी अशी इच्छा असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी ती एक. मेहेंदी धुवून झाल्यावर दिवसभर मी हाताचा वास घेत बसते, तरीही मनाचं समाधान होत नाही. असो.
          मेहेंदी कधी नीट निरखून पाहिलीय का? काय दिसतं त्यात. ठराविक पॅटर्न परत परत काढला गेलेला असतो. प्रत्येक सुंदर मेहेंदी मध्ये एक पाच सात प्रकारचे वळणदार डिझाईन पुन्हा पुन्हा काढलेले असते.  तरीही पूर्ण झालेली डिझाईन किती सुंदर वाटते.  तशाच त्यात काही वेगळे जाड रेषांनी काढलेले एखादे फुल असते तर कधी कुणाचे नाव कोरलेले. जवळून पाहिले तर त्यात कधी एखादी चूक दिसतेही पण एकूण परिणाम जो असतो तो खासच.
          तसंच काहीसं आपल्या रोजच्या आयुष्यात चाललेलं असतं, नाही का ? विचार करा, कुठलीही छान आठवण कशामुळे तयार होते? शिकागोमध्ये असताना एका मैत्रिणीला रोज सकाळी न चुकता फोन करायचे. तेव्हा काही विशेष वाटायचं नाही पण आज त्याची एक छान आठवण झाली आहे.  परवा स्वनिक म्हणाला तू आम्हाला पुण्यात पनीरची भाजी बनवताना कसे वेगळे पनीर भाजून द्यायची, तसे देशील का? आता तेव्हा तो मोजून तीन-साडेतीन वर्षाचा होता तरीही त्याच्या आठवणीत ती गोष्टं राहिली. कशामुळे तर पॅटर्न. आमच्या घरी दर शनिवारी आई चकोल्या (वरणफळ किंवा चकुल्या) बनवते. गेले ३० वर्षं तरी झाली असतील. आजही मला चकुल्या केल्या की शनिवार असल्यासारखं वाटतं. कशामुळे तर पॅटर्न.
          एखादं शहर किंवा घर आवडणं म्हणजेही केवळ पॅटर्न. रोज सकाळी स्वयंपाकघरात मस्त ऊन येते. उन्हाने असं घर भरलं की सकाळ अजूनच उत्साही वाटू लागते. त्यात नियमितपणे कानावर पडणारा पक्षांचा आवाज किंवा रेडिओचा. दिवाळीला किंवा पाडव्याला सजवलं, सणावाराला मुलंबाळं, पाहुणे आले की ते घर अजून प्रिय वाटू लागतं. कशामुळे तर पॅटर्न. जसं चांगल्या आठवणी बनतात तसंच वाईटही. आजही मुंबईच्या घामजलेल्या ट्रेन ची आठवण झाली की नको वाटते. तो दुपारी ३ ते ११ चा ऑफिसला जाण्याचा काळ किंवा कॉलेजच्या मेस मध्ये मिळणारी कोबीची भाजी किंवा उसळ आजही आठवली की खायची इच्छा होत नाही. कधी बर्फ पाहून टोरांटो मधले तळघरातले थंडीचे दिवस आठवतात. तर एकूण काय चांगल्या किंवा वाईट आठवणी बनतात त्या केवळ आपल्याच एखाद्या पॅटर्नमुळे. 
          सध्या इथे थंडीमुळे बाहेर जास्त पडता येत नाही त्यामुळे शुक्रवारी घरी आले की मुलांना एखादा मुव्ही लावून देतो आणि अगदी मस्त लाईट बंद करून, पॉपकॉर्न हातात घेऊन मुव्हीचा आनंद घेतात. गेले दोन महिने असे दर शुक्रवारी केल्यामुळे आता पॅटर्न झाला आहे, दर शुक्रवार 'मुव्ही डे' बनला आहे. मुलांना एकदम उत्साह येतो शुक्रवार म्हणलं की. नवीन घरात येऊन दोन ३ महिने झालेत. विचार करतेय, इथल्याही अशा अनेक गोष्टीतून घडणारं आयुष्य मेहेंदीच्या डिझाईन सारखे एकत्र पाहिले की सुंदरच दिसेल का? 

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: