शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना प्रत्येकवर्षी ठरवायचे, यावर्षी एकदम सुरुवातीपासून मन लावून अभ्यास करायचा. कितीही केले तरी परीक्षेच्या वेळी होणारी धावपण व्हायचीच, विशेषतः कॉलेजमध्ये. त्याप्रमाणेच सानूची शाळा, म्हणजे ती बालवाडीत होती तेंव्हापासून दार वर्षी ठरवतो, तिच्या अभ्यासाकडे, बाकी ऍक्टिव्हिटी कडे अजून जास्त लक्ष द्यायचे, वेळ द्यायचा, तरीही एखादी पेरेंट-टीचर मिटिंग चुकलीच आहे, अनेक नोटिसा अगदी शेवटच्या दिवशी सह्या करून दिल्यात किंवा एखाद्या प्रोजेक्ट्च्या वेळी द्यायचे सामान राहून गेले आहे. आणि हो ज्या दिवशी 'रेड डे' म्हणून लाल रंगाचे कपडे घालायचे असतील तेव्हा हमखास निळे-हिरवे-पिवळे घालून गेलो आहे. ती ४-५ वर्षाची असताना बरेचवेळा पुण्याच्या शाळेत एखादा अंक किंवा अक्षर
२५-३० वेळा लिहून आणायचं होमवर्क असायचं. मी म्हणायचे जाऊ दे, लिहिता येतंय
ना, मग कशाला ३० वेळा काढायला लावायचं? अशा वेळी टिचरकडून 'होमवर्क पूर्ण
करून पाठवा' अशा नोटही आलेल्या आहेत. एकूण काय की थोडे इकडे-तिकडे झालेच आहे.
बरं नुसते शाळेतला अभ्यास नाही. त्यासोबत एखादा खेळ किंवा कलाही शिकवावी म्हटलं. पोहायला सर्दी होते म्हणून दोन-तीन वेळा राहिलं, तर एकदा हात मोडला म्हणून. कधी घर बदलले म्हणून चित्रकलेचा क्लास मागे पडून गेला. अशा एक ना अनेक गोष्टी. जागरूक आई-वडील म्हणून कितीही धावपळ करायची म्हटलं तरी काहीतरी राहून जायचेच. पण यावेळी आम्ही अगदी ठामच ठरवले, वेळच्या वेळी सर्व कामे करून, पोरांचे अभ्यास घेऊन, बाकी सर्व क्लासही वेळेत करून घ्यायचे. त्याप्रमाणे शाळेतल्या सर्व नोटिसांना वेळेत सह्या करून पाठवल्या, शाळेत लागणाऱ्या मदतीलाही भाग घेतला (PTO मध्ये). ऍक्टिव्हिटी सेंटर ला गेलो तर पोहायचे, जिम्नॅस्टिकचे आणि सॉकरचे सर्व सेशन आधीच भरून गेले होते. ice skating हा आम्हाला हवा असलेला एकमेव क्लास वेळेत मिळाला त्यामुळे ते तरी काम पूर्ण झाले होते. सानूची चित्रकला छान आहे असे आम्हाला वाटते म्हणून तिचा मागच्या वर्षी अर्धवट राहिलेला क्लासही लवकरच सुरु होणार आहे. अशा रीतीने निदान मागच्या वर्षीपेक्षा बरीच प्रगती आहे म्हणायची.
आता यात पोरीला किती पिडणार? असे विचारही अनेक लोकांच्या मनात आले असतील. बरोबर! मलाही हे असेच वाटायचे. कशाला उगाच पोरांना ढीगभर क्लासला घालायचे आणि त्रास द्यायचा? त्यामुळे बरेच वेळा माहिती असूनही आम्ही बरेच क्लास लावले नाहीत. पण यावेळी म्हटले एक प्रयत्न तरी करून बघू. आता यात होते काय की आजपर्यंत तरी असे कुठलेही गुण आमच्या मुलांचे दिसले नाहीयेत ज्यामुळे आम्ही म्हणू शकू की 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात'. त्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीत प्रोत्साहन दिले पाहिजे हे कळत नाही. आता स्वनिकला वाचनाची आवड लवकर लागली आणि तो ५ वर्षाच्या आतच बरंच छान वाचू शकतो हे कळलं. तर कधी त्याला गाणी ऐकायला प्रचंड आवडतं हेही दिसतं. आम्ही काही कलाकार नाही, अशा वेळी त्याला एखाद्या क्लासला लावूनच त्याला त्यात आवड आहे की नाही हे पाहू शकतो ना? त्यामुळे एक अभ्यासाचं क्लास, एक खेळाचा आणि एक कलेचा असे तीन क्लास झालेच. बरोबर? आजकाल अनेक पालक जागरूक राहून मुलांच्या भल्यासाठी त्यांना या सर्व
क्लासमध्ये घालून प्रोत्साहन देतात. त्यात 'मला हे सर्व करायला मिळालं नाही
तर मुलाला तरी मिळू दे' अशी सदिच्छाही असतेच.
आता याची दुसरी बाजू अशी की हे सर्व केल्यामुळे मुलांची दमछाक होते असेही बोलले जाते. त्यांच्यावर नको इतके ओझे लादले जाते किंवा त्यांचं बालपणच हरवलंय हेही बोललं जातं. पण खरं सांगू? एक आई म्हणून आपल्या मुलाची काय आवड असेल हे लहान वयात ओळखणे अवघड आहे. पण त्याचसोबत त्याचा कल कशाकडे असेल हे पाहण्यासाठी त्याला सर्व संधी उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. कदाचित पुढे जाऊन मुलाचा कल पाहून त्यांना त्या त्या आवडीच्या गोष्टीला प्रोत्साहन देताही येईल. पण अशा अनेक गोष्टी असतात ज्या लहानपणापासून सुरु केल्यास त्यांचा सराव चांगला होतो किंवा हात चांगला बसतो असे असेल. उदा: झाकीर हुसैन, लता मंगेशकर यांनीही लहानपणापासूनच सराव केला असेल ना? त्यांच्या घरी संगीताचं वातावरण असेल, माझ्या घरी नाहीये तर मला कसं कळणार काय केलं पाहिजे?तर आपण पालक म्हणून आपल्या पाल्याची आवड निवड ओळखणं खरंच अवघड आहे आणि ती कळेपर्यंत तरी अशा अनेक संधी त्यांना आपण दिल्याच पाहिजेत असं मला आता वाटू लागलंय.
खरं सांगू का? अगदी बाळ पोटात असल्यापासून ते जन्मानंतर पुढे त्याची वाढ कशी होत आहे हे बघायला डॉक्टर तर असतातच. पण इंटरनेटवरही बरीच माहिती मिळते, एक पालक म्हणून आपण कसं वागलं पाहिजे किंवा नाही याच्यावर ढिगाने पुस्तकं मिळतील. पुढे एखादा खेळाडू, गायक, अभिनेता आपल्या आईवडिलांच्या मताविरुद्ध जाऊन कसा यशस्वी झाला हे सांगणारे अनेक चित्रपट आणि पुस्तकंही मिळतील. पण एखाद्या मोठया व्यक्तीच्या आई-वडिलांचं एखादं पुस्तक कुणाला आठवतंय का? आता PV Sindhu च्या आई-वडिलांनी तिच्यासाठी बरीच मेहनत घेतली असणार, पण त्यांच्यावर पुढे जाऊन पुस्तक थोडीच लिहिलं जाणार आहे? किंवा मी माझ्या मुलींसाठी कसे कष्ट घेतले यावर ते लिहितील का? मला शंकाच वाटते. कितीही मोठी व्यक्ती असली तरी तिच्या आई-वडिलांनी तिच्यावर घेतलेली मेहनत कशी घेतली असेल हे नेहमी एक कोडेच राहते. त्यांना कसं कळलं आपल्या मुलाला हे शिकवलं पाहिजे, इ?
मला असं वाटतं की भारतातही अनेक आईवडील आहेत ज्यांना आपल्या मुलाला अशा संधी द्यायच्या असतात, त्यांनी ऑलम्पिक मध्ये चांगली कामगिरी करावी असं त्यांना वाटत असेल. पण सुरुवात कुठून आणि कशी करायची? कधी ठरवायचं की माझ्या मुलाला किंवा मुलीला केवळ सोबत राहून मदत करण्यासाठी मी आहे ते माझं सर्व करियरही सोडलं पाहिजे? कुठले तरी त्याग कुणीतरी केलेच असतील ना? कोण सांगणार हे सर्व? बरं, एखाद्या 'दीपा करमाकर' ला असं वाटलं असेल ना 'माझे आई वडील मला किती त्रास देत आहेत'. पण केवळ त्यांच्या आग्रहामुळे, 'तू हे करू शकतेस' या विश्वासामुळे तिने खेळ चालू ठेवला असेल? नक्की कुठल्या वेळेला आपण थांबायचं? आणि मुलाला त्याच्या मनाप्रमाणे करू द्यायचं हे कसं कळणार? स्केटिंग क्लासच्या पायऱ्यांवर बसून मी आणि संदीप बोलत होतो,"हे मोठ्या खेळाडूंच्या आईवडिलांनाही असेच त्यांना वेळेत क्लास लावले असतील का?" कुठेतरी त्यांनीही सुरुवात केलीच असेल ना? कुणाला आवडेल आपल्या मुलाची एकच आवड असताना हजार क्लासेस लावायला?
खरंच असं कुणाचं एखादं पुस्तक मिळालं तर? अशा किती आईवडिलांची पुस्तकं असतील? समजा हिंदी, इंग्रजी, मराठी सर्व भाषा
मिळून २००-३०० पुस्तकं जरी असती तर त्यातलं एखादं फायद्याचं झालं असतं.
जगात अनेक प्रसिद्ध व्यक्तींची किंवा त्यांच्यावर लिहिलेली हजारो पुस्तकं
असतील, पण आई वडिलांवर किंवा त्यांचे स्वतः लिहिलेले मात्र जवळ जवळ नाहीच? मी तर म्हणते भरपूर पाहिजेत. निदान आमच्यासारख्या पामराला त्याचा नक्कीच फायदा होईल. आमचे आणि पोरांचेही जरा भले होईल. होय ना? असो. लेख खूप मोठा झाला. तरीही साध्य काहीच नाही. आपल्याकडे मुलं इंजिनियर झाली म्हणून त्याच्या मागे लाखो होतात आणि त्यांना मार्गदर्शन करायला हजारो क्लासेस असतात. पण मग इतक्या आई-वडिलांमध्ये 'Being Parents of अमुक तमुक' हे लिहिणारे निदान हाताच्या बोटावर मोजण्याइतकी तरी पाहिजेत ना? तुम्हाला काय वाटतं?
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment