हुश्श ! पोचले एकदाची परत अमेरिकेत. गेले दोनेक आठवडे नुसती धावपळ चालू होती. यायची तयारी, खरेदी आणि त्यात गणपती येणार होते. गणपतीत आमच्या सोसायटीमध्ये जरा जास्तच जोश असतो. त्यामुळे त्यात मी, मुले सर्व झाडून सहभागी होतो. रोज संध्याकाळी प्रत्येकाची प्रॅक्टिस, त्यांच्या वेळा, जागा, त्यातून जेवण मग माझी प्रॅक्टिस, ऑफिस असा सगळा गोंधळ चालू होता. पण मजा आली खूप म्हणजे खूपच. गणपती हाच मुळात सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे सर्वजणच जोमाने तयारी करत असतात सोसायटीत. तर असे हे गणपतीचे ५ दिवस संपवून, सगळं बस्तान बांधून परत घरी आले आणि एकदम बोअर व्हायला लागलं. जरा स्थावर होऊन लिहायला घ्यावं म्हटलं. एकतर इतक्या दिवसांचं डोक्यात इतकं साचलेलं. सुरुवात कुठून करावी हा प्रश्नच होता. असो. नमनाला घडाभर तेल झालंच आहे, तर सुरुवातही करते.
वेगवेगळ्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर दिवसांतून निदान ३-४ वेळा तरी बायकांवर वेगवेगळे जोक्स येत असतात. अनेकदा अपमानकारक असतात. कधी उगाच ओढून ताणून आणलेले असतात. बरं, यावर काही बोलायला जावं तर ग्रुपवरची मुलं म्हणणार, " इतकं काय मनाला लावून घेतेस, जोक आहे." म्हणजे बाई म्हणून स्वतःवर केलेला जोक नाही आवडला तरी तेही बोलता येत नाही. त्यात नेहमी येणारा जोक म्हणजे, व्हॉट्स ऍप वर बायका केवळ सामोरासमोर नसतात त्यामुळेच इतका वेळ घालवू शकतात. एका ठिकाणी काहीतरी ध्येय घेऊन सर्वानी मिळून काहीतरी चांगलं काम करणं हे त्या जोकच्या दृष्टीने अशक्य वाटतं. पण सगळ्या जणींनी ठरवलं तर मजा, गप्पा टप्पा करता करता एखादं छान कामही होऊ शकतं याचा अनुभव मी गेल्या काही दिवसातच घेतला.
तर झालं असं की या वर्षी भारूड करण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे का अशी शेजारणीने विचारणा केली. जी मैत्रीण ते करणार होती, तिने ते लिहिलं होतंही. त्यामुळे बेसिक स्क्रिप्ट तयार होती. कुणा- कुणाला भाग घ्यायचा आहे ते ग्रुपमध्ये ऍड होत गेले. आणि एकूण १२ जणींचा ग्रुप जमला. तर भारुडची संकल्पना अशी होती की आपल्या रोजच्या वागण्यामुळे पृथ्वीवर त्याचा जो परिणाम होत आहे आणि तो कमी होण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे थोडक्यात मांडायचं. एकतर त्या मूळ स्क्रिप्ट मध्ये जसे लोक मिळत गेले तसे प्रत्येकीसाठी थोड्या ओळी त्यात ऍड केल्या गेल्या. त्याचसोबत बऱ्याच सुधारणा करत करत स्क्रिप्ट तयार होत गेली. त्याबाबतीत खूप काही मतभेद नव्हतेच. मजा यायची जेव्हा कुणी स्वतःचं वाक्य विसरतेय आणि बाकी सर्व तिच्याकडे बघताहेत. वाक्यरचना, बोलण्याची पध्द्त, तू असं बोल-मग मी असं उत्तर देईन, अशा अनेक गोष्टी घडल्या. आणि एकूण भारूड छान बसलं.
खरंतर स्क्रिप्टपेक्षा बाकी अनेक गोष्टीचा जास्त विचार करायला लागत होता. एकतर मुलांच्या प्रॅक्टिसच्या वेळा पाळायच्या असत. त्यात काहींजणी मुलांचे डान्स बसविणाऱ्या होत्या. काहींची मुले अगदीच लहान असल्याने त्यांना स्वतःच त्यांच्यासमोर उभं राहायला लागत होतं. संध्याकाळी ते सर्व उरकून, कुणी ऑफिसमधून उशिरा येणारी असायची तर कुणाचे जेवण करायलाही वेळ मिळत नव्हता. पण रात्री 'वेळेत या गं' म्हणत सर्वजणी एका ठिकाणी जमायचो. मग काय तास-दीडतासापैकी निम्मा वेळ तर 'ह्या ह्या' आणि 'खी खी' करण्यात जायचा. दोन वेळा मोजून सराव आणि मग उरलेला वेळात ड्रेस कुठला घालायचा यावर चर्चा. :) आणि मी म्हणते का करू नये मजा आणि गप्पा? उगाच काय सारखं 'काम- काम' करत बसायचं. जरा जास्त हसलं म्हणून काय बिघडतं? त्यामुळे मला तर वाटतं, मुलांपेक्षा आम्हा मुलींच्या तयारीतच जास्त मजा असते. जिच्याकडे सर्व असेल तिच्याकडे कॉफीही होऊन जायची.
आता त्यासाठी 'ड्रेस कुठला घालायचा' हे प्रकरण जरा गंभीर होतं. ड्रेस तसा साधाच हवा होता. पांढरा कुर्ता (जमल्यास लांब बाह्यांचा). पण आमच्या महाराज, म्हणजे भारुडात जी महाराज झाली होती आणि तिनेच हे दिगदर्शित केले, तिच्या म्हणण्यानुसार, आपण आपल्या गरजा कमीत कमी केल्या पाहिजेत. तर मग, एका भारूडासाठी नवीन कुर्ता आणणे योग्य नव्हते. मग काय करायचे? कुणाकडे तरी शोधायचा, मागायचा, भाड्याने आणायचा असे अनेक पर्याय वापरायचे असं ठरलं. अनेक प्रयत्नानंतर बऱ्याच जणींनी आहेत त्यात काम पार पाडले तर काहींनी विकत आणले. पण त्या निमित्ताने, आपण आपल्या गरजा कमी करणं किती अवघड झालं आहे हे लक्षात आलं. तर हे झालं कुर्त्याचं. खाली जीन्स घालायची का काळी लेगिंग यावर दोन दिवस चर्चा झालीच. त्यातून, जीन्स नक्की करण्यात आली होती. बरं, त्यातही किती प्रकार, फिकट निळी का गडद? तर गडद निळी नक्की झाली. पुढे मग कानात काय आणि गळ्यात, हातात काय घालायचं यावरही बरीच चर्चा झाली. अर्थात ८-९ मिनिटाच्या कार्यक्रमात हे दुरून कोण पाहणार होतं? पण प्रत्येक गोष्ट क्लिअर केलेली बरी, हो ना?
सगळ्यात शेवटचा मुद्दा होता तो म्हणजे फेटा बांधणे. पुन्हा एकदा नवीन न आणता, बरेच प्रयत्न करून वेगवेगळ्या ठिकाणाहून बरेच फेटे आम्हाला मिळाले. त्यात वेगवगेळ्या रंगाचे असल्याने कुणी कुठला घालावा यावर चर्चा क्रमप्राप्त होतीच. :) तरी एका मैत्रिणीचे भाऊजी फेटे बांधून देणार होते, त्यामुळे कधी, कुठे, कसे हे प्रश्न सुटले होते. बिचाऱ्यानी १३ जणींचे फेटे बांधून दिले. त्यात कुणाचा फेटा सुळसुळीत तर कुणाचे केस. त्यामुळे दोन चार परत बांधावे लागले. त्यात गणपतीच्या दिवशी सगळ्यांना घरची आरती, बिल्डिंगच्या गणपतीची आरती, प्रसाद हे सर्व होतंच. फेटे झाल्यावर, कपाळावर टिकली लावायची का आणि कुठली यावर बोलणं झालं. त्यात चंद्रकोर लावायची म्हंटल्यावर ज्यांनी फेटे बांधून दिले त्यांनीच सर्वांना छान चंद्रकोरही काढून दिली. बिचारे किती काय काय करणार त्यात आमचा गोंधळ. कुणाचा तुरा कमी तर कुणाचा जास्त. शिवाय सेल्फी, ग्रुप सेल्फी, प्रत्येकीच्या फोनमध्ये फोटो, ग्रुप फोटो हे सर्व प्रकार होतेच. :)
पण सर्व करून स्टेजवर सर्वजणी एकत्र आलो, भारूड छानच झालं. त्यातला मंत्र मुलाना, घरच्यांना सोप्या भाषेत सांगायचा होता, तेही केलंच. कुणाला वाटेल, इतक्या सर्व गोंधळात खरंच, मूळ विषयावर काही चर्चा झाली का? तर नुसती चर्चा नाही तर शेवटी प्रत्येकीने जे वाक्य घोषणा म्हणून दिले ते तिने स्वतः पाळायचे असेही ठरविले आहे. त्यातलीच ही काही वाक्यं:
१. ओला-सुका कचरा वेगळा करू.
२. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करू
३. प्लॅस्टिकच्या भेटवस्तू देणं टाळू.
४. पाण्याचा वापर कमीत कमी करू.
५. विजेचा अपव्यय टाळू.
६. थर्माकोलचा वापर बंद करू.
७. नदीत कचरा टाकणार नाही.
८. फिनाईल, शॅम्पू, साबण यांना पर्याय शोधू.
९. वापरलेलं प्लास्टिक रिसायकल करू.
एकूण काय तर हा एकूणच अनुभव आम्हा सर्व जणींसाठी एक चांगला पार पाडलेला प्रोजेक्ट्च होता. त्यातून प्रत्येकीला काही ना काही मिळालं. घरचं, मुलांचं, सणासुदीचा सर्व आवरून, नीट पार पडलेला कार्यक्रम तो. तर आमच्या भारुडामध्ये केवळ हसणे-खिदळणे नाही तर अशा विचार प्रवृत्त करणारी बोलणीही झाली आणि त्याने त्या त्या घरातही फरक पडेल. अगदी, गेल्या दोन दिवसांपासून मी बाहेर जेवायला गेल्यावर आपण उगाच ज्यादा घेऊन येत असलेल्या प्लस्टिकच्या चमच्यांचा विचार केला. किंवा डब्यात स्वतःचा चमचा नेला तर कॅफे मधून प्लास्टिकचा चमचा घ्यावा लागणार नाही हाही विचार केला. घरी आम्ही ऑलिव्ह वापरतो, त्याचे एकदम छोटे प्लास्टिकचे कप आणतो. प्रत्येवेळी तो कप टाकून दिला जातो. तर आता मी, बरणीच आणायचं ठरवलं आहे. खरंच चर्चेमुळे आमच्या वागण्यात नक्कीच फरक पडला आहे. तुम्हालाही यातील काही गोष्टी अंमलात आणायचा विचार आला तर अजून उत्तम. :)
तर मंडळी, अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पर्यावरणाचा ऱ्हास टाळू शकतो आणि ही पृथ्वी आपल्या मुलांसाठी जपून ठेवू शकतो.
'बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ।।'
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment