Tuesday, September 27, 2016

पोरं म्हणजे...... उपदव्याप

         काल एकतर सोमवार त्यामुळे ऑफिसमधून घरी येऊन सगळी रोजची कामं करायची या विचारानेच वैतागलेला जीव. त्यात जरा वेळ रनिंग करायचं होतं. सुदैवाने डोशाचे पीठ तयार असल्याने, पळून आल्यावर पटकन पोरांना डोसे करून द्यायचं ठरवलं आणि पळायला घरातून बाहेर पडले. पोरं संदीपसोबत लेगोचे छोटे ब्लॉक्सचा ट्रक बनवत बसले होते. पळायला सुरुवात करून पाच मिनिटं झाली आणि संदीपचा फोन आला. 'इतक्यात काय झालं?' म्हणून मी फोन उचलला तर मागून स्वनिकचा रडण्याचा आवाज येत होता आणि संदीप म्हणाला, 'घरी लवकर परत ये स्वनिकने नाकात लेगो चा ब्लॉक घातलाय'. त्याच्या आवाजानेच मला काही सुचेना. मी जोरात म्हणाले 'कॉल ९११' आणि जमेल तितक्या वेगाने पळत घरी यायला लागले. 
         आता विचार करा, घरापर्यंत पोहचेपर्यंत माझ्या डोक्यात इतके विचार येऊन गेले. त्यात अजूनही पोलीस किंवा ऍम्ब्युलन्सचा आवाज येत नव्हता. पुढचे तीन मिनिटं मी जीव तोडून पळाले. घरी पोचले तर स्वनिकच्या नाकातून रक्त येत होतं आणि तो रडत होता. ऍम्ब्युलन्स आली आणि मग मी त्याला घेऊन आत बसले. संदीप मागून गाडीतून  येऊ लागला. स्वनिक आता थोडा शांत झाला होता. आत आमच्या सोबत असलेल्या पॅरामेडिकला जमेल तशी हळू आवाजात बऱ्यापैकी उत्तरं देत होता. त्याच्यासोबत हॉस्पिटलला पोचले. तिथे 'कसं झालं हे?' या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागणारच होतं. आता खरंतर स्वनिक बराच समजूतदार मुलगा आहे आणि हे कसं झालं असावं हा आम्हालाही प्रश्नच पडला होता. पण नर्सला जेव्हा उत्तरं द्यायला लागतो तेव्हा असं वाटतं, एक पेरेंट म्हणून ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील? तिला कसं सांगणार की संदीप तिथे त्यांच्यासोबतच बसला होता तरीही हे असं घडलं? कधीतरी दोन मिनिटात हे घडलं होतं. आपण कितीही सावध असलो तरी एखादी घटना घडून जातेच, नाही का? 
        नर्सने मला विचारलं, 'तुम्ही ९११ का कॉल केला? त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता का?'.  म्हणजे पेरेंट म्हणून आपण घाईत जरा जास्तच घाईत निर्णय घेतला की काय असेही वाटू लागते. पण त्या क्षणाला आई-वडील म्हणून जी भीती असते त्याच्यापलीकडे कसलाही विचार मनात येत नाही. नंतर कितीही ते योग्य किंवा अयोग्य वाटले तरीही. सान्वीचाही सायकलवरून पडून एकदा हात फ्रॅक्चर झाला होता. तेव्हा मी थोडी शांत राहिले होते की हाताला कास्ट घालतील आणि निघून जाऊ. पण जेव्हा तिला आमच्यासमोर डॉक्टरनी भूल दिली तेव्हा मात्र माझा संयम ढळला होता आणि रडू फुटलं होतं. त्यामुळे कुठलाही प्रसंग कमी लेखायचा नाही हे कळलं होतं. असो. 
      स्वनिकची सर्व माहिती भरून बेड मिळाला. रूममध्ये घेऊन गेले तोवर संदीप आलाच होता मागून. बेडवर बसलेला स्वनिक पाहून वाटत होतं की एरवी 'बिग बॉय' आहेस ना म्हणून त्याच्याकडून मोठेपणाच्या ज्या अपेक्षा आम्ही ठेवतो त्यापेक्षा किती छोटा आहे तो? त्याच्याच बाबतीत नाही, सानूच्या बाबतीतही तिच्याकडे पाहून असंच वाटलं होतं. आपल्या मुलांकडून समजूतदारपणे वागण्याची किती अपेक्षा करतो आपण? अशा संकटप्रसंगी ते किती लहान आहेत ती याची जाणीव होत राहते. नाही का? त्यांच्या घाबरलेल्या किंवा रडून थकलेल्या चेहऱ्याकडून पाहून अजूनच वाईट वाटायला लागतं. त्यात काही खाल्लंही नाही, उपाशी तसेच आहेत म्हणलं की चेहरा अजून छोटा होतो. 
 
       स्वनिकला आम्ही विचारलं कसं काय झालं हे? तर तो म्हणत राहिला की 'चुकून गेला'. अशा वेळी काही जास्त विचारताही येत नाही. पण ब्लॉक्स खेळताना मधेच तो २-३ मिनिट जागेवर नव्हता तर संदीपने त्याला विचारलं,'तू स्वतः ते काढायचा प्रयत्न केलास का?' तर तो 'हो' म्हणाला. म्हणजे आपल्याला रागवायला नको म्हणून त्याने स्वतःच ते काढण्याचा प्रयत्न केला असणार. आता अशा वेळी त्याला कसं सांगणार की 'आम्ही नाही रागावणार तुला, पण तू आधी आई-बाबांना' सांगायचं जे काही झालं असेल ते? बरं त्यासाठी म्हणून मग कायमच प्रेमाने सांगायचं का पोरांना? रागावून सांगायचे प्रसंग येतच असतात. त्यांच्यापासून हे वेगळे कसे करणार? आम्ही त्याला समजावून सांगितलं की तू आमच्याकडे आधी आला असतास तर नसते झाले हे सर्व. त्याच्यासोबत सान्वीलाही समजावले.तीही शांतपणे जमेल तशी मदत करतच होती. 
      साधारण पाऊण-एक तासाने डॉक्टर आले. त्यांनी चेक केले आणि हवेच्या पंपाने तो लेगोचा तुकडा ओढून निघेल असा प्रयत्न करून बघू म्हणून सांगितले. आणि नाही जमले तर एका बारीक वाकलेल्या लांब काडीने आतून ओढून काढायचा प्रयत्न करू असेही सांगितले. आता तेही यशस्वी झाले नाही तर मात्र काय हे विचारायची माझी हिम्मत नव्हती. सानूसमोर हे नको म्हणून मी तिला बाहेर घेऊन गेले. थोड्या वेळाने डॉकटर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की तो तुकडा निघाला. तर सक्शन पंपाने ते निघाले नाही म्हणून त्यांनी तार घालून पटकन बाहेर काढले. हे ऐकून मी सुटकेचा निश्वास सोडला. संदीप त्यांच्याशी बोलत असताना, मी स्वनिकशी बोलत होते. तो मला म्हणाला,'मला दुखलं नाकात ते काढत असताना. पण मी रडलो नाही. एकदम ब्रेव्ह बॉय सारखा काढून घेतला.' हे ऐकून मात्र मला रडू फुटलं. खरंच कळत नाही काय करायचं या पोरांचं? 
      आई-वडील म्हणून आपल्यासमोर छोट्या-मोठ्या समस्या येतच असतात. पण अशा प्रसंगी मात्र खरंच कसोटी लागते. नियमितपणे मुलांना योग्य काय, अयोग्य काय हे समजावणे, शिवाय त्यांचा विश्वासही मिळवणे, काही चुकू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि लक्ष असूनही चुकलंच काही तर घाबरून न जाता योग्य निर्णय घेणे हे म्हणजे अग्निपरीक्षा आहे रोजची. अशा अजून किती असतील काय माहित? आम्ही लवकरच घरी येऊन मुलांना जेवायला देऊन झोपवून टीव्ही बघत बसलो. रुटीन पुन्हा सुरु झालं होतं. आणि आज......पुन्हा एकदा तेच लेगो ब्लॉक्स घेऊन संदीप त्यांच्यासोबत उरलेला ट्रक बनवत आहे. आणि हो, नाकातून बाहेर काढलेला तुकडा डॉक्टरने फेकून का दिला म्हणून स्वनिक कालपासून आमच्याशी वाद घालत आहे. आता काय करायचं? पोरं म्हणजे खरंच उपद्व्याप असतात एकेक.....पण शेवटी झालेल्या गोष्टी मागून टाकून पुढं जायला तर लागतंच..... होय ना? 

विद्या भुतकर.

No comments: