वाटलं नव्हतं रे तरुण राहणं इतकं अवघड असेल. म्हणजे बघ ना, रोज सकाळी उठून तितक्याच उत्साहाने तुला भेटायचं यात काही कष्ट असतात का? मी तुला विचारलं पण होतं, "अजून १५-२० वर्षांनी कसे असू रे आपण?" तर तू म्हणालास, "तेव्हाचं कुणी पाहिलंय?". मला राग आला होता. हो ना, एकतर तुझं माझ्यावर प्रेम राहणार याची तुला खात्री नव्हती किंवा माझ्या प्रेमावर तुझा विश्वास नव्हता.
तुझ्यासाठी छान आवरून तुला भेटणं यात काय अवघड होतं सांग बरं? बिनधास्त गाडीवरून फिरायचं, अख्खा दिवस-दिवस तुझ्या विचारात घालवायचा किंवा अख्खा पगार तुला वाढदिवसाला भेट घेण्यासाठी उडवायचा, यात न जमण्यासारखं काय असणार? तुझ्यासाठी एखादी प्रेमात चिंब कविता लिहायची किंवा एकच सिनेमा २-३ पाहायचा फक्त त्या एका गाण्यासाठी, यात सुख नाही तर अजून कशात? तुझ्यासोबत पावसात भिजायचं, टपरीवर स्वीट कॉर्न खायचं आणि तुझ्याकडे बघत बसायचं, किती छान?
अशा अनेक गोष्टी फक्त आपल्या दोघांसाठी. त्या विश्वात बाकी कुणीच नाही मग. अगदी,'करावं लागतं' म्हणत कराव्या लागणाऱ्या कुठल्याही गोष्टींना त्या विश्वात वाव नाही. तुझ्याइतकं, बाकी जीव ओवाळून प्रेम करण्यासाठी, दुसरं कुणीही नाही. किती अवघड असणार हे सर्व? आणि हे सर्व नाही, तर तारुण्य ते कशात? बेभान, जगाची पर्वा न करता जगायचं नाही तर मग आयुष्य ते काय?
असा सगळा विचार करतच बसले होते बघ, तेव्हढ्यात धाकटा पायाशी येऊन बोलला,"आई भूक लागली आहे." मग काय, सगळे विचार सोडून कामाला लागले ना. अरे हो, बाय द वे, Happy Anniversary !!
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment