Monday, September 19, 2016

सहयाद्रीच्या रांगा

          ट्रेकींग हा असा अनुभव आहे जो मी केवळ भारतातच घेतला आहे आणि फक्त महाराष्ट्रातच, आपल्या सह्याद्रीतच. आपल्या पावसाची मजा मला बॉस्टन, शिकागोमध्ये कधी आली नाही. पुण्यात येत असतानाच, एक्सप्रेस वे वरून हिरव्यागार डोंगरांचं दर्शन झालं होतं. त्यावरून पडणारे छोटे झरे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी मधेच दिसणाऱ्या दऱ्या आणि त्यांना पटकन झाकणारे धुके. हे अनुभव शब्दांत सांगता येत नाहीत. ते केवळ स्वतः अनुभवावेच लागतात. तर हे सर्व आम्हाला पुन्हा एकदा अनुभवायचं होतंच त्यामुळे एखादा तरी ट्रेक व्हावा अशी इच्छा होती. नशिबाने  यावेळी पुन्हा एका ट्रेकला जायला मिळाले, जुन्या सहकाऱ्यांसोबत तुंग किल्ल्यावर.
        यावेळी ट्रेकची सर्व प्लॅनिंग आयती मिळाल्याने तसा बाकी व्याप नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काय न्यावं बॅगमध्ये हे १० मिनिटांत ठरवून भरून झालं होतं. मळले तरी चालतील असे कपडे, एखादे जॅकेट, एक ज्यादा कपड्यांची जोडी आणि खायचं सामान हे सर्व घेतलं. ठरलेल्या वेळेत निघालेली आणि पोचलेली ट्रिप तुरळकच. तरीही बरेच वेळेत निघालो होतो. सुरुवातीला सर्वजण जरा सेटल होत असतात. आम्ही चहाच्या एका टपरीवर चहा घेऊन गाडीत बसल्यावर गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या. तर ट्रेकच्या बसमध्ये सहसा, खाणारे, गाणारे, ओरडणारे आणि झोपणारे असे निदान चार प्रकारचे तरी लोक असतातच. आणि हो, ट्रेकमध्ये पुढे जात मार्ग दाखवणारे आणि सर्वांना घेऊन येत मागे असणारेही. माझी एक झोपही झाली. हळूहळू आम्ही छोट्या रस्त्यातून, घाटातून किल्ल्याकडे चाललो होतो. तर जसे जसे सह्याद्रीच्यामधून किल्ल्याकडे जात होतो, आम्हाला धुक्यातून दिसणाऱ्या रांगांचे दर्शन होत होते. किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन लवकरच ट्रेक सुरु झाला.
         ही पोस्ट मी केलेल्या त्या ट्रेक बद्दल नसून आजपर्यंत केलेल्या बऱ्याच ट्रेकची आहे. गड/किल्ला चढताना असणारा सुरुवातीचा उत्साह, कधी रिमझिम पाऊस यातून एक वेगळी प्रसन्नता असते. मिळेल त्या खाचातून पाय ठेवत, समोरून येणाऱ्या माणसांना रस्ता देत, कधी कुणाला लागेल तर हात देत प्रवास सुरु होतो. त्यात फोटो काढायची हौस असतेच, पण सोबत घेतलेलं सामानाचं ओझंही असतंच. आपण कसे उशिरा उठलो, धावत-पळत पोचलो, डब्यात काय घेतलं याच्या गप्पा असतात. जरा थोडं पुढे गेल्यावर जरा दमायला झालेलं असतं, चढही वाढायला लागलेला असतो. जसे वर चढू तसे काही लोकं विखुरले जातात. त्यांना मदत करत वर घेऊन येणारे असतातच. पुढे काय असेल याची उत्सुकता असणारे वेगाने पुढे जात राहतात. जोरात येणारा पाऊस किंवा कधी वाढणारं ऊन यातून प्रवास चालू असतो. एखाद्या ठिकाणी कुणीतरी बिस्किटाचा पुडा बाहेर काढतं आणि तिथेच एक ग्रुप जमा होतो. 
         एखाद्या अवघड ठिकाणी, आपण किती उंचावर आलोय हे जाणवायला लागतं. कुठल्या निमुळत्या रस्त्यावरून, घसरट पायवाटेवरून पुढे जायला भीती वाटायला लागते. एकमेकांना हात देत तो अवघड रस्ता पार केला जातो. खाचखळग्यातून वर जाताना, दोन्ही हात आधाराला लावलेले असताना, कधी वरून पडणाऱ्या पावसात चेहरा पूर्ण ओला होऊन जातो. गडाचा दरवाजा दिसायला लागला की आपणच गड सर केल्यासारखा ऊर भरून येतो. कुठल्याही गडाच्या दरवाज्यात लाखो लोकांनी काढलेले फोटो असतील. पायऱ्या चढत किल्ल्याच्या माचीवर, झेंडा लावलेल्या टोकावर पोचलो की बरेचदा एक पठार दिसतं. एखाद्या कोपऱ्यातल्या विहिरीचे अवशेष असतात, त्यात पावसानं पाणी साठलेलंच असतं. एखादं छोटं मंदिर असतं. बाकी लोक नको म्हणत असताना आपण थोडे पुढे जाऊन काहीतरी विशेष काम करण्याच्या प्रयत्नही केलेला असतो. फोटो काढून काहीतरी मिळवल्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो, पण आपला प्रवास संपला तरी पुढे काहीतरी असावं असं वाटत राहतं. कदाचित शिवाजी महाराजांच्या वाचलेल्या अनेक गोष्टींमधून आपल्यालाही काहीतरी गवसेल अशी अजूनही अपेक्षा असते. 
         तेव्हांच धुक्याच्या पार कुठेतरी दूर एखादं हिरवंगार गाव दिसतं. पाण्याने भरलेले वाफे दिसतात, भाताच्या शेतीच्या रांगा दिसतात, दूरवर सहयाद्रीच्या रांगा दिसतंच राहतात. मान कुठेही फिरवा, उंच त्या डोंगरांकडे पाहून मन आणि छाती भरून येते. त्या डोंगरावर कधी झरे दिसतात, तर ढगांचे लोट. एखादं मंदिरही दिसत राहतं. हे सर्व पाहताना, आपल्या गडावर, किल्ल्यावर आलेलं धुकं गालाला, हातांना लागून ते मऊ, ओलसर होतात. भूक तर जाम लागलेली असते. सर्वांनी आणलेल्या डब्यातलं सर्वच जेवण गोड लागत असतं. प्रत्येकानं जास्त घेऊन आल्यानं, पोट भरून जेवण होतं. डबे, पाण्याच्या बाटल्या संपून ओझं रिकामं होतं आणि परतीचा रस्ता सुरू होतो. 
          खरी मजा तर उतरताना असते. सकाळी धावत चढणारे तेच लोक आता हळूहळू पाय टाकायला लागतात. मोठ मोठ्या पायऱ्यांवरून उतरताना गुढग्यांची वाट लागते. कधी घसरट दगडांवरून एखादा घसरतोही. कधी ज्या दगडाला आधारासाठी हात लावतो तोच निखळून येतो. सकाळी स्वच्छ असलेले पायातले शूज लालसर मातीने आणि पावसाने एकदम ओळखू ही येणार नाही इतके बदललेले असतात. कुणाच्या बाटलीत पाणी आहे का, कुणाकडे खायला काही आहे का असे शोधत, तोंडात टाकत डोंगराच्या पायथ्याशी येऊनही जातो. या छोट्याशा सोबत असणारे, सकाळी अनोळखी असलेले लोकही एकदम ओळखीचे होऊन जातात, एखादा एकदम जवळचा मित्रही होऊन जातो. परतीच्या रस्त्यावरही उत्साह तसाच टिकून असेल तर मात्र मानलंच पाहिजे. काही ढेपाळून झोपून जातात, काही गप्पा मारत बाहेर बघत राहतात, तर काहींच्या भेंड्या अजूनही चालूच असतात. 
         बाहेर बघत तिथलं जग अनुभवताना काही गोष्टी लक्षात येतात. खरंच आपल्या राज्यात अजूनही इतका नयनरम्य निसर्ग आहे? खरंच इतक्या दुर्गम भागात लोक अजूनही मातीच्या घरात राहात आहेत? आणि चुलीवरचं जेवण कितीही आवडीने खाल्लं तरी, ते रोज खायला लागणारे लोक अजूनही तसंच आयुष्य काढत आहेत. अजूनही शाळा सुटलेली मुलं दुरून दुरून आपल्या घरी येताना दिसतात. इतके कष्ट करून त्यांना शाळेत जायला लागत आहे. अजूनही काही ठिकाणी वीज येत नाही. आणि हे सर्व आपल्यासारखे लोक केवळ एक दिवस मजा म्हणून जगत असले तरी, असं रोज आयुष्य कसं असेल? खरंतर मी एका छोट्या गावातच वाढलेय, पण तरीही ही इतकी दुर्गम गावं पाहिली की तिथे आधुनिकीकरण नाहीये म्हणून आनंद मानायचा की दुःख हे कळत नाही. कारण आपल्यासारखे अनेक लोक अजूनही तिथे जाऊन कचरा टाकून, प्लॅस्टिकच्या बाटल्या, चिप्सचे कव्हर तसेच टाकून जाताना दिसतात. त्यापेक्षा मग चुलीवरची भाकरीच बरी म्हणायची का? असो. 

         घर आलं की सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आपण एका वेगळ्याच जगात होतो याची प्रचिती येते. ते आवाज, धूर, धूळ आणि गर्दी यांचा सहवास नकोसा वाटतो. अशा वेळी उत्तम म्हणजे, गरम पाण्याने अंघोळ करून, जेवण करून पांघरून घेऊन झोपी जाणे. :) डोळे बंद केल्यावरही तेच रम्य दृश्य डोळ्यासमोर दिसत राहतं. कधी झोपेत चुकून दरीत कोसळल्याचा भासही होतो. सकाळी उठल्यावर दुखणाऱ्या पायांनी मात्र जमिनीवर आणलेलं असतं आणि आपण पुन्हा एकदा वर्षभरासाठी सहयाद्रीच्या त्या आठवणीवर पुढच्या ट्रेकची वाट बघत बसतो.
        






विद्या भुतकर.

No comments: