Tuesday, September 20, 2016

Life is a Project

         आयुष्य म्हणजे एक प्रोजेक्टच आहे म्हणायचं. आधी शाळा, कॉलेज, मग नोकरी, मुलं, घर (or vice versa), त्यांची शिक्षणं, त्यांचे प्रोजेक्ट, मग त्यांची कॉलेजं, लग्नं, त्यांची मुलं..... आणि पुढे चालू. असो. इतक्या मोठ्या चक्राबद्दल बोलायला नको. पण जरा थोडे दिवस झाले की पुढे काहीतरी आलेलं असतंच. मुलांच्या शाळा संपल्या म्हणून भारत दौरा झाला, गणपती झाले. आता नवरात्र आले, दिवाळी आली. दोनेक वर्षांपूर्वी दिवाळीला पणत्या आणून घरी रंगवून सर्वांना भेट म्हणून दिल्या होत्या. आता परत तशाच पणत्या घेऊन आलेय. प्रवासात १०० पैकी १० फुटल्या. त्यामानानं बऱ्याच वाचल्या म्हणायच्या. आता दिवाळीच्या आधी त्या रंगवायच्या आहेत. 
          म्हटलं जरा कामाला लागावं तर लक्षात आलं, मागच्या वेळीच बहिणीने छोटे मातीचे फ्लॉवरपॉट आणले होते. मोठया हौसेने मागवले होते. मी स्वतः रंगवणार म्हणून. पण त्याच्या पॅकिंग मधूनही ते बाहेर आले नव्हते. म्हणलं, पणत्या नंतर करू आधी हे फ्लॉवर पॉट पूर्ण करू. त्यासाठी त्यांच्यावर डोक्यात वारली चित्रं काढायचं मनात होतं. घरात एखाद्या टेबलवर त्या फुलदाण्या छान दिसतील वारली चित्र असलेल्या. पण मला वारली चित्रं काढता कुठे येतात? 
         झालं, मग आता पणत्या आणि फुलदाण्या हे दोन्हीही बाजूला राहिले आहे. वारली चित्रकला आधी कागदावर तरी काढून पाहिली पाहिजे म्हणून गूगल वरून छोटी चित्रं पाहून काढायला सुरुवात केली. आधी वाटलं होतं किती सोप्पी आहेत ती. छ्या ! कितीही सोपी वाटली तरी त्यातला तो एकसारखेपणा पेन्सिलनेही काढता येत नाहीये, तर पेन्ट ब्रश दूरच राहिला. परवा दोन तासाच्या मीटिंगमध्ये हाताला चाळा म्हणून ते काढत बसले आणि चिडचिड झाली. त्यामुळे अगदी नीट येइपर्यंत तरी फुलदाण्या रंगणार नाहीत. 
       आता हे सर्व प्रयत्न चालू आहेत त्यातच सानूच्या शाळेतून एक 'कव्हर पिक्चर' काढायची नोटीस आलीय. त्याची मूळ कल्पना आहे, 'Together we can'. तर माझ्या डोक्यात आयडिया आली त्या कव्हरसाठी वारली चित्र काढले तर? वारलीच्या एका चित्रामध्ये एकमेकांच्या हातात हात घातलेले किंवा झाडांना पाणी घालणारे अशी अनेक चित्रं आहेत. यातल्या काही चित्रांचे मिळून एक बनवायचा विचार आहे. आता त्यासाठी साधा कागद वापरावा की कॅनव्हास, कुठले रंग वापरावे असे बाकी हजार विचार. 
        आता वर लिहिलेल्या सर्व गोष्टीतील एक जरी पूर्ण झाली तरी नशीब असं म्हणायला हवं... कारण.. अजून तीन आठवड्यात या वर्षाची हाफ मॅरॅथॉन आहे. आणि गेल्या तीन आठवड्यात काहीच सराव न झाल्याने कुठलाही सरावाचा दिवस टाळता येणार नाही. तर असं आहे एकूण.... :) एखादी गोष्ट करायला घ्यावी आणि त्याला हजार फाटे फुटावे ही काही पहिली वेळ नाही. आणि रोजच आपण अनेक प्लॅन बनवतो, त्याला असेच फाटे फुटतात आणि त्या फाट्याना अजून फाटे.... पण तरीही एका पाठोपाठ एक प्रोजेक्ट आपण करतच राहतो आणि कितीही फाटे फुटले तरी सुरुवातीला म्हणाले तसे एकाच चक्रात सर्वांची आयुष्यं अडकलेली असतात. नाही का? :)

विद्या भुतकर. 

No comments: