आमचा एक मित्र म्हणत असतो की तुमच्या घरी नेहमी काही ना काही किस्से होतंच असतात. काय करणार? कितीही टाळायचं म्हटलं तरी झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि खरंतर मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा एकूणच अनेक अनुभवांमुळे मी थोडी भित्री झालेय म्हटलं तरी चालेल. असो. आजची पोस्ट त्यावर नाही. सलग दोन दिवसांत असं काही झालं त्यामुळे आपल्या प्रायॉरिटीज कशा बदलतात याचा अनुभव आला. म्हणून म्हटलं लिहावं.
विकेंडला पाणी पुरी बनवायची होती. मी पणत्यांचा पसारा आवरत होते तेव्हढ्यात संदीपला म्हटलं पाणीपुरीचा तिखट मसाला मिक्सरला बारीक करून घेशील का? तो ते करत असताना एकदम जोरात त्याचे पाणी उडाले आणि त्याच्या डोळ्यांत गेले. हिरव्या मिरच्या असल्याने आम्ही दोघेही एकदम गडबडलो. त्याला धरून पटकन बाथरुमकडे घेऊन गेले. तिथे त्याने डोळ्यांवर जोरजोरात पाणी मारले. सतत पाणी मारून डोळे लाल झाले थोडे पण दोनेक तासात डोळे ठीक झाले आणि आगही कमी झाली होती.
दुसऱ्याच दिवशी मी कसला मसाला बारीक करत असतानाही तो गरम असल्याने पटकन थोडेसे बाहेर आले. (clearly we need to work on our mixer or our mixer handling skills) तरीही ताजाच अनुभव असल्याने मी जपूनच करत होते. त्यामुळे झालं काय की जे काही थोडेसे उडाले ते माझ्या स्वेटर आणि भिंतीवर उडाले. एकतर नुकताच संदीपचा किस्सा झाल्याने मला कळत नव्हतं की नक्की काय गोंधळ होतोय त्या मिक्सरचा. पण माझ्या लाईट कलरच्या स्वेटरवर उडाल्याने मी जरा वैतागले होते. एकतर ते हळदीचे डाग निघणार का असा मला प्रश्न पडला होता. संदीप भिंत पुसायला आणि मी स्वेटर साफ करायला गेले.
मी नंतर विचार करत होते, संदीपच्या डोळ्यांत जेव्हा तिखट गेले तेव्हा त्याने कुठला शर्ट घातला होता किंवा त्यावर डाग पडले किंवा नाही याचा विचारही आमच्या डोक्यांत आला नाही कारण त्या क्षणाला त्याचे डोळे ठीक असणं महत्वाचं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी मी ठीक होते त्यामुळे आता माझी प्रायॉरीटी बदलून स्वेटर आणि भिंतीची सफाई झाले होते. परिस्थितीनुसार महत्व कशाला द्यायचे कसे बदलते याचं एक उत्तम उदाहरण होते ते.
अनेकवेळा आपण उशीर झालाय म्हणून कुठेतरी घाईत निघतो, किंवा गाडी जोरात चालवतो. त्या क्षणाला वेळेत पोहोचणे महत्वाचे असते. पण तेच जर कुठे अपघात झाला तर? तेव्हा कितीही महत्वाची मिटिंग असो, स्वतःचा जीव महत्वाचा असतो. त्या क्षणाला कुठलीही गोष्ट मग महत्वाची वाटत नाही. बरोबर ना? मुलांचा अभ्यास त्यांचे मार्क यावर होणारी चिडचिड हे सर्व दुय्यम वाटायला लागतं जेव्हा ते आजारी पडतात. अर्थात या सर्वांसाठी काय करायला हवं मलाही कळत नाही. पण निदान असे किस्से झाल्यावर त्या त्या गोष्टीचं महत्व समोर येतं इतकं खरं.
हां पण, अशा काही गोष्टी आहेत की ज्या वेळ गेल्यावर परत नक्कीच येत नाही. एखादं स्वप्नं पूर्ण करण्याची संधी, मुलांचं बालपण, शारीरिक स्वाथ्याकडे केलेलं दुर्लक्ष, आपल्या लोकांना न दिलेला वेळ निदान अशा बाबतीत तरी आपण कशाला महत्व द्यायचं हे नक्की केलं पाहिजे. म्हणजे निदान त्या बाबतीत तरी डोळे उघडण्यासाठी असे काही किस्से व्हायला नकोत. बरोबर ना?
हां पण, अशा काही गोष्टी आहेत की ज्या वेळ गेल्यावर परत नक्कीच येत नाही. एखादं स्वप्नं पूर्ण करण्याची संधी, मुलांचं बालपण, शारीरिक स्वाथ्याकडे केलेलं दुर्लक्ष, आपल्या लोकांना न दिलेला वेळ निदान अशा बाबतीत तरी आपण कशाला महत्व द्यायचं हे नक्की केलं पाहिजे. म्हणजे निदान त्या बाबतीत तरी डोळे उघडण्यासाठी असे काही किस्से व्हायला नकोत. बरोबर ना?
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment